किशोरदांनी आयुष्यात भरपूर उतार चढाव अनुभवले. एकदा ते म्हणाले होते, ‘मी ज्या टप्प्यावर आहे तिथून मला खाली यायची इच्छा नाही. लोकांनी मला येथे आणून बसवले आहे. मला वाटतं त्यांनी ‘तू जा बाबा, खूप झाले’ असे म्हणण्याच्या अगोदर मी स्वत:च अलविदा म्हणेन.
– – –
काही माणसं आतून बाहेरून सारखीच असतात. दिखाऊपणाचा लवलेशही नसतो त्यांच्यात. कुठलीच भावना अकारण दाबून ठेवणं अशा लोकांना अजिबात जमत नाही. दु:ख असो की सुख… प्रसंग चांगला असो की वाईट… ते अगदी प्रामाणिकपणे व्यक्त होतात. मग सगळं जग अशा माणसांना पागल ठरवून मोकळे होतं. पण त्याची फिकीर करत बसायला यांना तरी कुठे वेळ असतो! असं जगणं प्रत्येकाला नाही जमत. मला तर अशा माणसांचा खूपच हेवा वाटतो. खूपच रसरशीत असतात अशी माणसं. यांच्या फक्त देहालाच मृत्यू येतो, बाकी ते कायम जिवंत असतात. होय… मी आभास कुमार गांगुली ऊर्फ किशोरदा यांच्याबद्दलच बोलतोय. हा माणूस एकाच वेळी काय काय करत होता असे म्हणण्याऐवजी मी म्हणेन की हा अवलिया एकाच वेळी काय काय करत नव्हता?
आभास या शब्दाचे किती अर्थ आहेत बघा… प्रतिती, सदृष्य, मिथ्या प्रतिती, संकेत, चमक, अभिप्राय, अनुभूती वगैरे. मला वाटते, किशोरदांनी यातला प्रत्येक अर्थ शब्दश: सार्थ केला आहे.
अनेकदा एखाद्या कुटुंबात कुणीतरी एक जेव्हा स्वकतृर्त्वाने यशोशिखरावर तळपत असतो, तेव्हा कुटुंबातील इतरजण या दीप्तीने झाकोळून जातात. अनेकदा तर त्यांच्यात एक नकारार्थी विचारांचं रोपटंही मूळ धरू लागतं, अशा वृक्षाच्या सावलीत मग ते रोपटं खुरडून जातं. पण किशोरदा मात्र याला अपवाद ठरले. अशोककुमार त्या वेळचे चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार… नंतर मग दादामुनी झाले. ते गायक आणि अभिनेते. सुरुवातीच्या काळात स्वत:ची गाणी त्यांनी स्वत:च गायली. त्यामुळे किशोर आणि अनुप या त्यांच्या दोन्ही धाकट्या भावांवर नाही म्हटलं तरी त्यांच्या कर्तबगारीचे सावट होतेच… अनुप कुमारला शेवटपर्यंत यातून बाहेर पडता आले नाही, पण किशोरदांनी मात्र आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलंच.
वडील कुंजलाल गांगुली हे पेशाने नामांकित वकील. आई गौरी देवी श्रीमंत बंगाली कुटुंबातल्या. खांडव्याच्या गोखले कुटुंबीयांनी कुंजलाल गांगुली यांना खांडव्याला व्यक्तिगत वकील म्हणून बोलावून घेतले होते. किशोर हे कुंजलाल व गौरी देवी यांचे शेंडेफळ. सर्वात मोठे अशोककुमार, मग बहीण सतीदेवी, नंतर अनुपकुमार. अशोककुमार आणि किशोरदा यांच्यात १८ वर्षांचे अंतर. मोठा भाऊ तसाही वडिलांच्या ठिकाणीच असतो आणि अंतर अधिक असेल तर मग पिताच असतो. त्यामुळे मोठ्या भावाने लहान भावासाठी घेतलेले निर्णय बंधनकारक असतात. शिवाय तो कालखंडही एकत्र कुटुंबपद्धतीला शिरोधार्य मानणारा.
अशोककुमार जेव्हा चित्रपटसृष्टीत स्टार होते, तेव्हा किशोरदा तसे लहानच होते. खांडव्यातल्या गल्लीत चिकार धुडगूस घालणारे अवखळ कार्टे म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना काही चित्रविचित्र सवयी होत्या. एखादे वाक्य ते डावीकडून उजवीकडे जितक्या सफाईने वाचत, तितक्याच सफाईने उजवीकडून डावीकडेही वाचत. त्यांना नाव विचारलं की सांगत रशोकि रमाकु… समोरचा माणूस डोके खाजवत बसे. त्यांची सबंध कारकीर्द देखील अशीच होती उलट सुलट… काहीशी विसंगत तरीही रसरशीत… विशेष म्हणजे त्यांचा हा स्वभाव चित्रपटात आणि वास्तवात देखील सारखाच होता. गायनातील त्यांच्या खास यॉडलिंगचं मूळ बहुदा याच वयात रुजलं असावं.
लता मंगेशकर अर्थात लतादीदींच्या हजारो मुलाखती जगभरातून अनेकांनी घेतल्या आहेत, पण स्वत: लतादीदींनी कुणाची मुलाखत घेतल्याचं ऐकिवात नाही. अपवाद किशोरदांचा. किशोरदांनी १९८२नंतर मुलाखती देणे जवळपास बंद केले होते. मात्र स्वत: लतादीदी त्यांची मुलाखत घ्यायला इच्छुक आहेत असं कळताच ते तयार झाले. ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची मुलाखत असावी. या मुलाखतीत लतादीदींनी त्यांना विचारले होते की, तुम्हाला तुमच्यातलं सगळ्यात अधिक काय आवडतं? गायक, अभिनेता की संगीतकार?.. त्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच उत्तर दिलं, माझी पहिली आणि शेवटची पसंती हे गाणंच आहे. मला अभिनय हा प्रकार खोटा वाटतो. गाणं कसं थेट हृदयातून येतं म्हणूनच ते लोकांच्याही थेट हृदयात उतरतं… अगदी खरंच बोलले होते किशोरदा. शेवटी अभिनय म्हणजे कुणाचे तरी अनुकरण, मग ते वाचिक असो की कायिक. तो वास्तवाच्या जितका जवळ जाईल तितका तो अभिनेता/अभिनेत्री समर्थ कलावंत म्हणून गणले जातात. अभिनयाच्या अनेक जातकुळी असू शकतात. मात्र गाणं हृदयातून आल्याशिवाय भिडत नाही हे खरेच… किशोरदा माणसांना हृदयांनी जोडू इच्छित होते.
कुंदनलाल सैगल हे किशोरदाचं गाण्यातलं दैवत. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी हे ऋण शिरावर बाळगलं. रेडिओवरील सहगलची गाणी ऐकून किशोरदा त्यांच्या स्टाईलने ते गाणे म्हणत व त्यावर चिकार थिरकत. त्यावेळी गाण्यांची छापलेली पुस्तकं बाजारात सहज मिळत, ती जमवून मग त्यातील गाणी ते तोंडपाठ करत व घरी येणार्या पाहुण्यांना म्हणूनही दाखवत. मग कधाrकधी पाहुणे बक्षिशी पण देत. वयाच्या ११-१२व्या वर्षांपर्यंत ते गानवेडे झाले होते. अमीन सयानी यांच्याशी बोलताना एकदा किशोरदा म्हणाले होते, ‘मला खरं तर शास्त्रीय संगीत शिकून मोठा गायक बनायचं होतं, पण घरातले वकील साहेब अर्थात वडिलांमुळे माझी याचिका दाखल होण्याआधीच खारीज झाली.’
इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजात किशोरदाने प्रवेश घेतला. ते दर शनिवारी इंदोर ते खांडवा झुकझुक गाडीने जात आणि प्रत्येक स्टेशनला डबा बदलत. डब्यात देखील ते गाणे म्हणून लोकांचे मनोरजंन करीत. वडील भाऊ चित्रपटसृष्टीत असल्यामुळे मुंबईला त्यांचे सतत जाणे येणे होत असे. हिमांशू रॉय आणि देविका राणी या दापंत्याची ‘बॉम्बे टाकीज’ ही त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्मिती संस्था होती. अशोककुमार या संस्थेचे मुख्य नायक होते. एकदा किशोरदा मुंबईत आले असताना मालाडमधील बॉम्बे टॉकीजच्या ऑफिसकडे निघाले. ते ज्या लोकलने प्रवास करत होते, त्याच लोकलमध्ये एक तरुणीही प्रवास करत होती. दोघांनीही एकमेकांकडे बघितले. दोघेही मालाड स्टेशनवरच उतरले. बाहेर येऊन दोघांनीही वेगवेगळे टांगे केले. आणि दोघेही बॉम्बे टॉकीजच्या गेटजवळ येऊन थांबले. दोघेही या स्टुडिओत एकाच व्यक्तीला भेटायला आले होते. ती व्यक्ती म्हणजे संगीतकार खेमचंद्र प्रकाश. आणि ती तरुणी होत्या लतादीदी. किशोरदांनी हा प्रसंग लतादीदींच्या मुलाखतीत इतका खट्याळपणे सांगितला की त्याही मनापासून हसल्या. किशोरदांचा हा अवखळपणा शेवटपर्यंत असाच टिकून होता.
खेमचंद प्रकाश यांनीच सर्वप्रथम किशोरदांना चित्रपटात गाण्याची संधी दिली. गाणे होते, ‘मरने की दुवाँए क्यूं मांगू…’ हे गाणे गंभीर प्रवृत्तीचे होते. १९४८मध्ये आलेल्या ‘जिद्दी’ या देव आनंदच्या चित्रपटातील हे गाणे आहे. गंमत म्हणजे हे गाणे ऐकून अशोककुमार त्यांना म्हणत, ‘हे बघ, तुझ्या गाण्यात कसलेच वैविध्य नाही. गाणं हे तुझ्या आवाक्याबाहेरचे काम आहे. तू चित्रपटात अभिनय कर…’’ अशोककुमार पडले मोठे भाऊ, त्यात स्टार… किशोरदा मग गप्प बसत. पण अशोककुमारच्या अशाच टोमण्यांनी त्यांना प्रेरणा मिळत गेली. ‘मी गायक होऊन दाखवेनच…’ या जिद्दीमागे अशोककुमार यांचे कडवे बोल होते. खेमचंद मात्र अशोक कुमारला म्हणत, ‘तू या पोराला माझ्याकडे राहू देत, याच्या आवाजात एक वेगळा स्पार्क आहे.’ खेमचंद यांचेही ऋण किशोरदाने शेवटपर्यंत खांद्यावर बाळगले.
अभिनय किशोरदांना मुळीच आवडत नसे. पण दादामुनींचा मान राखणे हा त्यांच्या कर्तव्याचा भाग होता. म्हणून ते अभिनय पण करू लागले. बरं पहिली भूमिका मिळाली वेड्याची. किशोरदांना लोक पागल म्हणत. मग किशोरदाही म्हणत, ‘लोक जितना मुझे पागल समझते हैं उतना तो पागल मैं नहीं हूं… पर समझते हैं तो मैं भी पागलपन कर लेता हूँ.’
१९४९मध्ये किशोरदा मुंबईत स्थायिक झाले. येथे आल्यावरच त्यांनी ‘किशोर’ हे नाव धारण केले. किशोरदांच्या खास यॉडलिंगला संगीतात स्थान दिले ते सचिनदेव बर्मन यांनी. एकदा ते अशोककुमारकडे गेले असताना त्यांनी आतून येणारा गाण्याचा आवाज ऐकला. त्यांनी विचारले, ‘कोण गातंय?’ अशोककुमार म्हणाले, ‘माझा धाकटा भाऊ आहे. गाणं म्हटल्याशिवाय त्यांची अंघोळ पूर्ण होतच नाही.’ हा तरुण जिनीयस गायक आहे हे सचिनदांनी एका फटक्यात ओळखले आणि मग या दोघांनी चित्रपटसंगीत सृष्टी ढवळून काढली. सोबत चित्रपटात काम करणेही सुरूच होते. १९५४मध्ये बिमल रॉय यांच्या ‘नौकरी’ या चित्रपटात किशोरदांनी काम केले आणि गाणेही गायले. या चित्रपटाचे संगीतकार सलील चौधरी यांनी, किशोर गाणे शिकलेला नाही म्हणून, त्यांच्याकडून गाऊन घ्यायला नकार दिला होता. पण नंतर त्याचा आवाज ऐकून जे गाणे दिले ते आजही तेव्हाइतकेच मधुर आहे, ‘छोटासा घर होगा बादलों के…’ हे गाणे अगोदर हेमंतकुमार गाणार होते.
या काळात किशोरदांनी चित्रपटांत तुफान धुमाकूळ घातला. ‘नखरेवाली’ (न्यू दिल्ली : १९५६), ‘इना मिना डिका…’ (आशा : १९५७), ‘एक लडकी भिगीभागीसी…’, ‘पाँच रुपया बारा आणा’ (चलती का नाम गाडी : १९५८), ‘आके सिधी लगी दिल पे… ओ गुजरिया’ (हाफ टिकट : १९६२) वगैरे… खरं तर ‘ओ गुजरीया’ या गाण्यात सलील चौधरी यांना लतादीदींनाही घेऊन द्वंद्वगीत करायचे होते. पण लताजी तेव्हा शहरात नव्हत्या आणि गाणे तर रेकॉर्ड करायचे होते. शेवटी किशोरदांनी शक्कल लढवली आणि मेल फिमेल दोन्ही आवाजात तेच गायले. या गाण्याने अक्षरश: त्या काळात धूम केली.
सचिनदा यांनी किशोरदाच्या यॉडलिंगचा वापर देव आनंदसाठी अतिशय समर्पकपणे केला. त्यांच्यासोबत ‘मुनीमजी’साठी गायलेले किशोरदाचे ‘जीवन के सफर में राही…’ हे आजही टवटवीत व मन प्रसन्न करून जाते. ‘पेईंग गेस्ट’मधील ‘माना जनाब ने पुकारा नहीं…’, ‘नौ दो ग्यारह’मधील ‘हम हैं राही प्यार के…’, ‘फंटुश’मधील ‘ए मेरी टोपी पलट के आ…’ ही सोलो गाणी हिट होत असताना आशा भोसले यांच्यासोबतची गाणीही भन्नाट गाजली. ‘हाल कैसा है जनाब का’, ‘आरएटी रॅट रॅट माने चुहा’, ‘पाँच रुपय्या बारा आणा’, ‘अरे यार मेरी…’ ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत.
किशोरदा चित्रपटात जो धुमाकूळ घालत असत तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग होता. स्टेज शाेमध्ये गाणे गाताना, स्टुडिओत रेकॉर्डिंग करताना किशोरदांच्या शारीरिक हालचाली सहजपणे येत. ते नेहमी म्हणत, गाणे शरीराच्या आतून येतं, मग त्यांचा परिणाम शरीरावर तर होणारच ना! अभिनय जरी त्यांचा आवडता प्रांत नसला तरी ते कामाच्या बाबतीत प्रामाणिक असल्यामुळे त्यात कद्रूपणा कधीच करत नसत. रसिकांनी त्यांना विनोदी नायक म्हणून देखील स्वीकारलेलं होतं. याच काळात त्यांच्या एका वेगळ्या अंगाचा अनुभवही घेता आला. १९६१मध्ये ‘झुमरू’ हा चित्रपट आला. या चित्रपटात किशोरदांनी निर्माते, कथाकार, अभिनेते आणि संगीतकार अशी चौफेर धुरा सांभाळली. यातील ‘मैं हूँ झुम झुम झुम झुम झुमरू’ या गाण्यात त्यांच्या खास यॉडिलंगचे सर्वच प्रकार त्यांनी सादर केले. विशेष म्हणजे या चित्रपटाची पटकथा मधुसुदन कालेलकर या मराठी नाटककाराने लिहिली होती. किशोरदांच्या आतला किशोर झुमरूच्या निमित्ताने पडद्यावर बघायला मिळाला.
रुमा गुहा ही बंगाली तरुणी किशोरदाची पहिली पत्नी. १९५०ला झालेले हे लग्न फक्त आठ वर्षे टिकले. किशोरदाने मधुबालाला लग्नाचे विचारले, तेव्हा मधुबाला आजारी होती. तिच्या हृदयाला छिद्र पडले होते आणि ती उपचारासाठी लंडनला जाणार होती. त्यावेळी किशोरदांचा घटस्फोट झाला नव्हता. १९६०मध्ये घटस्फोट झाल्यानंतर दोघांनी सिव्हिल मॅरेज केले. किशोरदाने इस्लाम स्वीकारला आणि आपले नाव करीम अब्दुल ठेवले. लग्नापूर्वी दोघांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. गांगुली परिवार या लग्नाने खूष नव्हता. म्हणून मग त्यांनी हिंदू पद्धतीनेही विवाह केला, पण नाखुषीची एक अनामिक रेषा कायम राहिली. मधुबाला देखील त्यांना खर्या अर्थाने पती म्हणून जुळवून नाही घेऊ शकली आणि एका महिन्यातच स्वत:च्या बंगल्यात परतली. मधुबालाचं हृदयावरील छिद्र आणि किशोरदाचं ठाव न लागणारं मन या दोन अनाकलनीय घटना दोघांनाही पतीपत्नीच्या नात्यात एकत्र बांधून ठेवू शकल्या नाहीत. मधुबालाच्या मृत्यूपर्यंत ते विवाहित राहिले, पण संसार सुखाचा होऊ शकला नाही. मधुबालाच्या अखेरच्या काळात तिने हे शल्य बोलूनही दाखवले.
१९७६मध्ये किशोरदाने तिसरे लग्न अभिनेत्री योगिता बालीशी केले, पण हा विवाह देखील दोनच वर्षे टिकले. १९८०मध्ये किशोरदांनी चौथे लग्न लीना चंदावरकर हिच्याशी केले. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा अमित कुमार, ज्याने गायनात काही काळ वडिलांची गादी चालवली. लीनापासून झालेला मुलगा सुमित कुमार. या दोघांचे सूर मात्र चांगले जुळले.
किशोरदा सुरुवातीला स्टेज शोला प्रचंड घाबरत. मग थोडे धीट झाले. रंगमंचावर आले की समोर हात जोडून म्हणत, ‘मेरे दादा-दादियों, मेरे नाना-नानियों, मेरे भाई-बहनों, तुम सबको खंडवेवाले किशोरकुमार का राम-राम, अदाब, सत्-श्री-अकाल, नमस्कार…’ खांडव्याचं विलक्षण प्रेम होतं त्यांना. मधुबालाशी लग्न झाल्यावर ते नेहमी गंमतीने म्हणत, ‘मैं दर्जनभर बच्चे पैदा कर खंडवा की सडकों पर उनके साथ घूमना चाहता हूँ।’ खांडव्यातील लोकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिलं.
किशोरदांचे व्यावसायिक किस्सेही मोठे गमतीदार असत. एखादे गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी ते आपल्या सेक्रेटरीकडून पेंमेट किती झाले ते तपासून घेत. पेमेंट पूर्ण झाले नसेल तर मग गाणे अर्धेच रेकॉर्डिंग करत. मग निर्माता घायकुतीला येई व त्यांचे पेमेंट करी. अभिनेता म्हणून पूर्ण पैसे मिळाले नाही की चेहर्यावर अर्धाच मेकअप करून सेटवर जात. निर्मात्याने विचारले की सांगत, ‘आधा पेमेंट आधा मेकअप…’.
‘जय जय शिवशंकर…’ हे राजेश खन्नाच्या ‘आपकी कसम’ या चित्रपटातील सुपरहिट गाणे. या गाण्याच्या शेवटी ‘बजाव रे बजाव’ म्हणत त्यांनी त्यांच्या बाकी राहिलेल्या पैशांचाही गाण्यात उल्लेख केला आहे. निर्मात्याने लगेच दुसर्या दिवशी त्यांचा हिशोब चुकता केला. याच किशोरदांनी राजेश खन्ना आणि डॅनी यांनी निर्मित केलेल्या चित्रपटात एक पैसाही न घेता गाणी गायली.
त्यांच्या वॉर्डन रोडच्या बंगल्यावर एक पाटी लावलेली होती, ‘बीवेयर ऑफ किशोर’. एकदा प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक एस. एच. रावेल किशोरदांची शिल्लक रक्कम द्यायला गेले. पैसे दिल्यावर किशोरदांशी हात मिळवायला गेले, तसे किशोरदांनी त्यांचा हात तोंडात धरला आणि म्हणाले, तुम्ही दारावरची पाटी वाचली नाही का? एस. एच. रावेलनी हात सोडवला आणि हसत लगेच परत निघाले. एकदा प्रसिद्ध निर्माते जी. पी. सिप्पी त्यांच्या बंगल्यावर गेले. किशोरदा कारमधून गेटबाहेर पडत होते. पण त्यांनी कार न थांबवता वेग वाढवला. तसे सिप्पी साहेब पण त्यांच्या मागे निघाले. शेवटी मढ आयलंडच्या किल्ल्याजवळ किशोरदांनी गाडी थांबवली आणि पोलिसांना फोन केला की एक व्यक्ती माझा पाठलाग करून मला त्रास देत आहे. सिप्पी साहेबांना तर काही समजलेच नाही. दुसर्या दिवशी शांतपणे किशोरदा रेकॉर्डिंगला सिप्पी साहेबाकडे पोहचले. रागाने सिप्पी साहेबांनी त्यांच्या आदल्या दिवसाच्या वर्तणुकीबद्दल विचारले तर किशोरदा बोलले, ‘तुम्ही बहुदा एखादे स्वप्न बघितले असणार… मी तर काल खांडव्याला होतो.’
एका चित्रपटातल्या प्रसंगात त्यांना कार चालवत जायचे होते. किशोरदांनी कार चालवायला सुरुवात केली आणि थेट खंडाळा गाठला. दिग्दर्शक परेशान, त्यांना काही समजेना कुठे गेल्ो किशोरकुमार… किशोरदांनी फोन करून विचारले, मी थांबू ना? तुम्ही कट म्हणाला नाहीत म्हणून मी गाडी चालवत राहिलो… तर असे हे झक्की किशोरदा… कधी काय करतील याचा काहीच अंदाज बांधता येत नसे.
जगातील जवळपास सर्वच हास्य अभिनेते आतली अस्वस्थता आणि विद्रोहाला हास्यातूनच मोकळी वाट करून देत आले आहेत. एखाद्या चुकीची गोष्टीची चीड आम्ही तुम्ही सहसा व्यक्त करत नाही, कारण आपल्याला ते सवयीचेच वाटते. पण संवेदनशील माणूस लगेच व्यक्त होतो. किशोरदा आधी एक संवेदनशील व्यक्ती आणि नंतर गायक अभिनेता होते. एकदा त्यांच्यामागे इन्कम टॅक्सचा ससेमिरा लागला. १९७१मध्ये आलेल्या ‘आंसू और मुस्कान’ या चित्रपटात किशोरदांचे एक गाणे आहे, ‘गुणीजनो रे भक्तजनो…’ या गाण्याच्या शेवटी ‘पिछे पड गया इन्कम टॅक्स’ म्हणत त्यांनी जाम खिल्ली उडवली आहे. १९७५मध्ये आणीबाणीला विरोध म्हणून त्यांनी शासकीय समारंभात गाणे गायचे बंद केले. याचा राग आल्याने तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी त्यांची गाणी आकाशवाणीवर प्रसारित करण्यास मज्जाव केला होता आणि त्यांच्या चित्रपटाच्या प्रिंटदेखील जप्त करण्यात आल्या होत्या. खरे तर अभावानेच कलावंत मंडळी सत्तेला विरोध करतात. सत्तेला विनादबाव विरोध करण्याची ताकद फक्त कलावंत, विचारवंत व साहित्यिकात असते. हल्ली तर विरोध करणे म्हणजे राष्ट्रद्रोह अशी एक नवीन व्याख्या समोर येत आहे.
‘चलती का नाम गाडी’, ‘हाफ टिकीट’ आणि ‘पडोसन’ हे किशोरदांचे तीन चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतले एव्हरग्रीन कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखले जातात. ‘चलती का नाम गाडी’मध्ये त्यांच्यासोबत अशोककुमार, अनुपकुमार व मधुबालाही होती. किशोरदा सहकारी गायक कलावंताचा खूप आदर करत असत. एकदा मनोजकुमारने त्यांना ‘उपकार’ या चित्रपटासाठी गाणे गायला बोलावले. पण किशोरदांनी प्राण या खलनायकाला माझा आवाज कसा काय देऊ म्हणून पळ काढला. नंतर मन्नादांनी हे गाणे गायले आणि ते हिट झाले. ‘कस्मे वादे प्यार वफा सब…’ किशोरदांना आपली चूक लक्षात आली. ते लगेच मनोजकुमारकडे गेले आणि म्हणाले, इतक्या सुंदर गाण्याची संधी मी धुडकावली. वर हेही म्हणाले की मन्नादांनी हे गाणे इतके अप्रतिम गायले आहे की असे गायला मला सात जन्म घ्यावे लागले असते. मी हे गाणे सोडले, हे चांगलेच झाले. नाहीतर इतक्या सुंदर आवाजापासून लोक वंचित राहिले असते. ते मनाचे एकदम निर्मळ होते.
डिप्लोमॅटिक पद्धतीपासून ते शेकडो मैल लांब होते.
१९६०च्या दशकात मोहम्मद रफी कळसावर होते. किशोरदांसाठी अनेक चित्रपटात रफी साहब गायले आहेत. यातील एक प्रसिद्ध गाणे म्हणजे ‘मन मोरा बावरा…’ किशोरदांनी तंबोरा घेऊन चित्रपटात हे गाणे गायले. लतादीदींशी त्यांचे सूर खूप चांगले जुळलेले होते. अत्यंत मनमोकळेपणे ते लताजींशी बोलत व म्हणत, ‘तुम्हें तो पता है लता, मुझे वह सा, रे, ग, म, ध, प, ध, पा बिल्कुल नहीं आता’ म्हणजे आपल्याला संगीतातले शास्त्र नाही कळत असा सहज कबुलीजबाब ते देत असत… पण त्यांचे सूर मात्र कधी चुकले नाही, कानाला बोचले नाही. ते त्यांच्या हृदयातूनच येत. १९६३मध्ये ‘एक राज’ नावाच्या चित्रपटात त्यांचे एक गाणे आहे, ‘पायल वाली देख ना’ मारुबिहाग रागात संगीतकार चित्रगुप्त यांनी शास्त्रीय ढंगात खूप सुंदर चाल बांधली आहे. किशोरदांनी हे गाणे अप्रतिम गायले आहे. किंवा मेहबूबा मधील ‘मेरे नयना सावन भादो’ हेही गाणे तर शास्त्रशुद्ध चालीचेच होते ना!
किशोरदाच्या कारकिर्दीचे तीन कालखंड आहेत. पहिला कालखंड ज्यात स्वत:ची गाणी स्वत: गाणारे नायक होते. त्याच कालखंडात ते देव आनंदचा आवाज म्हणूनही लोकप्रिय होते. दुसरा कालखंड राजेश खन्नाचा. या काळात सर्वाधिक गाणी त्यांनी त्याच्यासाठी गायली. त्याचा अभिनय किशोरदाच्या गाण्यातून खूप बहरत असे. तिसरा कालखंड अमिताभ या महानायकासाठी गायलेल्या गाण्यांचा. अमिताभ गाताना गळ्याच्या ज्या हालचाली करायचा, त्या खरोखरच लाजबाब असत. किशोरदांचा आवाज तो आपल्या गळ्यातून काढतोय, असेच वाटायचे. सचिनदांनी त्यांच्या आवाजातील वेगळेपण ओळखून त्याचा अत्यंत योग्य वापर केला. पण त्यांच्या पुत्राने पंचमदाने तर किशोरदाला क्रिएटिव्ह गायकाचा दर्जा प्राप्त करून दिला.
गुलजार, आरडी, किशोर आणि आशाताई यांनी संगीत आणि गायनाला एका वेगळ्या उंचीवर नेले. पंचमदांनी भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचा एक सुरेख गोफ विणला आणि किशोरदांनी आवाजाची रत्नजडित पेरणी केली. ‘अमर प्रेम’, ‘कटी पतंग’, ‘खुशबू’, ‘घर’ यातील किशोरदांच्या आवाजातील भारदस्तपणा आणि सुरावरची अफाट पकड बघून या माणसाने संगीताची शिक्षण घेतले नव्हते, हे म्हणायला मन धजावत नाही. त्यांचे ‘खामोशी’ चित्रपटातील ‘वो शाम कुछ अजीब थी….’ ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. संगीतकार हेंमत कुमार यांनी यातला कोरस अनुभूतीच्या अतिउच्च पातळीवर नेऊन ठेवला आहे.
रेडिओवरील मुलाखतीच्या एका कार्यक्रमात अमीनजींनी किशोरदांना त्यांच्या सोबत्यांबद्दल काही सांगण्याची विनंती केली. यावर किशोरदा म्हणाले, ‘मित्रानों माझे अत्यंत जवळचे असे तीन सोबती आहेत. विशेष म्हणजे हे सोबती तुमचे पण आहेत. यातला पहिला सोबती बालपण, दुसरा तारुण्य आणि तिसरा वृद्धत्व. यांना आपण कधीच वेगळं करू शकत नाही. मीही नाही करू शकलो’. राज कपूरनेही हेच सांगितले होते ‘मेरा नाम जोकर’मध्ये. प्रचंड झगमगाट असलेल्या या मोहमयी दुनियेत किशोरदा अलिप्तपणे वावरत असत. ही अवघड गोष्ट आहे. कविवर्य सुरेश भटांच्या एका गझलेतील पुढील ओळी किशोरदाच्या बाबतीत खूप लागू पडतात. ‘रंगात सार्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा! ‘मुंबईची गर्दी, लोकांची धावपळ, प्रचंड वेग, प्रकाशाचो प्रखर झोत, मद्याची रात्रभर न उतरणारी धुंदी, आसुसलेली मने यामध्ये त्यांचा जीव कधी अडकला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९६४मधील चित्रपट ‘दूर गगन की छाँव मे’. हा चित्रपट सबकुछ किशोरकुमार होता. निर्माता, दिग्दर्शक, कथा, अभिनेता, संगीत आणि एक गाणेही त्यांनी लिहिले. स्वत: किशोरदा व प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुप्रिया चौधरी यात प्रमुख भूमिकेत होते. यात त्यांचा मुलगा अमितकुमार याचीही भूमिका होती. यातील ‘आ चलके तुझे मैं लेके चलू…’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. एरवी इतकी उछलकुद करणारे किशोरदा स्वत:ची कथा घेऊन चित्रपट दिग्दर्शित करतात, तेव्हा तो आजपर्यंतच्या त्यांच्या प्रतिमेपेक्षा सर्वस्वी भिन्न आढळून येतो. या चित्रपटाने जास्त व्यवसाय केला नाही, मात्र समीक्षकांना किशोरदांची एक वेगळी ओळख मान्य करावी लागली. गंमत म्हणजे दोन वर्षांनी याचा तमीळ रिमेक ‘रामू’ या नावाने आला आणि तो मात्र तुफान चालला.
किशोरदांचा असाच एक सर्वस्वी वेगळा चित्रपट १९७१मधील ‘दूर का राही’. संगीतकार ते स्वत:च होते. यातील ‘बेकरार दिल तू गाए जा’ हे गाणेही त्यांच्या नेहमीच्या व्यावसायिक शैलीतील नव्हते. त्यांच्या मनाची ओढ अशी दूर जाण्याची का होती? त्यांच्या मनाला मुंबईचा झगमगाट का मोहवू शकला नाही? मनातले कोणते कप्पे रिते होते? माहित नाही. १९७४मध्ये त्यांनी आणखी एक कॉमेडी चित्रपट काढला, ‘बढती का नाम दाढी’. ही एक स्लॅपस्टिक कॉमेडी होती. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. किशोरदांच्या देहिक हालचालीची पण एक खास ढब होती, ती स्लॅपस्टिक कॉमेडीसाठी अत्यंत सुयोग्य होती. पण भारतीय प्रेक्षकांना फक्त शारीरिक हालचालीने भागत नाही. ‘शाब्बास डॅडी’ नावाच्या आणखी एका चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन १९७९मध्ये त्यांनी केले होते. यात त्यांची तिसरी पत्नी योगिता बाली व मुलगा अमितकुमार पण होते.
खांडवा शहरातील गल्ल्यांनी आयुष्यभर किशोरदांवर आपली कायम मजबूत पकड ठेवली. आपल्या शहरावर इतकं अफाट प्रेम करणारा किशोरदांसारखा कलावंत विरळाच म्हणायचा. खांडव्याच्या दूध आणि जिलेबीने आयुष्यभर त्यांचा पिच्छा सोडला नाही. तिथल्या प्रत्येक रस्त्यावरच्या त्यांच्या पाऊलखुणा कधी पुसल्या गेल्या नाही. किशोरदांना त्यांच्या आवडीची त्यांनी गायलेली गाणी विचारली, तर त्यांच्या ओठावर सर्वप्रथम ‘दुखी मन मेरे’ हे गाणे हमखास येत असे. तर दुसरे गाणे होते ‘खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनों’. ही दोन्ही गाणी म्हणजे त्यांच्या दोन टोकांच्या व्यक्तिरेखेचं उदाहरण म्हणायला हवीत.
किशोरदांनी आयुष्यात भरपूर उतार चढाव अनुभवले. लतादीदींना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘आता मी ज्या टप्प्यावर आहे तिथून मला खाली यायची इच्छा नाही. लोकांनी मला या शिखरावर आणून बसवले आहे. मला वाटतं की त्यांनी ‘तू जा बाबा, खूप झाले’ असे म्हणण्याच्या आगोदर मी स्वत:च अलविदा म्हणेन. पण मी चॅरिटीसाठी मात्र माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत स्टेज शो करत राहीन. कारण मी संगीताला अलविदा नाही करणार. माझी एकच मनोमन इच्छा आहे की प्रत्येकाला सुख, शांती मिळावी, कुणी दु:खी राहू नये. असे एक आभाळ ज्याला त्याला मिळावे. सुखाचा नेमका कोणता क्षण असतो हे तर मला माहित नाही, पण जिथे असे क्षण मला मिळतात मी आनंदी होतो. पण जेव्हा दु:खाचे क्षण भेटतात तेव्हा गप्प बसतो. मी आता जिथे आहे तिथे खूप खूष आहे. माझी आयुष्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. मात्र मला माझे शहर सतत खुणावत आहे. हात उंचावून ते मला इशारा करतेय, ‘चल रे मुसाफिर तू चल रे, अब अपने वतन तू चल रे…’ जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी इथून पळून जाऊ इच्छितो…’
…किशोरदा लहान मुलांच्या रडण्याचा आवाज फार सुंदर काढत असत. मानवी जन्माची सुरुवात रडण्यापासून होते आणि भोवताल मात्र हे रडणे ऐकून आनंदी होतो. मूल नाही रडलं तर त्याला रडवण्यासाठी कोण आटापिटा करावा लागतो. मात्र हेच मूल अखेरच्या प्रवासात एकदम शांत व निश्चल असतं तर भोवताल रडत असतो… ५८ हे वय काही इतक्या लांबच्या प्रवासासाठीचं योग्य वय नक्कीच नव्हतं, किशोरदा… तुमचा देह डोळ्यासमोरून नाहीसा होऊन कितीही वर्षे झाली तरीही तुमच्या गाण्याचं काय? ती तर आजही आणि पुढेही अशीच असतील की… अगदी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत…