भारतीय चित्रपट व्यवसायाला २०२३ हे वर्ष लाभदायक ठरलं. सिनेमातून निवृत्ती पत्करायला हवीस, असे सल्ले सोशल मीडियावर ज्या हीरोला दिले गेले त्या शाहरुख खानने ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ असे एकापाठोपाठ तीन चित्रपट सुपरहिट करून बॉक्स ऑफिसचा ‘किंग खान’ कोण आहे दाखवून दिलं. शाहरूखच्या जोडीला रणबीर कपूर (अॅनिमल – ८५० कोटी), सनी देओल (गदर-२ – ६८७ कोटी) या सिनेमांनी गतवर्षात कोटीच्या कोटी उड्डाणे करून यशाला गवसणी घातली. ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने तिकीटबारीवर ९०.५ कोटी कमाई करत ‘सैराट’सारखं मोठं यश मिळवत मराठी प्रेक्षकांची मराठी सिनेमाशी नाळ अजूनही जोडलेली आहे हे दाखवून दिलं. गतवर्षीच्या देदीप्यमान यशाच्या पार्श्वभूमीवर २०२४ हे वर्ष बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडलंय काय या २०२४च्या सहामाही परीक्षेत?
या परीक्षेत पहिला नंबर पटकावला आहे प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ या सिनेमाने. जगभरात या सिनेमाने १००० कोटी रुपयांची छप्परफाड कमाई करत इतिहास रचला आहे. देशभरात ५५० कोटींचा टप्पा गाठून या सिनेमाने शाहरुखच्या ‘पठाण’लाही मागे टाकलं आहे. ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ या सिनेमांच्या निराशाजनक कामगिरीनंतर प्रभासचे आधीचे ‘बाहुबली’चे यश आभासी होते, असं म्हणणार्या टीकाकारांना प्रभासने सहा महिन्यांपूर्वी सालार (६१७ कोटी) सिनेमाच्या यशाने चोख प्रत्युत्तर दिलं होतंच. पाठोपाठ २७ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘कल्की’ सिनेमाने पहिल्या दहा दिवसांत भारतात ४६५ कोटींची कमाई करून आणि जगभरात ७६७ कोटींची कमाई करून दुष्काळग्रस्त बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला. इतकंच नव्हे तर या सिनेमाने सिनेमागृहाची वाट विसरलेल्या दोन कोटी प्रेक्षकांना पुन्हा ती वाट चोखाळायला भाग पाडलं.
या वर्षी यशाची पहिली झेप ‘हनुमान’ या तेलगू सिनेमाने घेतली होती. या सिनेमात प्रभाससारखा मोठा स्टार नव्हता, पण भारतीय प्रेक्षकांना त्यांचा सुपरहिरो कसा दिसायला हवा, याचं भान या सिनेमाच्या दिग्दर्शकाला नक्कीच होतं. पन्नास कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने देशात २०० कोटी तर जगभरात २९५ कोटी रुपयांची कमाई करून वर्षाची सुरुवात चांगली केली. हृतिक रोशनच्या ‘फायटर’ने देशात २५४ कोटी आणि जगभरात ३५८ कोटी रुपयांची कमाई करून बॉलिवूड अजूनही स्पर्धेत आहे, याची जाणीव दक्षिणेतल्या सिनेसृष्टीला करून दिली.
फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिकदृष्ट्या दखल घ्यावी असे सिनेमे फारसे आले नाहीत. वरुण ग्रोव्हर दिग्दर्शित ‘ऑल इंडिया रँक’ फेब्रुवारीत दाखल झाला. हा मासेसचा सिनेमा नव्हता. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारी मुले, आयआयटी असलेली शहरे अशा मोजक्या ठिकाणी या सिनेमाचं कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा ‘ऑल इंडिया रँक’ बराच खाली आला आणि केवळ ३७ लाख रुपयांचा गल्ला जमवून हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला.
शाहिद कपूरच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या सिनेमाने भारतात ८५ कोटींची कमाई केली. या तुलनेत यामी गौतम या अभिनेत्रीच्या ‘आर्टिकल ३७०’ या सिनेमाचे यश (७८ कोटी) चकित करणारे होते. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमाने २५ कोटी रुपयांची कमाई केली. रणदीप हुडा या अभिनेत्याने या सिनेमासाठी घेतलेल्या कष्टाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले, पण या कौतुकाचे रूपांतर बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले नाही.
आमीर खान निर्मित ‘लापता लेडीज’ सिनेमाचं समीक्षकांनी आणि जाणकार प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. सहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (२१ कोटी) चार पटीने कमाई केली असं दिसत असलं तरी तिकीट विक्रीतून मिळालेल्या पैशातील पन्नास टक्के वाटा मल्टिप्लेक्स मालकच घेऊन जातात. हा उत्तम सिनेमा ढिसाळ मार्केटिंगमुळे बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकाव धरू शकला नाही. कमी बजेटचे, पण चांगला आशय असणारे सिनेमे पाहायला सिनेरसिक लगेचच सिनेमागृहात येत नाहीत. मोठे स्टार नसलेले, आशयघन चित्रपट हे माऊथ पब्लिसिटीने हळूहळू जोर धरतात. पण जेव्हा महिन्याभरात या सिनेमाला गर्दी जमायला सुरुवात होते तेव्हा ओटीटी चॅनल या सिनेमाची जाहिरात करायला सुरुवात करतात. हा सिनेमा आता मोबाईलवर दिसणारच आहे, मग कशाला सिनेमागृहात जायचं असा विचार करून प्रेक्षक या सिनेमांना येत नाहीत. हा आत्मघातकी प्रकार ‘लापता लेडीज’मुळे पुन्हा एकदा सगळ्यांपुढे आला. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याऐवजी चार महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित व्हावा अशी सिनेमागृह मालकांची मागणी आहे, ती योग्यच वाटते.
मार्चमध्ये अजय देवगणच्या ‘शैतान’ या सिनेमाने भारतात १४८ कोटी कमावले. पण या यशात आर. माधवनचाही मोठा वाटा होता. ‘मैदान’ या पुढील चित्रपटात एकट्याच्या बळावर बॉक्स ऑफिसचा खेळ खेळण्यात अजय देवगण अपयशी ठरला. या सिनेमाकडून हिंदी चित्रपट उद्योगाला खूप आशा होत्या. ‘दंगल’, ‘चक दे इंडिया’, ‘सुलतान’, ‘धोनी’ या खेळावर आधारित सिनेमांनी खणखणीत यश संपादन केलं होतं. ‘मैदान’ बनवण्यासाठी निर्माता बोनी कपूरने सर्व शक्ती, धन पणाला लावलं. या सिनेमाचे बजेट (२५० कोटी) हाताबाहेर गेलं. या सिनेमाला फक्त ४२ कोटी गल्ला जमवता आला. बोनीने १९९०च्या दशकाच्या अखेरीला ‘रुप की रानी चोरों का राजा’ या सिनेमाचे मोठं अपयश पचवलं होतं. घरातली व्यक्ती स्टार असेल तर फ्लॉप सिनेमामुळे कोसळलेला निर्माता पुन्हा उभा राहू शकतो. आज ‘रुप की रानी…’च्या अपयशाची पुनरावृत्ती झाली असताना जान्हवी कपूरचे बाबा असलेला बोनी सिनेमाच्या मैदानात पुन्हा कम बॅक करील यात शंका नाही.
‘मैदान’च्या अपयशानंतर अख्ख्या सिनेमा जगताचे लक्ष ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमाकडे लागलं होतं. आजवरच्या सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक अशी या सिनेमाची चर्चा रंगली होती. ३५० कोटी खर्च करून बनलेल्या या सिनेमातील अक्षयकुमार आणि टायगर श्रॉफ ही अॅक्शनवीरांची जोडी ११ एप्रिलला मोठा हंगामा करणार, असं वाटत असताना ‘नाव मोठं आणि लक्षण खोटं’ अशी या सिनेमाची गत झाली. आमची फिल्म बॉक्स ऑफिसवर ११०० कोटी रुपयांची कमाई करेल असा दावा निर्मात्यांनी केला होता, पण फक्त ६६ कोटी रुपयेच हा चित्रपट जमवू शकला.
स्टार कलाकारांचे मोठे मानधन या विषयावर सिनेसृष्टीत आधी दबक्या आवाजात चर्चा व्हायची, आता सिनेमाचे वाढते बजेट आणि बॉक्स ऑफिसवर पडलेला दुष्काळ यामुळे नुकसान सोसत असलेले निर्माते याविषयी उघडपणे बोलत आहेत. जे कलाकार एका सिनेमासाठी ३५ कोटी रुपये मानधन मागतात, त्यांनी त्यांच्या सिनेमाला किमान साडेतीन कोटी रुपयांची ओपनिंग मिळेल याची गॅरंटी तरी द्यावी असं करण जोहर उपहासाने म्हणाला. ‘बडे मियाँ…’ची कमाई खूप कमी झाल्यामुळे सिनेमाचे निर्माते वाशू भगनानी यांना खूप मोठा आर्थिक फटका बसल्याचं सिनेसृष्टीत बोललं जात आहे.
मे महिन्यात अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीकांत’ हा बायोपिक राजकुमार रावला हिट मिळवून देऊ शकला नाही. बॉक्स ऑफिसवर ४८ कोटींची कमाई करून हा सिनेमा निर्मात्यांना नुकसानीत टाकून गेला. यानंतर काही दिवसांनी सध्या ओटीटीवर सुपरस्टार असलेले फॅमिली मॅन मनोज वाजपेयी यांचा ‘भय्याजी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दोन आकडी संख्यादेखील जमवू शकला नाही. या सिनेमाच्या निमित्ताने ओटीटी सिरीजमुळे मिळालेल्या स्टारडमची झाकली मूठ जेव्हा सिनेमागृहात उघडली जाते तेव्हा काय होतं, हे या आणि इतर भय्याजींना कळलं असेलच.
सिनेमा उद्योग जिवंत राहायचा असेल, तर ‘जवान’ आणि ‘पठाण’सारखे १००० कोटी गल्ला जमवणारे ऑल टाइम ब्लॉकब्लस्टर सिनेमे तर हवेतच, पण त्यासोबतच कमी बजेटमध्ये तयार होऊन पन्नास ते शंभर कोटी रुपयांची कमाई करणारे चित्रपट देखील हवे आहेत. सिनेमागृह चालवताना तिथे काम करणार्या कामगारांचा पगार, विजेचे बिल, जागेचे भाडे याचा खर्च दर महिन्याला करावा लागतो. अशा वेळी दर महिन्याला माफक कमाई करणारा सिनेमा हा चित्रपट व्यवसायाचा प्राणवायू आहे. या वर्षी हा प्राणवायू मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या दिग्दर्शकाने हिंदी चित्रपट व्यवसायाला मिळवून दिला, हे कौतुकास्पद आहे. अजय देवगणचा ‘मैदान’, राजकुमार रावचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘श्रीकांत’ या सिनेमांना पिछाडीवर टाकून सरपोतदारांच्या कोकणी ‘मुंज्या’ने जगभरात १२० कोटी रुपयांची कमाई केली.
‘मुंज्या’सोबतच बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केलेल्या ‘क्रू’ या महिलापटाचे विशेष कौतुक करावे लागेल. मोठमोठे पुरुष स्टार बॉक्स ऑफिसवर फेल होत असताना क्रिती सॅनन, तब्बू आणि करिना कपूर या त्रिकुटाच्या या सिनेमाने ७८ कोटी रुपयांची चांगली कमाई केली. विमानातल्या सेविकांना हवाई सुंदरी म्हणणार्या भारतीय समाजमनात एअर होस्टेसबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आकर्षक आहे, या गोष्टीचं भान ठेवून या सिनेमातील स्त्री कलाकारांची निवड करण्यात आली होती. प्रेक्षकांचे पैसे वसूल होतील असा मसाला सिनेमात होता. त्यामुळे या सिनेमाने चांगली कमाई केली. चित्रपटात काम करणार्या अनेक स्त्री कलाकारांची तक्रार असते की आम्हाला पुरुष कलाकारांच्या तुलनेत खूप कमी मानधन दिलं जातं. पण ‘क्रू’सारखं यश जर इतर महिलापटांना मिळायला लागलं, तर येणार्या काळात महिलांचं मानधन पुरुष कलाकारांपेक्षा जास्त असेल. ‘माहेरची साडी’ सिनेमानंतर अलका कुबल यांनी काम केलेल्या अनेक मराठी चित्रपटात त्याच्या पुरुष सहकलाकाराचे मानधन त्यांच्यापेक्षा कमी असायचं, याची इथे आठवण होते.
कबीर खान आणि कार्तिक आर्यन यांचा ‘चंदू चॅम्पियन’ दुर्दैवाने बॉक्स ऑफिसचा चॅम्पियन बनू शकला नाही. देशातील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदकविजेते मुरलीकांत पेटकर याच्या जीवनावर आधारित या सिनेमासाठी कार्तिकने प्रचंड मेहनत घेतली होती. परंतु सिनेमात मनोरंजक घटक कमी पडले. १४० कोटींचे बजेट असलेला हा सिनेमा भारतात फक्त ६२ कोटी रुपये गल्ला जमवू शकला. याच्या जोडीला कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्स्प्रेस’ या सिनेमाने ३७ कोटी रुपयांची मजल गाठली.
मराठीतला निकाल काय?
‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा-२’ या मराठी महिलापटांनी २०२३मध्ये चांगली कमाई केली होती. ९ डिसेंबरच्या ‘बॉक्स ऑफिस’ सदरातील लेखात आपण पुढील वर्षी महिलापटांची लाट येणार असं भाकित वर्तवलं होतं. त्याप्रमाणे या वर्षीच्या सहामाहीत ‘माय लेक’, ‘नाच गं घुमा’, ‘अप्सरा’, ‘बाई गं’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि अशाच धर्तीवरचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. महाराष्ट्रातील महिलावर्ग हाच पाच मुख्य मराठी एन्टरटेन्मेंट चॅनल्सचा आधारस्तंभ आहे. याच महिलांना भावेल रुचेल (मंगळागौर, वटपौर्णिमा) अशा विषयांवर सिनेमा काढायचा सेफ गेम सध्या मराठी चित्रपटसृष्टीत खेळला जात आहे. या वर्षीच्या पहिल्याच आठवड्यात नाना पाटेकर विरुद्ध माधुरी दीक्षित असा सामना मराठी बॉक्स ऑफिसवर रंगला. पंचक हा सिनेमा चालण्यासाठी या सिनेमाची निर्माती असलेल्या माधुरीने मार्केटिंग आणि प्रमोशनचा (प्रेक्षकांसाठी हळदी कुंकू समारंभ) धडाका लावला होता. परंतु तो बॉक्स ऑफिसवर कोटींचे पंचक देखील गाठू शकला नाही. माधुरीसारखेच नानांनी देखील ‘ओले आले’ हा सिनेमा पाहायला प्रेक्षक यावेत यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही, परंतु, सिनेमा फक्त नऊ कोटी रुपयांचीच कमाई करू शकला. बॉक्स ऑफिसवर हमखास ओपनिंग देणारे स्टार मराठीत नाहीत. म्हणूनच नानांच्या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. २०१६ साली आलेल्या त्यांच्या ‘नटसम्राट’चे (४० कोटी) यश पाहता हे अपयश पचवणं मराठी सिनेसृष्टीला अवघड गेलं.
‘थ्री इडियट्स’ फेम चतुर उर्फ ओमी वैद्यचा ‘आईच्या गावात मराठीत बोल’, ‘बीएससी डिग्री’, ‘मुसाफिरा’, ‘डिलिव्हरी बॉय’ असे अनेक मराठी चित्रपट कधी आले कधी गेले हे प्रेक्षकांना कळलंच नाही. सई ताम्हणकरसारख्या ग्लॅमरस स्टारवरही बॉक्स ऑफिसची ‘श्री देवी प्रसन्न’ झाली नाही. शिवराज अष्टकांची निर्मिती करत असलेल्या दिग्पाल लांजेकर यांच्या सुरुवातीच्या सिनेमांना मिळालेलं यश पाहून अनेक निर्मात्यांनी शिवकालीन ऐतिहासिक चित्रपटांच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. शिवकालीन इतिहासातील प्रत्येक महापुरुषावर दोन दोन, तीन तीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागले, यामुळे दिग्पाल यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमाही (७ कोटी) फार चांगली कामगिरी करू शकला नाही. या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत एकाही मराठी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर टिकाव धरता आला नाही. ही कोंडी महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ या सिनेमाने फोडली. मध्यम आकाराचे बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १४ कोटींची कमाई केली. पुढील आठवड्यात ‘नाच गं घुमा’च्या रूपाने या वर्षीचा पहिला मराठी चित्रपट पाहायला मिळाला. महिलापट म्हणजे यश हे सिद्ध करणार्या या सिनेमानं २७ कोटी रुपयांची कमाई केली. पण ‘नाच गं घुमा’चा (प्रमोशन) आवाज फारच कमी होता. जर या सिनेमाचं प्रमोशन ‘बाईपण भारी देवा’ किंवा ‘वेड’ या सिनेमांसारखं दणक्यात झालं असतं तर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची कमाई आणखी वाढू शकली असती.
‘अल्याड पल्याड’ या हॉरर कॉमेडीने प्रेक्षकांना भीती देखील मनोरंजक असू शकते हे दाखवून दिलं. हॉरर कॉमेडी हा जॉनर हाताळणारा चांगला सिनेमा बरेच दिवस प्रदर्शित झाला नव्हता. प्रेक्षक ज्या जॉनरची वाट पाहत आहेत त्या जॉनरचा सिनेमा आला तर प्रेक्षकही त्या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद देतात, मग भले त्यात कोणतेही मोठे स्टार नसले तरीही तो सिनेमा चांगली कमाई करतो. या सिनेमाने अगदी छप्परफाड कमाई केली नसली तरी निर्मात्याने घातलेले पैसे परत मिळवून देत अधिकचे पैसेही मिळवून दिले, मराठी सिनेमांसाठी हेही नसे थोडके. याशिवाय वेगळ्या जॉनरचा सिनेमा असल्यामुळे या सिनेमाचे सॅटॅलाइट आणि ओटीपी राइट्स अधिक किंमतीला विकले जातील अशी चर्चा आहे. ‘अल्याड पल्याड’ने सिनेमाबद्दलची भीती पळवून प्रेक्षकांना सिनेमागृहात आणलं.
कोकणातील गणपती उत्सव या पार्श्वभूमीवरील मोठ्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा आणि भरपूर कलाकार असलेला ‘घरत गणपती’ हा बिग बजेट सिनेमा २६ जुलै रोजी प्रदर्शित होतोय. मागच्या पाच जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी झटणार्या स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’ या सिनेमाकडून अपेक्षा आहेत. समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी या नामांकित कलाकारांच्या भूमिका असलेला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमा ऑगस्ट महिन्यात येतोय.
या वर्षी २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मंजुम्मेल बॉयज’ या मल्याळम सिनेमाने इतिहास घडवला. २० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या सिनेमाने जगभरात २४० कोटींचा गल्ला जमवला. मामुट्टी, मोहनलाल अशा केरळी सुपरस्टार्सना अजूनही २०० कोटींची कमाई करणं जमलं नाही, ते या तरुण कलाकारांनी करून दाखवलं. मल्याळी सिनेमात पहिली बॉक्स ऑफिस डबल सेंच्युरी झळकावण्याचा मान या बॉइजना मिळाला. याच्या जोडीला आज ‘कल्की’ सिनेमाचा डंका जगभरात वाजतो आहे. मागील सहा महिन्यांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट पाहून आजच्या घडीला तरी दाक्षिणात्य चित्रपट हिंदी सिनेमांना मागे टाकत आहेत, असं दिसतंय. पण याची सुरुवात खूप आधी झाली होती. भाजी कुठलीही असो, मसाला एकच, या धर्तीवर आजचा हिंदी सिनेमा म्हणजे सिनेमा कुठलाही असो, मारधाड एकच असा बनून बसला आहे. यात ना तर सिनेमा बनवणार्या लोकांचा फायदा, ना बघणार्यांचं मनोरंजन. सिनेरसिकांची खरंतर इच्छा असते की, सर्व रसांनी परिपूर्ण भोजनाच्या थाळीसारखा, सहा महिन्याच्या किंवा वर्षाच्या सिनेमाचा लेखाजोगा असावा. रोमँटिक, कौटुंबिक, प्रेरणा देणारे चरित्रपट, उत्कंठावर्धक, लहान मुलांचे सिनेमे, सामाजिक, अॅक्शन, तरल, वैचारिक, गूढ, विनोदी अशा विविध कसदार सिनेमांनी थिएटर वर्षभर तुडुंब भरून असावे, कोटीच्या कोटी उड्डाणे सहज शक्य व्हावीत, काहीतरी सरस बघितल्याचा अनुभव मिळावा. या सहा महिन्यांचा आलेख बघता प्रेक्षकांना फार सकस मनोरंजन मिळाले नाही असं नक्की म्हणता येईल. यापेक्षा लोकसभा निवडणुकीचे कथानक, मान्यवरांचे अंदाज आणि अनपेक्षित निकाल हेच जास्त इंटरेस्टिंग होते.
२०२४च्या उत्तरार्धातल्या सहा महिन्यात, ‘गोध्रा’, ‘द साबरमती रिपोर्ट’ (‘ट्वेल्थ फेल’ फेम विक्रांत मेसी), ‘स्त्री-२’, ‘भूलभुलैया-३’, ‘सिंघम अगेन’, ‘सितारे जमीन पर’ (आमीर खान, जेनेलिया) हे हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. वर्षाअखेरीस रवी जाधव दिग्दर्शित आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘शिवाजी’ प्रदर्शित होणार आहे. हे सिनेमे वेगवेगळ्या विषयांवर आधारित दिसतायत. त्या सिनेमातील कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, लोकेशन किती मनोरंजक आहेत आणि त्यातून बॉक्स ऑफिसवर किती बिझिनेस मिळेल हे बघण्यासाठी मात्र सहा महिने वाट पाहावी लागेल.
या सहामाही परीक्षेत मराठी बॉक्स ऑफिसवर काही सिनेमे सोडले तर बाकी चित्रपट नापास झाले आहेत. पुढील सहामाही परीक्षेत प्रदर्शित होणार्या सिनेमांनी किती अभ्यास केला होता, हे बॉक्स ऑफिसच्या वार्षिक निकालांवरून कळेलच.