जगभर सिनेमा हा समाजमनाचा आरसा समजला जातो. जे सिनेमात दिसतं ते समाजात असतं असा समज आहे. या पार्श्वभूमीवर हिंदी सिनेमात गाणी, प्रेमकथा, प्रेमविवाहांचं असलेलं अवास्तव स्थान चकित करणार आहे. कारण, भारतीय समाजात प्रेम आणि प्रेमविवाह यांना अजूनही सरसकट मान्यता नाही. आपल्याला मात्र वास्तव आणि सिनेमा यांच्यातल्या या फरकाने तितकासा ‘फरक’ पडत नाही. कारण सिनेमावाल्यांच जग वेगळं आणि आपलं जग वेगळं असं सहज मानलं जातं. या दोन्ही जगांत रोटीबेटी व्यवहार जवळजवळ नाहीच. पु.लं.च्या नाथा कामतसारखे सिनेमा आणि वास्तव जग एकमेकांना सांगत असतात, ‘बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं जग निराळं.’ सिनेमाक्षेत्रात मात्र प्रेमविवाह जुळतात, काही टिकतातही. एकदा अक्षता पडल्या की पुढची कथा सगळ्यांचीच थोड्याफार फरकाने सारखीच असली तरी मुळात ‘जुळलं कसं?’ याच्या कहाण्या पडद्यावरील सिनेमापेक्षाही रंजक असतात. सिनेमात काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडून विवाहबद्ध झालेल्या प्रेमी जोडप्यांना आजचा हा लेख समर्पित..
बॉलिवुडच्या स्मरणीय जोड्यांमध्ये एक ठळक नाव डोळ्यांसमोर येतं ते सुनील दत्त-नर्गिस दत्त यांचं. दोघांचाही जन्म एकाच वर्षातला, १९२९चा. सुनील दत्तचा ब्रिटिश पंजाबमधला तर फातिमा रशीदचा कलकत्याचा. वयाच्या सहाव्या वर्षी (१९३५) फातिमा रशीदने सिनेमात बालभूमिका केली, स्क्रीनवर तिचं नाव बेबी नर्गिस असं ठेवण्यात आलं आणि पुढे तेच प्रचलित झालं. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून तिने प्रौढ भूमिका करायला सुरुवात केली. तमन्नापासून (१९४२) नर्गिसची प्रेक्षकांना ओळख झाली. पुढे तकदीर (१९४३), अंदाज, बरसात (१९४९), आवारा (१९५०), श्री ४२० (१९५५) या सिनेमांतून आघाडीची अभिनेत्री म्हणून ती प्रसिद्ध झाली.
तिच्या प्रसिद्धीचं अजून एक कारण म्हणजे शो मॅन राज कपूर या विवाहित पुरुषासोबत असलेलं नातं. वर्षे सरत गेली तसतशी या नात्याची गोडी ओसरत गेली. करियरमधे यश मिळत असताना वैयक्तिक आयुष्य मात्र तेवढं सुखकर नव्हतं. म्हणतात ना, जो मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा, क्योंकि वो भगवान के मन का होता है… नर्गिसच्या बाबतीत तेच झालं. बलराज नावाचा रेडिओ सिलोनमधला तरुण रेडिओ जॉकी नर्गिसवर जीव ओवाळून टाकत होता. लक्स के सितारे या रेडिओ शोचं संचालन करणार्या बलराजला नर्गिसची मुलाखत घ्यायची इच्छा होती. तशी वेळही आली. नर्गिस स्टुडिओत आली आणि तिला बघून बलराज स्तब्ध झाला… त्याच्या तोंडून अवाक्षरही फुटेना… थोडा ब्रेक घेऊन झाला, सहकार्यांनी धीर देऊन झाला… पुन्हा तेच. मुलाखत रद्द होण्याची चिन्हं दिसू लागली, तेव्हा नर्गिसने या भेदरलेल्या तरुणाला आश्वस्त करून मुलाखत पूर्ण केली. तोवर बलराज नर्गिसच्या प्रतिमेच्या प्रेमात होता, आता त्या मुलाखतीपासून तो तिच्या कनवाळू स्वभावावर भाळला. पुढे नशीबाचे चक्र फिरले आणि १९५५च्या रेल्वे प्लॅटफॉर्म सिनेमातून बलराजने हिंदी सिनेमात पदार्पण केले. बलराज सहानी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत असलेल्या नामसाधर्म्यामुळे गोंधळ नको म्हणून त्याचं सुनील दत्त असं नामकरण करण्यात आलं.
सुनीलच्या मनावर नर्गिसची जादू होतीच. तिच्यासोबत काम करायला तो उत्सुक होता. आणि काय आश्चर्य! अवघ्या दोन सिनेमांनंतर तिसर्याच सिनेमात त्यांना ती संधी मिळाली. तो सिनेमा होता ‘मदर इंडिया’ आणि रोल होता नर्गिसच्या मुलाचा. या सिनेमाच्या सेटवर त्यांच्यात मैत्री होऊ लागली. या लाजर्या बुजर्या अदबशीर तरुणाबद्दल नर्गिसला सॉफ्ट कॉर्नर वाटू लागला. मदर इंडिया सिनेमात, एका दृश्यात आई राधा मुलगा बिरजू याला त्याच्या चुकीसाठी लोकांसमोर काठीने झोडपून काढते. नर्गिससारख्या कसलेल्या अभिनेत्रीला सुनीलला झोडपण्याचा सीन करणं खूप जड गेलं, असं तिनेच मुलाखतीत सांगितलं.
सेटवर जुळलेल्या या ऋणानुबंधातून सुनीलने एकदा आपल्या बहिणीच्या आजारपणाविषयी नर्गिसला सांगितलं. पुढच्याच दिवशी नर्गिस स्वतः त्यांच्या घरी गेली आणि सुनीलच्या बहिणीला उत्तम उपचार मिळतील, अशी व्यवस्था केली. भावबंध जुळत होते, पण सुनीलला आपल्या भावना बोलून दाखवण्याचा धीर होत नव्हता. एक दिवस शेतातील दृश्य चित्रित होत असताना गवताच्या गंजीत ठिणगी पडून हा हा म्हणता गवताने पेट घेतला. नर्गिस त्या आगीच्या ज्वाळांत अडकली. सेटवर सगळे आग विझवायचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण ती आटोक्यात येत नव्हती. तितक्यात वायुवेगाने आलेल्या सुनीलने नर्गिसला वाचवण्यासाठी आगीत उडी टाकली आणि तिला आगीतून बाहेर काढलं. नर्गिसचा जीव वाचवताना सुनीलही होरपळला आणि सेटवरून थेट इस्पितळात दोन आठवड्यांसाठी त्याला हलवलं गेलं. सगळीकडे त्याच्या शौर्याची वाखाणणी झाली. हा खरा हिरो, असं प्रत्येकाला वाटू लागलं. इस्पितळात दोन आठवडे आणि नंतर बरे होईपर्यंत नर्गिसने सुनीलची शुश्रुषा केली. या काळात दोघांना एकमेकांच्या मनातले भाव कळले. हळुहळू या गोष्टीची खबर सेटवर सगळ्यांना, दिग्दर्शक मेहबूब खान यांनाही समजली. सिनेमात हे दोन्ही कलाकार आई-मुलगा अशा भूमिकेत होते. अशावेळी त्यांच्या प्रेमाची बातमी बाहेर कळली असती त्ार त्याचा सिनेमाच्या यशावर परिणाम झाला असता. ही भीती त्यांनी नर्गिस, सुनील यांच्यापाशी बोलून दाखवली. १४ फेब्रुवारी १९५७ला मदर इंडिया सिनेमा रिलीज झाला आणि पुढच्या वर्षी ११ मार्च १९५८ला नर्गिसने हिंदू धर्म स्वीकारून, निर्मला हे नाव घेऊन, सुनील दत्तसोबत विवाह केला. २३ वर्षांच्या संसारानंतर नर्गिसने जगातून अकाली एक्झिट घेतली, पुढे २००५ साली सुनील दत्तही हे जग सोडून गेले, पण त्यांची प्रेमकथा त्यांनी केलेल्या सिनेमांपेक्षाही अधिक लोकप्रिय आहे. या दोघांनी एकमेकांवर जिवापाड प्रेम केलं, धर्म, करियर, पूर्वाश्रमीची नाती या कशालाही प्रेमाच्या आड येऊ दिलं नाही.
हिंदी सिनेमातली आणखी एक चिरतरुण जोडी म्हणजे दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची. १९५६ला अवघ्या बारा वर्षांच्या सायराने ‘आन’ या सिनेमात, युसुफ खान उर्फ दिलीप कुमारला बघितलं आणि मी युसूफसोबतच निकाह करणार असं घोषित केलं. लहानपणीचं खूळ म्हणून सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. अम्मी नसीम बानू अभिनेत्री होती, सायरानेही सिनेमात यावं अशी तिची इच्छा होती. आई सिनेमात असल्याने सायरा दिलीप कुमारला भेटायची आणि त्याच्या अधिकाधिक प्रेमात पडायची. पुढे १९६१ला सायराने ‘जंगली’ सिनेमातून शम्मी कपूरची हिरोईन म्हणून एन्ट्री केली. ती पहिल्याच सिनेमात फिल्मफेअरची बेस्ट अॅक्ट्रेस ठरली. हळुहळू तिची राजेंद्र कुमारशी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडी जमू लागली होती. पण हे ज्युबिली कुमार विवाहित होते. यामुळे सायरा पेचात होती. तिकडे दिलीप कुमारने प्रेमाची एकापाठोपाठ एक अपयशी स्थानके पार करून वयाची चव्वेचाळीशी गाठली. आता तो लग्न करणार नाही अशी जवळजवळ सगळ्यांची खात्रीच झाली असताना १९६६ सालातल्या २३ ऑगस्टला चमत्कार झाला. सायराच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून नसीम बानोंच्या निमंत्रणावरून दिलीप कुमार आला आणि सायराचा निरागस अल्लडपणा बघून तिच्या प्रेमात पडला. दिलीपच्या लाखो चाहत्या मुलींना जे जमलं नाही ते सायराने केलं. लोकांचा दिलीप कुमार, सायराचा युसूफ साब बनला तो कायमचा. दिलीपने सायराला मागणी घातली आणि वयाच्या बाराव्या वर्षापासून सायराने बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं. ११ ऑक्टोबर १९६६ रोजी दोघांचा निकाह झाला आणि सुखी दांपत्यजीवन सुरू झालं. १९८१मध्ये दोन वर्षांसाठी अस्मा रेहमान नावाचं वादळ दोघांच्या आयुष्यात आलं, पण दिलीप-सायरा यांच्या होडीची बांधणीच अशी मजबूत होती की त्या वादळाने पडझड झाली तरी मोडतोड झाली नाही. वादळ शमल्यावर आधीपेक्षाही अधिक तन्मयतेने सायरा युसूफसाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत (७ जुलै २०२१) सोबत होती. सायराने कधी सावली तर कधी ढाल बनून आणि वार्धक्यात अक्षरशः काठी बनून दिलीप कुमारला साथ दिली. वार्धक्यातली परवड सायरामुळेच दिलीपच्या वाट्याला आली नाही. पंचावन्न वर्षांच्या सहवासाने ही प्रेमकथा अमर केली.
दांपत्यजीवनात, दिलीप-सायरा यांनाही सिनियर होतं दाम्पत्यजीवनाची साठी गाठणारं देव दांपत्य… रमेश देव आणि सीमा देव. रमेश देव म्हणजे कोल्हापूरचा रांगडा गडी. १९५१मध्ये पाटलाची पोर या सिनेमातून त्यांचा मराठी चित्रपटात प्रवेश झाला. देखणा मराठी व्हिलन म्हणून ते गाजत असतानाच १९६०ला जगाच्या पाठीवर या चित्रपटाची ऑफर आली. लोकलने ते फिल्मिस्तानकडे निघाले होते. त्यांच्याच डब्यात एक पोक्त स्त्री आणि गजरा माळलेली युवती येऊन बसली. ती सोज्वळ युवती, मोगर्याचा धुंद गंध याने रमेश देव मुग्ध झाले. तेवढ्यात ती युवती आईच्या कानात कुजबुजली, ‘‘आई, हा आंधळा मागतो एक डोळामधला व्हिलन रमेश देव आहे बहुतेक.’’ उत्तरादाखल आई मोठ्याने उत्तरली, ‘दुष्टच आहे हा माणूस.’ हे ऐकून देव भडकले. पुढे ते तिघेही एकाच स्टुडिओत शिरले. ‘जगाच्या पाठीवर’मध्ये नलिनी सराफ ही नवोदित नायिका रमेश देवांसोबत असणार होती. नामांकित अभिनेत्री नलिनी जयवंतच्या नावासोबत गोंधळ नको म्हणून नूतनच्या सीमा (१९५५) चित्रपटावरून नलिनीचं नवं नामकरण झालं… सीमा. तीच ती लोकलमधली मुलगी. आजवर लहानमोठ्या व्हिलनची कामं करणार्या रमेश देवांना इथे एकदम सातशे रुपये महिना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. सीमा आपल्यासाठी लकी आहे असं त्यांच्या मनात पक्क झालं. सेटवर काम करताना दोघांची मैत्री झाली. कोल्हापूरच्या रांगड्या हिरोला ही मुंबईची मुलगी आवडली. हे नातं पुढे घेऊन जाण्यात अडसर होता तो सीमाच्या आईचा. सिनेमाचं शूट असो अथवा एका सेटवरून दुसर्या सेटवर जाणं असो, ती कायम आईसोबत असायची. एकदा दूरवरून बैलगाडीत बसून येण्याच्या एका दृष्याचा फायदा घेऊन रमेश देव यांनी मनातली भावना बोलून टाकली. तिला प्रतिसाद मिळवला.
रमेश देव आणि सीमा ही जोडी पडद्यावरही हिट झाली. दोघांत सुरुवातीला फुललेलं प्रेम नंतर काही काळासाठी दुराव्यात रूपांतरित झालं होतं. बोलायचं दोघांनाही होतं, पण पहिल्यांदा कोण बोलेल हा प्रश्न होता, १९६२मध्ये प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा सिनेमातील गाजलेले गीत, एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.. शूटिंग सुरू होण्याच्या बेताला सीमाकडे एक चिठ्ठी आली, आता अबोला पुरे, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात अशा अर्थाची. ती वाचून अबोला दोन्ही बाजूंनी संपला आणि संवाद सुरू झाला तो नेहमीसाठी.
सीमा आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर करत नाही तोवर लग्न करायचं नाही असं दोघांनी ठरवलं होतं. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडून १ जुलै १९६३ रोजी सीमा, सौ. सीमा रमेश देव झाल्या. गंमत म्हणजे काहीतरी गोंधळ होऊन, फोटोग्राफर लग्नाच्या दिवशी पोहोचलाच नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा एकही फोटो अस्तित्वात नाही. पण पुढे दोन दशके त्यांनी जोडीने मराठी हिंदी सिनेमात काम करताना छायाचित्रांचा खजिना गोळा केला. आनंद सिनेमातील ही गोड जोडी कोण बरं विसरेल? आयुष्याची ६१ वर्षे हातात हात घेऊन ‘सूर तेच छेडीता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे’ हे बोल वास्तवातही जगणारी ही जोडी रमेश देव यांच्या स्वर्गवासाने २ फेब्रुवारी २०२२ रोजी कोमेजली आणि सीमा देव यांच्या निधनाने २४ ऑगस्ट २०२३ रोजी कायमची अबोल झाली.
हिंदी सिनेमाचा महानायक अमिताभ बच्चनची प्रेमकहाणीही त्याच्या सुपरहिट सिनेमासारखीच आहे. बाबूमोशाय अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचं पहिल्यांदा बोलणं झालं ते गुड्डीच्या सेटवर १९७०मध्ये. त्याआधी जयाने अमिताभला पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बघितलं होतं, तर एका मासिकाच्या मुखपृष्ठावर जयाचा फोटो बघून अमिताभ मोहित झाला होता. १९७०मध्ये प्रत्यक्ष ओळख होईपर्यंत जया एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली होती. पण अमिताभचे ओळीने कैक चित्रपट पडले होते. गुड्डीमध्ये अमिताभ आणि जया यांची जोडी असणार होती. दहा दिवसांचं शूटिंग पूर्ण झालं. पण हाय रे किस्मत! हृषिकेश मुखर्जी हे गुड्डीचे दिग्दर्शक, ते आनंद सिनेमाचंही दिग्दर्शन करत होते. आनंदमध्ये अमिताभचा महत्वाचा आणि मोठा रोल होता. दोन्ही सिनेमे साधारण एकाच वेळी रिलीज होणार होते, त्यामुळे गुड्डीत जो अपरिचित नायक हवा होता, तसा अमिताभ असणार नाही, याची त्यांना कल्पना होती. मग, गुड्डीमधला अमिताभचा रोल समीत भांजा या बंगाली कलाकाराला देण्यात आला. जया आणि अमिताभ यांची जोडी तोवर पडद्यामागे जुळली होती. एक नजर (१९७२) या पुढच्याच सिनेमाच्या सेटवर दोघांनी या नात्याला पुढे न्यायचं ठरवलं. प्रथितयश अभिनेत्री बनलेल्या जयाने नऊ अपयशी सिनेमांची माळ लावलेल्या अमिताभशी लग्न करायचं ठरवलं, ही मोठी कौतुकाची बाब होती. यशाच्या रोषणाईत सगळेच सामील होतात, अपयशाच्या अंधारात हात देतो, तो खरा तुमचा माणूस. पडत्या काळातली जयाची साथ भविष्यातील विजयाची नांदी ठरली. १९७३ला येणारा जंजीर अपयशी ठरला तर गाव गाठायचं आणि यशस्वी झाला तर सगळ्या मित्रमंडळासह लंडनवारी करायची असं सर्वानुमते ठरलं होतं. अमिताभला गावी जाण्याचीच शक्यता अधिक वाटत होती. पण, अपयशाच्या साखळ्या तोडून, जया-अमिताभचा जंजीर ब्लॉकबस्टर झाला आणि बच्चनयुगाचा उदय झाला. ११ मे १९७३ला जंजीर आला, सुपरहिट झाला. आता लंडनवारीचा विषय आला. जया सोबत येणार होतीच. अमिताभ बाबूजी हरिवंशराय बच्चन यांना हे सांगायला गेला, तेव्हा ते म्हणाले, आधी लग्न करा आणि मगच एकमेकांसोबत विदेश यात्रा करा. अमिताभसाठी बाबुजींचा शब्द प्रमाण. मग जयाच्या घरी रीतसर मागणी घालून ३ जून १९७३ रोजी ही प्रेम-जंजीर अमिताभच्या गळ्यात आली आणि नवपरिणित जोडपं मधुचंद्रासाठी लंडनला रवाना झालं. पुढे, अभिमान (१९७३), मिली, चुपके चुपके, शोले (१९७५), सिलसिला (१९८१), कभी खुशी कभी गम (२००१) अशा सुपरड्युपर हिट सिनेमांमध्ये या जोडीने काम केलं. पाया भक्कम असेल तर इमारत उंची गाठू शकते, जया-अमिताभ यांच्या नात्याच्या भक्कम पायावरच आज अमिताभ बच्चन नावाचं चालतं बोलतं विद्यापीठ दिमाखात टिकून आहे. अमिताभच्या यशाचं श्रेय जसं बाबूजींचे संस्कार आणि अमिताभचे परिश्रम यांना आहे, त्यासोबतच घरचा मोर्चा समर्थपणे सांभाळणार्या जयाचंही आहे. पतीच्या प्रतिष्ठेची शेखी मिरवणार्या स्त्रिया बघितल्या की जयाचं वेगळेपण अधोरेखित होतं.
शोलेमधल्या या जयचा उल्लेख आल्यावर विरू कसा विसरला जाईल? या सिनेमात दोन जोड्या होत्या, अमिताभ-जया आणि धर्मेंद्र-हेमा. आपली लव्हस्टोरी देखील अमिताभ-जयाप्रमाणे विवाहाच्या मार्गाने जावी अशी आधीच विवाहित असलेल्या बालबच्चेदार धर्मेंद्रची जिवापाड इच्छा होती. १९७०मध्ये ‘तू हसीन मैं जवान’च्या सेटवर धर्मेंद्र-हेमा यांची पहिली भेट झाली, तेव्हा धर्मेंद्रचं वय होतं ३५ आणि हेमा मालिनी होती २२ वर्षांची. पहिल्याच भेटीत धर्मेंद्र हेमावर फिदा झाला. हेमाही भाळली होती, पण विवाहित धर्मेंद्रकडे ती दुर्लक्ष करत होती. १९७० ते १९८० या काळात या जोडीने जवळजवळ २० चित्रपटांतून सोबत काम केलं. प्रेक्षकांनाही त्यांची जोडी आवडत होती. दशकभरात धर्मेंद्रंचं प्रेमातलं देखणं सातत्य पाहून हेमाही प्रेमात होत्याच. पण दोघांच्या घरून या नात्याला मान्यता नव्हती. हेमाच्या घरच्यांनी खूप समजावून तिला जितेंद्रशी लग्न करण्याची गळ घातली. हेमानेही त्याला रुकार दिला. एकीकडे धर्मेंद्र आणि दुसरीकडे जितेंद्रची हवाई सुंदरी प्रेयसी शोभा यांनी ताबडतोब मद्रास गाठून हे लग्न मोडून टाकलं. त्यानंतर यांच्या लग्नाचा मार्ग सुकर झाला. पडद्यावरची हिट जोडी वास्तव आयुष्यात यशस्वी व्हायला मात्र खूप प्रयत्न करावे लागले. धर्मेंद्रची प्रथम पत्नी प्रकाश कौर घटस्फोटाला तयार नसल्याने धर्मेंद्र आणि हेमा यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. दिलावर खान आणि आयेशा बी या नावांनी त्यांनी निकाह केला. अखेर प्रयत्नांती पंजाबी समोसा आणि तामिळ इडली एकाच ताटलीत स्थिरावले. दशकभरात त्यांच्या प्रेमकहाणीशी प्रेक्षकही समरस झाले होते. या प्रेमत्रिकोणाच्या तीनही कोनांना प्रेक्षकांची सहानुभूती मिळाली. प्रकाश कौर आणि हेमा या दोघींनीही घरची धुणी चौथर्यावर आणली नाही. आज बॉलिवुडमध्ये बिझनेस डोक्यात ठेवून जुळणार्या आणि तुटणार्या जोड्यांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र आणि हेमाची स्वत:च्या अटींवर सोबत राहणारी जोडी मनस्वी वाटते.
१९७३मध्ये हिंदी सिनेमातले दोन सुपरस्टार विवाहबद्ध झाले, यशाच्या शिखरावर असलेले राजेश खन्ना आणि उगवता सुपरस्टार अमिताभ. अंजु महेंद्रू या प्रेयसीशी नातं संपल्यावर काका राजेश खन्ना एकटा पडला होता. हजारो मुलींनी रक्ताने लिहिलेली पत्रे, कोणालाही न लाभलेलं अफाट सुपरस्टारडम असूनही मनातली ती खास जागा रिकामी होती. तेव्हाच बॉबीमधून (१९७३) षोडशवर्षीय डिंपल कपाडिया हिंदी सिनेमात एन्ट्री घेणार होती. गुजरातमधील एका कार्यक्रमात काका आणि डिंपल आमने सामने आले, डिंपलचं सौंदर्य राजेशला मोहित करण्यासाठी पुरेसं होतं. पण पुढचं पाऊल टाकावं कसं? पण डिंपल आपली चाहती आहे आणि सध्या सिंगल आहे हे कळल्यावर ३१ वर्षीय राजेशने १६ वर्षांच्या डिंपलला लग्नासाठी मागणी घातली. सुपरस्टार लग्नासाठी विचारतो आहे म्हटल्यावर अबोध डिंपलने होकार दिला. २७ मार्च १९७३ला डिंपलच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला आणि बॉबी (रिलीज तारीख २८ सप्टेंबर १९७३) रिलीज होण्याच्या सहा महिने आधीच १६ वर्षीय डिंपल ‘काकू’ झाली. लग्नानंतर डिंपलने स्क्रीनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. राजेशच्या यशात यश मानायची तिची तयारी होती. दुर्दैवाने तेव्हाच बच्चन युग सुरू झालं आणि काकाच्या यशाला ओहोटी लागली. यशाने पाठ फिरवल्यावर काका व्यसनी आणि चिडचिडा बनला. या अपयशाला सामोरं जाण्याची तयारी ना काकाची होती ना लहानग्या डिंपलची. वेळोवेळी आलेल्या वादळांनी या दोघांच्या सहजीवनाची नौका कधी भरकटली कधी हेलकावत राहिली. अखेर दोन मुलींच्या जन्मानंतर दोघे विभक्त झाले. ‘बॉबी’नंतर १० वर्षांनी ‘सागर’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर डिंपलने सिझलिंग आणि सेन्सेशनल पुनरागमन केलं.
या पार्श्वभूमीवर सगळ्या वादळांमधून तगून राहिलेली संसारनौका होती ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची. वयाच्या तिसर्या वर्षी वडील राज कपूर यांच्या श्री ४२० सिनेमातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यात लहानग्या ऋषी कपूरने भावंडांबरोबर कॅमिओ केला. मेरा नाम जोकरमधल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यावर वयाच्या २१व्या वर्षी बॉबी (१९७३) हा प्रचंड यशस्वी सिनेमा दिल्यावर नवा प्रॉमिसिंग हिरो म्हणून ऋषी प्रकाशात आला. अमिताभचा अँग्री यंग मॅन आणि धर्मेंद्रचा हीमॅन यांच्या मारधाडपटांच्या भाऊगर्दीत आता ऋषी कपूरचे रोमँटिक सिनेमे येऊ लागले. १९७४च्या ‘जहरीला इंसान’च्या सेटवर ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची भेट झाली तेव्हा ऋषी होता २२ वर्षांचा आणि नीतू होती सोलह बरस की. तिनेही वयाच्या चौथ्या वर्षापासून बेबी हरनीत या जन्मनावाने बालकलाकार म्हणून इनिंग्ज सुरू केली होती. वडिलांचं छत्र हरपल्याने खूप लहानपणी कुटुंबप्रमुखाची जागा तिला घ्यावी लागली.
ज्या वयात लोक करियरची सुरुवात करतात, त्या वयापर्यंत तिने निवृत्ती घेता येईल एवढं काम केलं होतं. बॉबी हिट झाल्यावर डिंपलला मिळालेले सिनेमे तिने लग्नासाठी सोडले, त्यातले जवळपास सगळे नीतूच्या झोळीत आले आणि डिंपलचा नायकही त्यावर फ्री मिळाला. परिस्थितीने शिकवलेली जुळवून घेण्याची वृत्ती आणि हसतमुख चेहरा यामुळे नीतू ऋषीची घट्ट मैत्रीण बनली. इतकी की ऋषीच्या तेव्हाच्या गर्लप्रâेंडसोबत फोन-पत्र यांच्या देवाणघेवाणीत नीतू त्याला मदत करायची. १९७६मध्ये एकीकडे कभी कभी आणि दुसरीकडे बारुद असं शूटिंग सुरू होतं ऋषीचं. बारुदसाठी पॅरिसला गेल्यावर त्याला नीतूची आठवण यायला लागली आणि त्याने तिथून टेलिग्राम पाठवला, सिखणी (नीतू सिंग) बडा याद आती है! ऋषीचा स्वभाव मस्करीबाज, त्यामुळे तो परत येईपर्यंत वाट बघण्याचा निर्णय नीतू यांनी घेतला. पाच वर्षांच्या कोर्टशिपनंतर २२ जानेवारी १९८० रोजी कपूर खानदानाच्या इतमामास साजेसा विवाहसोहळा संपन्न झाला. नीतू सिंग आता नीतू कपूर बनून आदर्श पत्नी, माता, सून होऊन भरभरून जगत राहिली. ३० एप्रिल २०२० रोजी ऋषीने जगाला अलविदा केले आणि चाळीस वर्षांच्या संसारात नीतू पहिल्यांदाच म्लान झाली. पण ऋषीच्या आठवणी मनात जपत, ती नातवंडांच्या प्रेमात रमली आहे. काळाच्या ओघात नीतूचा मुलगा रणबीर कपूर मोठा झाला. त्याच्याही लग्नाची गाठ सिनेमामुळे आणि सिनेमातील हिरोईनशीच जुळली.
राजेश खन्ना-डिंपल, अमिताभ-जया आणि इतर स्टार्सच्या मुलांनीही आईवडिलांचा कित्ता गिरवत आपापली प्रेमकहाणी कशी रंगवली, ते पाहूया पुढच्या भागात.