जनता
प्रेत-ढिगार्यावरती बसले
मणिपुरात ते भाजप सीएम
रक्तसडे जरी जिकडे तिकडे
नव्हते आता जनतेचे प्रेम
आता अचानक झाली उपरती
खुर्ची सोडून सीएम पळाले
समोर दिसता घोर पराभव
पीएमचेही अवसान गळाले
असे कसे हे निर्ढावलेले
काळीज यांचे आहे फत्तर
पीएम-सीएमची कसली मैत्री
उठली जनतेच्याच जीवावर
———-
मतदार
विश्वासाचे कुणी न उरले
सब सब घोडे बारा टक्के
एकमेकांना मारीत डोळे
जनतेला ते देती बुक्के
जनतेला त्या लावूनी टोप्या
उघडपणे या भेटीगाठी
सत्तेसाठी साटेलोटे
लोकांना दाखवती पाठी
चेहर्यावर तो असे मुखवटा
मतदारांना ते घालती गंडा
जनतेला ते मुर्ख समजती
होतील जागे बसता दंडा
———-
एकनाथ शिंदे
पुन्हा पुन्हा हा माझा अपमान
बघती मला ते सीएम पाण्यात
रुसून पळता मी गावाकडे
अजित का ते हसती गालात
डोळियात का खुपल्या सांगा
माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या
मते मिळताच झाले दुष्मन
नावडत्या का झाल्या यांच्या
माझी गोची करण्यासाठी
भाजपवाले आहेत तत्पर
मला कळे ती त्यांची चलाखी
दिल्लीवरून मी टाकीन बम्पर
———-
तानाजी सावंत
माझ्यापेक्षा आहे बिलंदर
आहे हुश्शार माझा दिवटा
उधळीत लाखो कोटी रुपये
फडकवतो तो माझा बावटा
दुबई कधी तर कधी बँकॉक
हौसेची मी मोजे किंमत
मोजत बसतो चिंबोर्यांना
झापण्याची मज नाही हिंमत
खासगी विमान बुकिंग करोनी
केला त्याने मोठा पराक्रम
मी शासनाला धरले वेठीस
नाकी आणला माझ्या त्याने दम
———-
नरेंद्र मोदी
ट्रम्प हा माझा मित्र जिवाचा
दोघांत एकच समान धागा
हट्ट पुरवण्या आपला आपला
जगाशी तुम्ही कसेही वागा
भारतीयांना बेड्या घालून
पाठवणी जरी केली त्यांनी
नाही विचारलं नावही त्यांना
मीही करतो तशी मनमानी
हम करे सो कायदा अशीच
आम्हा दोघांचीही वृत्ती
मी ना काही बोललो त्यांना
एकमेकांवर आमची भक्ती