महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि नामांकित क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड या तिघांनाही महाराष्ट्र शासनाकडून क्रिकेट प्रशिक्षणासाठी भूखंड मिळाले. त्यानंतर क्रिकेटपटू घडवण्याच्या या तिघांच्या दृष्टिकोनावर टाकलेला हा प्रकाशझोत.
– – –
एक तीळ सात भावंडं खातात, या म्हणीचा प्रयोग नित्य व्यवहारात अनेकदा आपण ऐकलेला. माणसाचा दृष्टिकोन मांडणारा. अशी एक कथा जगद्विख्यात शास्त्रज्ञ न्यूटनची. त्यानं एक कुत्रा आणि एक मांजर पाळली होती. त्यांना एका खोलीतून दुसर्या खोलीत जाण्यासाठी अडथळा येऊ नये, म्हणून त्यानं दोन दरवाजे अनुक्रमे कुत्रा आणि मांजरीसाठी तयार केले. पण प्रत्यक्षात कुत्रा आणि मांजर एकाच मोठ्या दरवाजानं पलीकडे गेल्यावर हुशार न्यूटनला आपली चूक उमगली.
आणखी एक कथा इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यासंदर्भातील. दुसर्या महायुद्धात मित्रराष्ट्रांचा काही ठिकाणी पाडाव होत होता. त्यावेळी एक माहीतगार सैनिकानं ही बातमी चर्चिल यांना सांगितली. तेव्हा तो निर्धारानं म्हणाला, ‘‘आपण भलेही काही लढाया हरू; पण अखेरीस महायुद्ध आपणच जिंकू!’’ चर्चिल यांचे बोल पुढे खरे ठरले.
आपल्याकडे एका शेतकर्याची पुराणकथाही प्रचलित. आपल्या शेतात मी खजिना लपवला आहे, तो शोधून काढा, असं सांगितल्यावर मुलं संपूर्ण शेत खोदून काढतात. मग त्या शेतात पिकांची रोपं लावून वाढवल्यावर हाच खरा खजिना, हे त्या मुलांना ते पटवून देतात.
आता आपण प्रकाशझोत टाकू या दृष्टिकोन हाच मुद्दा मांडणार्या तीन वास्तववादी सत्यकथांकडे. एक भारतीय क्रिकेटचा पहिला सुपरस्टार ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर यांची, दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची, तर तिसरी रमाकांत आचरेकर यांच्यानंतर ३२ वर्षांनंतर झालेले महाराष्ट्राचे दुसरे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची.
सुनील गावस्कर
भारत १९८७मध्ये विश्वविजेतेपदाला सलग दुसर्यांदा गवसणी घालणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण वानखेडे स्टेडियमवरील उपांत्य सामन्यात इंग्लंडनं भारताचा मार्ग रोखला. ५ नोव्हेंबर, १९८७ हाच तो दिवस. त्यानंतर गावस्कर भारतीय संघात कधीच दिसले नाहीत. तोच त्यांचा अखेरचा सामना ठरला. पण, मैदानावर क्रिकेटची विधायक सेवा करणार असून, त्यासाठी बंदिस्त स्टेडियम सुरू करावं, असं जाहीर करून क्रिकेटरसिकांची मनं गावस्कर यांनी जिंकली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी गावस्कर यांच्या कार्याला बळ देण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात २००० चौरस मीटरचा भूखंड त्यांच्या ३९व्या वाढदिवसानंतर दोनच दिवसांनी १२ जुलै १९८८ या दिवशी त्यांना बहाल केला. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर मुंबईत सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनच्या बंदिस्त क्रिकेट स्टेडियमवर नवोदित क्रिकेटपटूंना प्रशिक्षणाच्या योजनेचा बराच गाजावाजा झाला. रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स, आल्विन कालिचरण, इयान बोथम, इयान चॅपेल, अॅरलन बोर्डर यांच्यासारख्या क्रिकेटपटूंचंही या केंद्रावर मार्गदर्शन मिळेल, असं गावस्करांनी सांगितलेलं.
या भूखंडाची तत्कालीन किंमत होती साडेदहा लाख रुपये. ती राज्याच्या क्रीडा आणि सांस्कृतिक खात्यातर्पेâ महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडे (म्हाडा) अनामत रक्कम म्हणून देण्यात येईल, असंही ठरवण्यात आलं. भूखंडाची कागदपत्रं पूर्ण होण्याच्या प्रक्रियेला लाल फितीच्या कारभारामुळे सहा वर्षं लागली. गावस्कर क्रिकेट इन्स्टिट्यूट कसं साकारणार, याचा भव्य दिव्य आराखडा जाहीर झाला. गावस्कर यांच्या संकल्पनेतील ही बारमाही प्रशिक्षण योजना दिरंगाईनं का होईना अस्तित्वात येणार अशी चिन्हं दिसू लागली.
पण, प्रत्यक्षात पुढे तो भूखंड आणि गावस्कर यांची योजना यांचं नेमकं काय झालं, हे काहीच कळेना. गावस्कर यांना सरकारने मोफत दिलेल्या या भूखंडावर आपल्या मनातलं प्रशिक्षण केंद्र का साकारता आलं नाही? एरवी हाती माइक आणि लेखणी घेऊन सडकून टीका करणार्या गावस्कर यांना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या, याची स्पष्टपणे त्यांनी कधीच जाहीर वाच्यता केली नाही. अर्थात, त्यांनी आपल्या समस्या मांडल्या असत्या, तर त्या कोणत्याही राजकीय सरकारनं सोडवल्या नसत्या का? परिणामी कराराची चार दशकं उलटून गेली, तरी गावस्कर यांना देण्यात आलेला तो भूखंड तसाच पडून राहिला. कालांतरानं आसपासच्या झोपडपट्टीवासियांनी आपले पत्रे टाकणं, शौचास जाणं, यासाठी त्या भूखंडाचा वापर सुरू केला.
मग या भूखंडाचं खितपण पडणं सरकारला किंवा म्हाडाला ध्यानात आलं. काही वर्षांपूर्वी गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनने पत्राद्वारे भूखंडवाटप रद्द करण्याची विनंती केली होती, ती ५ एप्रिल २०२२ या दिवशी मंजूर करण्यात आली. हा भूखंड पुन्हा सरकारच्या ताब्यात आला. गावस्कर यांचं प्रशिक्षण केंद्रं उभं राहिलं असतं, तर आणखी मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू राज्यातून घडले असते. त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळालं असतं. पण, गावस्कर यांनी क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर पुढे मैदानी मार्गदर्शनाऐवजी सुटाबुटातला समालोचन, स्तंभलेखन, समित्यांची पदं हा मार्ग पत्करला.
अजिंक्य रहाणे
गावस्कर यांना वापरता न आलेला हा भूखंड शासनाकडे पडून असल्याची बाब अजिंक्य रहाणेच्या लक्षात आली. रहाणेची क्रिकेट कारकीर्द अद्याप संपलेली नाही. कदाचित येत्या दोन-तीन वर्षांत गरज पडल्यास त्याचं पुनरागमनही होऊ शकेल. पण, रहाणेलाही उगवत्या क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याची इच्छा झाली आहे. त्याने याच २००० चौरस मीटर भूखंडावर अद्यावत क्रिकेट प्रशिक्षण केंद्र बांधण्याची योजना आखली. त्यासाठी शासनदरबारी फेर्या मारल्या.
रहाणेची मेहनत काही वर्षांत फलदायी ठरली. शासनानं अध्यादेश काढून हा भूखंड ४ कोटी, ८८ लाख, ९४ हजार रुपये (जवळपास पाच कोटी रुपये) अधिमूल्य आणि भुईभाडे आकारून रहाणेला ३० वर्षांकरिता भाडेपट्ट्यानं दिला. सर्वसामान्यपणे असे भूखंड देताना निविदा प्रक्रिया राबवण्यात येते. परंतु, रहाणेसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारायचंय, म्हणून हे मुद्दे गौण ठरले. रहाणेचा हा प्रयत्न इथवर यशस्वी ठरलाय. आता प्रत्यक्षात तो कशा रीतीनं क्रिकेटपटू घडवतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
दिनेश लाड
दिनेश लाड यांनी रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, हरमीत सिंग, सुवेध पारकर, अथर्व पुजारी असे ९०हून अधिक क्रिकेटपटू घडवलेत. रोहित आणि शार्दूल शालेय वयात लाड यांच्याच घरी काही वर्षं राहायला होते.
आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बलविंदर सिंग संधू म्हणाले की, ‘‘जेव्हा आचरेकर सरांकडे आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी आलो, तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. पण तरीही सरांनी आम्हाला शिकवलं. आज आमच्याकडे सर्व काही आहे; पण सर आमच्यासोबत नाहीत.’’ क्रिकेटपटूची आर्थिक कुवत बघून क्रिकेट प्रशिक्षण कधीच आचरेकर सरांनी केलं नाही. असंख्य गरीब घरामधलेच तारे आचरेकर यांनी घडवले. हेच कार्य आता लाड करून इच्छितात.
शासनानं भाडेपट्टीवर दिलेल्या दहिसर येथील गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील एका भूखंडावर दिनेश लाड फाऊंडेशनची निवासी क्रिकेट अकादमी त्यांनी सुरू केलीय. सावंतवाडी, सांगली, शिर्डी, संभाजीनगर, बीड, रत्नागिरी, बांदा गरीब मुलं अशा ग्रामीण भागासह राज्यातील गुणी मुलं ते हेरून त्यांच्यावर पैलू पाडतायत. ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेट प्रशिक्षणासह निवास आणि शाळा हेसुद्धा लाड पुरवतायत. शासनानं त्यांना आठ महिन्यांच्या मुदतीचा नूतनीकरण होऊ शकेल असा करार दिलाय. त्यासाठी शासन १ लाख, ८० हजार रुपये त्यांच्याकडून आकारते. याशिवाय मैदानाची देखभाल आणि सुरक्षा यासाठी तीन लाख रुपये खर्च त्यांना होतो. पण, या विधायक कार्यासाठी त्यांचं अर्थकारण तोकडं पडतं. शासनानं गरीब मुलांना क्रिकेट प्रशिक्षणाच्या या उपक्रमाकडे गांभीर्यानं पाहण्याची आणि त्याला आर्थिक साहाय्य करण्याची आवश्यकता आहे.
तात्पर्य, गावस्कर, रहाणे आणि लाड या तिघांनाही शासनाचे भूखंड मिळाले. तिघांचा उद्देश क्रिकेट प्रशिक्षणाचा म्हणजेच क्रिकेटपटू घडवण्याचा. पण, दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा. गावस्कर यांचा भूखंड शासनाकडे परतला. तो आता अद्ययावत क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी रहाणेला दिलाय. लाड यांनाही क्रिकेट प्रशिक्षणासाठी भूखंड देण्यात आलाय. सर्वसामान्य क्रिकेटरसिकहो, या तिन्ही क्रिकेटकथा वाचून त्याचं तात्पर्य कळण्याइतपत तुम्ही सुज्ञ नक्कीच आहात!