लॉकडाऊन पूर्णपणे संपलेले नाही. तरीही अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात आता मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये. यातच हेमंत ढोमे यांच्या नव्या सिनेमाचे चित्रीकरण इंग्लंडमध्ये सुरू झाले आहे. ढोमे यांनीच सोशल मिडीयावर एका पोस्टद्वारे नुकतीच ही माहिती दिली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या इंग्लंडमध्येच आहे. तीदेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसेल अशी शक्यता आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा उल्लेख केला आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच इंग्लंडमध्ये सुरु करण्यात आल्याचे हेमंत ढोमे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये हेमंत लिहितात की, नवा सिनेमा… इंग्लंडमध्ये शूट सुरू… याव्यतिरिक्त या सिनमाबद्दल आणखी कोणतीही माहिती त्यांनी या पोस्टमध्ये दिलेली नाही. मात्र त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा दिसत आहे. त्यामुळे तिची या नव्या सिनेमात प्रमुख भूमिका असेल असे वाटण्यास जागा आहे. या सिनेमात इतर कलावंत कोण असतील आणि सिनेमाचा विषय काय आहे हे मात्र ढोमे यांनी स्पष्ट केलेले नाही.