देशभरात गाजावाजा, गुकेश झाला ६४ चौकडींच्या बुद्धिबळाचा राजा. १८ वर्षांचा हा चेन्नईचा तरुण बुद्धिबळाचं जगज्जेतेपद कसं काय जिंकतो? त्याचा अविश्वसनीय प्रवास सर्वांच्याच चर्चेचा विषय. या निमित्तानं गुकेश हा जगज्जेता क्रीडापटू कसा घडला, याचं विश्लेषण.
– – –
चेन्नईत २०१३मध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात विश्वविजेतेपदाची लढत झाली होती. त्यावेळी एका सात वर्षांच्या मुलानं महत्त्वाकांक्षा प्रकट केली की मला बुद्धिबळातील जगज्जेतेपद काबीज करायचंय. ११ वर्षांनंतर त्या मुलानं आपलं हे स्वप्न सत्यात उतरवलं. चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनला नामोहरम करीत गुकेश दोम्माराजूनं वयाच्या १८व्या वर्षी बुद्धिबळातील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा वारसा चालवणारा गुकेश जगज्जेता म्हणून कशा रीतीनं घडला? हा सर्वांचा स्वाभाविक प्रश्न.
जगज्जेता क्रीडापटू कसा घडतो? काही तज्ज्ञ म्हणतात, ज्या मातीत तो घडतो, तिथले गुण त्याच्या झिरपतात. म्हणजेच जन्मठिकाण किंवा वातावरण म्हणता येईल. काही अभ्यासकांच्या विश्लेषणानुसार, जगज्जेता घडवण्यात त्याच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांची मेहनत आणि त्यागाचं मोठं योगदान खेळाडूच्या आयुष्यावर असतं. काही जाणकारांच्या मते खेळाडू घडवण्यात शाळेचं श्रेय प्रचंड असतं. काहींचं म्हणणं असतं, प्रशिक्षक हाच खेळाडू घडवतो. त्याची अंत:प्रेरणा खेळाडूला लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरक ठरते.
तमिळनाडूच्या मातीचा महिमा
सध्या गुकेश तमिळनाडूचा की आंध्र प्रदेशाचा हा वाद सीमाप्रश्नाइतकाच ज्वलंत झालाय. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यात गुकेशचं श्रेय मिळवण्यासाठी समाजमाध्यमांवर चांगलीच जुंपलीय. गुकेश तमिळ की तेलुगू? गुकेशचे आजोबा शंकर राजू यांचा निवास आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील सत्यवेडूजवळील चेंचूराजू कंड्रिगा गावचा. ते रेल्वेत नोकरीला होते. पण गुकेशचे वडील रजनीकांत यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी चेन्नईत स्थलांतर केलं. तिथेच पद्मावती यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर २९ मे २००६ या दिवशी गुकेशचा चेन्नईत जन्म झाला. त्यांचं कुटुंब तेलुगू आहे, पण त्याला घडवण्याचं योगदान चेन्नईचं. गेल्या तीन तपांचा इतिहास हा तमिळनाडूचा बुद्धिबळातील महत्त्व अधोरेखित करणारा. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आणि विश्वविजेता. पण त्याव्यतिरिक्त के. शशिकिरण, एस. विजयालक्ष्मी, बी. अधिबान, एसपी सेतुरामन, मॅन्युएल आरोन, आर. प्रज्ञानंद, आर. वैशाली, आदी अनेकांनी या क्रीडाप्रकारात छाप पाडली आहे. भारताच्या ८५ ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंपैकी एकट्या तमिळनाडू राज्यातील ३० जणांचा समावेश आहे. याचप्रमाणे १२४पैकी ३४ आंतरराष्ट्रीय मास्टर, १८ पैकी सात महिला ग्रँडमास्टर, ४३पैकी १२ महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तमिळनाडूच्या आहेत. बुद्धिबळातील अनेक आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या स्पर्धांसाठी तमिळनाडूला सन्मानानं यजमानपद बहाल केलं जातं. या क्रीडाप्रकारासाठी अनुकूल वातावरण त्यांनी जपलंय, म्हणूनच या मातीचं माहात्म्य नाकारताच येणार नाही.
आई-वडिलांचा त्याग
गुकेशचे वडील रजनीकांत ईएनटी सर्जन म्हणजेच कान, नाक, घशावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर, तर आई पद्मा
मायक्रोबायोलॉजिस्ट (सूक्ष्म जीवशास्त्राची अभ्यासक). वयाच्या सातव्या वर्षीपासून गुकेशनं बुद्धिबळाची आवड जोपासली. २०१५मध्ये नऊ वर्षांखालील वयोगटाचं आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावल्यानंतर त्यानं ‘फिडे मास्टर’ किताबही प्राप्त केला. फिडे गुणांकन, किताब आणि विजेतेपदं एकापाठोपाठ एक मिळू लागली. शाळकरी वयातल्या गुकेशचे वडील नेहमी त्याच्या सोबतीला असायचे. २०१७-१८मध्ये या पिता-पुत्रांचे असंख्य दौरे व्हायला लागले. परिणामी रजनीकांत यांनी सन्मानाचं डॉक्टरी कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला. हा कौटुंबिक निर्णय सर्वांनी विचारपूर्वक घेतला. परिणामी आईची मिळकत हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत उरला. गुकेशनं ग्रँडमास्टर किताबाचा अखेरचा नॉर्म मिळवला, तेव्हा त्याच्या कुटुंब आर्थिक संघर्षाचा सामना करीत होतं. या कठीण काळात वडिलांच्या मित्रानं गुकेशच्या दौर्यांसाठी आर्थिक साहाय्य केलं. मुलाचं बुद्धिबळाचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैलीतही मोठ्या प्रमाणात बदल केला.
शाळेकडून मर्सिडीज कारची भेट
शाळा व्यक्तिमत्व घडवते. तेथील संस्कारांची शिदोरी त्याला आयुष्यभरासाठी प्रेरक ठरते. उदाहरणच द्यायचं झाल्यास शारदाश्रम विद्यामंदिरचं देता येईल. या शाळेतून एवढ्या मोठ्या संख्येनं क्रिकेटपटू घडले, ज्यांनी देशोदेशीची मैदानं गाजवली. सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, अमोल मुझुमदार, विनोद कांबळी आदी अनेक नावं घेता येतील. देशविदेशातील अनेक क्रीडापटूंचं खेळाकडे लक्ष केंद्रीत करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. गुकेशला बुद्धिबळाची ओळख त्याच्या शाळेतूनच झाली. पण चेन्नईच्या वेलम्मल विद्यालयातून चौथीपर्यंतच शालेय शिक्षण त्याला व्यवस्थित घेता आलं. पुढे पूर्णत: बुद्धिबळाचं प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी त्यानं स्वत:ला झोकून दिलं. पण, गुकेशच्या आई-वडिलांनी त्याचं अनौपचारिक शिक्षण म्हणजेच होम स्कूलिंग म्हणजेच गृहशिक्षण चालू ठेवलं. तो दौर्यांवर असतानाही ऑनलाइन वर्ग आणि खासगी शिक्षकांसारख्या पर्यायी पद्धतींनी त्याचं शिक्षण चालू राहिलं. काही महिन्यांपूर्वी गुकेशचा त्याच्या वेलम्मल विद्यालयानं विश्वनाथन आनंदच्या हस्ते भव्य-दिव्य सत्कार केला होता. मे महिन्यात १८ वर्षं पूर्ण करणार्या गुकेशला या कार्यक्रमात शाळेनं ६० हजार डॉलर्सची मर्सिडिज बेन्झ कार भेट म्हणून दिली. या कार्यक्रमाप्रसंगी ड्रोन आणि लेझर शोनं उपस्थितांचे डोळे दिपले. ही शाळा बुद्धिबळपटू घडवणारी शाळा म्हणून चेन्नईत ओळखली जाते. प्रज्ञानंद आणि वैशाली हे भाऊ-बहीण बुद्धिबळपटूही याच शाळेचे विद्यार्थी आहेत.
मार्गदर्शकांची भूमिका
गुकेशचे पहिले व्यावसायिक प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना. २०१७पासून म्हणजे वयाच्या ११व्या वर्षीपासून प्रसन्नाचं गुकेशला मार्गदर्शन लाभलं. प्रसन्ना हा ‘सर्कलचेस’ अकादमीचा मार्गदर्शक. आता गुकेश ‘सर्कलचेस’चा सदिच्छादूत झालाय. प्रसन्नानं १२व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला प्रारंभ केला. नंतर २४व्या वर्षी ग्रँडमास्टर होताच त्यानं आपल्या पत्नीसमवेत प्रशिक्षणाचं मार्ग स्वीकारला. गुकेशच्या जगज्जेतेपदाच्या यशात मनोधैर्य मार्गदर्शक पॅडी अपटन यांची भूमिकाही उपयुक्त ठरली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं २०११चं क्रिकेटमधील विश्वविजेतेपद जिंकलं, तेव्हा अपटन यांचंही योगदान महत्त्वाचं होतं. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाच्या मानसिक निर्धारात त्यांचं कार्य जबाबदारीचं होतं. त्यामुळे विश्वविजेतेपदाच्या आव्हानवीराची स्पर्धा जिंकताच गुकेशसाठी अपटन यांची नियुक्ती करण्यात आली. गुकेशची रणनीती अपटन यांनीच तयार केली. १२वा डाव गमावल्यावरही गुकेशला खचू न देण्यात आणि निर्णायक १४वा जिंकून देण्यात अपटन यांचंच मार्गदर्शन मोलाचं ठरलं. ‘‘तुम्हाला परीक्षेत उत्तम गुण मिळवायचे असतील, तर संपूर्ण पुस्तकाचा इमानेइतबारे अभ्यास करावा लागेल. परीक्षेला जातानाचा आत्मविश्वास या अभ्यासातूनच मिळतो. अभ्यास न करता फक्त आशा बाळगून परीक्षेला जाता येत नसतं’’ असा अपटन यांचा दृष्टिकोन गुकेशच्या जगज्जेतेपदासाठी मार्गदर्शक ठरला.
याशिवाय गुकेशच्या विश्वविजेतेपदासाठीच्या लक्ष्यप्राप्तीत विश्वनाथन आनंद हा त्याचा प्रेरक म्हणून कार्यरत होता. तसेच आनंदच्या वेस्टब्रिज आनंद चेस अकादमीचे (वाका) मार्गदर्शकही त्याच्या सहाय्यक मार्गदर्शकांच्या फळीत होते.
या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून गुकेशच्या गुणवत्तेला बळ मिळालं आणि भारताला एक विश्वविजेता लाभला.
– प्रशांत केणी
[email protected]