छगन भुजबळ
जरांगे-पाटील माझ्या
जेव्हा आले अंगावर
सरसावून पुढे झालो
घेतलं त्यांना शिंगावर
कामापुरता केला मामा
मला युतीच्या लबाडाने
अजितदादा हेच व्हीलन
सूड घेतला आकसाने
माझ्या भुजांतील बळ पाहून
तिघांनाही वाटे धास्ती
येईन बघा पुन्हा मीही
तिघांची या जिरवेन मस्ती
—– —– —–
एकनाथ शिंदे
घातले मी लोटांगण
मोदी-शहांच्या चरणी
घ्यावे मला सांभाळुनी
काया झाली दीनवाणी
माझ्या आकांक्षांना त्यांनी
लावला तो मोठा चाप
विमान आणले जमिनीवरी
आणि म्हणाले, आम्हीच बाप
तेल गेले, तूप गेले
हाती आले धुपाटणे
अडीच वर्षे आता फक्त
हात-पाय आपटणे
—– —– —–
दीपक केसरकर
साधू संतांचाही आव
नाही मलाही फळला
बदनामीचा डाव माझ्या
मला आधी नाही कळला
कित्ती माझ्यासारखे नेते
पत्ता त्यांचाही काटला
भ्रष्ट भ्रष्ट शिक्का मारून
कळस खुन्नसचा गाठला
आमच्या संपत्तीचा आला
त्यांच्या डोळ्यावर धूर
आपलेही झाकून पुरते
माझ्या नावे बडवला उर
—– —– —–
अजित पवार
दिपोटीसीएम झालो तरी
मला फरक पडत नाही
सगळे गुन्हे माफ झाले
संपत्तीही रिटर्न येई
मोदी शहा मालकीची
वॉशिंग मशीन इतकी मोठी
माझ्यासारखे शेकडो मावतील
जरी त्यांची नियत खोटी
आमच्या पक्षामधले काही
खड्यासारखे काढले वेचून
नाकापेक्षा मोती नको जड
नाहीतर टाकतील मलाच चेचून
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
पुन्हा येईन म्हणता म्हणता
खरंच मी हा पुन्हा आलो
शब्द माझा खरा केला
वाहत्या गंगेत पावन झालो
शिंदेंना या सावरताना
अडीच वर्षे फुकट गेली
माझं मलाच कळलं नाही
त्यांची खुर्ची माझी झाली
पाहत होते दिवास्वप्ने
सीएम पद जणू हाती आले
अमित शहांनी दम देता
सुतासारखे सरळ झाले