एकनाथ शिंदे
मी सीएम झाल्यापासून
कितीतरी अपघात वाढले
पाच पाच लाख वाटले तरीही
मृत्यूसत्र नाही थांबले
राज्यात वाढली गुन्हेगारी
खून, हत्यांना नाही तोटा
रन-हिटचा सुरू धडाका
गृहखात्याचा दामच खोटा
त्या खात्याचे पोलीस बंदे
दबावापुढे करतील काय
गुन्हेगारांची इथे बडदास्त
फडणवीस कुठे करतात काय!
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
माझ्या राज्यात कायदा सुव्यवस्था
आहे बघा अगदी चोख
कोण म्हणतो अंदाधुंदी
गृहखात्याला पडले भोक?
नाही देणार राजीनामा
राज्यात आहे सारे आलबेल
मुंग्यांसारखी माणसे चिरडतात
गुंडांनाही मिळतो बेल?
मला नाही खरे वाटत
अपराध्यांना मारू लाथ
लोक का म्हणतात कळत नाही
बोलाची कढी बोलाचाच भात
—– —– —–
अजित पवार
नाही कशाचे सोयरसुतक
घोषणा करण्यात आहे गुंग
खजिना झाला जरी रिकामा
होत नाही हवा तंग
लाडक्या बहिणी, लाडके भाऊ
कोणीच नाही आहे दोडके
मतांसाठी करू काहीही
जरी झाले राज्य बोडके
लाजलज्जा गुंडाळली मी
काकांपेक्षा होईन वरचढ
कशी जिरवली काकांचीही
दिल्लीचाही सर केला गड
—– —– —–
नरेंद्र मोदी
केंद्रात काही खरे नाही
कधी सत्ता जाईल निघून
जागतिक दौरे करून घेऊ
सगळे देश घेऊ बघून
केवढा देतात मला सन्मान
केवढा तिथे वाढतो रुबाब
आपल्या देशात नाही विचारत
हड्डी में तर घालती कबाब
पाच वर्षे जातील सुखात
असे मात्र नाही वाटत
उसवत चालली सत्ता-गादी
दिवसेंदिवस चालली फाटत
—– —– —–
छगन भुजबळ
आदल्या दिवशी दिली दुषणे
दुसर्या दिवशी धरले पाय
स्वभाव माझा आहे नाटकी
म्हणूनच कोणी विचारत नाय
सार्यांनाच आहे ठाऊक
मी स्वयंभू सच्चा नेता
पाडापाडीत आहे हुश्शार
खाता पिता ढेकर देता
दाखवत आलो माझी ताकद
आहे माझ्या भुजात बळ
साहेबांनी जरी मारली छडी
नाही उठत पाठीवर वळ