द्वारकानाथ संझगिरींमध्ये क्रिकेटचा कथाकथनकार म्हणजेच ‘स्टोरीटेलर’ दडला होता. समोरचा सामना, क्रिकेटमधील व्यक्तिमत्वं आपल्यासमोर उभं करण्याचं दैवी सामर्थ्य संझगिरींच्या लेखणीला प्राप्त झालं होतं. जवळपाच पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी लेखन केलं. अनेक स्थित्यंतरं घडली. पण, त्यांनी मराठी क्रिकेटलेखनाची गोडी टिकवून ठेवली.
– – –
लिओनार्दो दा विन्चीनं चितारलेलं मोनालिसाचं स्मितचित्र जगभरात आजही तितकंच भावतं. पण, या विन्चीची दुसरी कुठली कलाकृती जगभरात चर्चेत नाही. मुघल सम्राट शहाजहाँनं आपल्या लाडक्या मुमताजसाठी ताजमहाल ही वास्तू बांधल्यानंतर ‘यासम’ दुसरी वास्तू निर्माण होऊ नये, म्हणून बांधकाम कामगारांचे हात कलम केल्याचे ऐकिवात आहे. परंतु ताजला पर्याय ठरेल असं दुसरं काही नाहीच. पण, द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखणीची तर्हाच न्यारी. त्यांच्या लेखनाचं सौदर्य अभिजात दर्जाचं. त्यामुळेच त्यांचा एक लेख उत्तम वठल्यानंतर, यासारखा होणे नाही, असं वाटत असताना पुढचा लेखही तितक्याच समर्थपण साकारलेला. नावीन्याची कास जपणारी ती अनुभूती. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक लेखाची ओळख स्वतंत्र. संझगिरींमध्ये क्रिकेटचा कथाकथनकार म्हणजेच ‘स्टोरीटेलर’ दडला होता. कधी सामन्याचं, तर कधी व्यक्तीचं चित्रण करताना त्यांचे शब्द निष्णात फलंदाजानं बॅटची ग्रिप पकडावी, तसेच नेमकेपणानं उमटायचे. तो सामना, ती क्रिकेटमधील व्यक्तिमत्वं आपल्यासमोर उभं करण्याचं दैवी सामर्थ्य संझगिरींच्या लेखणीला प्राप्त झालं होतं. बर्याचदा त्यांची शीर्षकंसुद्धा तितकीच ताकदीची. मराठीतल्या अनेक शब्दांनी त्यांची गुलामगिरी किंवा मांडलिकत्व पत्करताना कोणताही खेद बाळगला नाही. इतकं विस्तृत त्यांचं शब्दभांडार होतं. फुलराणीचं नाजूकपण असो, ऐश्वर्याचं लोभस रूप असो, लतादीदींचं सुमधुर गाणं असो, एव्हरेस्टचं शिखर असो, गांधीजींचा शांतीमार्ग असो, कोहिनूर हिरा असो, अर्जुनाचा लक्ष्यभेद असो, वारकर्यांची विठ्ठलभक्ती असो वा कृष्ण-राधेचं प्रेम असो, अशा असंख्य उदाहरणांद्वारे ते आपलेसे व्हायचे. ही आपुलकी मग टिकून राहायची. हाच त्यांचा ऋणानुबंध.
क्रिकेटची बातमी किंवा लेख म्हणजे या संघाचा इतक्या धावांनी पराभव किंवा त्या संघाचा इतके गडी राखून विजय, तर अमक्या अमक्याने इतकी भागीदारी केली किंवा बळी मिळवले, चौकार-षटकारांची आतषबाजी झाली, धावा काढल्या आणि क्वचितप्रसंगी विक्रम नोंदले गेले… एवढ्यापर्यंत मर्यादित होती. ही मर्यादा आजच्या पिढीचं लेखन वाचतानाही असंख्य वेळा प्रत्ययास येते. पण माहितीचा मर्यादित स्रोत उपलब्ध असण्याच्या जुन्या काळात तेसुद्धा पुरेसं होतं. सत्तरीच्या दशकात जेव्हा आकाशवाणीचं समालोचन ऐकण्याचे ते दिवस होते. रेडिओ घरोघरी असायचा, तशीच वर्तमानपत्रं आवडीनं ज्ञानार्जनासाठी वाचली जायची. त्यातील शब्द-भाषा हे प्रमाण मानले जायचे. तेव्हा एका अवलियानं क्रिकेट लेखनाच्या आणि वार्तांकनाच्या या सीमारेषा ओलांडण्याचं धारिष्ट्य दाखवलं. त्यांचं हे गारूड पुढे पाच दशकं टिकून होतं. क्रीडाक्षेत्राचा सत्तर टक्के भाग व्यापणार्या क्रिकेटच्या लेखनाद्वारे वाचन संस्कृती घडवणारं आणि ती टिकवणारं व्यक्तिमत्व म्हणजे संझगिरी.
त्या काळात ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि.वि. करमरकर यांनी क्रीडाक्षेत्रातल्या अन्यायाला आपल्या समर्थ लेखणीचे वार करून वाचा फोडली. पण, संझगिरी यांनी वेगळी वाट निवडली, ती म्हणजे कसदार मराठी क्रिकेट लेखनाची. त्यांच्या उपमा-उत्प्रेक्षा, विशेषणं, अलंकार आदी भात्यातील तेजस्वी बाणांनी वाचक अखेरपर्यंत खिळून राहायचा, तर कधी त्यांनी उभ्या केलेल्या क्रिकेटविश्वात रमून जायचा. त्यामुळेच संझगिरींना किमयागार क्रिकेटलेखक म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यावेळी आकडेवारी आणि विक्रम हे आजच्या इतक्या सहज उपलब्ध नसायचे. त्यासाठी आपली वेगळी डायरी जपावी लागायची किंवा काही सांख्यिकीतज्ज्ञांकडे विचारूनच त्याची खातरजमा व्हायची.
ऐंशीच्या दशकात टेलिव्हिजन आलं. सुरुवातीला काही श्रीमंतांघरीच हा ‘इडियट बॉक्स’ पोहोचला. शेजार-पाजारी, चौकांमध्ये टीव्ही हळूहळू दिसू लागले. कालांतरानं कृष्णधवलची जागा रंगीत टीव्हीनं घेतली. पुढील १० वर्षांत आस्ते-आस्ते टीव्ही दिसू लागले. पण कार्यालयात, प्रवासात क्रिकेटबाबत प्रत्येकाला अपडेट राहता येईल, इतकी क्रांती जेव्हा घडली नव्हती. तेव्हा दुसर्या दिवशी हाती पडणार्या वर्तमानपत्रात काय लिहून येतं, त्यावरच वाचक अवलंबून असायचे. अशा काळात कालच्या सामन्यात नेमकं काय घडलं, याचा ‘आँखो देखा हाल’ ते चपखलपणे मांडायचे. महाभारताच्या युद्धाचं संजय जसं आंधळ्या धृतराष्ट्राला वास्तववादी वर्णन करायचा, तीच खासियत संझगिरींनी जपलेली. परंतु संझगिरींची लेखनशैली काळजाचा ठाव घेणारी. भूतकाळाला वर्तमानकाळात जिवंत करणारी. डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर, विवियन रिचर्ड्स यांच्या खेळीची नजाकत मांडताना ते अनेक कल्पनारम्य दाखले द्यायचे. यापैकीच एक त्यांच्या आवडीचं उदाहरण म्हणजे ‘सुनीलच्या खेळीतले फटके इतके नयनरम्य की हॉलिवूड अभिनेत्री मरलिन मन्रोनं मला शयनसुखाचं निमंत्रण दिलं असतं, तर तेही मी हसत-हसत नाकारलं असतं!’
मागील शतकाच्या उत्तरार्धात इंटरनेट क्रांती झाली. त्यानंतर दशकभरात कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२० क्रिकेट अधिक लोकप्रिय झालं. नेमक्या याच काळात वृत्तवाहिन्याही सुरू झाल्या. संझगिरी वृत्तवाहिन्यांवरही आपल्या खास शैलीत रसरशीत वर्णन करताना दिसू लागले. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संचाऐवजी मोबाइल हातोहाती दिसू लागला. परंतु संझगिरी यांचं लेखन वाचणार्यांच्या संख्येत कोणताही फरक पडला नाही. सकारात्मक भाग असा की, आकडेवारीसाठी इंटरनेटचं साहाय्य मिळू लागलं. तसंच समाजमाध्यमंही त्यांच्या लेखनाला साता समुद्रापार मराठी माणसांपर्यंत घेऊन जाऊ लागली.
गेल्या दशकभरात ‘इन्फ्लूएन्सर’ ही एक नवी बोलकी डिजिटल संस्कृती उदयास आली. बर्याचशा स्वयंघोषित क्रिकेटपंडितांनी ‘बोलंदाजी’ सुरू केली. क्रीडा आणि विशेषत: क्रिकेटच्या माहितीचा स्फोट झालाय, अशी ही स्थिती. या नव्यानं उदयास आलेले लेखक आणि क्रीडा पत्रकार यांच्यावर ठसा हा इंग्रजीचा. त्यामुळे शब्दभांडार तुटपुंजे आणि क्रिकेटचं ज्ञान तोकडं. पण, संझगिरीची सर कुणालाही येईना, ही वस्तुस्थिती. अस्सल मराठीत संझगिरी यांनी काय लिहिलंय, कशा पद्धतीनं लिहिलंय, ही उत्सुकता सदैव चिरतरुण राहिली, ती त्यांच्या लाडक्या देव आनंदसारखी. काळानुसार बदल तो एवढाच की वृत्तपत्रांप्रमाणेच लोकांना समाजमाध्यमांवरही त्यांचं लेखन वाचायला मिळू लागलं.
नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात (१९८८-८९) ‘क्रिकेटचा देव’ असा बिरुद मिरवणार्या सचिन तेंडुलकरचं पर्व सुरू झालं. वानखेडे स्टेडियमवरील रणजी क्रिकेटचं त्याचं पदार्पण संझगिरींनी त्यांच्या खुमासदार शैलीत ‘सचिन नावाची पहाट’ हा लेख लिहून संस्मरणीय केलं. इथपासून ते त्याची संपूर्ण कारकीर्द म्हणजेच त्याचा वानखेडेवरील निरोपाचा सामना इथपर्यंतचे ते साक्षीदार. इतकंच कशाला १९९९मध्ये शारजात जेव्हा वाळूच्या वादळानंतर सचिन नावाचा झंझावात घोंघावला, तेव्हा ते तिथे होते. या स्पर्धेत सचिननं ऑसी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची यथेच्छ धुलाई केली होती. पण, स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर वॉर्ननं आपल्या जर्सीवर सचिनची स्वाक्षरी घेतली होती. हा प्रसंग संझगिरी यांनी उत्तमपणे रेखाटलेला. शतकांत एक सचिन, चिरंजीव सचिन अशी सचिनच्या क्रिकेटप्रवासाला वाहिलेली असंख्य पुस्तकं. १९९८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर अॅहडलेड येथे डॉन ब्रॅडमन आणि सचिनची भेट झाली. त्या भेटीवर आधारित ‘सर डॉन ब्रॅडमन : सर न झालेला कडा’ हा लेखही अत्यंत वाचनीय. याशिवाय संगीत, चित्रपट आणि प्रवासवर्णनं या विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केलं. याशिवाय व्यासपीठावरील अनेक कार्यक्रमही त्यांनी सादर केले. क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतानाचे संझगिरी असोत वा असंख्य किश्शांतून उलगडणारे संझगिरी असोत, ते रसिकांची मनं जिंकायचे.
१९८३चा तो ऐतिहासिक एकदिवसीय प्रकारातला विश्वचषक, जेव्हा कपिल देवच्या नेतृत्वाखाली अविश्वसनीय इतिहास घडला. भारतानं वेस्ट इंडिजचं वर्चस्व झुगारून देत जगज्जेतेपद जिंकलं. त्या घटनेच्या वार्तांकनासाठी ते इंग्लंडला गेले होते. त्यानंतर असंख्य विश्वचषकांसाठी, स्पर्धांसाठी किंवा मालिकांसाठी परदेश दौरे त्यांनी केले. तेथली जगण्याची संस्कृती त्यांनी टिपकागदाप्रमाणे टिपत वाचकांपर्यंत पोहोचवली. ध्रुवतारा म्हणजे आकाशगंगेतील अढळ तारा. संझगिरी यांनी पृथ्वीलोकाचा निरोप घेतला असला तरी मराठी भाषेत समृद्धपणे साकारलेली त्यांची असंख्य पुस्तकं आणि लेखांद्वारे ते असेच सदैव तळपत राहतील!