□ एसटीच्या तोट्याला लाडक्या बहिणी जबाबदार- परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे विधान.
■ लाडक्या बहिणींवर कसलेही निकष न लावता अनुदानाची उधळपट्टी करण्याच्या आधी हा शहाणपणा कुठे गेला होता? तेव्हा यांनी अशा योजना आणू नका, भविष्यात माझ्या खात्याला तोट्यात घालतील, असं काही म्हटलं नव्हतं… तुमच्या सरकारच्या एसटीतलं डिझेलच ते होतं… आता सत्तेच्या मुक्कामावर पोहोचल्यावर बहिणींच्या नावाने बोटं मोडताय होय?
□ फसवणूक प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा; मंत्रीपदावर टांगती तलवार.
■ ना शिक्षा होणार ना मंत्रिपद जाणार… यांची साधनशुचिता फक्त इतरांकडे बोट दाखवण्यापुरतीच असते… ज्यांना सहयोगी म्हणून सोबत घेतलेलं आहे त्यांना टप्प्याटप्प्याने उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे. त्यांनी ते स्वकर्माने ओढवून घेतलेलं आहे म्हणा!
□ एकनाथ शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के; एकीकडे ९०० कोटींच्या खरपुडी गृहनिर्माण प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश आणि दुसरीकडे १४०० कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द.
■ महाशक्तीची राजकीय सोय म्हणून शिवसेना फोडायला पाहुण्याची काठी वापरली गेली होती, तेव्हा मिळालेला मान पाहून त्या काठीला आपण राजदंड असल्याचा भ्रम झाला होता. तो आता पद्धतशीरपणे दूर केला जातो आहे, एवढेच. आता हात चोळत बसण्यापलीकडे करतील काय? आपण स्वयंभू नेते नाही, हे आता फार वाईट पद्धतीने लक्षात येईल.
□ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा डेटा देण्यास आयकर विभागाचा राज्य सरकारला ठेंगा.
■ बहिणींचा उपयोग संपला आहे, आता त्यांनाही लवकरच ठेंगाच मिळणार आहे.
□ माझी खुर्ची तर गेली, पण पंतप्रधानांची खुर्ची मी बनवून देणार – सुधीर मुनगंटीवार.
■ फावल्या वेळात वेगळ्या काही कला शिकत आहेत का? राजकारणात टिकायचं म्हटल्यावर काही ना काही कुटीरोद्योग करावे लागतातच म्हणा!
□ महायुतीत शीतयुद्ध; रुसलेल्या एकनाथ शिंदेंची ‘दांडीयात्रा’ अजूनही सुरूच – फडणवीसांच्या बैठकांबरोबर कार्यक्रमांकडेही पाठ.
■ यातून साध्य काय होणार? आता आपलं डोकं सोडून फोडायला काय शिल्लक उरलं आहे. जे काही घेऊन गेले आहेत, ते महाशक्ती क्षणार्धात फोडून मोकळी होईल. मग जे इतरांना सांगत होतात, तेच होईल… दोघेच उरतील.
□ बेरोजगारी हटवण्याची महायुतीची घोषणा हवेतच; सरकारी नोकर्या १६ टक्क्यांनी घटल्या.
■ पण तरुणांना मिरवणुकांमध्ये नाचणे, अचकट हावभाव करणे, सोशल मीडियावर धमक्या देणे, गुंडांचे आणि राजकीय गुंडांचे फोटो नाचवणे, गोरगरीबांवर दहशत माजवणे, असे कितीतरी वेगळे उद्योग निर्माण होत आहेत… त्यातून रोजगार तयार होतीलच की!
□ धनंजय मुंडेंमुळेच कृषी खात्यात घोटाळा – आमदार सुरेश धस यांचा आरोप.
■ आधी धस सच्चे वाटत होते. मग त्यांची आणि मुंडेंची भेट पाहून काळजात धस्स झाले… आता कितीही आरोप करा आणि काहीही बोला, ते फुस्सच वाटणार हो!
□ रायगड जिल्ह्यात मिंधे गटात वॉर : आमंत्रण दिले नाही म्हणून राजा केणींचा थयथयाट.
■ सगळे सत्तेभोवती गोळा झालेले मुंगळे आहेत… गूळ मिळाला नाही की एकमेकांना कडकडून चावणारच.
□ ईडी लावू, तुरुंगात डांबू, अशा धमक्या दिल्याने अजित पवार गटात गेलो – जितेंद्र आव्हाडांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी केला पर्दाफाश.
■ जे जे महाशक्तीच्या भजनी लागले आहेत, त्यांची कहाणी तीच आहे. ईडीच्या भीतीपुढे दबले नाहीत, नमले नाहीत, असे दमदार नेते कमीच आहेत राज्यात.
□ माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणार्यांवर किती विश्वास ठेवायचा? – संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची टोलेबाजी.
■ लोक काही काळ टाळ्या वाजवतील. नॉन बायॉलॉजिकल जिथे बसलेत तिथे भक्कम आहेत. जनता भ्रमित आहे, तोवर ते काही हलत नाहीत. जनतेला जाग येण्याची सुतराम शक्यता नाही. हे सगळे अरण्यरुदन ठरणार आहे.
□ दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
■ चला, परीक्षा मंडळाच्या लौकिकाला बट्टा लागला नाही म्हणायचा!
□ कोस्टल रोडला महिनाभरातच तडे.
■ महिनाभर टिकला कसा, उद्या लोकांच्या सगळ्याच रस्त्यांकडून अपेक्षा वाढतील, म्हणून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केलं नाही म्हणजे मिळवली.
□ राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही – शरद पवार.
■ राजकारणी मंडळी साहित्यात सोडा, लोकांच्या स्वयंपाकघरांमध्येही आणि भोजनघरांमध्येही शिरली आहेत पवार साहेब! त्यांना हुसकावण्याची काही युक्ती सांगा.
□ कानडी आमच्या उरावर बसून आमच्या भाषेला नाकारताहेत – सीमावासीयांचा संताप.
■ त्यांच्याइतका प्रखर भाषाभिमान महाराष्ट्रात असता तर मुळात हिंदीचं स्तोम माजवून मराठी संस्कृतीचा गळा घोटत चाललेली, महाराष्ट्राला गोपट्टा बनवणारी त्रिभाषा सूत्राची संकल्पनाच, उत्तर भारताने स्वीकारण्याआधी, आपण स्वीकारली नसती.
□ मिंध्यांचा आणखी एक घोटाळा; माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यवधींचे अनुदान लाटले.
■ यात घोटाळा काय आहे? हेच त्यांचे राजकीय कार्य आहे. ते पाहूनच तर लोक त्यांना वारंवार निवडून देतात.