अमेरिकेचे अध्यक्ष (ईश्वर अमेरिकेला लवकरात लवकर सद्बुद्धी देवो आणि काही विवेकबुद्धी, संवेदनशीलता आणि तारतम्य असलेला राष्ट्रप्रमुख देवो) डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोमिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये झालेली चर्चा एव्हाना सगळ्या जगासमोर आलेली आहे… इतरत्र काय समजूत झाली असेल ती असेल, पण भारतात मात्र अनेकांना १९७०-८०च्या दशकांमधले अजित, प्रेमनाथ वगैरे खलनायकांचे अड्डे आठवले असतील आणि त्यांची लोकांना धमकावण्याची भाषा, शैली आठवली असेल… रस्त्यावरचे मवाली परवडले इतक्या वाईट पद्धतीने ट्रम्प आणि त्यांचे त्यांच्यापेक्षा भयंकर उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स दादागिरीची भाषा बोलत होते आणि झेलेन्स्की जवळपास ५० मिनिटं आपली बाजू शांतपणे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते… काही विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात सुरळीत चर्चा सुरू असताना अचानक चहापेक्षा किटली गरम असलेल्या व्हान्स यांना त्यात नाक खुपसण्याची उबळ आली आणि तिथून चर्चा बिघडली… हे खरं मानलं तरी त्यामुळे ट्रम्प यांचं उत्तरदायित्व कमी होत नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असलेला ईलॉन मस्क त्यांच्या सरकारमध्ये वाट्टेल तशी लुडबुड करतो, कोणत्याही बैठकांना हजर असतो, कोणालाही आदेश देतो. ट्रम्प हे फक्त एक बाहुलं आहे, सगळ्या दोर्या मस्कच्या हातात आहेत, हेच त्यांच्या दुसर्या कार्यकाळाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. व्हान्ससारखा वाचाळ मनुष्य त्यांनीच हौसेने सोबत घेतलेला आहे. शिवाय, खुद्द ट्रम्प इतके निरर्गल आहेत की त्यांना जोडीदाराची गरजही नाही.
जगातला सर्वात शक्तिमान देश असलेल्या अमेरिकेने सगळ्या जगाचा तोल बिघडवायला घेतला आहे, या विचाराने सगळं जग अवाक् झालेलं आहे. सोविएत रशिया, नंतर रशिया आणि अमेरिका हे जगाचे दोन ध्रुव राहिले आहेत. कम्युनिझमबद्दल भांडवलवादी अमेरिकनांना टोकाची नफरत आहे. आज त्याच अमेरिकेचा अध्यक्ष रशियन अध्यक्ष पुतीन यांच्या तालावर नाचतो आहे, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. युक्रेनवर हल्ला करून त्या देशाचे लचके तोडणार्या रशियाशी झेलेन्स्की यांनी जुळवून घ्यावे, अशी ट्रम्प यांची तथाकथित मध्यस्थी आहे. त्यात ही मध्यस्थी केल्याबद्दल अमेरिकेला युक्रेनच्या खनिज संपत्तीत वाटा हवा. म्हणजे रशिया जे युद्ध करून लुटेल ते आम्हाला युद्ध न करता द्या, म्हणजे आम्ही रशियाला थोपवण्याचा प्रयत्न करू (तशी खात्री देणार नाहीच), असं हे सगळ्या जगाचे स्वघोषित पांडू हवालदार सांगताहेत. सर्व बाजूंनी कोंडीत सापडलेल्या युक्रेनसाठी ते करायलाही झेलेन्स्की तयार झाले होते, ते डील करण्यासाठीच ते अमेरिकेत आले होते. आता त्यात व्हान्स यांनी खोडा घातला असेल, तर हे कोणाचं बाहुलं आहे, कोणाच्या इशार्यावर काम करत आहे, याचा शोध घ्यायला लागेल.
रशियाने युक्रेनचा घास घेतला तर तो देश पश्चिम युरोपच्या सीमेला येऊन भिडेल आणि सगळ्या युरोपीय देशांना धोका निर्माण होईल, हे जाणून इंग्लंड, प्रâान्स, जर्मनी आदी बलवान देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युद्धात सक्रिय साह्यही केलेलं आहे. पण, अमेरिकेने मदत रोखली तर या देशांवर पडणारा वाढीव भार प्रचंड असेल. मात्र ट्रम्प यांनी केवळ युक्रेनलाच नव्हे तर सगळ्या युरोपलाही वार्यावर सोडण्याचा निर्धार केला असावा, असं त्यांचं वर्तन आहे. ट्रम्प आणि अमेरिकेच्या विरोधात युरोपातलं जनमत आणि सगळे देशही एकवटत आहेत. त्यामुळेच, ट्रम्प-झेलेन्स्की भेटीच्या फियास्कोनंतरही या देशांनी झेलेन्स्की यांना पाठबळ पुरवत राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे. खुद्द अमेरिकेत आणि ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातही ट्रम्प यांच्या वेडाचारामुळे त्यांचं पाठबळ घटू लागलेलं आहे. तिकडचे कट्टर उजवे आणि बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना बनून नाचणारे भारतातले निर्बुद्ध ट्रम्पभक्त सोडले तर व्हाइट हाऊसमधला लाइव्ह तमाशा पाहून सुबुद्धजन विस्मयचकितच झाले आहेत.
जगाला तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणार्या या घटनाक्रमात सगळ्या जगाच्या लक्षात राहिला तो झेलेन्स्की यांचा ताठ कणा, सभ्यता न सोडता आपली बाजू मांडण्याचा चिवटपणा आणि देश युद्धात होरपळत असताना गुंडपुंडांपुढे न नमण्याची वृत्ती. माझा देश युद्धातून बाहेर पडेल, तेव्हा मी सूट घालेन, असं सांगणारा नेता कुठे आणि रोज नवनवीन वेशभूषा करून फॅन्सी ड्रेस स्पर्धा जिंकणारे नेते कुठे? आपल्या गल्लीत फार मोठ्या गमजा मारणारे, आपण जगाचे किंवा विश्वाचेच नेते बनलो आहोत असा आव आणणारे, आपल्यामुळे देशाचा मान वाढला आहे, असा भ्रम जोपासणारे पेंढा भरलेले वाघ ट्रम्पसारख्या खुनशी लांडग्यासमोर जाण्याची वेळ आली की हात रुमालात बांधून शेळी बनून बसतात आणि ट्रम्प सांगतील त्या जाचक, अन्यायकारक अटी मान्य करून मोकळे होतात. ज्याची छाती खरोखरच ५६ इंचांची असते, तो युद्धात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढतो आणि ट्रम्पच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याच्याशी बोलण्याची हिंमत ठेवतो, हे सगळ्या जगाने पाहिले.
हा सगळा घटनाक्रम सुरू असताना भारतात एक अजब घटनाक्रम उलगडत होता.
देशाबाहेर गेल्यावर ‘वसुधैव कुटुंबकम्’ (सगळे पृथ्वीवासी हे आपलं कुटुंबच आहे), असं तत्त्वज्ञान सांगणारे आणि देशात असताना सगळे भारतवासी हेच आपलं कुटुंब आहे, असं सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी त्यांच्या कुटुंबियांना पाहायला मिळणार नाही, असा निकाल न्यायालय देत होतं आणि जो कोणी ती पदवी जनतेसमोर आणण्याची मागणी करील, त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावावी, अशी मागणी देशाचे सॉलिसिटर जनरल करत होते!