‘प्रायोगिक रंगभूमी आणि राज्य नाट्य स्पर्धा यात एक रंगनातं आहे. प्रायोगिक नाटकांना हक्काचे मुक्काम स्थळ म्हणून राज्य नाट्य स्पर्धा या दरवर्षी खुणावतात आणि नव्या दमाचा आविष्कारांना इथे वेगळेपण सिद्ध करण्याची स्पर्धात्मक संधी मिळते. रंगभूमीवरील सक्षम प्रयोगशाळा म्हणून या दोघांनी अगदी हातात हात गच्च धरून आजवर साथसोबत केलीय. म्हणूनच विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, प्रेमानंद गज्वी, जयंत पवार, प्रशांत दळवी, दिलीप जगताप अशा अनेक दिग्गज नाटककारांच्या संहिता प्रकाशात आल्यात. नाट्यप्रवाहात मोलाचे काम त्यातून झालं आहे. या वाटेमुळे दरवर्षी नव्या नाट्यबदलांना सामोरं जाण्याचं बळही सर्वांना मिळालं. नाट्यप्रवाहाला सामर्थ्य अन प्रेरणा देणार्या या वळणावरल्या कलाकृतींची दखल नाट्य इतिहासात घेतली जातेय. व्यावसायिक आणि प्रायोगिक या शब्दांपेक्षा सादरीकरणातून प्रगट होणारा आविष्कार हा किती व कसा भिडतो हे खरं तर लाख मोलाचे ठरते. आजवर शेकडो प्रायोगिक नाटके याच मांडवाखालून आली म्हणूनच व्यावसायिक रंगभूमीचे दालन समृद्ध झाले ही वस्तुस्थिती आहे.
याच वाटेवरून, स्पर्धेच्या मांडवाखालून नाटककार संजय पवार लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘साती साती पन्नास’ हे नाटक रंगभूमीवर आलंय. जे आजच्या तिकीट विंडोच्या हिशेबापेक्षा स्त्री-पुरुष भेदाभेदाच्या मनाच्या खिडक्या उघडणारे आहे. ‘स्त्री-पुरुष’ यांच्यातले शारीरिक, मानसिक, सामाजिक वेगळेपण यावर केवळ मराठीतच नव्हे तर जगभरातल्या कथा, कादंबर्या, चित्रपट, नाटके यात कथानके रचली गेलीत. ‘स्त्रीमुक्ती’साठीही प्रसंगी लढे उभारले गेलेत. ‘मुलगी झाली हो!’ हे पथनाट्य मराठी रसिकांनी एकेकाळी अनुभवलं. दक्षिण आप्रिâकेतही वर्णद्वेषावर आधारित ‘दे कोट’ ही संहिता उपलब्ध आहे. त्यात एक नायक अखेरीस आपला काळा कोट फेकून देतो आणि नायिकेच्या काळ्या देहाला जवळ करतो. असा शेवट आहे. दोघांनीही एकमेकांना जाणून घेणं, सार्या जाचक रुढीपरंपरा भिरकावून परस्परांच्या सन्मानाने मुक्तपणे वर्तन करणं, ही काळाची गरज आहे आणि त्यावरच नाटककार संजय पवार यांनी या प्रतीकात्मक अर्थपूर्ण संहितेतून युक्तिवादासह तिरकस, बोचरं भाष्य केलंय, जो ‘साती साती पन्नास’चा आशयगाभा आहे.
पडदा उघडतो. विश्व नारी अभियान कार्यालय प्रकाशात येतं. सुसज्ज यंत्रणेसह तिथे सहा स्त्रिया काम करताहेत. एकमेकींशी संवादही साधताहेत. निखिला ही या अभियानाची प्रमुख सूत्रधार. भूतलावर फक्त महिलांचेच राज्य असावे, असा या ग्रुपचा प्रयत्न आहे. ‘पुरुष’ त्यांच्या दप्तरी नाही. आता त्यांची चळवळ यशस्वीही झाली आहे. पुरुष जन्माला घालणे म्हणजे एक गुन्हाच, असा त्यांचा समज. त्यामुळे जगभरातले पुरुष अल्पमतात आलेत. जगभरात केवळ शंभरेक आणि हिंदुस्थानात फक्त एकच पुरुष शिल्लक उरलाय. आता या पुरुषाचं करायचं काय, हा त्यांच्या संघटनेपुढे प्रश्न आहे. त्यासाठी बैठक सुरू होते. दरम्यान क्रांतिकारी दहशतवाद्यांच्या ‘वैम’ या संघटनेच्या बायका इथे पोहोचतात. त्यांना सूड उगवायचा आहे. एकमेव पुरुषाचा खातमा करण्याचा त्यांचा पक्का निर्णय झालाय, तर दुसरीकडे त्याला वाचविणारी, त्याच्या प्रेमात पडलेली तरुणीही आहे. ती त्याच्यासोबत फेर धरते. नाच करते. गाणं म्हणते. आता यात त्या पुरुषालाही त्याची बाजू मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात येते. तो तरुण पुरुष आपल्याच मस्तीत आहे. या पुरुषाला ‘मारायचं की जगवायचं’ यावरली चर्चा सुरू होते. जी अनेक वादविवादातून, तर्कवितर्कातून अक्षरश: टिपेला पोहचते. एकीकडून पुरुषजात नष्ट करण्याची संघर्षाची तर दुसरीकडून नवा पुरुष जन्माला घालून समेटाची भूमिका पुढे येते. प्रत्येक महिला आणि तो तरुण आपली बाजू मांडतात… तरुण पुरुषाला मारहाण करण्यात येते. तो जखमी होतो. सुटकेचा प्रयत्न करतो.
महिलांनी कायम स्त्रीपुरुषांच्या निकोप समाजाचे चित्र पाहिले, ज्यात कुठल्याही दुय्यमतेला स्थान नसेल. स्त्रीला पूर्णत्व देण्याचा हा ‘प्रयोग’ आहे, असे चळवळीची प्रमुख निखिला आपल्या मनोगतात सांगते. यापुढे स्त्री अबला, हताश, नसेल. शोभेची बाहुली नसेल, पुरुषी वर्चस्वाला अर्पण झालेलीही नसेल!! असे स्पष्ट करून जखमी पुरुषाबद्दल सहानभूती व्यक्त करते.
कथानकापेक्षा या नाटकातील संवाद प्रभावी ठरतो. प्रसंगांपेक्षा त्यातील विचार वरचढ होतो. स्त्रियांना समाजात समान हक्क, अधिकार वागणूक मिळावी, अन्यथा भावी युगात पुरुषांवर जखमी होण्याची वेळ येईल, हे या नाटकातून सांगितलं जातं. नाटकाचा उत्कर्षबिंदू विविध अंगी व अर्थपूर्ण आहे. धारदार, चमकदार शैलीतून नाट्य आकाराला येते.
पुरुषाला कायम राजाचे स्थानच मिळाले, अगदी दंतकथेपासून ते सत्यकथेपर्यंत! राजाला दोन राण्या. एक आवडती, दुसरी नावडती. पण कुठल्याही राणीला दोन राजे कधीही मिळाले नाहीत. नावडतीचे मीठ अळणी तर आवडतीचे मीठ गोड. आवडतीचे सारे हट्ट जगावेगळे, असा युक्तिवाद पुरुषप्रधान संस्कृतीची चिरफाड करताना या स्त्रियांकडून केला जातो. त्यावर पुरुषांची बाजू मांडताना, ‘अखेर सारे हट्ट, लाड पुरविणारे पुरुषच असतात. पुनर्विवाह लावणारे. धीटपणे जगापुढे उभे करण्याचा प्रयत्न करणारे पुरुषच होते आणि आहेत. स्त्री ही मूर्तिमंत आग आहे. ती समईत राहिली की तेवते. नाहीतर वणव्यासारखी भडकते. तिला सांभाळायचं दिव्य हे पुरुष जातीनेच केलंय! असं तो तरुण म्हणतो. शतकानुशतके स्त्री-पुरुष यांच्यातील बदलत चाललेल्या वृत्ती-प्रवृत्तीचा वेध हा यातील सवाल-जबाबातून परखडपणे घेण्यात आलाय. त्यामागची नाटककाराची कल्पक चाणाक्ष नजर आणि त्याचा अभ्यास दिसतो. केवळ वादाला वाद यात नाही, त्यामागे खोलवर दोन्ही बाजूंचा विचार आहे. जो काहीदा सुन्न करून सोडतो.
नाटककार संजय पवार यांनी उमेदवारीच्या काळात ‘चतुरंग’च्या सवाई एकांकिका स्पर्धेत सातत्याने तीन वर्षे ‘सवाई लेखक’ म्हणून उभ्या नाट्यसृष्टीचे लक्ष वेधून घेतले होते. ‘ठष्ट’ या त्यांच्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचे लेखन-दिग्दर्शन त्यांचेच होते. त्यातही सहा मुलींना घेऊन नाट्य उभं केलं होतं. नाटकाच्या शीर्षकापासूनच कुतहल ही त्यांची खासियत. जी इथेही कायम आहे. ‘कोण म्हणतो टक्का दिला?’ या नाटकातून ब्लॅक कॉमेडीची शैली होती. दलित नाट्यप्रवाहात चमकदार नाट्यशैलीमुळे हे नाटकही मैलाचे निशाण ठरले. अनेक चित्रपटांचे पटकथालेखनही त्यांनी केले आहे. भविष्याचा वेध घेऊन आजच्या वास्तवाला भिडण्याचा त्यांचा नाटककार म्हणून असलेल्या प्रवासातलं हे नाट्य लक्षवेधी आहे.
डझनभर व्यावसायिक नाटकांसह चित्रपट, मालिका यांचे लेखन, दिगदर्शन, अभिनय, निर्मिती असा चौफेर अनुभव गाठीशी असलेले दमदार दिग्दर्शक कम नाट्यशिक्षक राजेश देशपांडे यांनी चर्चात्मक आणि काहीशा गंभीर असलेल्या या संहितेत नेमके रंग भरलेत. संहितेतलं ‘साहित्य’ कुठेही हरवू दिलेले नाही. नाटकाची निवड, कलाकारांची देहबोली आणि तांत्रिक बाजूची जुळणी यातून त्यांच्यातला दिग्दर्शक नजरेत भरतो. नाट्य कुठेही कंटाळवाणं होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. सात स्त्रिया आणि एक पुरुष यांच्यात उत्तम ट्युनिंग आहे. सारेजण दिग्दर्शकांच्या नाट्य कार्यशाळेतले विद्यार्थी असल्याने प्रत्येकजण भूमिकेशी प्रामाणिक दिसतो. श्रद्धा माळवदे यांची निखिला चळवळीतली प्रमुख म्हणून ठसा उमटविते. भूमिकेची पकड चांगली आहे. चैताली जोशी हिची श्रावणीच्या विचार व कृती यातली आक्रमकता तसेच जरब लक्षात राहते. सोनाली राजे हिने स्वप्नाळू मानसी सुरेख रंगविली. गौरवी भोसले हिने जिजीच्या भूमिकेतून ग्रामीण भाषेचा ठसका दाखविला आहे. गीता पेडणेकर (गीता), अर्चना पाटील (अर्चना), स्वरांगी जोशी (स्वरांगी) यांनीही स्त्रियांची बाजू मांडण्यात साथसोबत केलीय. एकमेव पुरुष असलेला निनाद चिटणीस याची देहबोली शोभून दिसते, अभिनयातील निरागसता तसेच संवादफेकीतही विविधता या जमेच्या बाजू ठरतात. महिलांच्या या गर्दीत एकमेव युवक असला तरी तो कुठेही अवघडलेला नाही. या एकाकी पुरुषाबद्दल सहानभूती वाटत राहाते. हे सारेजण प्रथमच व्यावसायिक रंगभूमीची दारे ठोठावत आहेत.
रंगमंचाच्या दोन्ही बाजूने स्त्रियांच्या बाजू मांडणारे चित्र तसेच त्यावरले भाष्य ठळकपणे दिसते. कार्यालयाच्या भास उभा करण्यासाठी काही मांडणीही आहे. ही रचना पूजा देशमुख हिने नेपथ्यातून केलीय. हालचालींना अडसर होणार नाही, याचेही भान त्यामागे आहे. रंगसंगती उत्तम. विजय मिरगे, प्राची रिंगे यांचे संगीत भडक नाही. तो मोह त्यांनी टाळला आहे. साई शिरसेकर यांची प्रकाशयोजना, सिद्धेश कांबळी यांची नृत्यरचना, चैताली-श्रद्धा यांची वेशभूषा आहे. स्त्रियांच्या एका ग्रुपला सारख्या साड्या तर दुसर्या ग्रुपला दहशतवादी कपडे हा विरोधाभास नजरेत भरतो. त्यातून चांगली वातावरणनिर्मिती होते. तांत्रिक बाजूचे अवडंबर नाही. साधेपणातलं सौंदर्य त्यात आहे.
अशा वैचारिक संघर्ष असलेल्या नाटकांचे व्यावसायिकवर प्रयोग होताना अनेक गणितांची जुळवाजुळव करावी लागते. तरीही हा विषय रसिकांपर्यंत पोहचविण्याचा राजेश देशपांडे यांचा मानस तो कौतुकास्पद म्हणावा लागेल.
प्रायोगिक, समांतर रंगभूमीवर गेल्या वर्षी काही नाट्यकृती आल्यात. त्यातल्या काहींचे रसिकांनी स्वागत जरूर केलंय. चं. प्र. देशपांडे यांचे मनाच्या प्रयोगशाळेत घेऊन जाणारे ‘मन’, प्रमोद शेलार यांचे दिग्दर्शन-लेखन असणारे प्रदूषणमुक्तीचे वास्तववादी नाट्य ‘शुद्धता गॅरेंटेड’, पारधी समाजाची कथा व्यथा मांडणारे प्रशांत निगडे यांचे ‘आय अॅम पुंगळ्या शारुक्या’… याच वाटेवरले ‘साती साती पन्नास’ दर्दी रसिकांची अभिरुची संपन्न करणारे ठरेल. याचे प्रयोग झाले पाहिजेत.
स्पर्धेच्या गुणपत्रिकेत बसू न शकणारी आणि काहीदा डावललेली अनेक नाटके रंगभूमीवर आजवर आली. नंतर त्यांनी आपलं विजेतेपद रसिकांकडून हक्काने पटकावले. त्यात ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ अशा डझनभर नाटकांची जंत्री आहे. इथे या ‘टीम’ने रसिकांच्या दरबारी आपला असा खेळ मांडला आहे, ज्यात ‘नर-नारी’ यांच्यातला विलक्षण संघर्ष आहे. जो अस्वस्थ अनुभव देतोय. काहीदा सुन्न करतो अन् खिळवूनही ठेवतो.
साती साती पन्नास
लेखन : संजय पवार
दिग्दर्शन : राजेश देशपांडे
नेपथ्य : पूजा देशमुख
संगीत : विजय मिरगे/ प्राची रिंगे
प्रकाश : साई शिरसेकर
नृत्ये : सिद्धेश कांबळे
रंगमंच व्यवस्था : प्रज्ञा वारणकर
निर्मिती : सृजन द क्रिएशन/ शिवशाही कला क्रीडा सेवा केंद्र