छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यांचा इतिहास महाराष्ट्रालाच नाही, तर सगळ्या देशाला प्रेरणादायी आहे. हा इतिहास शाहिरी पद्धतीने सांगणार्या प्रवृत्तींनी अनेक ऐतिहासिक बाबी दडवून ठेवल्या आणि छत्रपती शिवरायांची एकांगी प्रतिमा रंगवली. ती त्यांच्या राजकीय धोरणांच्या सोयीची होती. मधल्या एका काळात या सगळ्याविरोधात उठाव झाला. नवीन संदर्भ साधनं उपलब्ध झाली, इतर इतिहास संशोधक पुढे आले आणि त्यांनी अनेक भ्रम दूर केले, शिवरायांना उणेपणा देणारा भाग वजा केला. आता शिवराय आपल्या राजकीय सोयीचे नाहीत, त्यांची गरज उरली नाही, म्हणून की काय, एकेकाळी त्यांचा उदोउदो करणारा वर्ग आता त्यांची नालस्ती करायला पुढे आलेला आहे. सांगोवांगीच्या गप्पांमधून शिवरायांच्या जन्मापासून अनेक गोष्टींविषयी शंका निर्माण करणारे आता त्यांच्या आग्र्याहून सुटकेच्या रोमहर्षक जीवनक्रमाचीही मोडतोड करून त्यांचे सामान्यीकरण करू पाहात आहेत. सहज कोसळणारे पोकळ पुतळे उभारताना शिवरायांच्या कपाळावर कृष्णाजी भास्करच्या तलवारीची अनैतिहासिक खोक दाखवणारीच ही प्रवृत्ती आहे. महाराष्ट्राला खच्ची करणार्या या प्रवृत्तीचं एकेकाळी बाळासाहेबांच्या कुंचल्याने केलेलं चित्रण आजही लागू पडावं, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली असेल शिवप्रेमी महाराष्ट्रासाठी?