एकेकाळी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका सुरू होती. तो १९८७-८८चा सुमार. तेव्हा रस्ते ओस पडायचे. फोन बंद. सभा रद्द. भेटीगाठीसाठी ती वेळ टाळली जायची. हळदीकुंकू, फुलं, आरत्या यांनी टीव्ही सेटला मंदिराचं रुपडं यायचं. ‘सीता राम चरित अतिपावन…’चे स्वर घराघरात घुमायचे. एक चमत्कारच जसा या पौराणिक महाकाव्याने मनोरंजनाच्या दुनियेत घडविला. एक पर्व आकाराला आलं. रामायणाचा जबरदस्त पगडा एकूणच समाजजीवनावर असल्याचे प्रत्यंतर वेळोवेळी आलं आणि येत आहे. या कथानकातील काहीशी दुय्यम समजली गेलेली, दुर्लक्षित व्याक्तिरेखा म्हणजे उर्मिलेची! अभ्यासकांच्या दृष्टीने ती आजही संशोधनाची ठरलीय.
काही व्यक्तिरेखा जरी मध्यवर्ती नसल्या तरीही मनात गच्च घर करून बसतात. ‘नटसम्राट’ नाटकातील बेलवलकरांची पत्नी सरकार यांना रसिकांकडून हृदयात मानाचे स्थान मिळते. ‘घाशीराम कोतवाल’च्या शीर्षकात ‘घाशीराम’ असला तरी कावेबाज नाना त्याचे नायक होतात. ‘वीज म्हणाली धरतीला’ हे झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरले नाट्य. पण त्यात राणीला सोबत करणारी जुलेखाचा पराक्रम, जिद्द लक्षवेधी ठरते. ‘इथे ओशाळला मृत्यू’तले नायक छत्रपती संभाजीराजांसमोरचा क्रूर औरंगजेब किंवा ‘सखाराम बाईंडर’समोरची लक्ष्मी, तसंच ‘ती फुलराणी’तला मंजुळासमोरचा प्राध्यापक अशोक जहागीरदार. एक ना दोन. या तशा दुय्यम वाटणार्या व्यक्तिरेखा रसिकांच्या मनावर खोलवर रुजल्या गेल्यात. त्यांचा एक ठसा उमटलाय. त्याच प्रकारे रामायणातील व्यक्तिरेखा उर्मिला! लक्ष्मणाची पत्नी! प्रमुख पात्र नसलं तरीही तिचं एकाकीपण, दु:ख, वेदना ही हेलावून सोडते. कमालीची अस्वस्थ करते. याच व्यक्तिरेखेचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न नाटककार सुनील हरिश्चंद्र यांनी केलाय. तो विलक्षणच आहे.
स्त्री-पुरुष, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्यात असलेलं नाजूक नातं जागविण्याचा प्रयत्न ‘उर्मिलायन’ नाट्यात असून हा विषय पुराणातला असला तरीही तो कालबाह्य झालेला नाही. रामायणाच्या मुख्य कथानकातलं राजकन्या उर्मिलेचं हे नाट्यपूर्ण उपकथानक, जणू पुराणातली लव्हस्टोरीच! तिची तुलना आजही काही गोष्टींशी सहज करता येईल. ही कथा पहिल्या नजरानजरेपासून सुरू होऊन प्रेम, लग्न, कुटुंब, विरह, समज-गैरसमज इथपर्यंत पोहचते.
पडदा उघडताच शस्त्रविद्या शिबिरात घडते योद्धा लक्ष्मण आणि उर्मिला यांची पहिली भेट. आव्हान प्रतिआव्हानातून एकमेकांबरोबर तलवारबाजी खेळली जाते. दोघेही या कलेत निपुण. तिचं कौशल्य बघून लक्ष्मण भारावून गेलेला. उर्मिला ही शस्त्रकला, चित्रकलेत पारंगत. दोघेही प्रेमात आकंठ बुडालेले नाच-गाणी, काव्य-चित्रे यातून व्यक्त होतात. दोघांच्या विवाहानंतर ती पत्नीपेक्षा अतिप्रिय सखी म्हणून आणि तो पतीपेक्षा अतिप्रिय नाथ म्हणून तन-मनाने एक झालेले. या दोघांच्या दालनात प्रेमसंवाद सुरू असतानाच नाट्य एका वळणावर पोहचते. माता कैकयीने संकट उभे केले. रामाला १४ वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक. रामापाठोपाठ माता सीता निघते. त्यामागोमाग लक्ष्मणही निघतो. साधा निरोपही न घेता.
धर्मपत्नीला विश्वासात न घेता तो वनवासी निघाल्याने उर्मिला पुरती हादरते. पतीवियोगाने पुरती कोसळते. कुठल्या तोंडाने उर्मिलेचा निरोप घेणार? कर्तव्य-श्रद्धा श्रेष्ठ. सर्वच वनवासी गेले तर राज्य, कुटुंबाकडे कोण बघणार? हे प्रश्न लक्ष्मणाचे असल्याने तो अगतिक बनतो. अर्धांगिनी म्हणून ओळखल्या जाणार्या आम्ही स्त्रिया सर्वार्थाने गुलाम आहोत. सहजीवनाचा एकतर्फी त्याग करण्याचा अधिकार हा काय फक्त पुरुषांनाच आहे काय, हा सवाल उर्मिला करते. आणि एक शिक्षा म्हणून चौदा वर्ष मूकपणाने एकांत स्वीकारते. मनाच्या गाभार्यातून ‘सखा’ पतीला ती मुक्त करते. नेमक्या याच दोन मुद्द्यांवर हे नाट्य गुंफण्यात आलंय. दुसर्या अंकात युक्तिवाद, वैचारिक, भावनिक संघर्ष टिपेला जातो. तो या एकूणच नाट्याचा गाभा आहे.
विरहात असताना उर्मिलेने केलेले प्रेमावरचे भाष्य तसेच ‘हे महापुरुषा’ हे जाब विचारणारे स्वगत, म्हणजे संहितेतली जमेची बाजू ठरते. एकपात्री प्रयोगाच्या जवळ जाणारी ही स्वगते हमखास टाळ्यांची दाद मिळवून जातात. ‘प्रेमा’वर उर्मिला म्हणते, ‘प्रेम सगळ्यांच्याच पलीकडे असते. प्रेम म्हणजे एखाद्यासाठी आपलं आयुष्य ओवाळून टाकणं असतं. प्रेम म्हणजे आपला विचार न करता त्याचा विचार करणं असतं. प्रेमात विश्वास असतो. त्याग असतो. अधिकार असतो. प्रेमात स्वातंत्र्यही असते. रंगेलपणा अन् झुरणेही असतो. प्रेमात येते बंडखोरी आणि प्रेमातच येते जबाबदारी, म्हणून जिथे प्रेम आहे तिथे वेदना आहे. प्रेम आहे तिथेच बांधलेपणाचे करकचलेले धागे आहेत. प्रेम हे अपेक्षाभंगही विसरायला लावते!’
ए री सखी सुन तो जरा तो बरसू लागला
शीतल बुंदे मन को मुंदे बिलगू लागला
आणि नजरेचा तीर मनी शिरता, मन अधीर अद्भुत काहुरते
आणि
अंगांगं कोवळे उन, ढळतात किती आतून
हे रंग सात जन्मांचे, बेरंग तुझ्यावाचून
आणि
वंदना तिन्ही लोकांची कंकणे ज्यास सूर्याची
पापणी नम्र झुकलेली, एकाग्र लोचने ज्याची!
तसेच दुसर्या अंकातील
आवरुनी गहिवर सांगा, प्रियकर प्रियवर सांगा
हे काव्य, नृत्य आणि त्यातील ताल-सुरांनी हे नाट्य एका उंचीवर पोहचण्यास मदतच होते. उर्मिलाचे अंतरंग त्यातून अधिक प्रभावीपणे प्रकाशात येते. शब्दांपलीकडचा अर्थ मिश्र लयींच्या नर्तनातून साकारण्याचा प्रयत्न उर्मिलेला जणू आगळावेगळा ‘लहेजा’ देतो.
स्त्रियांची आभूषणे सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच कुळाचं भूषण म्हणून ओळखली जाणारी असली तरीही त्याचा अर्थ गुलामगिरी असल्याचे उर्मिला सांगते. स्त्रियांनी हात उंचावू नये म्हणून बाजूबंद, बांगड्या आहेत. तिनं हात उंचावला तर आवाज होईल. कर्णभूषणे कानात घातली जातात. कारण तिने काही ऐकू नये म्हणून. मानेभोवतीचे हार, माळा या मान फिरवू नये म्हणून येतात. पायातील नूपुरांमुळे पायांनी फार धावू नये म्हणून आणि पैंजणे ही आवाज यावा म्हणून. स्त्री गुलाम असते यासाठी ही आभूषणे दिली आहेत. स्त्रीची आभूषणे ही गुलामीचं प्रतीकं आहेत हे ठामपणे सांगून स्त्रीमुक्तीची संकल्पना उर्मिला मांडते. ती अर्थपूर्ण आहे.
नाटककार आणि दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांची संहिता आणि दिग्दर्शन हे एकहाती असल्याने कुठेतरी पौराणिक आणि संगणकयुगाची वैचारिक सांगड घालण्याचा प्रयोग दिसतोय. एक अन्वयार्थ लावण्याचाही त्यामागे प्रयत्न आहे जो लाखमोलाचा. ही संहिता मूळची एकांकिकेची, स्पर्धेत विजेती ठरलेली. एकांकिकेच्या आवाक्याबाहेरची असल्याने दोन अंकात बसविली आहे. खटकेबाज संवाद, काव्यात्म बाज, टाळ्यांची वाक्ये, प्रसंगातील नेमकेपणा, उत्कर्षबिंदूचा वेग, हे सारं काही सुरेख जुळून आलंय. दुसर्या अंकातील स्वगते, संवाद याची गर्दी असून सादरीकरणामुळे पकड घेतली जाते. तांत्रिक बाजूंनी परिपूर्ण होण्यासाठी अनेक युत्तäया योजण्यात आल्या आहेत. नाटककाराची संशोधक प्रवृत्ती नजरेत भरते. दिग्दर्शकाला असलेला नावीन्याचा वेधही दिसतो. त्याचे ‘पाहिले न मी तुला’ हे आजच्या युगातलं कॉमेडी व्यावसायिक नाटक एकीकडे, तर दुसरीकडे ‘उर्मिलायन’ ही पौराणिक शैलीतली नृत्यनाटिका, या दोन्ही बाजूंनी रंग-ताकद व कल्पकता दिसते. महाविद्यालयीन, राज्यनाट्य स्पर्धेत विजेतेपदाची मोहर उमटवली असल्याने आविष्कारात सफाईदारपणा आहे. एकांकिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर अनेकांची दारे अलगद उघडली गेलीत. त्यात सुनील हा एक आघाडीचा रंगमंचावरला फलंदाज ठरला आहे.
निहारिका राजदत्त हिने उर्मिलाची प्रमुख भूमिका केली आहे. अभिनयाची उत्तम जाण असलेली ही गुणी अभिनेत्री. एकांकिकेपासूनच उर्मिलाची भूमिका तिनं केलीय. तिची देहबोली शोभून दिसते. अभिनय आणि आवाजावर असणारी हुकमत ही नोंद घेण्याजोगी आहे. नृत्य तसेच तलवारबाजीतील कौशल्य अप्रतिम. दुसर्या अंकातलं नाट्य अक्षरशः अंगावर झेललं आहे. अमोल भारती याने साकारलेला लक्ष्मण चांगली साथसोबत करतोय. त्याची बाजूही चांगली मांडली असून त्याची अगतिकता त्यात अधोरेखित होते. उर्मिला आणि लक्ष्मण यांच्या खटकेबाज संवादांना न्याय मिळाला आहे. ही जोडी शोभून दिसते.
कल्पिता राणे हिची सीता, पूजासाधना हिची धनु आणि अजय पाटील याचा भरत याही व्यक्तिरेखा आपल्या भूमिका चोख पार पाडतात. टीमवर्क उत्तम. १८ जणांची टीम सोबत आहे. एकूणच टीमवर्क चांगले जुळले आहे. सुजय पवार आणि ऋचा पाटील यांनी नृत्यरचना केल्यात, ज्या टाळ्यांची उत्स्फूर्त दाद वसूल करतात. यातील नृत्यामुळे संस्कृतीचा अर्क सादरीकरणातून आकारतो.
अन्य तांत्रिक बाजूही नजरेत भरणार्या आहेत. निनाद म्हैसाळकर याचे संगीत हे पौराणिक कथेला पूरक तर चेतन ढवळे याची प्रकाशयोजना कलात्मक आहे. सिद्धार्थ आखाडे यांची साहसदृश्ये, उदयराज तांगडी व सुनिहार यांची रंगभूषा, वेशभूषा ही त्या काळात घेऊन जाणारी. निर्माते निखिल जाधव यांनी निर्मितीमूल्यांत कुठेही तडजोड केलेली नाही. श्रीमंती थाट दिसून येतो. जो काहीदा थक्क करून सोडतो. वैभवशाली मराठी नाट्यपरंपरेचे जनक असणारे विष्णुदास भावे यांनी १८४३ साली याच रामायणातील कथानक हे ‘सीता स्वयंवर’ नाटकातून सादर केलं. हा नाट्यइतिहास. इथूनच संवादरूपी पहिल्या नाटकाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी रामायणावर आधारित दहा नाटकेही रंगभूमीला दिली. हा भूतकाळ जागा आहे काळ बदलला तरी त्याचे नवनवीन अर्थ-अन्वयार्थ हे काढले जातात. एवढी अलौकिक ताकद या महाकथेत गच्च भरलेली आहे. त्यातीलच हे एक उर्मिलचे प्रकरण!
रामायणातल्या अनेक अपरिचित पैलूंबद्दल अभ्यासकांचे कायम कुतूहल आहे. ‘हमारे राम’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत असून अभिनेते आशुतोष राणा हिंदी रामायणातल्या कथेत ‘रावणा’ची भूमिका करीत आहे. या प्रयोगाचे देशभरात विक्रमी प्रयोग होत आहेत. नव्या पिढीलाही रामायणातील व्यक्तिरेखांचे ‘क्रेझ’ असल्याचे दिसतंय. मराठी जाहिरातींमध्ये हिंदी ‘हमारे राम’ आणि ‘उर्मिलायन’ दोन्ही दिसताहेत! ही नाट्यवर्तुळात नोंद घेण्यासारखी घटना आहे.
नाटककार मामा वरेरकर यांनी १९५० साली ‘भूमिकन्या सीता’ हे नाटकही लिहिले. याचा पहिला प्रयोग हिंदीत झाला. त्यात उर्मिलेची व्यथा आणि सीतेचं भूमीशी असलेलं नातं ठळकपणे प्रथमच मांडलं होतं. ज्योत्स्ना भोळे यांची सीता, कुसुम कुलकर्णी हिची उर्मिला गाजली होती. पौराणिक कथेला आधुनिक आशय देण्याचा प्रयत्न होत आहे. आज ७५ वर्षानंतरही हेच व्ाâथानक अभ्यासू रंगकर्मी नव्या कल्पक चष्म्यातून मांडत आहे. मराठी रंगभूमीने जागतिक स्तरावर जी काही दर्जेदार नाटके दिलीत त्यात दखलपत्र ठरावे असे हे उर्मिलायन! याचे प्रयोग अन्य भाषेत, राज्यात, परदेशात व्हावेत त्या दृष्टीने सर्वच स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत!
पणती जरी सूर्याची बरोबरी करीत नसली तरीही अंधारात तिला सूर्याएवढचं महत्व असतं, हेच सांगणारी ही उर्मिलेची कथा. ती आज नव्या रंगारूपात शैलीदार आविष्कारात रसिकांपुढे पेश झालीय. तिचं स्वागत दर्दी रसिक निश्चितच करतील यात शंका नाही.
उर्मिलायन
लेखन/दिग्दर्शन – सुनील हरिश्चंद्र
नेपथ्य – अरुण राधायण
संगीत – निनाद म्हैसाळकर
प्रकाश – चेतन ढवळे
नृत्ये – सुजय पवार, ऋचा पाटील
गीते – सुनील / गजानन
सूत्रधार – दिनू पेडणेकर /अरविंद घोसाळकर
निर्माता – निखिल जाधव
निर्मिती – सुमुख चित्र/अनामिका