लाख गाव. गावातील दफ्तरी खोकनाथ खुर्चीत बसलेला. समोरल्या मेजावर चौथाई वसुलीतून वा शिफारशीच्या रदबदलीसाठी मिळालेल्या धनातून मेजवानी भरवली गेलेली. असंख्य प्रकारचे उंची, दुर्मिळ, रुचकर खाद्यपदार्थ तेथे ठेवले गेलेले. खोकनाथ दाढी कुरवाळत एकवेळ त्या सर्व पदार्थांवरून नजर फिरवतो. आणि स्वतःच्या हुशारीवर खुश होत सुहास्य वदनाने एक एक पदार्थ निरखू लागतो. तोच चिंताग्रस्त कळणीस घाईने आत येतो. दफ्तरी मेजावर बसून मेजवानी झोडणार्या खोकनाथाकडे नजर जाताच त्याच्या कपाळावर आठ्या पसरतात.
‘काय आहे हे? निदान दिवसाउजेडी तरी असल्या मेजवान्या टाळायला हव्यात ना?’ शक्य तितका राग आवरत कळणीस सुनावतो.
‘छ्या! दफ्तरी माश्या खूप झाल्या नाही?’ पदार्थांवर बसलेल्या माश्या दोन्ही हातांनी हाकलत आपल्याच मेजवानीत मग्न खोकनाथ.
‘मी काही तरी म्हणतोय हो!’ खोकनाथचं ध्यान वळवण्याचा कळणीसचा प्रयत्न.
‘तर्री? तर्री मस्त आहे हो! मसालेदार, रुचकर आणि…’ खोकनाथ अजिबात विचलित न होता मेजवानीवर लक्ष कायम ठेवतो.
‘खोकनाथ! मी ह्या मेजवान्या दिवसा करत जाऊ नका म्हणतोय! किमान दफ्तरी तरी…’ कळणीस मोठ्याने ओरडतो.
‘हा आता लोकं प्रेमाने आणतात आमच्यासाठी खाऊ! त्यांच्यासमोरच दोन घास घेतले म्हणजे त्यांना समाधान मिळतं,’ खोकनाथ जिलबी तोडत निर्लज्जपणे उत्तरतो.
त्याला डोकं लावण्याने काहीही हशील नाही हे बघून कळणीस आल्या कामास लागतो. कोपर्यातील कपाटं, फडताळं वगैरे नुसत्या शंकेनं चाचपू लागतो. एक एक फाईल, एक एक कागद निरखून पाहात काही आवश्यक कागदं काळजीपूर्वक शोधू लागतो. पूर्ण फायलींच्या गठ्ठ्यांवर बसलेली धूळ झटकत आणि जाळं बाजूला करत उचक पाचक करू लागतो. काही कागदांना बारकाईने न्याहाळत बाजूला काढतो. काही कागदं चिडून फाडून टाकतो.
‘ही रबडी गायीच्या दुधापासून बनवलेली दिसतेय. म्हशीचे दूध असते ना तर चव छान झाली असती!’ तोंडाला लावलेली एक वाटी खाली ठेवत खोकनाथ उद्गारतो.
फायलींच्या ढिगार्याआडून कळणीस फक्त जळजळीत नजरेने त्याच्याकडे बघतो आणि तावातावाने पुन्हा शोधकार्य चालू ठेवतो.
‘बाकी काही म्हणा, कळणीस! आमच्या कातार्याकडे ज्या म्हशी मिळतात ना, त्यांच्या घट्ट दुधाची सर इथल्या मलईला सुद्धा नाही,’ एक गुलाबजाम बळजोरीने कंठात ढकलत खोकनाथ बोलत जातो.
‘मग आता ह्या दफ्तरी म्हशींचा गोठा बांधून घ्या! कातार्यासारखाच, काय?’ कळणीस खोचकपणे सल्ला देतो.
‘तेही बरोबर होईल की हो! दफ्तरीची जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतल्यापासून मला वेळच वेळ असतो. दोन म्हशींचे दूध काढण्यात नक्की चांगला वेळ जाईल. वर उठसुट गावी शेतात जाण्याऐवजी हे सोपं होईल!’ खोकनाथ सल्ला गंभीरपणे घेतोय हे बघून कळणीस कपाळाला हात मारून घेत पुन्हा फायली चाळू लागतो.
उजवीकडच्या फायली चाळून झाल्यावर डावीकडल्या फायली बघू लागतो. मधूनच चष्म्याचं भिंग नीट करण्यासाठी चारदोन वेळा चष्माच काढून मागे-पुढे सरकवून बघतो. पुन्हा आपल्याच कामात रमल्यावर अचानक जुनाट कागदांवरून एक पाल त्याच्या हातावर उडी घेते, ‘आऽऽईऽ!’ किंचाळत तो उठून उडी मारतो. हातपाय चारी दिशांना झटकत पाच फूट लांब जाऊन उभा राहतो. भीतीने आणि संशयाने चौफेर बारीक नजर टाकत पाल खाली कुठे पडली ते शोधू लागतो.
‘ह्यॅऽऽऽ ह्यॅऽऽऽ ह्यॅऽ! कश्याला ही घाबरता राव तुम्ही!’ म्हणत खोकनाथ मात्र मोठ्याने हसू लागतो, ‘अगदी हिडी-सिभॉयने छापा घातल्यागत दचकला तुम्ही! मुका निरुपद्रवी प्राणी तो! काय करील?’
‘आवरा, मेजावरली तुमची ताटं, थाळ्या उचला. मला ह्या फाईली तिथे ठेवून बघता येतील,’ काहीश्या रागाने कळणीस बोलतो.
‘काय बोलता? आता कुठे अर्धे पदार्थ चाखलेत मी! अजून ते संपवायचे बाकी आहेत. असं सुग्रास जेवण रोज थोडेच मिळते का? आणि इतकं काय महत्त्वाचं शोधताय तुम्ही?’ आणखी कुठली तरी वाटी पिऊन संपवत खोकनाथ त्याला उत्तर देतो.
खोकनाथ ऐकणार नाही आणि पालही कुठे दिसत नाही हे बघून कळणीस पुन्हा अस्ताव्यस्त फायलींच्या ढिगार्याजवळ जाऊन बसतो. पुन्हा शोधाशोध करू लागतो.
‘पण तुम्ही शोधताय काय? हे नाही सांगितलं?’ विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न आल्याने खोकनाथ पुन्हा तोच प्रश्न करतो.
‘काही नाही! कुठल्या परदेशी वकिलातीने श्रेष्ठींना तक्रार दिलीय. त्यांच्याकडे कामाच्या बदल्यात काही…’ कळणीस वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच खोकनाथ कान टवकारतो.
‘आपलं धोरणच आहे ना? हिसकावून खा! मग असल्या तक्रारींचा का विचार करायचा?’ खोकनाथ त्याला काही आठवण करून देत सवाल करतो.
‘तुम्हाला नाही कळायचं! तुम्ही संपवा हा लवकर! ढेकर विकास!’ कळणीस तिरकस बोलतो. पण त्याचं बोलणं विनोद समजून खोकनाथ खो खो हसू लागतो.
ह्या प्रकाराला काय बोलणार? कळणीस गप्प बसून आपल्या कामाला लागतो.
‘मी काय म्हणतो? तुम्ही इतक्या फायली बघितल्याच आहेत तर त्यातल्या रद्दी फाईल्स लगेहाथ बाजूला काढता का? सगळं दफ्तर सुटसुटीत लावून घेता येईल. काय?’ खोकनाथ घास बनवताना काम सुचवतो.
‘मी तुम्हाला शिपाई वाटतोय की कारकून? ही कामं माझी आहेत का? एकतर तुम्ही कुठली फाईल कुठे ठेवलीय, याची माहिती तुम्हाला नसते. सगळा विचका करून ठेवलाय तुम्ही इथे!’ कळणीस उद्वेगाने बोलतो.
‘सगळ्या फाईल्स नीट सुव्यवस्थित रचून ठेवल्यात मी! हे बघा ते डावीकडे कपाट आहे ना?’ खोकनाथ बर्फीच्या तुकड्याने खूण करतो.
‘हो, तिथे कुठल्या आहेत?’ कळणीस आशेने विचारतो.
‘त्या डावललेल्या फाईल्स आहेत. थोडक्यात डाव्या हाताने धुवून फ्लश करण्यायोग्य!’ खोकनाथ उत्तरतो.
‘म्हणजे कामं मार्गी लागलेल्या फाईल्स आहेत ना? की कामं पूर्ण झालेल्या?’ कळणीस पुन्हा विचारतो.
‘नाही, विनामेजवानीवाल्या कोरड्या फाईल्स आहेत त्या!’ खोकनाथाच्या उत्तराने कळणीस उठून ते कपाट उघडू बघतो.
‘मग यातच असलं पाहिजे…’ म्हणत अत्यानंदाने कळणीस त्यात कागदपत्रे शोधू लागतो.
‘त्यात नक्कीच नसतील! तुम्ही उजवीकडच्या कपाटात बघा,’ खोकनाथ कळणीसाला लाडूने उजवं कपाट दाखवतो.
‘त्यात कुठल्या फाईल्स आहेत?’ कळणीस शंकेने विचारतो.
‘ त्यात…? मेजवान्यांचे स्पॉन्सर आहेत. अगदी आजपासून मागच्या कार्यकाळातील सर्व!’ खोकनाथ त्याला विस्कटून सांगतो.
‘नाही, मग त्यात नक्की नाहीय काही!’ कळणीस स्पष्टपणे सांगतो.
‘कशावरून तुम्ही असं बोलताय? नेमकी कुठली फाईल तुम्हाला हवीय?’ खोकनाथ कळणीसला न राहवून विचारतो.
‘मार्डीयेच्या फाईल्स शोधत होतो मी!’ कळणीस एक फाईल उचलत सांगतो.
‘ह्या काय? त्या थाळी खाली ते हिरवे कागदं दिसताय ना?’ मेजावरची कोपर्यातली थाळी दाखवत खोकनाथ बोलू जातो.
‘काय? तुम्ही फाईली फाडल्यात? अहो, काय केलंत हे?’ कळणीस कळवळतो.
‘फाडल्या नाहीत हो! त्यांच्याकडून ही मेजवानी झोडतोय, किमान त्यांना खरकटा हात लागायला नको का? त्यांच्याप्रती आदर वगैरे…?’ खोकनाथ कृतीचं निर्लज्ज समर्थन करतो.
‘बघू मला त्या!’ म्हणत कळणीस एक एक थाळी उचलून फाईल आणि कागदं बघू लागतो.
‘अहो, थांबा! माझं जेवण!’ खोकनाथ त्याला अडवू बघतो.
‘तुम्ही आवरा हो! तुमच्यामुळे पूर्ण विश्वात आमची छीः थू झाली! आणखी तुम्ही गुरासारखे चरताच आहात! काही भाडभीड?’ कळणीस अंमळ संतापून बोलतो.
‘आम्ही भीड न ठेवता भाड खातो, ह्याच गुणावर तुम्ही त्यावेळी भाळला होतात! विसरलात काय? त्यात आम्ही निर्लज्जशिरोमणी! दुसर्यांच्या ताटावर बसून त्यांनाच शिव्या देण्यात आमचा हातखंडा! आणि म्हणोन…’ खोकनाथ कळणीसास सुनावू लागतो.
‘पुरेपुरे! पण ह्या सगळ्या फायली वेगळ्याच आहेत. त्यात ती फाईल कुठे दिसत नाही?’ कळणीस पुन्हा विषयावर येतो.
‘ती कुठली?’ खोकनाथ नाकासमोरील थाळीतील भजी ओरपतो.
‘तीच किस्टा!’ कळणीस सुचकपणे उत्तर देतो. त्यासरशी खोकनाथला ठसका लागतो. कळणीस चटकन धावत जात त्याला पाणी पाजतो. जरा पाठ चोळून देतो. त्यामुळे खोकनाथाचा ठसका रहातो.
‘ती फाईल ह्या मेजाच्या पावक्याखाली लावलीय!’ खोकनाथ बोट दाखवून कळणीसाला फाईल दाखवतो.
‘अहो, काय हा प्रकार? अगदी बिल्लीश्वराकडून खडसावणी झालीय माझी! आणि तुम्ही ती फाईल पावक्याखाली ठेवताय?’ कळणीस चिडून त्याला विचारतो.
‘काय करणार? तुमच्या बिल्लीश्वराने मला तेव्हा आश्वासन दिलेलं. हवं ते आणि हवं तितकं खाण्यास देण्याची जबाबदारी आमची! फक्त आमच्या पदरी ये! खाण्याची ददात मिटवू! म्हणून तर ह्या दफ्तरी आलोय ना मी?’ खोकनाथ कळणीसाला उलट सवाल करतो.
‘हो, पण तुम्ही मजबुतीनं मेजवान्या झोडताय ना? त्यात खंड कुठे पडू दिला आम्ही?’ कळणीस अगतिकतेने विचारतो.
‘नाही, पण नेहमी नेहमी तेच काय खायचं? कधी रुचीपालट म्हणून दूरदेशीच्या मेजवान्या झोडण्याची इच्छा प्रकट केली तर इतका गहजब?’ खोकनाथ मलई पितो!
‘हो पण ह्या दफ्तरीचं नाव ढेकर विकास झालंय तुमच्यामुळे! याचं काही भान?’ कळणीस शेवटचा सवाल करतो, पण त्यावर उत्तर देण्याऐवजी खोकनाथ चक्क कडकडीत लाजतो.