ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, या म्हणीप्रमाणे चार वेळा पक्ष बदलणार्या मा. नीलमताई गोर्हे यांनी आजपर्यंत किती पोळ्या खाऊन किती टाळ्या पिटल्या असतील त्याची नोंद गिनिज बुकात नक्की होईल याची मला खात्री आहे, असे आत्मविश्वासात्मक उद्गार माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने माझ्यापाशी काढले, तेव्हा मीही त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. म्हटलं, पोक्या यात त्यांची काहीच चूक नाही. अरे, तू म्हणशील की, त्या खाल्ल्या मिठाला जागल्या नाहीत, पण तुला हे माहीत नाही की प्रकाश आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्यापासून आता शिंदे गटात जाईपर्यंत त्यांनी मिठाची चव कधी चाखलेलीच नाही. आपल्या नव्या दैवताची मर्जी राखायची असेल आणि त्याच्याकडून भविष्यकाळात बरंच काही मिळवायचं असेल तर त्यासाठी त्याची भलावण करत सोडचिट्ठी देऊन आलेल्या पक्षाच्या पॉवरफुल्ल नेत्यांवर दुगाण्या
झाडाव्याच लागतात. त्यासाठी त्यांना गल्लीकुचीपासून नवी दिल्लीतील साहित्य संमेलनापर्यंत कुठलंही व्यासपीठ चालतं. मग साहित्य संमेलनातील ‘आम्ही असे घडलो’ या विषयावरील परिसंवादाचा विषय लक्षात न घेता ‘आम्ही असे बिघडलो’ असं त्याचं विद्रुपीकरणही त्या करतात. संमेलनात कारण नसताना मर्सिडीजचा विषय काढून आपली गाडी मुख्य रस्त्यावरून हटवून ती आडमार्गाला कशी न्यायची याचं गणित त्यांनी आधीच मनात पक्कं केलेलं असतं. नंतर पत्रकारांनी त्यांना या विषयावर छेडलं तेव्हा अगदी साळसूदपणाचा भाव चेहर्यावर आणत, बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असे त्या मानभावीपणे म्हणाल्या. याला फक्त बनेलपणा नाही, तर हरामखोरी म्हणतात. सभ्य आणि सुसंस्कृतपणाचा आव आणणार्या या बाई इतक्या पोचलेल्या असतील याची कल्पना आमच्या बिचार्या पोक्यालाही नव्हती. मी त्याला म्हणालोसुद्धा, पोक्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून रणरागिणीच्या आवेशात केंद्रातील सत्ताधार्यांनाच नव्हे, तर पंतप्रधानांना खडे बोल त्यांच्यासमोरच सुनावणार्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर कुठे आणि आपली राजकीय धुणी संमेलनाच्या व्यासपीठावर धुण्यासाठी आलेल्या या क्षुद्र वृत्तीच्या नीलम गोर्हे कुठे?… हे ऐकल्यावर पोक्याही संतापाने पेटून उठला. मला म्हणाला, मी आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारतो… त्यावर मी म्हणालो, पोक्या असं काही करण्याची गरज नाही. नीलम गोर्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनी त्यांची गणना कशात केलीय हे तू लक्षात घे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही, कुठल्या व्यासपीठावरून आपण काय बोलत आहोत याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं, असा सणसणीत टोलाही त्यांना लगावलाय. त्याशिवाय काही आजी माजी नेत्यांनीही त्या एखादं काम करण्यासाठी किंवा एखादं प्रकरण चव्हाट्यावर न आणण्यासाठी किती लाख घेत होत्या, असं न घाबरता सांगितलंय. काहींनी तर त्यांच्याकडे पन्नास कोटींहून संपत्ती कशी आली याचा हिशोबच मांडायला सांगितलंय. महाराष्ट्रातल्या एकाही वृत्तपत्राने बाईंची बाजू न घेता त्यांची खरडपट्टीच काढलीय. शिंदेंच्या गटात बाळासाहेबांच्या शिवसेनेला शिव्या देत आपल्याबद्दल आदर वाढवावा आणि भविष्यात आपलं स्थान बळकट करावं एवढ्याच स्वार्थी आणि आप्पलपोट्या वृत्तीने त्यांनी साहित्य संमेलनाच्या पवित्र व्यासपीठावरून, ज्यांच्यामुळे त्या मोठ्या झाल्या त्या शिवसेनेच्या नेतृत्त्वावर विषाचे फुत्कार सोडले. अरे पोक्या, जर त्या कर्तृत्त्वाने एवढ्या मोठ्या होत्या तर त्यांच्यापाठी त्यांचे हजारो अनुयायी असायला हवे होते, पण चार टकलीही चार पक्षांत त्यांच्यामागे नव्हती. मुळात शिंदे गटाने सुरतमार्गे गौहाती असा खोकेमय प्रवास करून, गौहातीला दारू पिऊन जो नंगानाच केला, गोव्याचीही सहल केली, त्या कुठल्याही कटात त्यावेळी त्या सामील नव्हत्या. कारण अशा राडेबाज राजकारणाची, रस्त्यावर उतरून धरणे धरण्याची, आक्रमक आंदोलन करण्याची त्यांना सवयच नव्हती. शिंदेंना जेव्हा शिवसेना फोडण्याची सुपारी यशस्वी केल्याच्या बदल्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, तेव्हा केवळ सत्ताधार्यांच्या गटात जाऊन आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या स्वार्थी इराद्याने बाईंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला टांग मारली आणि त्या शिंदे गटात गेल्या. त्या गेल्या नसत्या, तर त्यांनी कोट्यवधींची संपत्ती कशी गोळा केली हे समजून घेण्यासाठी भाजपाने त्यांच्यामागे ईडीचा लकडा लावला असता. इथे काहीही न करता आयत्या बिळावर नागिणीसारख्या त्या बसल्या. त्यानंतर अजितदादांच्या गटालाही भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून शुद्ध करण्यात आलं. दादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. पोक्या, असा हा भ्रष्टाचारी, संधीसाधू, स्वार्थसाधू नेत्यांचा आणि अक्कलशून्य समजल्या जाणार्या मूर्खांच्या नंदनवनात वावरणार्या लाळघोट्या व्यक्तींचा गोतावळा आहे. अशा लोकांमुळे भाजपाची आधीच बदनाम झालेली प्रतिमा दिवसेंदिवस अधिक बदनाम होतेय. त्याचे परिणाम फडणवीसांना भोगावे लागतायत. त्या शिंदेंचे रूसवेफुगवे निस्तरताना शिंदेंची लवकरात लवकर हकालपट्टी कशी करता येईल याचा विचार करून त्यांचे पंख कापण्याचं काम सध्या मुख्यमंत्री चोख करताहेत. उद्या शिंदे गावातल्या आपल्या घरी बसल्यावर शिंदेंच्ो जवळचे सहकारी शिंदेंना सोडून भाजपामध्ये कधी पलायन करतील हे समजणारही नाही. आता शिंदेंना खूश करण्यासाठी आपला मूर्खपणा पणाला लावणार्या या गोर्हेबाईंची मर्सिडीज तेव्हा कुठल्या बोगद्यात असेल याची फक्त कल्पना करून बघ पोक्या, तेव्हा ना घर की, ना घाट की असं म्हणू नकोस.