लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला, ते असंतोषाचे जनक बनले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्यलढ्याने टिळकांच्या मृत्यूनंतर २७ वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं… पण, या लढ्यात प्रखरपणे अग्रेसर असलेल्या मराठी माणसाच्या वाट्याला काय आलं? बाळासाहेबांनी १९६६ साली टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण करताना रेखाटलेल्या या मुखपृष्ठचित्रामधला मराठी माणूस हा टोपली उशाला घेऊन हाताच्या घडीची उशी करून फुटपाथच्या कडेला झोपलेला मजूर आहे… या चित्राला आता ६० वर्षे होत आली तरी मराठी माणसाचं चित्र बदललं आहे का? खासकरून महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत त्याची अवस्था काय? तरी नशीब, इथे खुद्द बाळासाहेबांच्याच नेतृत्त्वाखाली मराठी अस्मितेची लढाई शिवसेनेने लढली आणि मुंबईवरचा मराठी ठसा कायम राखला! पण, मिंधे आणि घरचे भेदी यांचा मरहठ्ठ्यांना शापच आहे. त्याचीच फळं आजचा महाराष्ट्र भोगतो आहे… दिल्लीच्या तख्तावर बळजबरीने बसलेली तथाकथित महाशक्ती स्वाभिमानी महाराष्ट्राला त्याच्याच करांचा वाटा द्यायला तयार नाही आणि इथे नेमलेले हुजरे तिथे मुजरे करायला जात असतात… टिळकांचा आत्मा तळतळत असेल स्वर्गात ही लाचारी पाहून.