बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीच महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे ऋषी कपूर यांचे निधन झाल्यानंतर रणबीरने कालच 27 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय ऑर्गन डोनेशन डे’ निमित्त आपले अवयवदान करण्याचा संकल्प घेतला आहे. ‘रॉकस्टार’ फेम अभिनेत्याने ही घोषणा काल शुक्रवारी अमर गांधी फाऊन्डेशनने आयोजित केलेल्या एका समारंभात बोलताना केली.
रणबीर कपूरने आपला संकल्प जाहीर करताना म्हटले की, ‘आज ऑर्गन डोनेशन डेच्या निमित्ताने मी माझे अवयवदान करण्याचा संकल्प घेतो. मला आशा आहे की मी असे केल्यामुळे किमान एक किंवा दोन व्यक्तींवर जरी परिणाम झाला तरी ते माझे यश असेल. या मुद्यावर जनजागृती होण्याची आज गरज आहे. मित्रांनो, तुम्हीही अवयवदान करण्यावर नक्की विचार करा.’
दरम्यान, रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट हिने म्हटले की, ‘या मुद्याबाबत आता लोकांना माहिती देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. मला वाटतं आरोग्याच्या मुद्यांवर, अमर गांधी फाऊन्डेशन आणि ऑर्गन डोनेशन अवेअरनेस ड्राइव या संस्थांवर चर्चा व्हायला हवी. मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी लोकांना उद्युक्त केले पाहिजे.’ विशेष म्हणजे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनीही अवयवदान करण्याचा संकल्प घेतला होता. याची सुरूवात याच वर्षी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ऊर्फ बिग बी यांनी आपले अवयवदान जाहीर करत केली होती. आतापर्यंत ते आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरीक्त ऐश्वर्या राय-बच्चन, अर्जुन माथुर, प्रियंका चोप्रा, आमिर खान आणि आर. माधवन यांच्यासह बऱ्याच सेलिब्रेटीजनी अवयवदान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.