ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने १-३ अशा फरकाने हार पत्करल्यानंतर आता या पराभवाला जबाबदार कोण? नेमके कोण चुकले? असे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर अपयशाचे खापर फोडले जात आहे. कोण आहे जबाबदार?
– – –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिका पराभवाच्या ताज्या घटनांचे शल्यविच्छेदन करण्यापूर्वी एका तपापूर्वीच्या (२०११-१२) ‘त्या’ कटू इतिहासाच्या पानांचा आढावा घेणे अधिक आवश्यक ठरेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने ०-४ अशी पाटी कोरी राखत बोर्डर-गावस्कर चषक गमावला होता. त्या मालिकेत सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने चार सामन्यांत २२.६२च्या सरासरीने १८१ धावा केल्या होत्या. म्हणजेच ऑस्ट्रेलियातील पानिपताची अनुभूती त्याने घेतली आहे. त्या दौर्यात भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. यावर प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. ‘द ऑस्ट्रेलिया’ वृत्तपत्राने ‘भारताचे सामर्थ्यस्तंभ ढासळले’ अशा शब्दांत ताशेरे ओढले होते. ‘द हेराल्ड सन’ने अॅशेस मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने कशी कामगिरी उंचावली, याचे कौतुक केले होते, तर सराव सत्र टाळणार्या भारतीय शिलेदारांचा खरपूस समाचार घेतला होता. मालिकेनंतरच्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला ‘‘तुम्ही बांगलादेश संघाविरुद्ध खेळत असल्यासारखे वाटले का?’’ असा सवालही एकाने विचारला होता. या मालिकेनंतर राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय कसोटी संघात पुन्हा कधीच दिसले नाहीत. भारतीय कसोटी संघाला वैभवाचे दिवस दाखवणार्या या जोडगोळीला निरोपाचा कसोटी सामना न खेळताच अलविदा करण्याची नामुष्की ओढवली, कारण तो संक्रमणाचा काळ होता.
त्यानंतर वर्षभरात भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाला ४-० असे नमवून त्या पराभवाचे उट्टे फेडले. मग पुढच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात भारताने चार सामन्यांची मालिका ०-२ अशी गमावली. पण २०१४नंतर बोर्डर-गावस्कर चषकावर फक्त आणि फक्त भारताचे वर्चस्व होते, तेही २-१ अशा सारख्याच फरकाने. यापैकी दोन मालिका भारतातल्या होत्या, पण दोन मालिका ऑस्ट्रेलियातीलही होत्या. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील १-३ अशा दारुण पराभवामुळे भारताचे दशकाचे वर्चस्व संपुष्टात आले. याहून आणखी बर्याच आकड्यांची मोडतोड झाली. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना यंदा प्रथमच भारताच्या नशिबात नसेल. मागे दोनदा वाट्याला आलेल्या उपविजेतेपदानंतर प्रथमच ही वाट अशक्यप्राय ठरली.
गेल्या काही दिवसांत विराट कोहलीला खलनायक ठरवणार्या ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी भारताच्या या पराभवालाही मसालेदार फोडणी दिली आहे. जशी १२ वर्षांपूर्वीच्या मालिकेने राहुल-लक्ष्मणची कारकीर्द संपवली, तशी सध्या तरी कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि विराटची कारकीर्द संपेल, असे दिसत नाही. पहिल्या कसोटी सामन्यात कौटुंबिक कारणास्तव माघार घेणार्या रोहितने अखेरच्या सामन्यात लय हरवल्यामुळे स्वत:हून न खेळण्याचा निर्णय घेतला. पण प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या निवृत्तीच्या चर्चा वाढू लागल्यावर सामन्यात न खेळणारा हा कर्णधार ऐनकेन प्रकारे सर्वांसमोर आला आणि ‘हिटमॅन संपलेला नाही’ असा इशारा दिला. यावेळी रोहितने माध्यमांवर तोंडसुख घेताना म्हटले की, ‘‘माइक, लॅपटॉप किंवा लेखणी बाळगणार्या मंडळींच्या मतांमुळे आमचे आयुष्य बदलत नसते. आम्ही बरीच वर्षे हा खेळ खेळत आहोत. आम्ही केव्हा खेळू नये, केव्हा संघाबाहेर राहावे किंवा मी केव्हा कर्णधार व्हावे, ते ही माणसे ठरवू शकत नाहीत. मी समंजस आणि परिपक्व तसेच दोन मुलांचा पिता आहे. आयुष्याकडे पाहण्याचा माझा काही दृष्टिकोन आहे.’’ आपण लक्ष्यस्थानी असल्यामुळे काल-परवापर्यंत नायक ठरवणार्या प्रसारमाध्यमांचा आणि माजी क्रिकेटपटूंचा रोहितला आता त्रास होऊ लागला आहे आणि तुम्ही कोण, हा प्रश्न तो त्यांना विचारू लागला आहे.
भारताच्या पराभवाची मीमांसा करताना प्रशिक्षक गंभीर यांनी यापुढे खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे मतप्रदर्शन केले. पण, २३ जानेवारीपासून सुरू होणार्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खरेच हे खेळाडू खेळतील का, असा सवाल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केला आहे. कारण रोहित, विराट आणि रवींद्र जडेजा यांनी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असल्याने ते उपलब्ध आहेत. केएल राहुलची भारताच्या ट्वेन्टी-२० संघात निवड होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गंभीरचा गांभीर्यपूर्ण सल्ला अमलात येईल का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारताच्या गोलंदाजीच्या मार्याचे विश्लेषण केल्यास दोन कसोटी सामन्यांत नेतृत्व करणार्या जसप्रीत बुमराने टिच्चून मारा करीत आपली भूमिका चोख बजावली. १३.०६च्या सरासरीने त्याने सर्वाधिक ३२ बळी मिळवत मालिकावीर पुरस्कार पटकावला. सिडनीत बुमरा दुखापत असतानाही फलंदाजीला उतरला, पण गोलंदाजीला उतरू शकला नाही. त्याने गोलंदाजी केली असती, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असू शकला असता. या मालिकेदरम्यान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्ती पत्करली. पण, एकंदरीतच भारताच्या गोलंदाजीत बुमराला अन्य गोलंदाजांकडून तोलामोलाची साथ मिळाली नाही. मोहम्मद सिराजने २० बळी मिळवले; पण त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच डिवचले. अखेरच्या सामन्यात प्रसिध कृष्णाने ६ बळी घेत मिळालेल्या संधीचे सोने केले. नितीशकुमार रेड्डीच्या वाट्याला चौथा वेगवान गोलंदाज म्हणून मोजकीच षटके आली; पण आकाश दीप, हर्षित राणा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांची कामगिरी प्रभावहीन ठरली.
गोलंदाजीपेक्षा अधिक निराशाजनक ठरली, ती भारताची फलंदाजी. ऑस्ट्रेलियात रोहित आणि विराट झगडताना आढळले. फलंदाजीच्या तंत्रात कशा रीतीने सुधारणा करावी, हे या अनुभवी फलंदाजांना समजलेच नाही. रोहितने तीन सामन्यांत सलामी आणि मधल्या फळीत क्रम बदलत ६.२०च्या सरासरीने जेमतेम ३१ धावा काढल्या, तर विराटने पाच सामन्यांत २३.७३च्या सरासरीने १९० धावा काढल्या. पहिल्या कसोटीतले शतक वगळता विराटला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. उजव्या यष्टीबाहेरील चेंडू टाकून ऑसी वेगवान गोलंदाजांनी विराटची त्रेधातीरपीट उडवली. पण त्याच चुका, पुन्हापुन्हा केल्या. रोहित वारंवार पॅट कमिन्सचा शिकार ठरला. त्याची आत वळणार्या चेंडूंपुढे फसगत व्हायची. राहुलच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला. याव्यतिरिक्त, शुभमन गिल, जडेजा, देवदत्त पडिक्कल, सुंदर यांच्याही फलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह सर्वाधिक ३९१ धावा काढल्या. ऋषभ पंतने (२५५ धावा) मोक्याची क्षणी अनेकदा जिगरबाज वृत्ती दाखवली. पण पदार्पणाच्या मालिकेत नितीशने (२९८ धावा) उपयुक्तता सिद्ध केली. या अपयशी दौर्यातील हे एक फलित म्हणता येईल.
संघनिवडीचे निर्णय अनेकदा चुकले. गुलाबी चेंडूच्या कसोटीत आकाश हा अधिक उत्तम पर्याय होता. पण त्याच्याऐवजी हर्षितला प्राधान्य देण्यात आले. सिडनीत सुंदर आणि जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांची मुळीच आवश्यकता नव्हती. याऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाज खेळवणे हितकारक ठरले असते. याशिवाय प्रशिक्षक गंभीरही संघाच्या अपयशासाठी जबाबदार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने १०पैकी सहा कसोटी सामने गमावले, तर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही पराभव पत्करला. पण कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात निराशा करणार्या गंभीरच्या मार्गदर्शनाखाली फक्त ट्वेन्टी-२० प्रकारात सहापैकी सहा सामने जिंकले आहेत. गंभीरच्या दिमतीला अभिषेक नायर (फलंदाजी), मॉर्नी मॉर्केल (गोलंदाजी) आणि रयान टेन डॉइश्चॅट या साहाय्यक प्रशिक्षकांची फौज आहे. पण न्यूझीलंडविरुद्ध ४६ धावांत गारद होणे असेल किंवा अन्य सामन्यांत या मार्गदर्शकांचा भारतीय संघाला कोणताही फायदा झाल्याचे दिसून आले नाही.
एकंदरीतच ऑस्ट्रेलिया दौर्यातील अपयशानंतर आता कोण चुकले? जबाबदार कोण? याची चर्चा जोरात सुरू आहे. रोहित-विराट अद्याप निवृत्ती स्वीकारत नसल्याचे सध्या तरी स्पष्ट होते आहे. पण संक्रमणाचा काळ सुरू असल्याने जसे धोनी, अश्विन थांबले, तसेच तेही योग्य वेळी निरोप घेतील. जूनमध्ये भारताशिवाय कसोटी अजिंक्यपदाचा विश्वविजेता ठरेल. पण आगामी मोसमासाठी सज्ज होताना योग्य पावले उचलायला हवीत, तरच त्याची फळे रसाळ गोमटी चाखायला मिळतील.