अभ्यास करण्यासाठी शांत वातावरण हवे. शिवाय भोवताली अभ्यास करणारी मित्रमंडळी हवीत. समान ध्येयाने प्रेरित असलेली मंडळी कळत नकळत एकमेकांना दिशा देत असतात. एकमेकांच्या मदतीने, सहकार्याने अभ्यास होतो. आपण मागे पडलो असल्यास ते कळते. पुढे जाण्याकरिता आपण अधिक गांभीर्याने विचार करू लागतो.
अभ्यासिका असे वातावरण देऊ शकतात, देत असतात. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी उत्तम वातावरण मिळते. शिवाय बसायला उत्तम सोय, हवेशीर जागा, भरपूर उजेड, अभ्यासिकेच्या इमारतीच्या भोवताली नारळाची-आंब्याची भरपूर झाडे, हिरवळ, लागूनच तलाव असे नितांतसुंदर वातावरण असेल तर अभ्यास करायला नक्कीच मजा येऊ शकते. तसे फार कमी लोक आहेत, जे हौसेने अभ्यास करतात, मात्र ज्यांना पुढे जायचे आहे, त्यांना हौस असो वा नसो, अभ्यासाला ओलांडून पुढे जाता येत नाही. अभ्यासाला पर्याय नाही. पण अभ्यास करण्यासाठी उत्तम वातावरण असल्यास तितकेच प्रसन्न वाटते.
अर्जुन थोरात या युवकाने वयाच्या पंचविसाव्या वर्षी अंबेजोगाई, ता. अंबेजोगाई, जिल्हा बीड येथे ‘ज्ञानपीठ अभ्यासिका’ या नावाने प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात अभ्यासिका काढली आहे. आज ३४ वर्षांचा असलेला अर्जुन शाळा-कॉलेजात असताना घरात बसून अभ्यास न करता घरापासून जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचा. तिथे त्याचे अभ्यास करताना मन रमे. तिथे त्याला निवांतपणा मिळायचा. त्याचा अभ्यासही उत्तम होत असे. निसर्गाच्या सान्निध्यात माणसाची एकाग्र होण्याची शक्यता वाढत असावी.
अर्जुनच्या आईवडिलांनी दहाबारा वर्षांपूर्वी घराचे बांधकाम केले. टोलेजंग घर बांधले. तळमजला अधिक दोन मजले बांधले. दुसर्या मजल्यावर मिनी हॉल, ऑडिटोरियम काढले. घरची मंडळी निवांत बसून सिनेमे पाहतील यासाठी ते बांधले होते. मात्र दोनेक वर्षे त्या मिनी ऑडिटोरियमचे दारसुद्धा उघडले गेले नाही. त्याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही, ते तसेच पडून राहिले. अर्जुन यांच्या कुटुंबीयांना हा हॉल उगीच बांधला असे वाटू लागले. त्यापेक्षा ही जागा रूम बांधून भाड्याने दिली असती तरी नियमित भाडे आले असते असे त्यांना वाटे. त्यांच्या असे वाटण्यातही काही चुकीचे नव्हते. पण आता निर्णय चुकला तर तो दुरुस्त करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा उपाय नव्हता.
अर्जुन यांचे शिक्षण बी. कॉम, डिप्लोमा इन अॅनिमेशन. त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी या मिनी ऑडिटोरियमच्या ठिकाणी आणि वरील आणखी एका मजल्यावर उत्तम अभ्यासिका उभारण्याचे ठरवले. अंबेजोगाईच्या अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक उत्तम जागा तयार करण्याचा निर्णय घेतला. अभ्यासिकेसाठी आवश्यक फर्निचर बनवले. सुंदर इंटेरियर बनवून तिचे १० डिसेंबर २०१५ रोजी औपचारिक उद्घाटन केले.
अंबेजोगाई शहराची लोकसंख्या साधारण दोनेक लाख आहे. इथे मोठमोठी महाविद्यालये आहेत. शहराच्या आजूबाजूच्या गावातील असंख्य मुले इथे शिक्षणासाठी येत असतात. तसेच यूपीएससी, एमपीएससी, यूजी नीट, पीजी नीट, एएफसीएटी, पोलीस भरती, चार्टर्ड अकाउंटंट आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी क्लासेस वगैरे लावतात, तसेच अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत प्रवेश घेतात. मात्र त्यांच्या अभ्यासाशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करेल अशा अभ्यासिका शहरात नव्हत्या. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून अर्जुन यांनी ज्ञानपीठ अभ्यासिका सुरू केली.
तसे पाहिले तर अशा बहुतेक अभ्यासिका शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी, वर्दळीच्या ठिकाणी, जिथे शाळा, कॉलेजे, कोचिंग क्लासेस असतील अशा ठिकाणी असतात. मात्र अर्जुन यांनी धोका पत्करत आपली अभ्यासिका शहरांपासून दोन किलोमीटर अंतरावर वर्दळीपासून दूर ठिकाणी सुरू केली. हेतू असा होता की विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात, शहरी कलकलाटापासून दूर शांत ठिकाणी अभ्यास करता यावा. त्यांना चित्त एकाग्र करण्यासाठी भोवताल निवांत असावा. मुले अभ्यासासाठी शहरापासून दोन किलोमीटर दूर येतील की नाही ही शंका अनेकांना होती. मात्र लोकांना वाटणारी कमजोर बाजूच ज्ञानपीठ अभ्यासिकेची जमेची बाजू असणार आहे, याची पूर्ण जाणीव अर्जुन यांना होती. शहरापासून दूर असल्यामुळे व्यवसाय अपयशी होऊ शकतो, असे अनेकांना वाटते. मात्र तीच आपल्या व्यवसायाची भक्कम बाजू होती, असा विश्वास अर्जुन यांना होता आणि झालेही तसेच. अभ्यासिका सुरू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच ती विद्यार्थ्यांनी फुलून गेली.
स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहाची व्यवस्था, हवेशीर वातावरण, इंटरनेट यामुळे विद्यार्थी अभ्यासिकेत येऊ लागले, इथे बसून अभ्यास करू लागले. अर्जुन नियमित विपश्यना करतात. दरवर्षी दहा दिवस इगतपुरी येथे मुक्कामी राहून विपश्यना केंद्रात विपश्यना करतात. त्यांनी तिथे मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांना वाटले. शिवाय मानसिक आरोग्याच्या बाबतीत ते वैयक्तिक पातळीवरसुद्धा सजग आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक समस्यांची जाण आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा, वैयक्तिक आयुष्याचा, कौटुंबिक आयुष्याचा ताणतणाव असतो, शिवाय भोवताली स्पर्धा असते, त्यामुळे ते अधूनमधून तणावात असतात.
अर्जुन यांनी या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध केली नसून त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी विद्यार्थ्यांचे चित्त एकाग्र व्हावे, अभ्यासात मन लागावे, त्यांच्यात सकारात्मकता यावी, यासाठी एक स्वतंत्र रूम मेडिटेशन करण्यासाठी राखीव ठेवली आहे. सकाळी सव्वा सहा वाजता आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता त्या रूममध्ये अर्ध्या तासाचे गाईडेड मेडिटेशन घेतले जाते. जेणेकरून विद्यार्थी अभ्यासिकेत व्यवस्थित, चिंतामुक्त मनाने अभ्यास करू शकतील. त्यांना अभ्यास करताना प्रसन्न वाटेल.
ज्ञानपीठ अभ्यासिका ही केवळ अभ्यासिका नसून विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी जे जे केले पाहिजे, ते ते करणारी व्यवसायसंस्था आहे. माणसाचे संपूर्ण जगणे मानसिक क्रियांनी व्यापलेले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याबाबत सजग असलेली व्यक्तीच जीवनात येणार्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सक्षम असते. विद्यार्थ्यांना मानसिक पातळीवर सुदृढ करण्यासाठी सायकॉलॉजिकल हेल्थशी संबंधित अनेक पुस्तके ज्ञानपीठ अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना वाचण्याकरिता ठेवलेली आहेत.
अभ्यास हा तसा गंभीर विषय आहे. काही वेळाने कपाळावर आठ्या येतातच येतात. मात्र तो करून करून विद्यार्थ्यांना शीण येऊ शकतो, येत असतो. त्यामुळे थोडेसे मनोरंजनही असावे, म्हणून काही काळ विरंगुळा म्हणून अर्जुन यांनी अभ्यासिकेत कराओके सेटसुद्धा ठेवला आहे.
गेल्या नऊ वर्षांत पन्नासपेक्षा अधिक सरकारी अधिकारी, कर्मचारी झाले आहेत, ज्यांनी ज्ञानपीठ अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे. ते राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध विभागात सेवा देत आहेत. त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे, शक्य आहे, ते ज्ञानपीठ अभ्यासिकेने देण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ज्ञानपीठ अभ्यासिकेच्या सेवेचा लाभ घेतला आहे.
अभ्यासिकेत ७०जणांची बसण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे अर्जुन हे सत्तरच अॅडमिशन देतात, सत्तर जागा आहेत आणि त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दाखल करून घेत नाहीत. एकदा विद्यार्थ्याला जी जागा दिली आहे, तीच त्याची कायम राहणार. रोज जागा बदलत नाही. अभ्यासिकेत यायला उशीर झाल्यास ती जागा दुसरा विद्यार्थी घेऊ शकत नाही. एकदा एक जागा दिली की त्याच्यासाठी तो जोवर अभ्यासिकेत येणार आहे, तोवर ती जागा त्याचीच राहते. रोज नवीन जागेशी जुळवून घेण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागत नाही. अर्जुन यांनी ग्रीस देशातील सँटॉरिनी गार्डन थीम वापरून कॅलिस गार्डन बनवले आहे. अतिशय सुंदर आणि मोहक पद्धतीने ते विकसित केले आहे. विद्यार्थ्यांना वाटले की बागेत जाऊन अभ्यास करायचा आहे तर ते तिथे बसूनही अभ्यास करू शकतात.
अंबेजोगाईसारख्या मुंबई-पुण्यापासून दूर असलेल्या ठिकाणी इतका विचारपूर्वक व्यवसाय करणे म्हणजे अनेकांना नवलच वाटते. मात्र आता इंटरनेटमुळे कुठे काय चालू आहे, काय केले तर योग्य राहील हे कळणे इतके अवघड राहिलेले नाही. जाणून घेण्याची इच्छाशक्ती असल्यास मोबाईलच्या एका बटणावर सारी माहिती उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना आवश्यक असणार्या सार्या गरजांचा विचार करून अर्जुन यांनी ज्ञानपीठ अभ्यासिका उभी केली आहे, शिवाय नऊ वर्षे काळानुरूप ती अधिकाधिक सुसज्ज कशी राहील, विद्यार्थ्यांना तिथे सकारात्मक वातावरण कसे देता येईल, याचा विचार करून त्यावर अंमल केला आहे. त्यामुळे ही अभ्यासिका अतिशय नावारूपाला आली आहे. विद्यार्थ्यांचा इथे प्रवेश घेण्याकडे अधिक कल असतो.
इथे विद्यार्थी चार-चार, पाच-पाच तास अभ्यास करत असतात. काही विद्यार्थी आठ ते दहा तास अभ्यास करतात. त्यांच्यासाठी हे एक सेकंड होमच झालेले असते. त्यामुळे त्यांना सर्व सुविधा देणे गरजेचे ठरते. अभ्यास करून करून विद्यार्थी थकून जातात. त्यामुळे दुपारचे जेवण घेतल्यानंतर त्यांच्या आरामाची इथे व्यवस्था केली आहे. ४५ मिनिटांची वामकुक्षी ते घेऊ शकतात, त्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध केलेली आहे. अभ्यासिकेत शिस्त राहावी, विद्यार्थ्यांना अभ्यासात एकमेकांची मदत व्हावी, त्यांच्यामध्ये समन्वय राहावा, यासाठी ‘ज्ञान सारथी’ची विद्यार्थ्यांमधूनच एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. तो येथे शिस्त राहील, याची काळजी घेतो. शिवाय कुणाला काही अडचण असल्यास ती अडचण ज्ञानपीठपर्यंत पोहोचवतो. या प्रक्रियेत तो विद्यार्थी विकसित होतो. त्याची अनेकांना मदत होते. ओघानेच त्यालासुद्धा विद्यार्थ्यांची मदत होते.
अर्जुन यांना ज्ञानपीठ अभ्यासिका चालवताना त्यांचे वडील चंद्रशेखर ज्ञानोबा थोरात आणि आई कस्तुरी चंद्रशेखर यांची खूप मदत होते. अभ्यासिकेच्या दैनंदिन कामात या दोघांचाही सहभाग असतो. त्यांचे अनेक विद्यार्थ्यांशी एक वडीलकीचे नाते जमले आहे. अर्जुन थोरात सांगतात, आईवडिलांच्या सहकार्याशिवाय हा व्यवसाय मी इथवर आणूच शकलो नसतो. त्यांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहन देण्याच्या स्वभावामुळेच हा व्यवसाय इतकी मजल मारू शकलो. अर्जुन यांची संवाद साधण्याची कला, विचारांची स्पष्टता, नवीन बाबी जाणून घेण्याची तीव्र इच्छा, एखादा विषय समजून सांगण्याची हातोटी या आणि अशा अनेक गुणांचा ज्ञानपीठ अभ्यासिका चालवताना त्यांना उपयोग होतो.