शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये असे वादग्रस्त विधान केल्यानंतर सोलापूर शहरातील विधवा संघटनेच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी संघटनेच्या नेत्या विद्या लोलगे यांनी भिडे गुरुजींचा निषेध करत ‘भिडे तोंड आवरा नाहीतर तुमच्या मिशा कापू’ असा सज्जड दम दिला. ही बातमी वाचून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या मिशीतल्या मिशीत बराच वेळ हसत होता. ते पाहून कधी नव्हे तो मला त्याचा राग आला. त्याच्याकडून तो पेपर मी हिसकावून घेत त्याला म्हणालो, पोक्या हे बरं नव्हे. कसंही झालं तरी ते वयाने ज्येष्ठ आहेत आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणारेही आहेत. त्यांच्या झुबकेदार मिशांची नोंद लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे, हे कदाचित तुला ठाऊक नसेल. आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला ते अभिमानास्पदच आहे. त्यामुळे त्यांची टिंगल टवाळी करणं तुलाच काय, कोणालाही शोभत नाही. त्या मिशा वाढवण्यासाठी आणि त्यांची काळजी व संरक्षण करण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले आहेत याची तुला कल्पना नाही. त्या ऐतिहासिक मिशीच्या प्रत्येक केसाला जपण्यासाठी त्यांनी आपल्या जिवापेक्षाही अधिक काळजी घेतलीय. तुला एवढं हसायला येत असेल तर तू प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांचे विचार जाणून घे. म्हणजे तुझ्या ज्ञानातही भर पडेल. हे ऐकल्यावर पोक्या हसू दाबत निघाला आणि त्यांची मुलाखत घेऊनच तो परत आला. तीच ही मुलाखत.
– साष्टांग नमस्कार करतो भिडे गुरुजी.
– पहिली ती बर्म्युडा काढून ये.
– गुरुजी, तुमची पण खाकी हाफ पँट आहे.
– ती संघाची संस्कृतीरक्षक पँट आहे. तिने संस्कृतीची विटंबना होत नाही, पण तुम्ही आजकालचे तरुण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करता ना त्याला कसला धरबंधच राहिलेला नाही. माझ्या आतल्या खोलीत अशा सहा खाकी पँटी सुकत घातल्यात. त्यातली एक घालून ये. जा… आता कसा शोभून दिसतोस. ही खाकी पँट तुला भेट म्हणून घेऊन जा. आता ये मुद्द्यावर.
– गुरुजी, तुम्ही नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या दिवशी या पेहरावात वडाची पूजा करू नये असं म्हटल्यावर महिला नेत्यांनी तुमचा निषेध करत तुमच्या मिशा कापण्याची धमकी दिलीय. त्यावर तुमची प्रतिक्रिया हवीये.
– कसली प्रतिक्रिया? वडाची साल पिंपळावर लावताहेत त्या. माझ्या उपदेशाचा आणि माझ्या मिशांचा मुळात संबंधच काय? मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.
– पण नट्या कुठे करतात वडाची पूजा? फार तर टीव्ही सीरियलमध्ये करत असतील त्या. तिथेपण अगदी नऊवारी, सहावारी किंवा पाचवारी चापून चोपून नेसून. वडाला धागा गुंडाळतानाचं ते दृश्य किती विलोभनीय वाटतं. आपल्या सर्वसामान्य विवाहित गृहिणीही तशीच पूजा करतात. आजकालच्या नवविवाहिता तरुणी व स्त्रियांनी आधुनिक ड्रेस घालून पूजा केली तर त्यामुळे काय बिघडलं? आजकाल धावपळीच्या युगात नोकरदार विवाहित स्त्रियांना आणि गृहिणींनाही साड्या नेसून पूजा करायला वेळ तरी कुठे असतो. तरीही हजारो स्त्रिया आजही वेळात वेळ काढून वडपूजेची संस्कृती जपत असतात. त्याबद्दल तुम्ही त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. त्यांच्या पेहरावावर तुमचं लक्ष कशाला? आणि तुम्ही कशाला बघायला जाता त्या प्रदक्षिणा घालताना. फारच रसिक दिसताय तुम्ही.
– मी रसिक नाही तर संस्कृतिरक्षक आहे. आपली संस्कृती ही साडीतच होती. साडीतच आहे आणि साडीतच राहील.
– तुमच्याबद्दल, तुमच्या मिशांबद्दल आदर राखूनच म्हणेन मी की तुम्हाला या नसत्या उठाठेवी सुचतातच कशा? कोणी कसे आणि कोणते कपडे घालावे हा त्यांचा प्रश्न आहे.
– साफ चूक आहे हे. माझी तर राज्य सरकारला विनंती नव्हे तर मागणी आहे की, वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा करणार्या स्त्रियांना सरकारने साडीचा ड्रेसकोड ठरवून द्यावा, तसा कायदा करावा. आमचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस त्या दृष्टीने हालचाल करून पावलं उचलतील याची मला खात्री आहे. कारण ते निष्ठावंत संघनिष्ठ आहेत.
– पण संघानेही आता पूर्वीची खाकी हाफ चड्डी सोडून खाकी फुल पँट घालण्याचा ड्रेसकोड अंमलात आणलाय. तुम्ही मात्र जुन्या खाकी हाफ पँटवरच असता.
– मला त्यात मोकळेपणा वाटतो. मी माझ्यापुरता मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. हाफ चड्डीचे फायदे या विषयावरचा माझा प्रबंधही मी पुणे विद्यापीठाला सादर केला होता. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने त्याची दाद घेतली गेली नाही.
– किती दूरदृष्टीने विचार करता तुम्ही. आमच्या हे कधी लक्षातच आलं नाही.
– तू हे लक्षात घे की महाराष्ट्रातील पुरुषांच्या दृष्टीनेही मी ड्रेसकोडचा सखोल विचार केलाय.
– मला तरी कळू दे.
– सर्व पुरुषांसाठी पांढरे शुभ्र धोतर, सदरा आणि डोक्यावर काळी टोपी. लवकरच मी आपल्या दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना माझी योजना सादर करणाराय. हाफ चड्डीसारखंच धोतर हे मोकळं-ढाकळं असतं आणि त्याला प्राचीन परंपरा आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सरकारने एक ड्रेसकोडचा नियम शाळांना लागू केलाय, तसंच आहे हे.
– मी खरं सांगू गुरुजी. ती सरकारच्या नापीक डोक्यातून उगवलेली मूर्खपणाची कल्पना आहे. त्यांच्या महायुतीच्या सरकारात कसा तीन तिघाडा काम बिगाडा आहे तसंच आहे ते.
– मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. कसल्या स्वातंत्र्याचा विचार करता तुम्ही? असलं दळभद्री स्वातंत्र्य मला मान्य नाही. मोदींनी २०१४ साली देशाला दिलं ते खरं स्वातंत्र्य. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासारखं स्वातंत्र्य यायला हवं.
– अहो गुरुजी, या शिंदे सरकारला मुंबईतल्या समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामही अजून हाती घेता आलं नाही आणि तडीसही नेता आलं नाही. या नालायक सरकारला त्याची लाजही वाटत नाही… आणि कसल्या स्वराज्याच्या बाता मारता! तुम्ही फक्त तुमच्या मिशा सांभाळा… येतो मी.