सुपरमॅन, आयर्न मॅन, अवेंजर्स यांसारख्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या हॉलिवुडपटांनी जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. पण खरंतर महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास अस्सल महानायकांनी भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर पुत्राने संपूर्ण मुघल साम्राज्याला हादरवून सोडलं, पण हा पराक्रम जगभर पोहचू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘छावा’ चित्रपटात संभाजी महाराजांचा पराक्रम, निष्ठा आणि बलिदानाची गाथा भव्य दिव्य स्वरूपात जगभरात पोहचेल अशी मांडणी केली आहे.
१६८० साली छत्रपती शिवाजी महाराजांचा अकस्मात मृत्यू झाला आणि मराठा साम्राज्य एका मोठ्या संकटात सापडले तिथून सिनेमाची कथा सुरू होते. मुघल बादशहा औरंगजेबाला (अक्षय खन्ना) वाटलं की शिवाजी महाराजांचा वारसा संपला आहे आणि मराठा साम्राज्य आता सहज गिळंकृत करता येईल. पण छत्रपती संभाजी महाराजांनी (विकी कौशल) बुर्हाणपूरवर हल्ला करून औरंगजेबाचा खजिना लुटला, तेव्हा त्याची ही समजूत धुळीस मिळाली! औरंगजेबाने मराठ्यांचे दख्खन मुघल साम्राज्यात सामील करून घेण्यासाठी लाखोंच्या सैन्यासह महाराष्ट्राकडे कूच केली. बलाढ्य सेनेच्या बळावर काही दिवसांतच मराठ्यांचा पराभव करून दिल्लीला पुन्हा जाऊ, असा औरंगजेबाचा कयास होता. दिल्लीहून आलेली निम्मी मुघल सेना संभाजी महाराजांनी कुशल रणनीतीने गारद केली. त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नव्हती. त्यांना परकीयांसोबतच स्वकीयांशीही संघर्ष करावा लागला. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असूनही, त्यांच्या गादीवर बसण्याला विरोध करणार्या अनेक शक्ती होत्या. या सगळ्या राजकीय कलहाच्या पार्श्वभूमीवर संभाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा संघर्ष अधिक तीव्र होत गेला. मुघली सेनेवर शेवटचा घाव घालण्याआधी स्वकीयांकडून झालेल्या गद्दारीमुळे संभाजी महाराज पकडले गेले. क्रूरकर्मा औरंगजेबाने महाराजांवर अगणित अत्याचार करून त्यांना अत्यंत निर्दयीपणे ठार मारले, हा घटनाक्रम सिनेमात आहे.
संभाजी महाराजांवरील संपूर्ण चरित्रपट केवळ तीन तासांच्या सिनेमात उभा करणं शक्य नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी संभाजी महाराजांचा औरंगजेबाशी संघर्ष, त्यांची अटक आणि त्यांना वीरगती प्राप्त होणे यावरच लक्ष केंद्रित केले आहे. सिनेमा सुरू होतो तो औरंगजेबच्या दिल्लीतील दरबारापासून. पोषाखी ऐतिहासिक सिनेमात सेट उभे करणे आज अवघड राहिले नाही, पण त्या व्यक्तिरेखा साकारणे हे आजही चॅलेंजिंग आहे. दरबारातल्या मुघल सरदारानंतर कॅमेरा जातो सिंहासनावर बसलेल्या, टोप्या विणणार्या हातांकडे, हळूहळू कॅमेरा वर जात औरंगजेबाची छबी दिसते… आणि तो औरंगजेबच वाटतो हे अभिनेता अक्षय खन्ना, दिग्दर्शक आणि मेकअप डिझायनर श्रीकांत देसाई यांचं यश आहे. सिनेमावर मेहनत घेतली गेली आहे हे इथूनच ठसायला सुरुवात होते. अक्षय खन्ना संपूर्ण सिनेमात उत्तम काम करतो. त्याहीपेक्षा काकणभर सरस भूमिका निभावली आहे विकी कौशलने. मसान, राजी, सॅम बहादूर, सरदार उधमसिंग या सिनेमांनंतर संभाजी महाराज पडद्यावर साकारताना विक्की कुठेही कमी पडला नाही. मराठी संवाद असोत अथवा आईसाहेब, आबासाहेबांच्या आठवणीने व्याकुळ होणारे छत्रपती संभाजी महाराज असोत, सोयराबाईंच्या महालात आशीर्वाद घेताना, संगमेश्वरच्या लढाईत फितुरी करणारे कोण ते कळल्यावर विषण्ण आणि संतप्त होणारे महाराज, लढाईत एकेक मोहरा गळत असताना विकल होणारे आणि त्या शूरांचा पराक्रम पाहून पुन्हा त्वेषाने लढणारे संभाजी महाराज विकीने अत्यंत ताकदीने अभ्यासपूर्ण उभे केले आहेत. संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना शोभून दिसली आहे. परंतु संवादाचा दाक्षिणात्य लहेजा तिच्या भूमिकेस पूर्णत्व देत नाही.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला संपूर्ण सिनेमात आवाजातून भेटतात. पुत्राने पित्यास विचारलेले प्रश्न आणि पित्याने दिलेली उत्तरे यातून भेटलेले आबासाहेब प्रभावी ठरतात. सरसेनापती हंबीरराव मोहिते (आशुतोष राणा) थेट कल्पनेतील चित्राशी मिळतेजुळते आहेत, पण त्यांच्या तोंडी एकही मराठी संवाद नाही ही बाब काहीशी खटकते. तीच गोष्ट सोयराबाई साकारलेल्या दिव्या दत्ताच्या बाबतीत. गणोजी शिर्के (सारंग साठ्ये) कान्होजी (सुव्रत जोशी) यांनी लहानशा पण महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्या व्यक्तिरेखांची चीड येते यातच त्यांच्या अभिनयाचं यश आहे. धाराऊच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर खूप वर्षांनी पडद्यावर दिसतात, त्यांचा वावर सहज आहे. मुडदा बशिवला त्या औरंगजेबाचा हे त्यांचं वाक्य हशा आणि टाळ्या घेऊन जातं. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर यांच्या भूमिका त्या त्या प्रसंगात उत्तम झाल्या आहेत. डायना पेंटीने साकारलेली औरंगजेबची कन्या झीनत उन् निसा प्रभावी आहे. कवी कलश यांची भूमिका करणारा हरहुन्नरी कलाकार विनीत कुमार याने चार चांद लावले आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या काव्यशास्त्रविनोदाची अजून थोडी झलक असती तर विनीतकुमार अधिक लक्षात राहिला असता.
सौरभ गोस्वामी यांचे छायालेखन आणि सुब्रता चक्रवर्ती यांचे कलादिग्दर्शन या सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. मराठ्यांची गनिमी काव्याची रणनीती दाखवताना भव्यतेवर विशेष लक्ष दिलं आहे. पाण्यातून.. शेतातून.. हवेतून.. मुघलांच्या सेनेवर मावळे अचानक हल्ला चढवताना दिसतात. ही युद्धदृश्यं आणि गड-किल्ल्यांचं भव्य चित्रण पडद्यावरच्या सर्वोत्तम अनुभवांपैकी एक आहे. संगमेश्वरची निकराची प्रदीर्घ लढाई उत्तम चित्रित झाली आहे. पाच हजार मुघलांशी ५०० मराठे सैनिक काय त्वेषाने लढले असतील, हे या दृश्यात परिणामकारकपणे दाखवलं आहे.
मराठ्यांचं शौर्य, फितुरी, संभाजी महाराजांची शौर्यगाथा मनावर ठसते ती या लढाईतूनच. इथून पुढे सिनेमा वेग घेतो… औरंगजेबाच्या छावणीतील संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील संवाद, संभाजी महाराजांवर झालेले अगणित अत्याचार पाहून डोळ्यात अश्रू दाटतात. या सिनेमाचे पार्श्वसंगीत प्रसंगांना साजेसं आहे. पण सिनेमातली गाणी लक्षात रहात नाही. ए. आर. रहमानकडून अधिक चांगल्या संगीताची अपेक्षा होती. दोन तास ४० मिनिटे लांबीचा सिनेमा वेशभूषा, रंगभूषा, सेट्स या सगळ्याच मितींतून बांधून ठेवत आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातो. संभाजी महाराजांची शौर्यगाथा, त्यांचे स्वराज्यासाठी बलिदान वैश्विक स्तरावर पोहचवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.