मुंबईमधील प्रसिद्ध सॉलिसिटर पांडुरंग शामराव लाड आणि त्यांच्या पत्नी मंजुळाबाई यांचे तिसरे अपत्य म्हणजे दुर्गाबाई. गिरगावातल्या कांदेवाडीतील एकत्र कुटुंबात अत्यंत लाडाकोडात विस्तीर्ण घरात दुर्गाबाईंचे बालपण गेले, घरात धार्मिक व्रतवैकल्य, सणवार यांचे संस्कार, तर आजोळहून आईच्या माहेरघरातून, मलबार हिलवरच्या सुखटणकर घरातून इंग्रजी शिक्षण, रीतीभाती आणि वर्तन यांचे संस्कार घडले.
वडिलांचे एक पारशी मित्र होते, त्यांनी या लाडाच्या मुलीला `बानू’ म्हणायला सुरुवात केली आणि सर्वचजण तिला `बानू’ नावानेच ओळखू लागले. वडिलांना विविध कलांची आवड होती. तोच गुण `बानू’त उतरला. बालगंधर्वांच्या किंवा इतर कोणत्याही प्रसिद्ध नाट्यसंस्थेचा मुंबईत नाट्यप्रयोग असेल तर अगदी पुढच्या रांगेतील दोन आसने कायम राखीव असत. एक सॉलिसिटर लाड यांच्यासाठी आणि दुसरे त्यांची लाडकी लेक `बानू’साठी! एकच नव्हे तर नाटकांचे अनेक प्रयोगही बापलेकीची जोडी आनंदाने अनुभवत आणि आपोआपच त्यातील अभिनय संगीत, नाट्य यांचा सूक्ष्म अभ्यास `बानू’चा होई. पुढील कलाजीवनात याचा फार मोठा फायदा `बानू’ला घडला.
सॉलिसिटर लाड हे केवळ कलारसिक नव्हते, तर त्यांचे बालगंधर्वांशी अत्यंत घरगुती संबंध होते. गंधर्व कंपनी फुटू नये यासाठी त्यांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. बलवंत संगीत नाटक मंडळी बंद करू नका असे त्यांनी दीनानाथ मंगेशकर आणि चिंतामणराव कोल्हटकर यांना निक्षून बजावले होते.
१९१८-१९ च्या सुमारास भारतात राजकीय चळवळींना जोर चढला होता. गिरगावात मिरवणुका, प्रभातफेर्या आणि राजकीय पुढार्यांची भाषणे होत. या सर्वांचा परिणाम शाळकरी दुर्गाबाईंच्या मनावर झाला. शिक्षणाला राम राम ठोकून आपणही या राष्ट्रीय चळवळीत सामील व्हावे असे विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. याबाबत त्यांना शाळेकडून समजही देण्यात आली. वडिलांनी सांगितले, तुला काय करायचे ते तू संपूर्णपणे विचार करून कर, पण घरी बसून सर्व सुखसोयींचा उपभोग करून, आरामखुर्चीत बसून राजकारण करणार असशील तर ते मला मान्य नाही. त्याला आम्ही सहाय्य करणार नाही अशी सज्जड तंबीही देण्यात आली. विचार करण्यासाठी एक महिन्याचा वेळही दिला, १९२०च्या त्या महिनाभराच्या काळात दुर्गाबाईंनी त्या काळच्या देशभक्तांच्या सान्निध्यात राहून निरीक्षण केले आणि त्यांनी अखेर निश्चित पुढे काय करायचे आहे हे समजल्याशिवाय शाळा सोडायची नाही असा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मनापासून अभ्यास करून सिनिअर केंब्रिज आणि मॅट्रिक अशा दोन्हीही परीक्षा पूर्ण केल्या आणि पुढील शिक्षणासाठी झेविअर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
कॉलेजमध्ये शिकत असताना खेळ, स्नेहसंमेलन, वादविवाद स्पर्धा, सहली यामध्ये दुर्गाबाई अतिशय उत्साहाने सहभागी होत होत्या. त्यामुळे सर्व विद्यार्थीवर्गात मिस लाड हे एक आकर्षक बनले. नाटक बसविणे हा त्यांचा आणखी एक आवडता छंद. शेक्सपिअरच्या `मर्चंट ऑफ व्हेनिस’ मधील काही भाग आणि एक स्वतंत्र छोटी नायिका त्यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी सादर केली.
`बॅकवर्ड चाइल्ड’ हे त्यांनी बसविलेले नाटक इतके रंगले की त्यांना `बॅकवर्ड चाइल्ड’ या नावाने सर्व कॉलेज त्यांना ओळखू लागले. पण त्या महाविद्यालयातील शिक्षणाचे एकच वर्ष पूर्ण करू शकल्या. कारण त्या काळच्या समाज रीतीरिवाजामुळे त्यांचा विवाह के. डी. खोटे आणि कंपनीचे मालक काशिनाथ खोटे यांचे चिरंजीव विश्वनाथ खोटे यांच्याबरोबर लावून देण्यात आला.
खोटे आणि लाड यांचे पूर्वीपासूनच घरोब्याचे संबंध. पहिल्या महायुद्धात कंत्राटी कामे करून खोटे यांनी अमाप संपत्ती कमावली होती. दुर्गाबाईंचा नवरा विश्वनाथ याला प्रथम बनारस हिंदू विश्वविद्यालयात आणि नंतर इंग्लंडला मॅकॅनिकल इंजिनिअर होण्यासाठी पाठवले गेले. पण त्यांचे शिक्षणात लक्ष नव्हते. स्वभावही हेकेखोर. घरातील श्रीमंती ही चिरकाल टिकणारी आहे, स्वत: काही कमाई किंवा उद्योग करायची गरजच काय, अशीच त्यांची भावना. सासूबाईंना सुनेचे पुढील शिक्षण पसंत नाही म्हणून शिक्षण बंद. घरात माणसे कमी. कलाविश्वाबद्दल उदासीनता आणि त्यात सहभागी होण्याबाबत विरोध. दुर्गाबाई आणि विश्वनाथ यांनी दोन मुलांना जन्म दिला. मोठा बकुल आणि धाकटा हरीन. पण परिस्थिती केव्हाही पलटी मारू शकते याचा प्रत्यय खोटे परिवाराला लवकरच आला. सट्टेबाजारात काशिनाथ खोटे यांना जबरदस्त फटका बसला आणि होत्याचे नव्हते झाले. दुर्गाबाईंच्या वडिलांनी या परिस्थितीत दुर्गाबाईंना मुलांसह लाड मॅन्शनमधील एक सदनिकेत राहायला नेले. पण, दुर्गाबाई स्वाभिमानी. आपल्या कुटुंबाचा भार आपल्या वडिलांवर पडू नये म्हणून दुर्गाबाईंनी इंग्रजीच्या शिकवण्या सुरू केल्या. पण त्यात हमखास प्राप्ती अशी नव्हती. नवरा मुंबई महानगरपालिकेत नोकरी करू लागला. पण निष्ठेने आणि चिकाटीने काम करण्याचा त्यांचा मुळातच स्वभाव नव्हता. पण नोकरी कशीबशी टिकली.
याच सुमारास वाडिया मुव्हिटोनचे वाडिया हे भवनानी नावाच्या दुसर्या एका मित्राबरोबर दुर्गाबाईंच्या मोठ्या भगिनी शालूताई यांच्याकडे आले आणि त्यांनी शालूताईंना आपल्या चित्र-बोलपटात काम करण्याची विनंती केली. शालूताई आणि वाडिया महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते म्हणून त्यांची ओळख होती. नुकतेच बोलपट युग सुरू झाले होते. `फरेबी जलाल’ नावाचा काही भाग मूक आणि काही भाग बोलका असा चित्रपट तयार करण्याची भवनानी यांची योजना होती. श्रीमती मीनाक्षी भवनानी यांनी चित्रपटाच्या मूक भागात काम केले होते. चित्रपटाचा दहा मिनिटांचा बोलपटाचा भाग वगळता इतर भाग तयार झालेला होता. पण मीनाक्षी भवनानी यांना हिंदी भाषा आणि गाणे या दोन्ही गोष्टी येत नसल्यामुळे बोलपटाचा भाग अडला होता. तो पूर्ण करण्यासाठी भवनानी एखाद्या घरंदाज स्त्रीच्या शोधात होते. त्याकाळी अजून पार्श्वगायनाची पद्धती सुरू झाली नव्हती आणि घरंदाज स्त्री चित्रपटात काम करण्यासाठी मिळणे म्हणजे केवळ अ-श-क्य!
१९२० साली नाटक आणि चित्रपट यात स्त्रियांनी काम करण्याच्या बाबतीत समाजाची दृष्टी अतिशय कर्मठ होती. घरंदाज स्त्रियांनी काम करणे म्हणजे अब्रहण्यम! शिव शिव! सासर आणि माहेर या दोन्ही घरातील लोकांना समाजात मानमान्यता असलेल्या अशा एका कुलीन, घरंदाज घराण्यातील शिक्षित अशा मुलीने सिनेमात नटी म्हणून काम करायचे? नाही, नाही त्रिवार नाही.
या सर्व गोष्टींची संपूर्ण कल्पना दुर्गाबाईंना असूनही त्यांनी या चित्र-बोलपटात काम करण्यास संमती दिली. त्याकाळच्या स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आणि समाजपरिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे क्रांतिकार्याचे पाऊलच होते. दुर्गाबाईंनी ते धाडस केले. शिवाय त्यांना आर्थिक मिळकतीची गरजही होती. दुर्गाबाईंच्या बहिणीला काम करण्याची गरज नव्हती. त्या वाडिया आणि भवनानी यांना घेऊन दुर्गाबाईंकडे आल्या. दुर्गाबाईंनी काम स्वीकारले. त्यांच्या पतीला दुर्गाबाईंना काम करावे अथवा ना करावे यात काही देणे घेणे नव्हते.
`फरेबी जलाल’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी अगदी जीव ओतून काम केले. एक गाणेही त्या गायल्या. निर्मात्यांनी त्यांच्या नावाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. सुप्रसिद्ध सॉलिसिटर लाड यांची कन्या आणि प्रख्यात खोटे घराण्याची सून हिचे सिनेसृष्टीत पर्दापण अशा मथळ्याच्या मोठमोठ्या जाहिराती वर्तमानपत्रात झळकल्या. पण चित्रपट अत्यंत खालच्या दर्जाचा आणि रद्दड निघाला. चित्रपटाचे कथानक तंत्रज्ञान आणि चित्रित करण्याची पद्धत अत्यंत वाईट होती. दुर्गाबाईंवरील चित्रपटाचा जो तुकडा ज्या उर्वरित चित्रणाला जोडला होता, ते सर्व चित्र उत्तान, बीभत्स होते, त्यामुळे दुर्गाबाईंवर मराठी जनतेने टीकेचा भडिमार सुरू केला. दुर्गाबाईंना या चित्रपटाचा मोबदला रुपये २५०/- मिळाला. पण घरीदारी, सासरी, माहेरी, गिरगावात अशी सर्वत्र दुर्गाबाईंची नामुष्की सुरू झाली. त्यांना लोकांना तोंड दाखविणे अवघड होऊन बसले. एका वर्तमानपत्रात त्यांच्या दोन्ही घरच्या आडनावावर कोटीक्रम करून ‘दुर्गाबाईंचे खोटे लाडू फेल गेले’ अशी नालस्ती केली. पण दुर्गाबाईंच्या वडिलांनी त्यांना शाबासकी दिली आणि अर्थाजन करण्याचा एक मार्ग दुर्गाबाईंनी स्त्रियांना दाखवून दिला असे गौरवोद्गार काढले.
दुर्गाबाईंच्या शिकवण्या याआधीच बंद झाल्या होत्या. त्यामुळे अर्थाजन थांबले. त्यापुढील एक वर्षाचा काळ दुर्गाबाईंना अत्यंत कठीण गेला. त्यांची सत्वपरीक्षाच होती. त्याच काळात प्रभात फिल्म कंपनी बोलपट काढण्याचा विचार करीत होती. त्यांनी अनेक मूकपट तयार करून रसिकांचे प्रेम मिळवले होते. आता बोलपट तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले होते. भारतीय चित्रपटांचा प्रारंभ ज्या दादासाहेब फाळके निर्मित `राजा हरिश्चंद्र’ने झाला, तोच विषय घेऊन प्रभातने बोलपट करण्याचे ठरविले. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत चित्रपट तयार होणार होता. चित्रपटाचे नाव ठरले `अयोध्येचा राजा (अयोध्या का राजा)’. पात्रनिवडीसाठी व्ही. शांताराम (दिग्दर्शक) मुंबईला आले असता त्यांनी दुर्गाबाईंचे `फरेबी जलाल’ मधील एका दारुड्याच्या पत्नीने केलेले काम पाहिले. बाकीचा चित्रपट जरी भिकार असला तरी दुर्गाबाईंनी केलेली भूमिका त्यांना आवडली. आपल्या बोलपटातील हरिश्चंद्राची पत्नी `तारामती’च्या भूमिकेला दुर्गाबाई न्याय देतील असा त्यांना विश्वास वाटला. व्ही. शांताराम आणि गोविंदराव टेंबे दुर्गाबाईंच्या घरी जाऊन त्यांना भेटले आणि प्रभात निर्माण करीत असलेल्या `अयोध्येचा राजा’ या चित्रपटात आपण काम करावे अशी विनंती केली. संवाद आणि गाणी या दोन्हीही गोष्टी या भूमिकेसाठी आवश्यक आहे आणि आपण त्या कराल हा विश्वासही प्रगट केला. दुर्गाबाईंनी `फरेबी जलाल’मध्ये काम करून समाजाचा रोष ओढवून घेतला होताच, त्यामुळे यापुढे या चित्रपटांच्या वाटेला अजिबात फिरकायचे नाही असे त्यांनी ठरविले होते. परंतु प्रभातसारखी नामवंत संस्था मानाने बोलावते आहे. भूमिकाही तारामतीची भारदस्त आहे. त्यामुळे विश्वनाथ खोटे आणि वडिल सॉलिसिटर लाड यांनी दुर्गाबाईंनी ही भूमिका अवश्य करावी अशी इच्छा व्यक्त केली. शिवाय आर्थिक गोष्टींचा विचार करून दुर्गाबाईंनी अखेर काम करण्यास होकार दिला. अशा प्रकारे मुलांना माहेरी ठेवून दुर्गाबाई `अयोध्येचा राजा’च्या चित्रिकरणासाठी मुंबई सोडून कोल्हापूर कलानगरीत दाखल झाल्या.
`अयोध्येचा राजा’ हा बोलपट निर्माण करणे म्हणजे प्रभातपुढे मोठे आव्हानच होते. अनेक अडचणी आर्थिक, तांत्रिक आणि इतर सर्व. कधी यंत्रात बिघाड व्हायचा. पात्रांच्या ओठांच्या हालचाली व्हायच्या पण आवाज यायचा नाही, कधी विश्वामित्र बोलतो आहे असे दृश्य दिसायचे आणि संवाद हरिश्चंद्राचे ऐकू यायचे. दिवसभर उन्हात शूटिंग शूट केलेला भाग वाया जायचा मग त्याचे पुन्हा चित्रीकरण. पैसा संपत आला. अखेर सर्व भागीदारांनी आपले घरचे दागदागिने सराफ पेढीवर गहाण ठेवले आणि पैसा उभा केला. अखेर `अयोध्येचा राजा’ तयार झाला. प्रभातने खास निमंत्रितासाठी एक शो लावला तो अत्यंत सुरळीतपणे पार पडल्यावर दामले मामा म्हणाले, हरिश्चंद्राप्रमाणे देवानेही आपली सत्वपरीक्षा पाहिली.
`अयोध्येचा राजा’ची हिंदी आवृत्ती २३ जानेवारी १९३२ रोजी व मराठी आवृत्ती ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाली. मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमागृहात मराठी आवृत्ती १४ आठवडे चालली. कोल्हापूरला लक्ष्मी प्रसाद सिनेमागृहात ती १७ आठवडे चालली. अर्देशीर इराणीचा `आलम आरा’ मुंबईत ७ आठवडे चालला होता. मराठी `अयोध्येचा राजा’ १४ आठवडे चालला. `आलाम आरा’चे रेकॉर्ड मोडले. `अयोध्येचा राजा’ चित्रपट बघितल्यावर लोकांची अभिरुची बदलली आणि अधिक संपन्न, डोळस झाली. दुर्गाबाईंचे वडील हा चित्रपट रोज बघत असत. पती विश्वनाथ खोटे यांनी हिंदी आवृत्ती बघून त्यावर टीका केली. कारण कदाचित त्यांच्यावर बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिकलेल्या हिंदी भाषेचे संस्कार असावेत. मराठी आवृत्ती त्यांनी बघितलीच नाही आणि सासू-सासर्यांनी तर दुर्गाबाईंचे नावच टाकले होते. काहीही असो, चित्रपटाच्या पुन्हा वाटेवर जाणार नाही. असं म्हणणार्या दुर्गाबाई `अयोध्येचा राजा’मुळे प्रकाशझोतात आल्या आणि त्यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल झळाळून गेली.
`प्रभात’ची शिस्त
वक्तशीरपणा, कामाची ओढ कल्पकता, सहकार्यांची एकजूट, रात्रंदिवस तन-मन-धन खर्च करून उत्तमोत्तम कलाकृती सादर करण्याची आवड आणि प्रत्येक बाबतीत दर्जा राखण्याची जिद्द आणि अशा अनेक गुणांमुळे लाभलेली रसिकप्रियता या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव दुर्गाबाईंना या बोलपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने आला. त्यांना प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा लाभली. आत्मविश्वास दुणावला आणि यापुढेही आपण `प्रभात’मध्येच काम करावे अशी उत्कृष्ट इच्छा त्यांच्या मनामध्ये तयार झाली आणि त्यांनी ती प्रभातच्या संचालकांकडे व्यक्त केली. पण आम्ही तारेतारका पाहून चित्रपटनिर्मिती करीत नाही, तथापि योग्य भूमिका असल्यास दुर्गाबाईंना अवश्य संधी दिली जाईल असे प्रभातकडून प्रांजळ उत्तर मिळाले. त्यावेळी त्यांचे वय होते सव्वीस वर्षे. पदरी दोन मुले. `अयोध्येचा राजा’मुंबईत जोरात सुरू होता. त्यांच्या भूमिकांचे सर्वत्र कौतुक होत होते. त्यामुळे मुंबईच्या चित्रपट निर्मात्याची त्यांच्याकडे रीघ लागली. परंतु मिळालेल्या भूमिका त्यांना स्वत:ला योग्य वाटेनात. पटकथा, संवाद आणि पात्रयोजना यात काहीच सुसंगती दिसेना. त्यामुळे त्यांनी या भूमिका नाकारल्या. १९३२-३३मध्ये प्रभातने `माया मच्छिंद्र’ या चित्रपटातील राणी कीलोतलीच्या भूमिकेसाठी दुर्गाबाईंची निवड केली.
`माया मच्छिंद्र’ हा चित्रपट स्त्रीराज्याच्या कल्पनेवर आधारलेला होता. त्यात नायिकेला वीरश्रीच्या कामांत तरबेज दाखविणे आवश्यक होते. तलवारीचे हात, घोड्यावर बसणे यांचा व्यवस्थित सराव करून त्यांनी ही भूमिका साकारली. गाणी-नृत्ये तांत्रिक व यांत्रिक करामती, केशभूषा, वेशभूषा आणि रम्यस्थळी चित्रीकरण यामुळे चित्रपट गाजला. त्यानंतर पतित पावन (१९३३) हा चित्रपट त्यांना नायक जयराज यांच्याबरोबर केला. आता दुर्गाबाईंचे चित्रपटसृष्टीतील आसन बळकट झाले. कोलकात्याच्या न्यू थिएटर्स या प्रसिद्ध चित्रसंस्थेने `राजरानी मीरा’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी पाचारण केले. हा चित्रपट हिंदी आणि बंगाली भाषेमध्ये होता. बंगाली आवृत्तीत वेगळ्या अभिनेत्री होत्या, पण दुर्गाबाईंनी त्या अवधीत बंगाली भाषा आत्मसात केली. त्याचा फायदा असा झाला की हिंदी शॉट पूर्ण झाला की लगेच बंगाली शॉट घेतला जाई आणि सेटवरची मंडळी बंगाली अभिनेत्री चंद्रावतीला दुर्गाबाईंसारखा अभिनय कर असे सांगत. दुर्गाबाईंना अशा प्रकारे त्यांच्या अभिनयाची पावतीच मिळत असे.
यापुढे आपल्याला जी भूमिका दिली आहे. ती उत्तम प्रकारे वठवायची. बाकी कथानक, पात्रयोजना, कलामूल्ये यांचा फारसा विचार करायचा नाही असे धोरण ठरवून त्यांनी भूमिका साकारण्यास सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभातने त्यांना पुन्हा एकवार आपल्या `अमरज्योती’ चित्रपटात काम करण्यासाठी पाचारण केले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पूर्णपणे काल्पनिक कथानकावर आधारित चित्रपट, पण त्याची संकल्पना आणि निर्मितीमूल्ये अप्रतिम होती. दुर्गाबाईंनी या चित्रपटात `सौदामिनी’ या अन्यायाने भडकलेल्या `चाच्या’ महिलेची प्रखर भूमिका केली. वीरश्री, स्वार्थत्याग आणि जुलमाविरुद्ध तेजाने तळपून जाण्याचा अभिनय त्यांनी अत्यंत उत्कटतेने रंगवला. `अमरज्योती’ चांगलाच गाजला. दुर्गाबाईंची ‘सौदामिनी’ चांगलीच कडाडली आणि लोकप्रियही ठरली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी `कल की बात’ नंदकुमार, सौंगडी (साथी) या चित्रपटामधून कामे केली आणि हेही चित्रपट चांगले चालले.
संपूर्ण चित्रपट कारकीर्दीमध्ये त्यांनी सुमारे २०० हिंदी, मराठी चित्रपटातून भूमिका केल्या, या सर्वांची नोंद येथे घेणे अशक्य आहे. पण गीता (१९४०), नायक चंद्रमोहन, पायाची दासी (१९४१), पृथ्वी वल्लभ (१९४३), महारथी कर्ण (१९४४), रुक्मिणी स्वयंवर (१९४३), मायाबाजार (हिंदी-मराठी १९४९), मग्रूर (१९५०), नरवीर तानाजी (१९५२), जशास तसे (१९५२) आणि चाचा चौधरी (१९५४), अदले जहांगीर (१९५५), परिवार (१९५६), पटरानी (१९५६), मुसाफिर (१९५७), भाभी (१९५७), राजतिलक (१९५८) असे अनेक चित्रपट केले १९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या `मुगले आझम’ या भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपटातील महाराणी जोधाबाई ही भूमिका अधिक गाजली. `लव्ह इन सिमला’ (१९६०), `भाभी की चुडियाँ, दो दिल, काजल’ (१९६५), `अनुपमा’ (१९६६), `प्यार मुहब्बत’ (१९६६), `झुक गया आसमान’ असे अनेक चित्रपट. राजकपूर यांचा बॉबी (१९७३), `नमक हराम’, ‘अभिमान’ हेही लक्षणीय चित्रपट. `बिदाई'(१९७४) मधील पार्वतीच्या भूमिकेने त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचे सर्वोत्कृष्ट अभिनयाचे फिल्मफेअर पारितोषिक मिळवून दिले.
उत्तरायुष्यात अलिबागजवळील झिराड येथे राहायला गेलेल्या दुर्गाबाईंना निर्माते- दिग्दर्शक वाट वाकडी करून भेटायला येत आणि त्यांनी आपल्या चित्रपटात भूमिका करावी अशी आग्रहाची विनंती करीत. दुर्गाबाईं त्यांना नाराज करीत नसत. अशा प्रकारे १९८३ पर्यंत त्यांनी सातत्याने काम केले.
दुर्गाबाईंनी स्वत:ची दुर्गा खोटे प्राडक्शन्स ही संस्था स्थापन केली. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनसह इतर अनेक नामवंत संस्थांची कामे डी.के.पी.ने केली आणि संस्थेने बराच लौकिक मिळविला. दूरदर्शनवरील `वागले की दुनिया’ ही लोकप्रिय मालिका डी.के.पी. चीच निर्मिती होती. हिंदी, मराठी चित्रपट, डी.के.पी संस्था याचबरोबर हिंदी-मराठी रंगभूमीशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आकाशवाणीच्या कार्यक्रमांतही त्या भाग घेत. इप्टा (इंडियन पीपील्स थिएटर असोसिएशन) या नाट्यसंस्थेचे त्यांनी काही काळ अध्यक्षपद भूषविले.
मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्वर्यू डॉ. अ. मा. भालेराव यांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्यांना भाऊबंदकी नाटकात आनंदीबाईची भूमिका साकारली. वि.वा. शिरवाडकर यांच्या कौंतेय, वैजयंती, राजमुकुट या नाटकांत आणि `संशयकल्लोळ’, `खडाष्टक’ याही नाटकांमधून भूमिका केल्या.
१९६१मध्ये दिल्लीला मराठी नाट्यसंमेलन संपन्न झाले, त्यांच्या अध्यक्षपदी होत्या दुर्गाबाई खोटे! अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८४), फिल्मफेअर पुरस्कार (१९७५), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९५८) पद्मश्री पुरस्कार (१९६८) `धरित्रीची लेकरे’ या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९७३) असे अनेक मानसन्मान लाभले. `प्रभात’ने केलेल्या महोत्सवातही त्यांचा गौरव करण्यात आला.
आपल्या खडतर जीवनाला आणि यश अपयश, मानसन्मान, निंदानालस्ती यांना धैर्याने सामोरे जात, कौटुंबिक अडचणींना बाजूला सारून नाटक-चित्रपट आणि कला माध्यमावरील निष्ठा जपत वयाच्या ८६ वर्षापर्यंत (जन्म : १४ जाने. १९०५, निर्वाण २२ सप्टें. १९९१) दुर्गाबाई कलाक्षेत्राशी आपले जिव्हाळ्याचे नाते जोडून होत्या. आपल्या कला आणि व्यक्तिगत जीवनाचे अनुभव कथन करणारे `मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक वाचनीय आहे.
मराठी कुटुंबात वाढलेली एक अस्सल घरंदाज स्त्री सामाजाच्या प्रखर विरोधाला सामोरे जात हिंदी-मराठी- नाट्य क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करते, ही मराठी भाषिकांना अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगिरी प्रचंड असली आणि त्या तुलनेत मराठी चित्रपटातील कामगिरी कमी असली तरी आपण अभिमानाने सांगू शकतो- मराठी बोलपटातील पहिली घरंदाज नायिका म्हणजे दुर्गा खोटे! दुर्गा खोटे यांनी स्वत: वाटेवर काटे पसरलेला अवघड मार्ग स्वीकारला, त्यावरून चालत तो राजमार्ग केला आणि वाटेला आज राजरस्त्याचे स्वरुप प्राप्त करून दिले, स्त्री वर्गाला नवा कलेचा मार्ग समृध्द करून दिला, अवघी स्त्री शक्ती त्यांची ऋणीच राहील.