• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोमीताईचा सल्ला

- प्रसाद ताम्हनकर

Nitin Phanse by Nitin Phanse
December 14, 2024
in भाष्य
0

सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –

सगळ्यांचे भविष्य ‘सोमी’हाती!

प्रश्न : ताई सध्याच्या सोशल मीडियाकडे पाहून तुला काय वाटते? या संवादमंचाचे भविष्य उज्ज्वल आहे?
उत्तर : सोशल मीडिया तुम्हाला तुमच्या देशाचा चेहरा दाखवतो असे मला वाटते. ज्याप्रमाणे सध्या देशात अराजक चालू आहे, अगदी त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील चालू आहे. सध्या देशात स्त्रिया जेवढ्या सुरक्षित आहेत, तेवढ्याच सोशल मीडियावर आहेत. जेवढा धार्मिक उद्रेक देशात चालू आहे तेवढाच सोशल मीडियावर चालू आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या भविष्याची काळजी करत आहात आणि सोशल मीडिया देशाचे भविष्य ठरवायला निघाला आहे. देशात आता कायदा, पोलिस, सुरक्षा यंत्रणा, न्यायालये यांच्या निर्णयांना काही महत्त्व उरलेले नाही. सोशल मीडियावरच्या ट्रोल आर्मी, स्वयंघोषित धर्मरक्षक हे स्वतःच न्यायनिवाडा करू लागले आहेत.
कोणत्या अभिनेत्रीने कोणते कपडे घालावेत आणि हातात किती आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या असाव्यात, हे आता पानाच्या टपरीवर दिवसभर पडलेला गण्या सुनावू लागला आहे. सरकारने पाकिस्तान आणि चायनाच्या कंबरड्यात कशी आणि कधी लाथ घालती पाहिजे, हे रात्री दोन घोट झाल्यावर बाळ्या शिकवायला लागला आहे. धर्माचे पावित्र्य कसे जपावे हे छेड काढल्याबद्दल चार वेळा मार खाऊन बसलेला पक्या समजवायला लागला आहे. न्यायालयाचे काय चुकले हे दहावीत तीन वेळा बसलेली पापा की परी दाखवून द्यायला लागलेली आहे.
पुणे हा जिल्हा आहे का तालुका हे माहीत नसलेली चंदा विधानसभेसाठी काय प्लॅन आखायला हवा, ते शिकवत आहे. एकूणात सर्व काही सुजलाम सुफलाम होण्याच्या दिशेने देशाची, सोशल मीडियाची वाटचाल चालू आहे. बाकी तुमच्या आमच्या भविष्याचे म्हणाल तर त्याचे काय होईल ते सोशल मीडियावासी ठरवतीलच!
– पंचागकर्ती सोमीताई

हवाहवासा त्रास असा हा!

प्रश्न : ताई, मी एक अबला नारी आहे, जी या सोशल मीडियावरच्या मवाली गावगुंडांना त्रासलेली आहे. मी कायम वेगवेगळे फोटो टाकत असते. तिथे हे लोक झुंडीने येतात आणि गळेपाडू प्रतिक्रिया देत असतात. मला चिकनी, हुस्नजान, परी, अप्सरा असे काय काय म्हणत असतात. खूप वर्ष मी हा त्रास सहन करते आहे. आता करावे तरी काय बाई?
उत्तर : माझ्या अबला सखे, तुझा अबला आणि सबलामध्ये काही घोळ होत आहे का? तुझी एकूण समस्या बघता तुला हा त्रास हवाहवासा वाटत असावा, असेच वाटते आहे गडे. इतकी वर्षे झाली पण तू अशा प्रतिक्रिया देणार्‍यात एकाला देखील ब्लॉक केलेले नाहीस. सेटिंगमध्ये बदल करून तुझ्या फोटोवर कोणालाच कमेंट देता येणार नाही, अशी तजवीज केलेली नाहीस. उलट काही ठिकाणी अशा प्रतिक्रियांवर तुझे इश्श, काहीही हं असे प्रतिसाद देखील दिसत आहेत. मला ना, तुझ्याकडे बघून माझ्या एका मैत्रिणीची फार आठवण येते आहे. ही माझी मैत्रीण आणि मी एकदा एका पार्टीला गेलो होतो. तिथे बाजूला एक देखणा मुलगा मित्रांसोबत बसला होता. थोडा वेळ गेला आणि माझी मैत्रीण त्याच्याकडे बघून एकदम ’हलकट.. नालायक..’ असे पुटपुटली.
मी : अगं काय गं? उगाच कशाला शिव्या देतेस? तो तर तुझ्याकडे बघत देखील नाहीये.
मैत्रीण : म्हणून तर…
– नार्सिसस सोमी

‘सोमी’वर जाहिरात कशी करावी?

प्रश्न : मा. सोमीताई नमस्कार. मला टॅरो कार्ड रीडिंगची आवड आहे. आता मला सोशल मीडियाच्या मदतीने त्याचे व्यवसायात रूपांतर करायचे आहे. त्यासाठी काय करावे?
उत्तर : व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाची असते ती जाहिरात. पण आजकाल जाहिरातीचे स्वरूप बदलले आहे. तेव्हा तू वादंगाला तुझी जाहिरात बनव आणि धाडसाने पुढे जा. सर्वात आधी दोन जवळच्या मैत्रिणींना मदतीला घे. तिघी मिळून एखादा प्रचंड सदस्यसंख्या असलेला ग्रुप जॉईन करा. पंधरा एक दिवसांनी तुझ्या मैत्रिणीला तिथे एक पोस्ट टाकायला सांग. पोस्टचा सारांश असा – ’माझ्या भाचीने काल आग्रह करून करून माझ्या एका मैत्रिणीचा पत्ता माझ्याकडून घेतला. ही मैत्रीण कसले तरी कार्ड वगैरे बघून भविष्य सांगते म्हणे. भले ती माझी मैत्रीण आहे पण मला तरी हा सर्व भंपकपणा वाटतो. या मैत्रिणीकडे मी अनेकदा तरुण पोरापोरींना येताना पाहिले आहे. एकूणात पुढच्या पिढीचे आणि बुद्धीचे जरा वाकडे दिसते आहे.
दोन दिवस शांत बस. ज्या काय पाच पन्नास इतर लोकांच्या प्रतिक्रिया येतील त्या शांतपणे वाच. त्यानंतर मैत्रिणीच्या पोस्टला एक भले मोठे उत्तर लिही. त्याचा सारांश, वरच्या लेखनात उल्लेख असलेली मैत्रीण म्हणजे मी आहे. माझे नाव घेऊन जरी पोस्ट लिहिली असती तरी मला वाईट वाटले नसते. हात बघणे, कुंडली बघणे, टॅरो कार्ड याबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे असे एक मत असते. पण कोणतेही मत बनवताना निदान एकदा अनुभव घ्यावा असे मला वाटते. माझ्या या मैत्रिणीला माझ्या घरी येणारी तरुणाई खटकते. पण त्यांना काहीतरी चांगला अनुभव आला असेल म्हणून ते परत येत असतात हा विचार तिच्या मनात का आला नसावा? मग अमक्या तमक्याला आलेला अनुभव, कधीतरी तुझे आभार मानायला आलेले ८०-८२ वयाचे जोडपे, असे काय काय लिहून मोकळी हो.
तुझे उत्तर वाचून पुन्हा त्यावर काही ना काही प्रतिक्रिया येतील. चौकश्या होतील. आता तिसर्‍या मैत्रिणीच्या लिखाणाची वेळ आलेली आहे. तिला फक्त तुमचे नाव घेऊन, हा भन्नाट विषय आहे. या विषयावर आणि तुझ्या अभ्यासावर एक स्वतंत्र पोस्ट का टाकत नाहीस?’ एवढेच लिहायचे आहे. एकदा का हे कार्य उरकले की मग स्वतंत्र पोस्ट टाकून दे मार स्वकौतुक सोहळा उरकून घे. किती किती आणि कोण कोणत्या लोकांना तू यशाचा डोंगर चढवलास ते लिही. एका फार मोठ्या अभिनेत्रीची फार मोठी अडचण तू कशी सोडवली ते पण लिही (’तिची परवानगी मिळाली तर नंतर तिचे नाव इथे टाकेन’) असे लिहायला विसरू नकोस. तुझा एखादा अंदाज कसा चुकला हे पण अवश्य लिही. वादविवादाची किनार लाभलेली असल्याने तुझ्या लेखनावर प्रचंड गर्दी होईल हे सांगायलाच नको. वर ’माझ्या मैत्रिणीला माझी जाहीर विनंती आहे की तिने एकदा स्वत: अनुभव घ्यावा आणि आलेला अनुभव देखील इथे लिहावा’ असा शेवट करायला विसरू नकोस. लोकं जाहिरात विसरतात पण वाद नाही. तेव्हा आता ग्राहकांच्या गर्दीसाठी तयार व्हायला हरकत नाही.
– बाई सोमी बंगाली

चिरकुटरावांचा प्रश्न

प्रश्न : सोमी तुम्ही कु. आहात का सौ.?
उत्तर : असे प्रश्न विचारताना सोबत बँक बॅलेन्सचा फोटो जोडावा एवढे साधे कसे कळत नाही हो तुम्हाला?

राजकारणाचे गजकरण

प्रश्न : ताई, मी राजकारणावर चर्चेचा एक ग्रुप चालू केला आहे. पण ना तिथे गर्दी वाढते आहे, ना आहेत ते सदस्य काही हालचाल करत आहेत. ग्रुपला सदाबहार कसा बनवू?
उत्तर : राजकारणावर काय चर्चा करतात? हे कसले भिकेचे डोहाळे? मुळात राजकारण आणि जेवण हे चर्चेचे विषय नाहीत, फक्त ताव मारायचा. एकतर आपल्यापर्यंत राजकारणातले किती, काय आणि कधी पोहोचावे हे स्वत: राजकारणी ठरवत असतात. पाच पाच वर्ष दडपलेल्या सो कॉल्ड घटना ते अचानक निवडणुकीच्या वेळी लोकांना सांगायला लागतात. पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचे पुरावे त्यांना अचानक सापडायला लागतात. गेली पाच वर्षे ज्या पक्षाला शिव्या देत होतो, तो देशाला कसा उज्ज्वल भवितव्याकडे नेतो आहे, त्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. आणि मग पडद्यासमोर पुढची पाच वर्षे जी काही साठमारी होते त्याला आपण समजतो राजकारण आणि जे पडद्यामागे चालू असते ते खरे व्याकरण.
– राजकारण तज्ज्ञ सोमी

तुमचे हित, त्यांची चिंता!

प्रश्न : सोशल मीडियावर हितचिंतक कसे मिळवावेत?
उत्तर : माझ्या भोळ्या भाऊराया, सोशल मीडियावर आपले हित झाले की ज्यांची चिंता वाढते त्यांना म्हणतात हितचिंतक. असे हितचिंतक तुला पदोपदी सापडतील. तू फक्त ’कंपनी बहुदा
ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे’ अशी एक ओळ लिही आणि हितचिंतकांचे थवेच्या थवे धावत येतील. ’अभिनंदन. लग्न झाले आहे का तुमचे?’ ’मग आता तिकडेच सेटल का?’ ’तुम्ही आयटी क्षेत्रात आहात का? सावध राहा. फुगा कधी फुटेल सांगता येत नाही’, त्या देशात सध्या आपल्या लोकांवर हल्ले होत आहेत ना? बी सेफ हां.’ ’ऑस्ट्रेलियामध्ये फारसे प्रॉस्पेक्ट्स आहेत असे वाटत नाही’, बॅक ऑफिस का प्रâंट? तिकडे गाढवागत राबवून घेतात. पुन्हा एकदा विचार करावा’ अशा भययुक्त सल्ल्याने तुझे अभिनंदन केले जाईल. हे सर्व तुझे सोशल मीडिया हितचिंतक आहेत याची खात्री बाळग. मात्र, ’वेलकम. मी इथे तीन वर्ष आहे. कोणताही त्रास नाही.’ ’मी चार वर्ष काढली आहेत तिकडे. तिथले लोक एकदम साधे आणि कोणाच्या अध्यात मध्यात नसणारे आहेत. छान वातावरण असते.’ तिथल्या मराठी मंडळात माझा मित्र असतो, काही अडचण आली तर बिनधास्त फोन कर त्याला. नंबर मेसेज करतोय..’ हे सांगणारे तुझे खरे हितचिंतक आहेत हे लक्षात घे. आभासी जगात हितचिंतकांची पारख फार सावधपणे करायची असते. हात धरून वर खेचणारे कमी आणि पाय धरून खाली खेचणारे जास्ती भेटतात. तेव्हा अखंड सावधान असावे..
– हितशत्रु सोमीताई

Previous Post

आंब्राई

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.