गाड्यांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही अशा समस्या असतानाच बेवारस गाडयांमुळे यात अधिक भर पडत असते. त्यामुळे स्थानिकांना मनःस्ताप होतोच पण काहीवेळा पालिकेकडे या गाडया ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते.
त्यामुळे अशा बेवारस गाड्यांसाठी पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांवरील 20 टक्के जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव शिवसेनेने पालिकेकडे मांडला आहे. या प्रस्ताव मंजूर झाला तर मुंबईतील बेवारस गाड्यांचा प्रश्न सुटणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवर वर्षानुवर्षे लोकांनी सोडून दिलेल्या, बंद पडलेल्या बेवारस गाड्या उभ्या असतात. अशा गाडय़ा ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात त्या ठिकाणी नीट साफसफाई करता येत नाही, गाडय़ा कशाही उभ्या केल्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडीही होते, परिसरात अस्वच्छता वाढून गलिच्छपणा वाढतो.
मुंबई महानगरपालिका अशी बेवारस वाहने उचलून त्यांचा लिलाव करते. मात्र, लिलावाच्या प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागत असल्यामुळे अशी वाहने ठेवण्यासाठी पालिकेकडे काही वेळा जागा उपलब्ध होत नाही.
रस्त्यांत महिनोन महिने उभ्या असलेल्या या गाडय़ा रस्त्यावर तशाच पडून राहतात. त्यामुळे मुंबईत ज्या ज्या विभागांत चटई क्षेत्रफळ निर्देशांकाचा (एफएसआय) वापर करून सार्वजनिक वाहनतळ बांधण्यात आले आहेत, अशा पालिकेच्या ताब्यातील वाहनतळांवरील 20 टक्के जागा बेवारस गाड्यांसाठी राखून ठेवावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी प्रस्ताव मांडून केली आहे. गुरुवार, 26 नोव्हेंबरला पालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
सौजन्य : दैनिक सामना