महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त दणका दिल्यानंतर त्या पक्षाच्या एकावर एक चिंतन बैठका जोरबैठकांप्रमाणे सुरू झाल्या. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अशा आणखी शेकडो बैठका होतील. पराभवाची खरी कारणे माहीत असूनही ती न शोधता उगाचच वायफळ मुद्द्यांचे चर्वितचर्वण करून विचारमंथन करण्याची त्यांची जुनी सवय आहे. त्यांच्या जन्मदात्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभवाची खरी कारणे समजल्याने त्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणाला जबाबदार धरले ते सर्वांना ठाऊक आहे. शेलक्या शब्दात आणि भाषेत संघाने ज्यांना सुनावायचे आहे त्यांना सुनावले. अहंकार आणि गर्वाची बाधा झाल्याने महाराष्ट्राने भाजपाचा बेंडबाजा वाजवला, हेच संघाला सुचवायचे होते. तरीही महाराष्ट्र भाजप नेत्यांनी चिंतन बैठकांचा घोळ घालून खर्या कारणांकडे दुर्लक्ष केले. उपमुख्यमंत्री फडणवीसांपासून महाराष्ट्र भाजपाचे बुळबुळीत अध्यक्ष ५२कुळे यांच्यापर्यंत भाजपाच्या अनेक बोलघेवड्या नेत्यांनी या बैठकांमध्ये अकलेचे तारे तोडले. ते ऐकून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या पोट धरून हसत होता. मला म्हणाला, जे जनतेला समजते ते या येडपट नेत्यांना कळत नाही की ते न कळण्याचा आव आणतात? डोंगर पोखरून ते उंदीरही काढत नाहीत. काखेत कळसा असूनही ते गावाला का वळसा घालतात? त्यावर मी म्हणालो, चिंतन बैठका घेणे, बौद्धिके घेणे हा त्यांचा छंद नसून ती विकृती आहे. तुला त्या बैठकांविषयी, त्या विचारमंथनातून लोणी काढण्याविषयी काही विचारायचे असेल तर तू फडणवीसांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या मुलाखतीमधून विनोदाचा निर्भेळ आनंद घेऊ शकतोस… पोक्याने घेतलेली तीच ही मुलाखत.
– नमस्कार फडणवीस साहेब.
– नमो नम:
– संपल्या का चिंतन बैठका? किती लोणी निघाले विचार मंथनातून? आम्हाला तरी द्या.
– काय असतं पोक्या, शेवटी त्यातूनच घुसळून घुसळून रबडीही बनू शकते. पराभव हा पराभव असला तरी तो पराभव मानायला मी तयार नाही. आम्ही खोलात अगदी तळाशी जाऊन त्याची कारणे शोधतो. आमचा आयटी सेल कधी ना कधी या पराभवाचा छडा लावील. आमच्या आयटी सेलच्या प्रमुख श्वेता शालिनी या किती आक्रमक आणि बोल्ड आहेत, हे तू गेल्या आठवड्यात पाहिलेच असशील. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला घाबरत नाहीत त्या. डायरेक्ट अॅक्शन घेतात. परवाही त्यांनी तेच केलं. पण प्रकरण माझ्या अंगावर शेकणार या भीतीने मी त्यांना एक रुपया देऊन सिम्बॉलिक माघार घ्यायला लावली. अब्जावधींची कॉर्पोरेट एजन्सी चालवतात त्या आमच्या पक्षाची. त्यांना दुखावून कसे चालेल?
– या कंपनीने सोशल मीडियावर एवढी प्रचारयंत्रणा राबवूनही भाजपाला महाराष्ट्रात जबर फटका का बरे बसला? यंत्रणा तोकडी का पडली?
– तिच्यापेक्षा आमचे काही पाळीव अनधिकृत प्रवक्ते कमी पडले. पण त्यांच्याविषयी कुणीच काही बोलत नाही. सगळं खापर आमच्याच डोक्यावर फोडून ते मोकळे. त्यांनी आम्हाला सावध करायला हवं होतं. पण तेही चारशे पारच्या भ्रमात होते. कसलीही विचारधारा नसलेले, जनमनाचा अंदाज नसणारे, प्रत्येक वेळी आणि काळी वेगवेगळा बुरखा पांघरून नौटंकी करणारे, स्वत:च्या स्वार्थानुसार सरड्यासारखा रंग बदलणार्या तथाकथित प्रवत्तäयांना वस्तुस्थितीचा अंदाज येत नसेल तर त्याचे खापर त्यांनी पक्षाच्या मीडिया सेलवर फोडून उपयोग नाही. आमच्या नेत्यांविषयी जे काय बोलायचे ते स्पष्ट बोला. आम्हाला महाराष्ट्रात आणि देशात अपयश का आले हे सामान्य माणसाला समजते, पण यांना नाही. आम्हाला ते समजूनही आम्ही बोलू शकत नाही, पण तुम्ही बोला ना. पण तिथे त्यांची जीभ अडखळते. का आणि कशासाठी?
– तुम्ही एवढे पॅनिक होऊ नका.
– का होऊ नको? तिकडून दिल्लीतून माझी शेंडी उपटतायत आणि इथे महाराष्ट्रात ते दोन शहाणे माझे पाय खेचतायत. वरून प्रेशर, खालून प्रेशर. यात माझं सँडविच होतंय पोक्या. अरे, माझ्या हातातोंडाशी आलेला घास या दोघांमुळे काढून घातला गेला, हे मी कसे विसरू? यांच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा होणार याची पूर्वकल्पना आयटी सेलवाल्यांनी दिली असती तर उगाच माझी ओढाताण झाली नसती. दिल्लीत अमित शहांनी माझी एवढी तासंपट्टी केली की सांगता सोय नाही.
– पण मोदीसाहेबांना भेटला नाहीत तुम्ही?
– त्यांनीच तर शहांना ही कामगिरी दिली होती. दोन वर्षांपूर्वी मला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी आली असता यांनी त्या दाढीवाल्यांना सीएम होण्याचा चान्स दिला. मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री म्हणून माझं डिमॉलिशन केलं. हे म्हणजे हेडमास्तरपदावरून शिक्षकपदावर नेमणूक करण्यासारखं होतं. तरीही मी मूग गिळून स्वस्थ बसलो. आता मात्र मी यांना सोडणार नाही. कायमचा धडा शिकवणार. माझ्यासारखं कणखर नेतृत्व आमच्या महाराष्ट्रातल्या पक्षातील बुळे नेते देऊ शकतील का? म्हणून मी पुन्हा येईन, असं म्हणत होतो. पण सगळंच मुसळ केरात.
– तरीही तुमच्या विनोद तावडेंनी महाराष्ट्रात सर्वेक्षण करून लोकसभा निवडणुकीत भाजपाचा फालुदा होणार असा अहवाल सहा महिन्यांपूर्वीच दिला होता ना?
– तो विनोद माझ्या वाईटावरच टपलाय. त्याला मी महाराष्ट्राच्या राजकारणातून खड्यासारखा बाजूला केला, त्याचेच उट्टे काढले त्यांनी.
– पण त्यांचे भाकीत खरे ठरले ना!
– तो योगायोग होता. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली.
– तरीही आज त्यांचे वजन वाढले ना दिल्लीत. भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतेय दिल्ली त्यांच्याकडे.
– तावड्यांनी व्हायरल केलेल्या वावड्या आहेत त्या. फार तर पाचकळ विनोद म्हणा त्यांना. मुख्यमंत्रीपदावर बसायला माझ्याइतका तुल्यबळ नेता नाही महाराष्ट्र भाजपात.
– पण सत्ता तर महाविकास आघाडीलाच मिळणार. शरद पवारांनी तर खुले चॅलेंज दिलेय महायुतीला!
– मी आव्हान स्वीकारलंय. ‘अब की बार ४२० पार’!