शिवसेनेशी, आपल्या आईशी गद्दारी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे कोणत्याही कार्यक्रमात गेले की एकच टेप वाजवतात… आम्ही दोन वर्षांपूर्वी (महाविकास आघाडीचे उत्तम चाललेले सरकार पाडून) काय महापराक्रम केला! नाटकाच्या कार्यक्रमाला गेले की आम्ही काय प्रयोग रंगवला, क्रिकेटच्या कार्यक्रमाला गेले की आम्ही काय षटकार मारला, साहित्यिक कार्यक्रमाला गेले की आम्ही काय जबरदस्त कथानक लिहिलं… मुख्यमंत्री झाल्यावर दोन दिवसांपासून दोन वर्षांपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमात फक्त काळाचा उल्लेख बदलतो… बाकी टेप तीच वाजते…
…त्यांचाही नाईलाज आहे… यापेक्षा वेगळं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही… ना तेवढी पोच ना तसा व्यासंग, ना वक्तृत्त्व… शिवाय इतरांना सांगण्यापेक्षा ते बहुदा स्वत:लाच सांगत असतात की आपण दोन वर्षांपूर्वी केलं ते बरोबरच केलं… आपण काही ईडीच्या पिडेच्या निव्वळ शक्यतेला घाबरून महाशक्तीला शरण गेलो नाही, आपल्यात सच्च्या शिवसैनिकाचा लढाऊ बाणा नव्हताच हे मान्य न करता ते स्वत:लाच सांगतात की आपण, गद्दारी केली आहे ती हिंदुत्वासाठी…
दुसरीकडे जनतेने लोकसभा निवडणुकीत कानाखाली सूर्यजाळ काढल्यानंतरही मति ठिकाणावर न आलेल्या भारतीय जनता पक्षाचे नंबर दोनचे नेते महाराष्ट्रात येऊन खर्या शिवसेनेला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य म्हणून हिणवताना दिसत आहेत… बिचार्या अमित शाह यांना मिरच्या झोंबणे स्वाभाविक आहे… हिंदू धर्माचे एकमेव ठेकेदार आपण आहोत, या तोर्यात भाजपवाले उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची मापं काढत फिरत असतात. मात्र, हिंदू धर्मात ज्यांना काही स्थान आणि मान आहे असे ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी निर्विवादपणे उद्धव यांच्या हिंदुत्वावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, मग यांचा पोटशूळ उठणारच… गद्दारी करणं हे हिंदुत्वात बसत नाही, असं शंकराचार्यांनी मिंध्यांनाही सुनावलं आहे. हृदयात राम आणि हाताला काम, ही हिंदुत्वाची व्याख्या उद्धव ठाकरे मांडत असतात. जुमलेबाजी आणि रेवडीबाजी करून सत्ता टिकवू पाहणार्यांचं हिंदुत्व म्हणजे धार्मिक विद्वेषाची आग पेटवून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचं हिंदुत्व… त्यांचे कान शंकराचार्यांनी उपटले तर आहेतच, शिवाय, तुम्ही धर्मावर बोलणं थांबवा, मग मी राजकारणावर बोलणं थांबवतो, हे ठणकावून सांगून त्यांनी भाजपच्या बनावट हिंदुत्वाची हवा काढून घेतली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वात मोठे टार्गेट उद्धव ठाकरे आहेत कारण अस्सल हिंदुत्वाचे हे निडर सेनापती म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याच्या अशक्यप्राय मनसुब्यांमधला मोठा अडथळा आहेत. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार या आडनावांना मोठं वलय आहे. ते निर्माण करणारे शरद पवार अजून सक्रिय आहेत आणि त्यांच्या निम्म्या वयाच्या विरोधकांना पाणी पाजणारा स्ट्राइक रेट राखून आहेत. प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वलयांकित वारसा ज्यांना लाभला ते उद्धव ठाकरे नेस्तनाबूत न होता अधिक प्रखर तेजाने तळपत आहेत. शिवसेना फोडून आपण त्यांना सहज नामोहरम करू, अशी भाजपची गोड गैरसमजूत होती. उद्धव ठाकरे हे बैठे, दरबारी राजकारणी आहेत, ते आपल्याला शरण येतील आणि पुन्हा युती सरकार स्थापन होईल, ही भाजपची अटकळ उद्धव यांच्या लढाऊ बाण्याने उद्ध्वस्त केली. राखेतून उभ्या राहणार्या फिनिक्सप्रमाणे त्यांनी अशी भरारी घेतली की आज महाविकास आघाडीचे राज्यातले ते एक सर्वात मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून कोविडकाळात त्यांनी केलेल्या कामामुळे कोणीही कसलीही योजना न आणता, पैशांची खैरात न करता, इकडे तिकडे दाढी कुरवाळत वल्गना करत न फिरता देखील ‘लाडका मुख्यमंत्री’ म्हणून तेच महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर विराजमान होऊन बसलेले आहेत.
सोनं कसाला लागतं किंवा आगीत टाकलं जातं तेव्हा ते आणखी झळाळून निघतं. शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत तेच घडलं. शिवसेना संपवण्याच्या नादात भाजपनेच आपली हद्दपारी ओढवून घेतली आहे महाराष्ट्रात. दोन वर्षांपूर्वी शिंदे यांनी केलेल्या तथाकथित बंडासारखे गद्दारीचे प्रयोग काही शिवसेनेला नवे नाहीत. याआधीही काही नेत्यांनी मतभेदांनंतर पक्ष सोडला, पण आमचाच पक्ष खरा, असं म्हणण्याचा निगरगट्ट हलकटपणा कोणी केला नव्हता. काहींनी हवा तो पक्ष निवडला, काहींनी वेगळा पक्ष काढला. त्यांना त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणात यशही लाभलं. मिंध्या गद्दारांनी मात्र थेट पक्षावर, चिन्हावर मालकी सांगितली, आसुरी महाशक्तीने सगळ्या यंत्रणा वाकवून ती त्यांना दिली. पण, यामुळे हे अलिबाबा आणि चाळीस चोर महाराष्ट्राच्या नजरेतून कायमचे उतरले. आता परिस्थिती अशी झाली आहे की या या, हवे ते मागा आणि मिळवा, अशी स्कीम खोलून बसलेल्या आधुनिक घाशीराम कोतवालापाशी शिते आहेत तोवर नाचणार्या धंदेवाईक भुतांची भुतावळ गोळा झाली आहे; शिते संपली की ती यांनाच धंद्याला लावेल. त्याचवेळी, माझ्यापाशी तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही, असं सांगणार्या उद्धव ठाकरे यांच्याभोवती मात्र कठीण काळातही साथ देणार्या निष्ठावंत मावळ्यांचं अभेद्य कडं उभं राहिलं आहे… राज्याच्या कानाकोपर्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढतच चालला आहे…
उद्धव ठाकरे यांच्या हाती नियतीनेच दिलेली मशाल आता महाराष्ट्राच्या राजकारणातला महायुती नावाचा कुबट, काळाकुट्ट अंधार नष्ट करणार आहे. हे धर्मकार्य आणि देशकार्य करण्यासाठी त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, अशी सदिच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून व्यक्त होत आहे.