उलट्या धोतर्याच्या फुलांचे हिरवे उपरणे पांघरलेले नव-वळेंतीन कपल तथा वांडमोर्चाचे झिप अध्यक्ष फुरफुरे आणि वांडवाहिनीच्या जीप सचिव कुमारी लटके थरथरत आणि पळपळत चुणे कोतवालीच्या अड्ड्यात येतात. समोर दारात ठाणे अंमळदार आजच्या लागू शकणार्या आकड्यांच्या हिशेबासाठी कॅल्क्युलेटर घेऊन हायपिशी कोडची टॅली मारत बसलेला.
समोर काही शिपुर्डे प्लँचेट करून संशयितांना पकडण्याचा प्लॅनिंग करतायत, तर महिला शिपाई कुणा भाईसाठी चुल्हांगण बनवून बिर्याणी फोडणीला घालतायत. आत आलेले फुरफुरे फुरफुरत अंमळदाराला सॅल्युट ठोकतात. अंमळदार तरीही साफ दुर्लक्ष करत आकडेमोड करत रहातो.
‘साहेब, मोठे साहेब आलेत का?’ फुरफुरे घायकुतीला येऊन विचारतो.
‘अँ?’ वर मान न करताच अंमळदार आकड्याच्या अंमलात बरळतो.
‘काम होतं हो अर्जंट! सांगा ना प्लिज!’ फुरफुरे अजिजीने विचारतो.
‘ते…? काय काम होतं..?’ अंमळदार अंमळ न उतरल्यानं.
‘जरा महत्त्वाचं आहे. साहेब भेटले तर…’ फुरफुरे चाचरत सांगतो.
‘केव्हाचं साहेब साहेब काय लावलंय रे? आम्ही काय..? ‘बोलता बोलता अंमळदार मान वर करतो न् पुढले शब्द घश्यात अडकून ठसका लागतो.
‘नमस्कार साहेब, बसा ना!’ नाकापुढली खुर्ची दाखवत अंमळदार मार्जारकुळात जातो. ‘आज कसं येणं केलंत?’ अंमळदाराच्या आवाजात नरमाई येते.
‘साहेब ते थोडं मॅटर झालं…’ फुरफुरे आजूबाजूला बघत अदमास घेत बोलू बघतो.
‘मोकळं बोला हो! इथं सगळी माणसं आपलीच आहे असं समजा! अगदी तुमचा बूथ आहे समजलं तरी चालेल. काय?’ अंमळदार फुरफुरेला विश्वास देऊ बघतो.
‘नाही पण साहेब भेटले असते तर…’ फुरफुरेची कॅसेट पुन्हा आधीच्याच ठिकाणी अडकते.
‘अहो, साहेब मामींच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर शोधताय! तोवर तुमचं काम टांगळून ठेवलं तर आल्यावर मला झापझाप झापतील. तेव्हा मला सांगा…’ अंमळदार विनंतीची रिक्वेस्ट करतो.
‘काय एवढ्यात मामींचा कार्यक्रम आहे? मला तर छप्पनझुरळेनं कळवलं नाही?’ फुरफुरेला वेगळीच भीती भरते.
‘नाही हो! कार्यक्रम मामींचा मूड झाल्यावर कधीही होत असतात. पूर्वतयारी मात्र सदैव ठेवावी लागते. एकवेळ एरियावाइज कलेक्शन उशिरा पोच केले तरी चालतात. पण अवचित घेतलेल्या कार्यक्रमांना स्पॉन्सर नसले, तिकीटविक्री झाली नाही की थेट क्रीमी अड्ड्यातून जिरायती अड्ड्यावर बदली होते. त्यामुळे चुणे-झोंबई-लाखपूर इथली मंडळी अर्धावेळ मामींच्या भयातच जगतात…’ अंमळदार अवघड जागेची दुखणी सांगू लागतात.
‘ते आम्हाला माहीत नाही होय?’ डोळ्याच्या कडा पुसत फुरफुरे भावुक होतात.
‘बोला तुमची समस्या काय आहे?’ अंमळदार चटकन विषय बदलतो.
‘ते शुक्रवारी व्हॅलेन्टाईन डे झाला ना..?’ फुरफुरे दबकत सुरुवात करतो.
‘हा दोनचार हवालदार आणि पाचसहा शिपाई लावून अश्लील चाळे करणारे जोडपे पकडून आणले की आम्ही? दम देऊन घरच्यांना सांगून बहुतेकांची खोड मोडली. साहेब स्वतः मातृ-पितृ दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आणखी काय करायला हवं होतं आम्ही?’ अंमळदार सविस्तर माहिती देतात.
‘ते ठीक आहे हो! पण प्रॉब्लेम तो नाहीच्च आहे. ते लग्नं…’ फुरफुरे काही सांगू बघतो.
‘नाही, तुमच्या कार्यकर्त्यांनी आणले होते मंगळसूत्र बरं का? पण जे जोडपं पकडलं त्याच्यातली मुलगी पदाधिकार्याची बहीण होती हो! मग करणार काय ना…?’ अंमळदार कारण सांगू बघतो.
‘त्यांचं मरू द्या हो! मी काय सांगतो ते ऐका एकदा!’ फुरफुरे वैतागून बोलतो.
‘तुमचंच ऐकतोय की हो मी! तुमचं न ऐकून मला बदली करवून घ्यायची आहे का? बोला तुम्ही!’ अंमळदार!
‘तर व्हॅलेन्टाईन डे शुक्रवारी होता ना..?’ फुरफुरे पुन्हा सांगू बघतो.
‘हो, शुक्रवारीच होता! त्या आधी प्रॉमिस डे पण होता. त्या दिवशी एक प्रॉमिस न पाळणार्याला भर चौकात शिव्या द्याव्या वाटलेल्या, पण नंतर आठवलं. अजूनही त्याच्याच पालख्या उचलाव्या लागतायत, पोटापाण्यासाठी!’ अंमळदार वेगळ्याच विश्वात जातो.
‘अहो मी काही सांगत होतो हो!’ फुरफुरे मध्येच ताण मारतो.
‘बोला ना राव! मी केव्हाचा कान लावून बसलोय तुमच्याकडं!’ अंमळदार साळसूदपणे बोलतो.
‘म्हणजे मी टाईमपास करतो आहे का? तुमचंच भलतं चाललंय…’ काहीसा चिडत फुरफुरे!
‘जाऊद्या बोला आता!’ अंमळदार चटकन सारवासारव करतो.
‘तर शुक्रवारी व्हॅलेन्टाईन डे होता!’ फुरफुरे पुन्हा एकवार सांगू लागतो.
‘हो होता!’ अंमळदार होकार भरतो.
‘त्या दिवशी आम्ही युवा आणि युवती मोर्चा मिळून ह्या संस्कृतीहणन करणार्या कपलना काय अद्दल घडवावी ब्वॉ, ह्याबद्दल एक गुप्त मिटिंग मी आणि लटकेनं मिळून ठरवली होती…’ फुरफुरे सारं नियोजन ईस्कटून सांगू लागतो.
‘तर तक्रार मिटिंगसंदर्भात आहे वाटतं… ‘ अंमळदार अंदाज लावू जातो.
‘अहो, पूर्ण ऐकून तर घ्या हो! आधीच कुठे एफआयआर फाडताय?’ फुरफुरे चिडून बोलतो.
‘बोला, बोला! आता नाही बोलत मी मध्ये!’ अंमळदार हमी देतो.
‘तर मी आणि लटके दोघं बसलेलो होतो अन् अचानक आमचेच कार्यकर्ते मागून आले. त्यांनी काही न बघताच मागून तोंडावर कापड टाकून चारदोन रट्टे हाणले,’ दुखरा गाल चोळत फुरफुरे सांगत जातो.
‘म्हणजे त्यांनी तुमच्या कानशिलात जडवल्या म्हणून त्यांच्यावर एफआयआर करायचीय तर…’ अंमळदार पुन्हा घायकुतीला येतो.
‘काही काय बोलता हो तुम्ही? त्यांनी पाहिलं नव्हतं ना? पण तुम्ही ऐकून घ्या ना!’ फुरफुरे चिरकतो.
‘सॉरी! म्हणजे ते आपलेत तर त्यांना दिलसे माफ करायचंय म्हणजे! धरबनी पॅटर्न? बोला तुम्ही पुढे!’ अंमळदार अंमळ समजुतीने घेतो!
‘मग त्यांनी त्याच जोशात आमचं दोघांचं, म्हणजे माझं आणि लटकेचं बळजोरीने लग्न लावून दिलं…’ फुरफुरे पुढे सांगू लागतो.
‘म्हणजे जोर-जबरदस्तीने विवाह लावला. काय म्हणावं याला? लव्ह… मरो! आता दंडसंहितेत यासाठी कुठली कलमं आहेत बघावी लागतील,’ अंमळदार पुढ्यातल्या चोपड्या चाळू लागतो.
‘नाही, त्याची गरज नाही. राहुद्या.’ बोलता बोलता फुरफुरे लाजतो, ‘असं किती दिवस लोकांची घरं फोडणार ना? केव्हा तरी जोडीदार शोधून आपला आपला संसार सुरू करावाच लागंल ना? आणि आम्ही सोबतीनं बरंच काही पेटवलंय, आता आमचं चूल पेटवायची वेळ झालीच की? तेव्हा ते…’ बोलता बोलता गहिवरलेला फुरफुरे लटकेचा हात हातात घेतो, ‘आणि गावासाठी, जिल्ह्यासाठी, देशासाठी, ब्रह्मांडासाठी एवढा त्याग तर मी करूच शकतो ना?’ त्याचा शेवटला सवाल!
‘म्हणजे तुमची तक्रार कुणाबद्दलच नाहीय तर…? मग साहेबांकडे का आलात?’ अंमळदार वर्मावर पाय ठेवू पाहतो.
‘कोण म्हणालं तक्रार नाहीय? आहे त…’ फुरफुरे उसळतो.
‘आता काय झालं?’ अंमळदाराच्या कपाळावर आठ्या पसरतात.
‘नाही, म्हणजे आमच्या ह्या पोरांनी आमची अशी गाढवावरून धिंड काढली ना..?’ फुरफुरे पुन्हा सांगू लागतो.
‘मग आता गाढवावर एफआयआर करायची का?’ अंमळदार त्रासिक चेहर्याने विचारतो.
‘ऐका हो माझं पूर्ण! मग बोला काय ते!’ लटक्या रागात फुरफुरे हात झटकतो.
‘अहो, तुमचंच ऐकतोय मी केव्हाचा! पण तुम्ही विषयापर्यंत येतच नाही. मग मी काय करू?’ अंमळदार!
‘सांगतो, सांगतो! आलोय शेवटालाच आलोय मी! तर माझ्या आणि लटकेच्या घरच्यांना हे आमचं लग्नं पसंत पडलं नाही. त्यात नातेवाईकांना आमंत्रण, त्यांचा मानपान असं काही घडलं नाही. त्यामुळे माझा मामा रुसून गाढवाला घोडा समजून टाच मारून निघून गेला,’ फुरफुरे कळकळीने सांगू लागतो.
‘म्हणजे आता आम्ही मामाचा रुसवा काढायचा का? अहो गेलाय तो तर जाऊद्या! करून करून तो उठाव करील ना? की प्रॉपर्टी हडपील? जे करील ते ‘श्या’मर्जीनेच करील. त्यापुढे तो, मी, तुम्ही जाऊ शकणार आहात का? हे आपलं एक बुजगावणं एका रुसव्याने दुसर्याची
प्रॉपर्टी ढापता आली म्हणून हल्ली केव्हाही रुसवा घेऊन भरेगावात जाऊन बसतंय. त्याकडे कुणी लक्ष देत नाही, तुम्ही कुठे…’ अंमळदार ज्ञान देऊ बघतो.
‘विषय प्रॉपर्टीचा नाहीय हो! गाढवाचा आहे. ते गाढव अडुस… लक्षणी होतं. ते एकदा पळालं की थेट सायमंडला जाऊन भिडतं. मग खर्च फार होतो हो. म्हणून त्याला परत फिरवता आलं तर बघा तेवढं..!’ फुरफुरे पोटतिडकीने म्हणणं मांडतो.
‘म्हणजे आम्हाला कामं नाहीत होय? आम्ही गाढवं वळावीत ती?’ अंमळदार संतापाने डाफरतो.
‘मग तुम्ही गाड्या-घोड्यातली, विमानातली गाढवं माघारी बोलवितात तर माझ्या मामाला घेऊन गेलेलं गाढव परत आणू शकत नाही होय? हीच का तुमची तत्परता?’ फुरफुरे सुरसुरीसारखा फुरफुरतो!