बाळासाहेबांच्या कुंचल्यातून आणीबाणीनंतरच्या जनता राजवटीच्या काळात उतरलेल्या या मुखपृष्ठचित्राला इंदिरा गांधी यांच्या गैरकृत्यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शहा आयोगाच्या कार्यवाहीचा संदर्भ आहे. न्या. शहा यांच्या नेतृत्त्वाखालील हा आयोग आपली बदनामी करतो आहे, असं इंदिराजी म्हणत होत्या. प्रत्यक्षात त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात हाती आलेल्या निरंकुश सत्तेचा गैरवापर करून जो मनमानी कारभार चालवला होता, त्याने इंदिरा गांधी यांची बदनामी अधिक होत होती. पण, अतिरेकी पुत्रप्रेमामुळे ते त्यांच्या लक्षात येत नव्हते. आजचे सत्ताधारी तर इतके महान आहेत की त्यांच्या परिवारावर, त्यांच्या पक्षावर, त्यांच्यावर टीका केली की थेट हिंदू धर्माचाच अपमान होतो, असा जावईशोध त्यांना लागतो. या विशाल आणि वैविध्यपूर्ण धर्माचा ठेका आपल्याकडे आहे, या भाजपच्या समजुतीवर प्रखर प्रहार करणार्या राहुल गांधींच्या नावाने भाजपचा आयटी सेल कंठशोष करतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालकबुद्धी म्हणून राहुल गांधी यांची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला, पण तोही त्यांच्या अंगाशी आला. हिंदू धर्माचं कट्टरीकरण करणार्या, हिंस्त्रतेचा नंगानाच घालणार्या आपल्याच परिवाराच्या उपद्रवी पिलावळीमुळे आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या भूमीत राममंदिर बांधल्यानंतरही पराभव पत्करावा लागला, याचा प्रकाश भाजपच्या डोक्यात लवकरात लवकर पडो, अन्यथा पुढच्या निवडणुकांमध्ये कपाळमोक्ष ठरलेलाच आहे.