भारताने ऑस्ट्रेलियामध्ये लाजिरवाणी हार पत्करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यामुळे अनेकांना कट्टर क्रिकेटप्रेमी असलेल्या बाळासाहेबांच्या कुंचल्यातून पन्नास वर्षांपूर्वी, १९७४मध्ये उमटलेलं हे मुखपृष्ठ चित्र आठवलं असेल. अजित वाडेकर या जबरदस्त कप्तानाने वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यासारख्या मातब्बर संघांबरोबरच्या कसोटी क्रिकेट मालिका जिंकून प्रचंड लोकप्रियता कमावली होती. १९७४च्या इंग्लंडबरोबरच्या रबर सिरीजमध्ये (क्रिकेटसह अन्य अनेक खेळांमध्ये दोन संघांमध्ये तीन किंवा पाच सामन्यांची मालिका खेळली जात असेल तर तिला रबर म्हणण्याचा प्रघात होता) भारत मोठा पराक्रम गाजवेल, असं वाटत असताना वाडेकरांच्या संघाने ३-० असा लाजिरवाणा पराभव पत्करला आणि त्यामुळे वाडेकरांना पायउतार व्हावं लागलं, त्यांच्याजागी टायगर पतौडी हे भारताचे कप्तान झाले. तेव्हा क्रिकेटच्या खेळाचं व्यावसायिकीकरण झालं नव्हतं, क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा नव्हता, क्रिकेटमधले स्टार्स कोट्यधीश बनत नव्हते, त्यामुळे की काय, पराभव झाला तर चाहत्यांना वाईट वाटायचं, रागही यायचा, पण आजच्याप्रमाणे त्यांची प्रतिक्रिया हिंस्त्र नसायची. रबर गमावलं तरी त्याने पडलेला डाग रबराने खोडून काढा, जबाबदारीने खेळा, पुन्हा यश मिळवा, असा धीर आपल्या क्रिकेटपटूंना देण्याइतका उदारपणा त्यांच्या चाहत्यांमध्ये होता. रोहित शर्मा, विराट कोहली यांना मात्र हे सद्भावनांचं भाग्य लाभेल अशी शक्यता नाही.