□ घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी; पत्नीला दोन लाखांची पोटगी.
■ ते कशातही दोषी आढळले तरी मंत्रिपदाला मुकतायत का? राजीनामा देतायत का? कुणी त्यांच्याकडे राजीनामा मागतंय का? तशा नैतिकतेची आता कुणाकडून तरी अपेक्षा ठेवता येते का? भारतीय जनता पक्षाने देशाच्या, राज्याच्या राजकारणाचं काय करून ठेवलं आहे, त्याचा हा एक नमुना आहे फक्त छोटासा. इथून पुढे तर जनतेला खूप पाहायचं आहे आणि भोगायचंही आहे.
□ निवडणूक आयोग मेलाय, फक्त घोषणा व्हायचीय – अखिलेश यादव यांचा प्रहार.
■ मेलेला नाही हो अखिलेश भाऊ, तो भारतीय जनता पक्षात सामील झालाय. अर्थात म्हणजे स्वतंत्र यंत्रणा म्हणून मरण पावलेला आहेच आणि त्याची घोषणा कधीच केली जाणार नाही. गरजच काय सगळ्यांना माहिती असताना.
□ मोहन भागवतांचा अजब आदेश; हिंदूंनो इंग्लिश बोलू नका, पारंपरिक कपडेच घाला.
■ भागवतांचा दोष नाही, त्यांचं हिंदू धर्माचं आणि हिंदू धर्मीयांचं आकलन हे त्यांच्या र्हस्वदृष्टीच्या, अतिसंकुचित मातृसंस्थेतच झालेलं आहे… पारंपरिक कपडे म्हणजे कोणते कपडे? ते का घालायचे? असले आदेश काढणारे हे कोण टिक्कोजीराव आहेत? असे प्रश्नच त्यांना पडत नाहीत. उचलली जीभ, लावली टाळ्याला! यांच्या विचारांना मानणारा आणि त्यांची कौतुकं सांगणारा एक तरी हरीचा लाल परदेशांत पाठवलेल्या आपल्या पोराबाळांना परत बोलावणार आहे का यांचं ऐकून?
□ मंत्रिमंडळ बैठकीत मोहाच्या दारूचा घमघमाट.
■ सत्तेच्या दालनांमध्ये पैशांच्या, सत्तेच्या, महत्त्वाकांक्षेच्या मोहाचा घमघमाट किंवा खरंतर दुर्गंध कायमच पसरलेला असतो, तिथे मोहफुलांच्या सुंदर मदिरेचा घमघमाट पसरला तर लगेच संस्कारी नाकं दाबून फिरण्याची गरज नाही. या मोहाची नशा आनंद देते आणि उतरते तरी. त्या मोहाची नशा मात्र सत्तालोलुपांनाही गर्तेत ढकलते आणि देशाचा, राज्याचाही सत्यानाश करते.
□ बदलापूर अत्याचार प्रकरणात दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर का नाही नोंदवला? – हायकोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली.
■ हाच मस्तवालपणा सगळ्या राज्यात, सगळीकडेच सुरू असतो. न्यायाधिशांनी ओळख न सांगता साधी मोबाइल हरवल्याची किंवा सायबर गुन्ह्याला बळी पडल्याची किंवा अशीच किरकोळ तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला की पोलिसी खाक्याचं विश्वरूप दर्शन होईल. ज्यांच्या हितरक्षणासाठी यांची नेमणूक आहे, ते सत्ताधीश इमानी सेवकांना होता होईल तेवढं संरक्षण पुरवणारच!
□ बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे हित जपा – हायकोर्टाचा शालेय शिक्षण विभागाला झटका.
■ शालेय शिक्षण विभाग असो किंवा इतर कोणताही विभाग- त्यांनी फक्त मंत्र्यांचं, उच्चाधिकार्यांचं, त्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांचं हित जपायचं असतं, हे कोर्टाला कोणीतरी सांगा. विद्यार्थी म्हणजे नसता डोक्याला ताप असतो. त्यांचं काय एवढं मनावर घ्यायचं?
□ शिवभोजन, आनंदाचा शिधा योजना गुंडाळण्याचा सरकारचा डाव.
■ आता मतांसाठी सरकारी खिरापत वाटून झाली, रोख रकमा वाटून झाल्या, आता वर आणखी शिवभोजन पण पाहिजे, आनंदाचा शिधा पण पाहिजे, हे जरा जास्त लाड नाही का झाले लोकांचे? मुळात सरकारच्या तिजोरीत कंत्राटदारांची बिलं द्यायला पैसे नाहीत, अनेक ठिकाणची कामं रखडली आहेत, पगार अडकले आहेत. आता मतदारांनी पाच वर्षें यांच्या तोंडच्या वाफांवर हवा शिजवून खावी.
□ वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीतून ७० हजार डॉक्टरांची नावे गायब.
■ या निवडणुकाही भारतीय निवडणूक आयोगाच्या हातात दिल्या गेल्या आहेत की काय? त्यांचा यात हातखंडा आहे. हा आयोग वैद्यकीय परिषदेचाही आपल्या देशाप्रमाणेच विचका करून मोकळा होईल, यात शंका नाही.
□ ट्रिपल इंजीन सरकारने ठाण्यातल्या ठेकेदारांचे दीड हजार कोटी थकवले.
■ फक्त ठाण्यातल्या? बाकी ठिकाणीही हीच परिस्थिती आहे. सगळीकडे सगळी कामं अर्धवट पडलेली आहेत. आता त्यांचा खर्च वाढवून सुरू होतील ती.
□ प्रताप सरनाईकांना बाजूला काढत एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी; फडणवीसांचा शिंदेंना धक्का.
■ आता मिंधे सरकार नाही, सरकारात हे मिंधे आहेत, याची जाणीव कायम करून दिली जाणारच.
□ उद्योजकांना त्रास देणार्यांना मोक्का लावा – फडणवीसांचे पोलिसांना आदेश.
■ सगळी राजकीय दुकानदारी बंद करणार की काय? शक्य तरी आहे का? ज्यांची दुकानदारी उघडी पडली, त्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत नाही. उद्योजक पण शहाणे असतात, खंडणीखोरांचे फक्त झेंडे बदलतात, हे त्यांनाही माहिती असतं. सणसणीत कारवाई झाली तर बघू.
□ सरकारने गंडवलं; पाच लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र.
■ सगळेच एकमेकांना गंडवत होते, आता नावं ठेवून उपयोग काय? हेच होणार, हे माहिती नसेल, इतक्या काही लाडक्या बहिणी अडाणी नव्हत्या. तेव्हा मतं विकून झाली. आता फळं भोगायची वेळ आली.
□ सरकार येणार नाही असा डाऊट होता, आम्ही गेम चेंज करून आणलं – ठाण्यात मिंध्यांनी फोडले महायुतीच्या विजयाचे बिंग.
■ अख्ख्या राज्याचं राजकारण कायमचं नासवल्याबद्दल सत्कार करा यांचा गुवाहाटीच्या मंदिरात. किती रेडे कापायचे आणि कुठे कुठे शिंगं पुरायची, ते विचारून घ्या.
□ इन्फोसिसच्या ४०० कर्मचार्यांना नारळ.
■ सुटले बिचारे वेठबिगारीतून. आता रविवारच्या दिवशी आपापल्या बायकोचं तोंड पाहायचं स्वातंत्र्य मिळालं.
□ अलिबागमध्ये विकासाच्या योजनांचा पाऊस, पण फुटकी कवडीही दिली नाही.
■ देतील कुठून? तिजोरीत असायला तर हवेत पैसे!