दर वेळी एखादा भारतीय खेळाडू एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवून आंतरराष्ट्रीय यश कमावतो, तेव्हा अभिमान दाटण्याबरोबरच मराठीजनांच्या मनात पहिला प्रश्न येतो… यात मराठी माणूस कुठे आहे?
आंध्र प्रदेशात जन्मून चेन्नईत लहानाचा मोठा झालेला डी. गुकेश वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी बुद्धिबळातला जगज्जेता ठरला, तेव्हाही आपल्या मनात हाच प्रश्न आला असेल… या खेळात मराठी माणूस कुठे आहे?
खरेतर हा प्रसंग सगळ्या देशाने आनंद साजरा करावा अशा आनंदाचा आहे. बुद्धिबळावर भारताचा ठसा आधीपासून आहेच. विश्वनाथन आनंदसारखा जगज्जेता आपणच दिला आहे जगाला. या खेळासाठी आवश्यक निवांतपणा, जीवनमान आणि प्रवास सुविधा मिळाव्यात यासाठी तो स्पेनमध्ये राहतो. गुकेशने मात्र भारतात राहून, इथेच सराव करून हे यश कमावलं आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्याने, त्याच्या कुटुंबाने आणि बुद्धिबळ संघटनेने काय मेहनत घेतली, त्याची कहाणी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रशांत केणी यांनी मार्मिकच्या याच अंकात सांगितली आहे. ती वाचल्यावर तर हा प्रश्न अधिक गहिरा होतो… महाराष्ट्र या खेळात कुठे आहे?
महाराष्ट्रानेही खाडिलकर भगिनी, प्रवीण ठिपसे यांच्यासारखे बुद्धिबळपटू दिले आहेत. एकेकाळी या खेळात आपण आघाडीवर होतो. त्याचबरोबर क्रिकेटमध्येही आपला दबदबा होता. मुंबईतलं शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क म्हणजे क्रिकेटपटूंची पंढरी. भारतीय संघात खेळलेले अनेक खेळाडू शिवाजी पार्काने आणि शारदाश्रम शाळेने घडवले. मुंबईतल्या वेगवेगळ्या जिमखान्यांमध्ये, मैदानांवर बारा महिने क्रिकेटची जत्रा भरलेली असते. देशाचं प्रतिनिधित्व करणार्या ११ जणांमध्ये स्थान मिळवायचं तर १० कोटी नागरिकांमागे एकाला ती संधी मिळते, एकेकाळी ती मिळवण्यात मुंबईकर अग्रेसर होते. त्यातही आता महाराष्ट्रीय खेळाडूंचं प्रमाण कमी झालं आहे. कपिलदेवच्या उदयापासून छोट्या केंद्रांवरच्या क्रिकेटपटूंनी भारतीय संघात स्थान मिळवायला सुरुवात केली, ती प्रक्रिया महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानपदानंतर आता इतकी व्यापक झाली आहे की क्रिकेटमध्ये आता कोणत्याच मोठ्या शहराचा किंवा एकाच एका राज्याचा दबदबा राहिलेला नाही.
कुस्ती, कबड्डी, खो खो वगैरे मैदानी खेळांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे आपल्या राज्याची? हॉकीमध्ये आपण कुठे आहोत? टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस या खेळांचे विजेते महाराष्ट्रात घडत आहेत का? पंजाब आणि हरयाणा यांच्याकडे ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडतात, तशा सोयीसुविधा तिथे उभारल्या गेल्या आहेत. पण, ओरिसासारखं मागास गणलं गेलेलं राज्यही माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या पुढाकाराने हॉकीला उत्तेजन देऊन देशाच्या क्रीडा नकाशावर झळकतं आहे. छत्तीसगड, झारखंडचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकत आहेत. कोणत्याही खेळाची कसलीही परंपरा नसलेल्या गुजरातमध्ये ऑलिम्पिक दर्जाची क्रीडा संकुलं उभी राहात आहेत. तिथे ऑलिम्पिक भरवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, मैदानी असोत की बैठे खेळ असोत; महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सगळी सामसूम दिसते आहे. असं का होत आहे?
महाराष्ट्र हे या देशाच्या स्वातंत्र्यापासूनच उद्योग व्यवसायात आणि अर्थकारणात अग्रेसर असलेलं राज्य. मुंबई आपल्या राज्यात असल्याचा हा फायदा होता. तो आपण क्रीडाक्षेत्रात वळवून वापरून घेतला का? क्रिकेट हा भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ. त्याचं मुख्यालय मुंबईत राहिलं आहे अनेक वर्षं. त्यामुळे इथे त्या खेळाची काही संस्कृती आणि सुविधा दिसतात. बाकीच्या खेळांच्या बाबतीत ते आपण उभारू शकलेलो नाही.
कोणता ना कोणता खेळ खेळायचा, त्यात प्रावीण्य मिळवायचं, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारायची आणि त्या आधारावर सरकारी नोकरी मिळवायची, असा यशाचा पॅटर्न पंजाब हरयाणामध्ये यशस्वीपणे राबवलेला दिसतो. नोकरीमध्ये रमणार्या, आर्थिक सुरक्षिततेला महत्त्व देणार्या महाराष्ट्रात मात्र हा मार्गही लोकप्रिय झालेला नाही.
कॅच देम यंग हे सूत्र ठेवून शालेय पातळीवरच खेळाडू निवडून त्यांना राज्य पातळीवरच्या अकादमीत घडवावं, त्यांच्यातल्या गुणांना पैलू पाडावेत, खेळातूनही त्याचं करियर घडवता येईल, याबद्दल त्याच्या पालकांना आश्वस्त करावं, ही व्यवस्थाच इथे उभी राहिलेली नाही. आपल्या मुलामध्ये बुद्धिबळाचं नैपुण्य आहे, हे लक्षात आल्यावर गुकेशच्या आईवडिलांनी त्याचं औपचारिक शिक्षण थांबवून त्याला बुद्धिबळाच्या प्रशिक्षणासाठी मोकळं केलं, त्याचं अनौपचारिक होम स्कूलिंग करण्याची जबाबदारी घेतली. त्याच्या वडिलांनी आपले काम सोडून त्याची सोबत करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे एखाद्या मुलामुलीत क्रीडागुण असले तरी त्याने किंवा तिने औपचारिक शिक्षणाचा मार्ग सोडून त्या खेळालाच वाहून घ्यावं, अशी हिंमत त्याचे पालक करतील का? ती कोणत्या आधारावर करावी, कोणत्या भरवशावर करायची? गुकेशचे पालक सधन वर्गातले होते. ज्या मुलांच्या आईवडिलांना दोन वेळच्या जेवण्याचीच भ्रांत असेल, त्या मुलांच्या प्रशिक्षणावर खर्च करणार कोण? त्या गुणवत्तेला न्याय मिळणार कसा?
या देशात जिथे क्रीडा संस्कृतीच नाही, तिथे क्रीडा संकुले उभारून व्यापारी पद्धतीने ती रुजवण्याचा विचार होतो आहे. पण, महाराष्ट्रात होती ती क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी भक्कम प्रयत्न झाले का? आपण ज्यांच्यात आघाडीवर होतो, त्या खेळांमध्येही मागे का पडलो?
डी. गुकेशचं यश मोठं आहे, अभिनंदनीय आहे, भारतीय म्हणून त्याचा अभिमानच वाटायला हवा; पण, बुद्धीचे खेळ असोत की बळाचे, महाराष्ट्र त्यात कुठेच का नाही, याचं आत्मपरीक्षणही करायला हवंच.