गंगोदक ते पवित्र।
येर कडू अपवित्र।१।
दोन्ही उदके तव सारखी।
शुद्ध अशुद्ध काय पारखी ।२।
गंगा देवापासून जाली।
येर काय मध्यवर्ती केली ।३।
शुद्धाशुद्ध हे वासना।
शरण एका जनार्दना ।४।
माणसाच्या डोक्यात एखाद्या धार्मिक कर्मकांडाचं खूळ गेलं की ते सहजासहजी निघत नाही. त्याला कितीही परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यातून बाहेर निघत नाही. त्या कर्मकांडातला फोलपणा त्याला तर्कशुद्ध युक्तिवादाने पटवून दिला तरी त्याला पटत नाही. त्यासाठी एकनाथ महाराजांनी एक नवा मार्ग शोधून काढला. ते स्वतः त्या कर्मकांडात सामील होत आणि ऐनवेळी त्या कर्मकांडातला फोलपणा उघडा पाडत. कृतीतून कर्मकांडाची चिकित्सा करत. नाथराय हे कृतीशील धर्मचिकित्सक होते.
त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग असाच मजेदार आहे. नाथराय एकदा कावडीच्या कर्मकांडात सामील झाले. कावडीचं कर्मकांड म्हणजे कावडीत गंगेचं पाणी भरून रामेश्वरच्या समुद्रात टाकणं आणि त्या समुद्रातलं पाणी पुन्हा गंगेत टाकणं. वर्षानुवर्षे हे कर्मकांड करणारे लोक होते. खरंतर या कर्मकांडात काहीच लॉजिक नाही. केवळ पुण्यप्राप्तीच्या भ्रामक कल्पनेनं झपाटलेले लोक हे कर्मकांड करत. नाथराय या लोकात सामील झाले. त्यांनी गंगेचं पाणी कावडीत भरून घेतलं. पाणी घेऊन ते रामेश्वरकडे निघाले. जाताना वाटेत तडफडणारं गाढव दिसलं. त्याला तहान लागली होती. नाथांनी लगेचच कावडीतलं गंगेचं पाणी त्या गाढवाला पाजलं. तडफडणार्या चार पायाच्या गाढवाला गंगेचं पाणी पाजलं म्हणून दोन पायाचे गाढव तडफडायला लागले. पवित्र गंगेचं पाणी अपवित्र गाढवाला पाजलं म्हणून ते नाथांना वेड्यात काढायला लागले. नाथांचं कर्मकांड फोल झालं म्हणून हसायला लागले. त्यावेळी नाथरायांनी त्यांना त्या कर्मकांडातला फोलपणा पटवून दिला. इथून तिथून पृथ्वीवरचं पाणी सारखंच आहे. त्यात गंगेचं पाणी अपवित्र आणि इतर पाणी अपवित्र असं समीकरण इल्लॉजिकल आहे हे नाथांनी पटवून दिलं. ‘गंगोदक पवित्र। येर काय अपवित्र।’ असा नाथरायांचा सवाल होता. गंगेचं पाणी पवित्र आणि इतर पाणी अपवित्र असू शकतं का? हा नाथांचा सवाल त्या कर्मकांडात गुरफटलेल्या लोकांच्या बुद्धीला थोडा झोंबला असणार. त्यातल्या एकाने लगेच नाथांना विचारलं असणार, ‘अहो, गंगा ही शंकराच्या जटेतून निर्माण झाली. त्यामुळे गंगेतलं पाणी ईश्वराने निर्माण केलंय. त्यामुळे ते पाणी पवित्र आहे. शुद्ध आहे. गंगेचं पाणी ईश्वरीय पाणी आहे.’ नाथरायांकडे त्या युक्तिवादाचं प्रत्युत्तर होतं. नाथराय म्हणतात- ‘गंगा देवापासून जाली। येर काय मध्यवर्ती केली।’ नाथरायांनी सांगितलं की, गंगा जर देवाने निर्माण केली असेल तर दुसर्या नद्या काय इतरांनी निर्माण केल्या आहेत का? नाथांचा हा सवाल मात्र उलट उत्तर देता येण्यासारखा नव्हता. ‘जयापासोनी सकळ। महिमंडळ हे जाहले।’ असं आपण मानतो. ईश्वराने हे जग निर्माण केलं असं आपण मानतो तर नद्या, नाले, तलाव, विहिरी आणि समुद्रातलं पाणीही त्यानंच निर्माण केलेलं आहे, असं मानावं लागतं. सगळीकडंचं पाणी ईश्वरानेच निर्माण केलेलं असेल तर गंगेचं पाणी पवित्र ठरवता येणार नाही.
नाथांनी गंगेचं पाणी गाढवाला पाजलं ही सर्रास सांगितली जाणारी कथा आपल्याला माहित असते. त्या तुलनेत त्या कथेचा मूल्यविचार सांगणारा त्यांचा हा अभंग मात्र माहित नसतो. संतांच्या कथेत मूल्यविचार असतो. तो रुजवण्यासाठीच ती कथा निर्माण झालेली असते. नाथांच्या जीवनात हा प्रसंग योगायोगाने घडला असं मला तरी वाटत नाही. मला वाटतं नाथांनी तो मुद्दाम घडवून आणला. वरच्या अभंगातला विचार त्या कर्मकांडात बुडालेल्या लोकांपर्यंत त्यांना पोहोचवायचा होता. त्यासाठीच हा खटाटोप नाथांनी केला असणार. एरवी गंगेच्या पाण्याला इतर पाण्यापेक्षा पवित्र मानण्यात काहीच अर्थ नाही हे नाथांना माहित होतंच. ते माहित असूनही नाथराय ते कर्मकांड करणार्या लोकांत सामील झाले, याचा अर्थ त्यांनी ते मुद्दाम केलं होतं. त्यातही त्यांनी पवित्र गंगेचं पाणी पाजलं ते अपवित्र आणि हीन मानल्या गेलेल्या गाढवाला. त्यांना तहानेनं तडफडणारं गाढव दिसलं याचं कारण त्यांना माणसातला ‘गाढवपणा’ दूर करायचा होता. गाढवाचा उपयोग ओझं वाहण्यासाठी असतो. त्याला त्याचा काहीच फायदा नसतो. ते केवळ ओझं वाहत असतं. त्याचप्रमाणे रुढीपरंपरांचं ओझं आपण वाहत असतो. त्याचा आपल्याला काही फायदा नसतो. नाथांना अशा लोकांना समज द्यायची होती.
नाथांना यातून जे काही सांगायचं आहे ते या अभंगाच्या शेवटच्या चरणात आलंय. ‘शुद्धाशुद्ध हे वासना। शरण एका जनार्दना।’ शुद्धता आणि अशुद्धता पारखायची झाली तर ती वासनेच्या आधारे पारखायला हवी. पावित्र्याचे निकष चारित्र्यावर अवलंबून ठेवायला हवेत. आपण मात्र पावित्र्याच्या भ्रामक कल्पना धर्माच्या नावाने निर्माण केल्या आहेत. संतांनी मात्र या पावित्र्याच्या परंपरागत कल्पना धुडकावून लावल्या आहेत. त्यासाठी थेट कृती करून दाखवली आहे.
आपल्या संत कबीरांची गोष्ट प्रसिद्धच आहे. ते मूळचे काशीचे. जन्म, बालपण आणि त्यांची सारी कारकीर्द काशीतच गेली. पण अखेरच्या काळात ते मगहरला गेले. त्यांनी तसं मुद्दाम केलं. काशीत मरण यावं म्हणून लोक अट्टहास करतात. काशीत मेलं की मोक्ष मिळतो अशी लोकांची समजूत आहे. ‘मोक्ष देऊनी उदार। काशी होय कीर। परि वेचावे लागे शरीर। तिये गावी।’ अशी लोकांची धारणा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत नोंदवली आहे. काशीत मेलं की मोक्ष मिळतो म्हणून लोक वृद्धापकाळी काशीतच रहायला जात. अनेक लोक तर आपला शेवट जवळ आला असं समजून काशीत रहायला जात पण दोन-चार महिने गेले तरी मरण येत नाही म्हणून परत माघारी येत. परत माघारी गावी आले की मरत असत. अशा अनेक गंमतीजमती आपल्याकडे घडलेल्या आहेत. अगदी कोरोना काळातही गंगेत प्रेतं वाहत होती, त्याचं एक कारण या भावनेतही होतं. अजूनही याच समजुतीचा पगडा असलेले लोक आजूबाजूलाही आढळतात. संतांच्या काळात तर ही धारणा पक्कीच होती. कबीरांनी मात्र या धारणेला जुमानलं नाही. ते काशीवासी असल्याने त्यांना विनासायास काशीतच मरण आलं असतं. पण कबीरांना काशीतल्या मरणाने मोक्ष मिळतो या लोकसमजुतीला जुमानत नाही हे दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी ते अखेरच्या काळात मगहरला गेले. त्याकाळी मगहर हे ठिकाण अपवित्र मानलं गेलेलं होतं. काशी पवित्र तर मगहर अपवित्र. काशीतलं मरण मोक्ष मिळवून देणारं तर मगहरचं मरण गाढवाच्या जन्माला घालणारं. पण कबीरांनी मुद्दाम मगहरला देह ठेवला. ‘काशीवासी भक्त कबीर। समाधीस गाव निवडती मगहर। लोक म्हणती नरकद्वार। तीच उद्धारभूमी जाहली।’ असं तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत म्हटलं आहे. कबीरांनीही त्यासंदर्भात लिहिलंय. कबीर म्हणतात- ‘क्या काशी क्या उसर मगहर, राम हदय बस मोरा। जो काशी तन तजै कबीरा, राम कौन निहोरा।’ याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. पवित्र-अपवित्रतेचे हे भ्रामक निकष संतांनी नामंजूर केलेले आहेत. कृतीतून त्यातला फोलपणा दाखवून दिला आहे. अभंग-दोहे लिहून त्यामागची वैचारिक भूमिकाही मांडली आहे.
जे कबीरांच्या बाबतीत तेच बसवण्णांच्या बाबतीतही आहे. बसवण्णा म्हणजे महात्मा बसवेश्वर. आपल्याकडे शंकराला केवड्याचं फूल अर्पण करत नाहीत. कोणत्यातरी एका पुराणाच्या कथेत तसा उल्लेख आलाय. केवड्याचं फूल शिवाला खोटं बोललं म्हणून ते शिवाला चालत नाही, असा त्यातला कथाभाग आहे. तेव्हापासून केवडा शिवाला चालत नाही. बसवण्णांना ही पुराणाची थाप खोटी ठरवायची होती. त्यासाठी त्यांनी मुद्दाम केवड्याचं फूल शिवाला अर्पण केल्याची कथा आहे. पाणी, ठिकाण, प्राणी आणि फूल याबाबतीतल्या कथा आपण पाहिल्या. तेच भाजीपाल्यातही आहे. कांदा आणि लसणाला अपवित्र मानलं गेलं आहे. त्यामुळं काही लोक जेवणात कांदा आणि लसूण खात नाहीत. बसवण्णांच्या एका कथेत मात्र त्यांनी कांद्याचा फारच सन्मान केला आहे. किन्नरी ब्रह्मय्या नावाचे एक शरण होते. त्यांना बसवण्णांच्या घरी जेवणात कांदा दिसला नाही. त्यामुळं ते रागावून त्यांच्या घरातून निघून गेले. बसवण्णा त्यांची समजूत घालण्यासाठी थेट कांद्याची मिरवणूकच काढतात.
पावित्र्याच्या भ्रामक समजुती संतांनी आणि भक्ती परंपरेतल्या महामानवांनी त्यांच्या आचार-विचारांतून नाकारलेल्या आहेत. हे जसं पक्षी, प्राणी, ठिकाण, फूल, पाणी यांच्या बाबतीत आहे, तसं माणसांच्याही बाबतीत आहे. काही तथाकथित खालच्या जातीतल्या माणसांना विनाकारण केवळ जन्माच्या निकषावर अपवित्र मानलं गेलेलं आहे. जाती विषमतेची उतरंड म्हणजे पावित्र्य कल्पनेचीच उतरंड आहे. संतांनी या उतरंडीची उलटापालट केली. दलित संतांना जास्तीत जास्त सन्मान दिला. महिलांनाही सन्मान दिला. महिलांना धर्माने अपवित्र मानलंय. त्यातही एकल महिलांना म्हणजे विधवा, घटस्फोटित आणि प्रौढकुमारी अशा महिलांना इतर महिलांच्या तुलनेने दुय्यम मानलं आहे. अपवित्र मानलं आहे. संतांनी मात्र अशा एकल महिलांना वारकरी परंपरेत सन्मान दिला. जनाबाई आणि मुक्ताबाई या अविवाहित एकल महिलाच होत्या. मीराबाई विधवा होत्या. इतर भक्ती परंपरेतही आपल्याला हेच पाहता येतं. बसवण्णांच्या परंपरेतल्या अक्कमहादेवींनीही लग्नाचा पती नाकारून चन्नमलिकार्जुनालाच पती मानलं होतं. काश्मीरातल्या लल्लेश्वरही होत्या. महानुभावांच्या परंपरेतल्या महंदबाही विधवाच होत्या. अशा अनेक प्रवर्गातल्या एकल महिला भक्ती परंपरेत अधिकार पदाला पोचल्या. एकल स्त्रियांच्या भोवती निर्माण केलेल्या पावित्र्याच्या कल्पनांचे इमले संतांनी धडाधड कोसळून पाडले आहेत.
पाळीच्या काळातही स्त्रीचा विटाळ मानला जातो. त्या काळात ती स्त्री अपवित्र मानली जाते. चक्रधर स्वामींनी, जसा नाकातून शेंबूड येणं जसं नैसर्गिक आहे तसंच पाळीही नैसर्गिक आहे असं सांगितलंय. वारकरी संतांनी आणि इतरही भक्ती परंपरेतल्या संतांचा हा विचार नाथांच्या या अभंगात उमटलाय. पवित्रता ही वासनेवर अवलंबून आहे असं नाथराय सांगतात. आपणही पावित्र्याचा निकष चारित्र्याशी जोडला पाहिजे.
– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर