कोरोनामुळे मराठी नाटय़ निर्मात्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून व्यावसायिक नाटय़प्रयोगासाठी दीनानाथ नाटय़गृह, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाटय़मंदिर व महाकवी कालिदास नाटय़मंदिर या महापालिकेच्या नाटय़गृहांचे व्यावसायिक नाटय़प्रयोगासाठीचे भाडे पाच हजारांपर्यंत करावे, अशी मागणी मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाने महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन केली आहे.
मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाचे पदाधिकारी, वाद्यवृंद संघ व महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात झाली. यावेळी महापौरांबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महापौरांना निवेदन देण्यात आले. त्यासोबतच प्रयोगासाठीच्या रेल्वे प्रवासासाठी नाटय़ कलावंत व रंगमंच कामगारांना क्यूआर कोडची व्यवस्था व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मराठी नाटय व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे, सहकार्यवाह सुशील आंबेकर, अभिनेते मंगेश कदम, अशोक नारकर, दिगंबर प्रभू उपस्थित होते.
सौजन्य : दैनिक सामना