पितळे जे म्हणत होता ते शंभर टक्के खरे असले तरी त्याच्या वयाच्या मानाने ही समज आणि त्याचा आत्मविश्वास मला काहीच्या काही वाटला. हा दिसतोय लहान पण देवाने घडवताना याचं वय इथेच थांबवले आहे का? या माणसाला समोरच्याच्या मनातील ओळखता येते आहे की काय? आपण शांतच बसावे.
– – –
‘अरे थांब रे जरा, पितळे यायचा आहे अजून.’ असे रांगेत आमच्या मागच्या रिक्षाचा चालक आमच्या रिक्षाच्या चालकाला म्हणत होता.
‘हो थांबणारच आहे. येईलच इतक्यात. वेळ झालीच आहे. आज माझ्याच रिक्षाने घेऊन जाईन म्हणून सांगितले आहे मी त्याला.’ इति आमचा रिक्षावाला.
आम्ही शेअर रिक्षात बसून हे सारे ऐकत होतो. माथेरानच्या अमन लॉजपासून ते माथेरान स्टेशनपर्यंत नव्याने बॅटरीवरील रिक्षा चालू झाल्या होत्या. सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर त्या चालू केलेल्या होत्या.
मागच्या रिक्षाचालकाने आमच्या रिक्षाचालकाला विचारले, ‘अरे पण ते बसलेलं गिर्हाईक थांबंल का एवढा वेळ?’
पुण्यातील दुकानदारसुद्धा एखाद्या गिर्हाईकाची एवढी निर्भत्सना करणार नाही अशा आवेशात आमचा रिक्षावाला म्हणाला, ‘थांबतील नाही तर जातील. आता रांगेत माझीच रिक्षा पहिली आहे. शिवाय आता टॉय ट्रेन नाही. वाट बघायची तयारी नसेल तर जाऊ दे तंगडतोड करत.’
मी आणि नवर्याने एकमेकांकडे बघितले. मिसळीला नावे ठेवल्यावर कोल्हापूरकरांना जे वाटले नसेल, किंवा वैशाली-रुपालीच्या सांबाराला नावे ठेवल्यावर जे एखाद्या पुणेकराला वाटले नसेल तितके अपमानकारक आम्हाला वाटलेले होते. पण रिक्षावाल्याच्या अपमानाने डिवचला जाईल इतका आमचा स्वाभिमान स्वस्त नव्हता, शिवाय खरेच तंगडतोड करत जाण्याची इच्छाही नव्हती. त्यामुळे आम्ही रिक्षावाल्याचे बोलणे ऐकलेच नाही असा चेहरा करून बसून राहिलो. हा पितळे नावाचा इसम आहे तरी कोण असा प्रश्न मात्र मनात उमटला होता. इथे अस्सल सोन्याला दुनिया भाव देत नाही आणि पितळे कुठून भाव खाऊन चालले?
पाच दहा मिनिटे आम्ही निमूट बसून राहिलो. मग उगीचच कंटाळा आल्याचे दाखवण्यासाठी सुस्कारे सोडून झाले. थंड हवेच्या ठिकाणी गेलेलो होतो तरीही रिक्षावाल्याला टोमणे मारण्यासाठी उगीचच रुमालाने हवा घेऊन मोठमोठ्याने माझे म्हणून झाले, ‘काय गरम होतंय नाही? थंड हवेच्या ठिकाणी आलो आहोत असे वाटतच नाही.’
पण आमच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यापलीकडे रिक्षावाल्याने काहीही केले नाही. मग मात्र कधीही न बघितलेल्या या पितळे नावाच्या माणसाबद्दल मनात भयंकर राग दाटून आला. तिसर्या माणसाचे भाडेदेखील आम्ही देऊ असा प्रस्ताव ठेवूनसुद्धा रिक्षावाल्याने ऐकले नाही. पक्षात वरचे पद देत असताना देखील ज्याचे आमदार प्रतिपक्षाला मिळाले आहेत, अशा पक्षप्रमुखासारखी आमची अवस्था झाली होती. पितळे आल्यावर अत्यंत वाईट पद्धतीने त्याला उद्देशून टोमणे मारणार असे मी मनोमन ठरवून टाकले होते. माझा चेहरा बघूनच मी काय करणार हे नवर्याने ताडले होते. त्यामुळे ते आधीच मला हळू आवाजात म्हणाले, ‘हे बघ ज्या पितळे म्हणून गृहस्थांची वाट बघणे चाललेले आहे ते कोण आहेत हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे त्यांना काहीही बोलायला जीभ उचलण्याच्या आत जरा विचार कर.’ पितळेना जो जळजळीत कटाक्ष मिळणार होता, तो आता अहोंना झेलावा लागलेला होता.
आता हे जे कोणी पितळे म्हणून गृहस्थ आहेत त्यांना चार कान, चार डोळे असे काहीतरी असण्याची कल्पना करणे शिल्लक राहिले होते, इतका माझा त्यांच्यावर विचार करून झाला होता.
इतक्यात सगळीकडे एकच गलका झाला, ‘आला रे, आला बरं का पितळे.’
असा आवाज आला तरीही पाच मिनिटे काहीच हालचाल नव्हती. आमचा रिक्षावाला देखील आता गायब झाला होता. मी रिक्षातून उतरले. बघितले तर लोकांचा एक घोळका उभा होता. मध्यभागी एक माणूस उभा असावा असे वाटले. आजूबाजूच्या गर्दीमुळे तो माणूस झाकला गेला होता. हाच असणार पितळे. काही मिनिटांनी गर्दी बाजूला झाली आणि त्या इसमाची मूर्ती आमच्या रिक्षाकडे यायला निघाली. इसम कसला लहानगा मुलगा होता तो. अगदी दहावी किंवा फार तर फार बाराव्या इयत्तेत असावा. पांढरा शर्ट, निळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट, पायात सॅन्डल, अगदी बारीक कापलेले केस, उंची जेमतेम सव्वापाच फूट, सरळ नाक, सावळा रंग, बारीक डोळे आणि पाठीवर लावलेली सॅक. अत्यंत आत्मविश्वासाने हा मुलगा रिक्षाच्या दिशेने चालू लागला. हाच पितळे आहे याची मला खात्री वाटत नव्हती.
तो येताना दिसला की मी लगेच घाईघाईत रिक्षात जाऊन बसले. तो आला आणि रिक्षात अहोंच्या बाजूला बसला आणि रिक्षावाल्याला म्हणाला, ‘चल रे संजू. किती वेळा तुम्हा सगळ्यांना सांगितले आहे की माझ्यासाठी थांबू नका. कोणाचा खोळंबा करू नका. पण तुम्ही लोक ऐकतच नाहीत.’
मग आमच्याकडे वळून बघत म्हणाला, ‘सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला थांबावे लागले.’
तो अजिबातच उद्धट नव्हता. इतक्या सौम्य स्वरात त्याने आमची माफी मागितली की आमच्याकडे ‘ठीक आहे, जाऊ दे’ असे म्हणण्यावाचून काही इलाजच राहिला नाही. आम्ही ठीक आहे म्हणाल्यावर तो पुन्हा सौम्य हसला. त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वात एक जादू होती. खरे तर अत्यंत माफक उंची, दिसणे सुद्धा साधारण होते. पण त्याचे बारीक डोळे कमालीचे भेदक होते. तो बोलायचा तेव्हा आधी डोळ्यांनी बोलायला सुरुवात होई.
त्याच्या वागण्या-बोलण्यात एक नवाबी थाट होता. इतक्या साधारण व्यक्तिमत्वाला हा थाट मात्र अगदीच विसंगत होता.
काही क्षण शांतता पसरली आणि मग पुन्हा त्याचा बारीक स्वर उमटला, ‘तुम्ही काय पर्यटक आहात काय?’
अजूनही माझ्या मनातील कडवटपणा गेलेला नव्हता त्यामुळे ‘नाही इथे कारखाना टाकता येतो का बघायला आलो आहोत’ असे मी म्हणणार तितक्यात आमचे अहो उत्तरले, ‘हो, पर्यटकच. इथे अजून कोण येणार?’
माझ्या मनातील ओळखल्याप्रमाणे पितळे डोळे बारीक करत म्हणाला, ‘तसे नाही हो सर. इथे काही व्यवसाय करता येतोय का बघायला लोक येतात.’
या माणसाला समोरच्याच्या मनातील ओळखता येते आहे की काय? आपण शांतच बसावे.
पुढे तो बोलू लागला, ‘इथे करण्यासारखे व्यवसाय तसे कमी असतात. पण लोक इथे हॉटेलमध्ये, होम स्टेमध्ये गुंतवणूक करता येते का बघायला येतात. चांगला परतावा असतो त्याला.’
परतावा, मार्केट, व्यवसाय म्हटले की नवरा कान देऊन ऐकू लागला.
पुढे पितळेने विचारले, ‘इथे कुठे उतरला आहात?’ या मुलाच्या आवाजात एवढा आत्मविश्वास होता की काय बिशाद तुम्ही उत्तर देणार नाहीत.
‘एमटीडीसी,’ अहोंनी उत्तर दिले.
‘चांगलं आहे, चांगलं आहे. मोठ्या असतात खोल्या. परिसर देखील बरा आहे. थोडा मेंटेनन्स हवा.’ इति पितळे. एखाद्या नवशिक्या मुलीला आजीबाई ज्या सहजपणे पदार्थात काय चुकले हे सांगतील त्या सहजतेने पितळे बोलत होता.
अहोंना त्याचे हे म्हणणे पटलेले होते, ‘हो, खरेच थोडे अजून व्यवस्थित ठेवता येऊ शकते.’
‘त्यात त्यांची चूक नाही हो, स्टाफच एवढा कमी आहे. काय करतील माणसं? जो माणूस दिवसभर मॅनेजर म्हणून काम करतो, तोच सकाळी सूर्योदयाला गाईड म्हणून पाठवतात. जो दिवसभर साफसफाई करतो त्यालाच संध्याकाळी गेम घ्यायला उभे करतात. करावे काय स्टाफने? स्टाफ आहे का जत्रेतील बहुरूपी?’
तो जे म्हणत होता ते शंभर टक्के खरे असले तरी त्याच्या वयाच्या मानाने ही समज आणि त्याचा आत्मविश्वास मला काहीच्या काही वाटला. हा दिसतोय लहान पण देवाने घडवताना याचं वय इथेच थांबवले आहे का?
आमच्याशी त्याचे बोलणे चाललेले होते आणि त्याच वेळात अध्येमध्ये तो बाहेर तोंड काढून कोणाला तरी हात करत होता. चालत्या रिक्षातूनच कोणाची तरी चौकशी करत होता. शंकर भगवान पृथ्वी प्रदक्षिणेला आले आणि त्यांनी भक्ताला प्रसन्न होऊन दर्शन दिल्यावर त्या भक्ताच्या चेहेर्यावर जो आनंद असेल तो या पितळेने कोणाची चौकशी केल्यावर लोकांच्या चेहेर्यावर दिसत होता.
माथेरान आता कसे बदलले आहे, घोडेवाल्यांची मनमानी कशी होत होती, आलेल्या पर्यटकांना कसे लुबाडले जात असे, मग ती एकाधिकारशाही कमी व्हावी म्हणून सरकारने गावातील लोकांना घेऊन या बॅटरीवरील रिक्षा कशा चालू केल्या, त्या रिक्षांची देखभाल कशी करावी लागते, किती फेर्यांनंतर बॅटरी चार्ज करावी लागते, रिक्षा चालवणे कसे फायद्याचे आहे असे सगळे त्याने आम्हाला न विचारताच समजावून सांगितले होते. अलिबाबाच्या गुहेत गेल्यावर खजिना बघणार्याचा चेहरा कोणाला बघायचा असल्यास त्यावेळचा आमचा चेहरा बघावा. आम्ही अक्षरश: तोंड उघडे ठेवून त्याच्याकडून हे अद्भुत ज्ञान ग्रहण करत होतो. मधेच रिक्षावाला त्याला काहीतरी विचारत होता, त्याचेही हा मुलगा शंकानिरसन करत होता.
न राहवून काही वेळाने मी विचारले, ‘पितळे, तुमचे वय काय?’
या प्रश्नाची वाट बघत असल्यासारखा तो हसला आणि म्हणाला, ‘तुम्हाला काय वाटते ताई? मॅडम वगैरे म्हणणार नाही कारण ते भारतीय संस्कृतीत बसत नाही.’
बापरे! म्हणजे साहेब भारतीय संस्कृतीचे देखील अभ्यासक होते.
अंदाज लावत मी म्हणाले, ‘वीस आहे का वय? म्हणजे तुम्ही एवढे ज्ञानी आहात, त्यामुळे खरेच वयाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. शिवाय, तुम्हाला गावाचा इतिहास ठाऊक आहे, इथल्या परिस्थितीचा एवढा अचूक अंदाज आहे. तर म्हटले की किती वय असेल?’
तो पुन्हा हसला, ‘तुम्हाला तसे वाटणे स्वाभाविक आहे. खरे तर पहिल्या दोन मिनिटांतच लोक माझे वय विचारतात. त्यामानाने तुम्ही थोडे उशिराच विचारलेत. तुम्ही माझ्याशी एकेरीत बोललात तरी चालणार आहे. मी सतरा वर्षांचा आहे.’
मनातल्या मनात मी हिशेब लावला, ‘म्हणजे माझ्या मुलापेक्षा लहान की.’
माझ्या चेहेर्याकडे बघत तो म्हणाला, ‘बरोब्बर, तुमची मुलं कदाचित माझ्या वयाची असतील.’
मी पुन्हा दचकले.
अहो माझ्या मदतीला आले, ‘काय करतोस तू पितळे? आणि सगळे तुला नावाने न बोलावता असे आडनावाने का बोलावतात?’
तो उत्तरला, ‘एकदा आडनावाने सुरुवात झाली की तेच म्हणत आले सगळे. मलाही आता तशी सवय झाली. कोणी नावाने आवाज दिला तर लक्षातच येत नाही. मी डिप्लोमाला आहे. हे काय कॉलेजमधूनच येतोय. प्रथम वर्षाला आहे. दहावीनंतर प्रवेश घेतला आहे.’
उगीचच काहीतरी बोलायचे म्हणून अहो म्हणाले, ‘चांगलं आहे की.’
रिक्षावाल्याने अभिमानाने सांगितले, ‘संपूर्ण गावात पितळे दहावीला पहिला आलाय, पण तरीही डिप्लोमाला प्रवेश घेतला आहे. सगळे म्हणत होते कॉलेज कर, कॉलेज कर.’
पितळे म्हणाला, ‘तुम्हा लोकांना काय जातं लेकाहो मला चढवायला. अकरावी बारावी करा. आणि नंतर काय करा, इंजिनीरिंग. मी नीट अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की डिप्लोमाला चांगला अभ्यास करून थेट इंजिनियरिंग दुसर्या वर्षाला प्रवेश घेणे जास्त फायद्याचे आहे. माझ्या बरोबरचे सगळे दोस्त कॉलेजला गेले. मी एकटाच डिप्लोमाला आलो… त्यांनाही म्हणालो की कशाला पोरांनो बापाचा पैसा वाया घालवता? चला डिप्लोमाला आणि लवकर कमावायला लागा. पण यांना कॉलेजमध्ये जाऊन मजा करायची आहे, पोरी फिरवायच्या आहेत. हे ऐकतात का!’
अर्जुनाच्या तोंडून भगवद्गीता बाहेर पडावी तशी ही पितळेवाणी बाहेर पडत होती. आणि आम्ही अर्जुनागत ती ग्रहण करत होतो.
मध्येच रिक्षावाल्याला पितळेने विचारले, ‘चव्हाण, ती बोरेंची म्हातारी खपली ना आज. आता मयत असेल, बाकीचे गिर्हाईक थांबवून सगळ्या रिक्षा तिकडे लावाव्या लागतील.’
हा भाऊ कॉलेजमध्ये असूनही याला ही सगळी खबर कशी, असे आम्हाला वाटले, पण असे त्याला विचारणे सुद्धा मूर्खपणाचे होते. कारण तो पितळे होता. त्याला सदासर्वकाळ सगळेच ठाऊक असणार होते.
त्याच्या या सूचनेवर रिक्षावाल्याने लगेच होकार भरला, ‘हो पितळे, तसेच करुत.’
आम्ही कुठे जेवतो आहोत, इथे कुठे कुठे जेवण चांगले मिळते, आम्ही शाकाहारी आहोत की मांसाहारी, काय काय बघितले, कुठली ठिकाणे चांगली आहेत पण कसे लोक तिकडे फारसे फिरकत नाहीत, अशी अमूल्य माहिती नंतर आम्हाला पितळे नावाच्या तज्ज्ञांनी विचारली आणि दिली. अडीच किलोमीटरच्या आमच्या काही मिनिटांच्या प्रवासाच्या पूर्वी आम्ही जे होतो ते त्या प्रवासानंतर पूर्णपणे बदललो होतो. आता आम्हीदेखील संपूर्ण गावाप्रमाणे पितळेचे चाहते झालो होतो.
नकळत माझ्या तोंडून प्रश्न बाहेर पडला, ‘आम्हाला चहा चांगला मिळाला नाही रे. सांगशील का कुठे चांगला मिळतो.’
‘सांगतो. शाकाहारी लोकांना एवढे एक व्यसन असते. त्यांना चांगला चहा लागतो.’ अहोंकडे बघत तो हे म्हणाला आणि पहिल्यांदा नवर्याच्या चहावर कोणीतरी बोलले म्हणून मी हसून त्यांच्याकडे बघत होते. एखाद्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्टरने टिप्पणी करावी तसे पुढे पितळे बोलू लागला, ‘पण एक सांगू का तुम्हाला? शाकाहारी लोकांना शक्ती कमी पडते. त्यांना त्यामुळे चहा घ्यावासा वाटतो. अमुकतमुक उद्योजकाची बायको काही दिवसांपूर्वी इकडे माथेरानमध्ये आली होती. ती तर काय ते विगन होती. बाईंना सोयाबीन दुधाचा चहा हवा होता. शिवाय बाईंना एवढे चालून जायचे नव्हते. आणि असे रिक्षात किंवा घोड्यावर जाणे कमीपणाचे वाटत होते. मग मॅडम त्यांची वैयक्तिक अँब्युलन्स घेऊन आल्या आणि थेट वरती हॉटेलात गेल्या. इथे कुठे सोयाबीन दूध मिळणार? मग लिंबू घालून कोरा चहा पिणे कसे तब्येतीसाठी उत्तम आहे हे त्यांना पटवून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली. म्हटलं चला, बोलतो बाईंशी.’
मी वेड्यासारखे विचारले, ‘मग काय झाले, प्यायल्या का उद्योजक बाई लिंबाचा चहा.’
त्याने अत्यंत करुणेने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, ‘ताई, पितळेला काम दिले आहे म्हटले की संपले ना. पुढे ते झाले की नाही हा प्रश्न उरतोच कुठे!’
खरे तर एवढ्या प्रवासात माझ्या हे लक्षात यायला हवे होते. हा माणूस हाडामासाचा नव्हे तर खरेच पितळासारख्या कुठल्या तरी धातूचा बनला असावा. धातूसारखा दणकट होता.आम्ही रिक्षेतून खाली उतरलो. तर तिथे केवढी तरी मंडळी पितळेची वाट बघत होती. परतीच्या रिक्षांच्या रांगेत खूप गर्दी होती. पितळेच्या अंदाजाप्रमाणे त्यातील बरीच गर्दी बोरेंच्या म्हातारीच्या मयताला जाणारी होती. पुढे होऊन पितळेने त्या सगळ्यांना वेगवेगळ्या रिक्षात बसवून दिले. रांगेतील पर्यटक लोक याविरोधात गोंधळ घालू लागले त्यांना याने समजावून गप्प बसवले.
आम्ही एखादा क्रिकेटचा चित्तथरारक सामना बघितल्यासारखा पितळेची ही सगळी कौशल्ये बघत उभे होतो. पलीकडे एका कट्ट्यावर काही म्हातारे लोक बसले होते. त्यांनी पितळेला आवाज दिला, ‘अरे बाबा, केव्हाची वाट बघतोय तुझी. ये जरा.’
मग पितळे तिकडे गेला. एका आजोबांना त्यांच्या मालिशबद्दल विचारले. मला तर पक्के ठाऊक आहे, मालिश कशी करायची, कोणाला मधुमेह असल्यास कुठले उपचार करायला हवेत, एवढेच कशाला माथेरान गावाच्या हितासाठी सरकारने काय निर्णय घ्यायला हवेत हे सगळे पितळेच ठरवत असणार.
अर्धा पाऊण तास तो तिथेच बोलत उभा होता. आम्ही मग तिथून निघालो. आम्हाला चहाची तल्लफ आलेली होती. चहा कुठे घ्यायचा हे आम्हाला पितळेने सांगून ठेवले होते. थोडे पुढे गेलो तो मागून आवाज आला, ‘तिकडे नाही दादा, इकडे.’
आम्ही मागे वळून बघतो तो पितळे झपाझप पावले टाकीत येत होता. त्याची ती सॅक, बारीक डोळे, छोटी उंची हे आता काहीच नजरेत येणार नव्हतं. त्याचा आनंद तेवढा नजरेत साठवत होतो. त्याच्यावरील राग तर कुठल्या कुठे पळाला होता. उलट त्याने आवाज देऊन आम्हाला थांबवले हा आम्हाला आमचा बहुमान वाटला होता. तो म्हणाला, ‘चला, माझ्या घरी जायच्या रस्त्यात तुमचे चहाचे दुकान आहे. सोडतो तुम्हाला तिकडे.’
आम्हाला घेऊन तो चालू लागला. शंभर लोकांना हात करणे, त्यांची चौकशी करणे चालूच होते. त्याला विचारले, ‘तुझ्या घरी कोण असतं रे?’
तो म्हणाला, ‘सगळे असतात. बाप असतो, माय असती. एक लहान बहीण आहे.’
पण आतापर्यंत माहिती देताना त्याच्यात जो उत्साह होता तो आताच्या बोलण्यात नव्हता. आपण उगीच याला विचारले की काय असे वाटल्ो. हा कोणा श्रीमंताचा लेक नाही हे त्याच्या राहणीवरून समजले होते. पण त्याचा एकंदर आवेश मात्र परिस्थितीला आडवे करून पाणी पाजण्याचा होता. चहाचे दुकान आले. त्याला चहाचा खूप आग्रह केला. पण त्याने घेतला नाही. आम्हाला चांगला चहा पाजण्याच्या सूचना मात्र त्याने चहावाल्याला केल्या. आपले खास पाहुणे आहेत हे बजावले. चहावाल्याने देखील आम्हाला अतिशय आदराने वागवले.
‘ येऊ का दादा? ते बघा ते माझं घर,’ असे म्हणून त्याने समोरच्या गल्लीच्या उतारावर एक घर दाखवले. घर कसले छोटे झोपडे होते. ‘आमचं चप्पलचं दुकान आहे. माथेरानचे अर्धे लोक चप्पलचे दुकानच चालवतात. चला निघतो. आता दुकानावर बसायची वेळ झाली,’ असे म्हणून तो उताराला लागला.
निघतो नाही येतो म्हणावे रे पितळे असे मला त्याला म्हणावेसे वाटले. पण तो इथेच असणार होता. मग तो कुठून येणार. आम्हीच परके होतो. आम्ही तिथून निघालो पण पितळे आमच्या डोक्यातून गेला नाही.
मी काय म्हणते, तुम्ही माथेरानला गेलात आणि मी सांगतिल्याप्रमाणे मुलगा तुम्हाला दिसला तर माथेरानमधून त्याला भेटल्याशिवाय परत येऊ नका. कारण नाव ‘पितळे’ असलं तरी ते पितळे नावाचं सोनं आहे.