ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अमेरिकेतील सामन्यांमध्ये धक्कादायक निकाल लागू लागले, तसे त्याचं कारण काय ही उत्कंठा जगभरात निर्माण झाली. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासारख्या दिग्गज संघांचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे ही उत्कंठा आणखी ताणली गेली. जेम्स बाँड, शेरलॉक होम्स, पठाण यांच्यासह अनेक गुप्तचर यंत्रणा कार्यरत झाल्या. ‘मिशन नासाऊ’ मोहीम सर्वच देशांनी हाती घेतली… याचाच घेतलेला आढावा.
– – –
चिंतामग्न अवस्थेत ते प्रशासकीय अधिकारी कसलीशी फाइल घेऊन व्हाइट हाऊसच्या पायर्या चढत होते. विषय अतिशय गंभीर असावा. वाटेत भेटणारा प्रत्येक जण त्यांना सलाम करीत होता. त्यांना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत पोहोचताना कुणीही अडवलं नाही. कारण ते होते विल्यम बर्न्स… अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख. त्यामुळेच त्यांची ही बडदास्त. बायडेन यांच्यापुढे फाइल सादर करून त्यांनी विषय मांडला. ‘‘या अतिमहत्त्वाच्या मोहिमेवर कुणाला नेमायचं?’’ राष्ट्राध्यक्षांनी प्रश्न विचारला. त्यावर बर्न्स उत्तरले, ‘‘जेम्स बाँड!’’ बायडेन यांनी स्मित करीत ‘‘गो अहेड’’ म्हटलं.
फाइलवर स्वाक्षरी होताच, त्वरेने चक्र फिरली. बाँडला तातडीनं ‘सीआयए’च्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं. एका पार्टीत गर्लफ्रेंडसह नृत्यात व्यग्र असलेल्या बाँडनं मेसेज पाहताच त्वेरेनं धाव घेतली. असं काय घडलं असावं? ‘सीआयए’ अधिकार्याच्या फायलीत असं कोणतं गंभीर प्रकरण होतं?
अमेरिकेच्या यजमानपदाखाली होणारा पहिलाच ट्वेन्टी-२० विश्वचषक. पण न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यांत दिग्गज संघांची त्रेधातिरपीट उडाली. परिणामी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासारख्या नामांकित संघांना गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडचा संघ रडतखडत पात्र ठरला. हे अविश्वसनीय कसं घडलं? यासाठी पाकिस्तानची ‘आयएसआय’, श्रीलंकेची ‘एसआयएस’ आणि न्यूझीलंडची ‘एनझेडएसआयएस’ या तिन्ही गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्या होत्या. भारतीय संघाला झगडून विजय मिळाला. त्यामुळे भारतातल्या ‘रॉ’ने ‘पठाण’ला पाचारण केलं होतं. ‘‘कुर्सी की पेटी बाँध लो, मौसम बिघडनेवाला है,’’ असा इशारा देत पठाणही विशेष विमानानं अमेरिकेला निघाला. तिथे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा ‘जिओ’नंही तडक शेरलॉक होम्सला मोहिमेवर जाण्यास सांगितलं. जगभरातील गुप्तचर यंत्रणा नासाऊ स्टेडियमसंदर्भात असं का घडतंय? याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाल्याचा सुगावा ‘सीआयए’ला लागला. त्यामुळे त्यांनीही ‘मिशन नासाऊ’ कोड क्रॅक करण्यासाठी बाँडला नेमलं.
एव्हाना न्यूयॉर्कला सर्व गुप्तचरांचं जाळं पसरलं होतं. सुदैवानं प्रत्येकाचं लक्ष्य एकच होतं, नासाऊचं रहस्य उलगडणं. नेमका कुणाचा हात यात आहे? शोकमग्न अवस्थेत बॅग भरणारा पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टनची ‘आयएसआय’ चौकशी करीत एजंटनं आपली दिशा ठरवली. किवी एजंटनंही केन विल्यम्सनची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शेरलॉकनं अमेरिकास्थित क्रिकेटमधील जाणकारांद्वारे आपल्या अभियानाची दिशा ठरवली. पठाणनं आधी नासाऊ स्टेडियमवरून कॉमेंट्री करणार्या नवज्योतसिंग सिद्धूची भेट घेतली. ‘‘पठाणजी, यह न्यूयॉर्क नहीं जन्नत है, आपका नासाऊ मिशन कामयाब हो जाये, यहीं हमारी मन्नत है’’ अशी शायरी सादर करीत सिद्धू यांनी आपल्याकडील माहिती पठाणला पुरवली. यावेळी बाँडशी मैत्री कर आणि हे मिशन यशस्वी कर, असा सल्ला द्यायला सिद्धू पाजी विसरले नाहीत. पठाणला ते पटलं होतं.
– – –
पठाणनं बाँडला भेटण्यासाठी ‘सप्टेंबर ईलेव्हन मेमोरियल’ ही जागा ठरवली. बाँडनं ‘‘किती वेळात भेटायचं?’’ यावर पठाणनं ‘‘सत्तर मिनिट’’ सांगितलं. दोघंही बाइक घेऊन भेटायला आले. बाँडच्या बाइकवरील ००७ हा क्रमांक लक्ष वेधत होता. ठरल्यावेळी दोघंही समोर हजर राहिल्यावर हस्तांदोलन झालं. बाँडनं सुरुवात केली, ‘‘माय नेम इज बाँड, जेम्स बाँड!’’ हात पसरवून आकाशाकडे पाहात पठाणनंही आपली ओळख दिली, ‘‘माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट! पण याच देशात मला वाईट वागणूक मिळालेली!’’ आठवणी जागवणारे पठाणचे डोळे अश्रूंनी डबडबले. बाँडनं वातावरण खेळतं करण्यासाठी ९/११च्या हल्ल्यासंदर्भातील कथन सुरू केलं. ‘‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है,’’ असा हिंग्लिशमध्ये डायलॉग शेवटी ऐकवला. पठाणनं अश्रू गिळत आपली एव्हरग्रीन स्माइल करीत म्हटलं, ‘‘हाँ बाँडजी, आप सच कह रहें है. मै एक सोल्जर हूं तुम्हारी तरह. हम ये मिशन साथ में कर सकते है. सो आर यू इन और आर यू आऊट?’’ बाँडनं पठाणचा मैत्रीचा पुढे केलेला हात मोठ्या मनानं स्वीकारला. मिशन एकत्रित पूर्ण करण्याचं निश्चित झालं. मग बाँड आणि पठाण यांनी मिशनकडे कूच केली. काही दिवसांच्या मेहनतीनंतर ठोस माहिती त्यांच्या हाताशी लागली.
– – –
‘सीआयए’चे प्रमुख बर्न्स आज पुन्हा व्हाइट हाऊसच्या पायर्या चढत होते. त्यांच्यासोबत होता, बाँड. यावेळी त्यांच्या चेहर्यावर गांभीर्य नव्हतं. ‘मिशन नासाऊ’ यशस्वी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर जाणवत होता. त्यामुळे उत्साहातच त्यांनी प्रेझेंटेशन रूम गाठली. तेथील मोठ्या खुर्चीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन त्यांची वाट पाहात होते. यावेळी संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री असे काही महत्त्वाचे राष्ट्रीय मंत्री उपस्थित होते. या सर्वांना बाँडच्या संशोधनाकडे आणि बर्न्स यांच्या सादरीकरणाकडे लक्ष लागून राहिलं होतं. ‘‘मिशन नासाऊ सक्सेसफुल!’’ बर्न्स यांनी हे शब्द उच्चारताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बायडेन खुर्चीवर उठून पुढे झाले. ‘‘बाँड इज दि बेस्ट,’’ असे गौरवोद्गार काढत बाँड आणि बर्न्स यांची पाठ थोपटली. या यशाचं श्रेय बाँडचं हे बर्न्स यांनी लगेच स्पष्ट केलं. समोरील स्क्रिन प्रकाशित झाली आणि बर्न्स यांच्या सादरीकरणाला प्रारंभ झाला. बर्न्स बोलू लागले.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मोठ-मोठ्या संघांच्या वाताहतीला जबाबदार ठरली त्या नासाऊ येथील ड्रॉप इन खेळपट्टी. २२ यार्डाच्या क्रिकेट खेळपट्टीप्रमाणेच ही खेळपट्टी असते. परंतु ती स्टीलच्या ट्रेमध्ये तयार केली जाते, पारंपरिक खेळपट्टीप्रमाणे ती मैदानावर बनवली जात नाही. त्यासाठी अनुकूल वातावरण, मातीचे विविध थर हे गणित साधले जाते. त्यानंतर पारंपरिक खेळपट्टीप्रमाणेच तिची काळजी घेतली जाते. अगदी रोलिंग करणे, पाणी देणे, गवत कापणे हे सारं सामान्य खेळपट्टीप्रमाणेच असतं.’’ बायडेन यांच्यासह सारेच मंत्रीगण हे कुतूहलानं ऐकत होते. पुढील माहिती बाँड सांगेल, असं करून बर्न्स यांनी सूत्रे बाँड यांच्याकडे दिली. बाँड उभे राहताच टाळ्यांचा गडगडाट झाला. आता बाँडने पुढील माहिती सांगायला सुरुवात केली.
‘‘डॅमियन हॉग हे अॅडलेड ओव्हलचे क्युरेटर म्हणजेच खेळपट्टी देखभाल तज्ज्ञ.
ड्रॉप इन खेळपट्टीचे हेच निर्माते. त्यांनीच नासाऊ खेळपट्टीचा प्रकल्प राबवला, तेच याचे सूत्रधार. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील भूमीवरील काळी मातीसुद्धा काही प्रमाणात वापरली. ही तयार खेळपट्टी मग अॅडलेड ते न्यूयॉर्क हे साता समुद्रापारचं अंतर पार करीत इथे आणण्यात आली.’’
बाँड यांच्या भाषणानंतर सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. मिशन नासाऊ क्रॅक झाल्याचा हा आनंद होता. तोवर टेबलवर केक्स, कॉफी, ज्यूस मांडण्यात आले.
बायडेन यांना बाँड आणि बर्न्सचं कौतुक वाटत होतं. पण उत्सुकताही ताणली होती. ‘‘माझा एक प्रश्न आहे की, खेळपट्टी तशीच आहे. मग रथी-महारथी क्रिकेटपटू भांबावल्यासारखे का खेळतायत? नामांकित संघांना परतीचं तिकीट लवकर का काढावं लागलं?’’
बर्न्स उभे राहणार तितक्यात ‘‘याचं उत्तर मी देतो’’ असं सांगत बाँडनं त्यांना थांबवलं. बाँड उभा राहिला आणि सांगू लागला, ‘‘ड्रॉप इन म्हणजेच कृत्रिम खेळपट्टी. ती नैसर्गिक खेळपट्टीप्रमाणेच कशी काय असेल? या खेळपट्टीवर चेंडूला अनियमित उसळी मिळते. त्यामुळे फलंदाजांचे अंदाज चुकतात. परिणामी फलंदाजांसाठी ती डोकेदुखी ठरतेय. त्यांच्याकडून मोठ्या धावा, अपेक्षित फटके मारले जात नाहीत.’’
बाँडच्या स्पष्टीकरणानं बायडेन यांच्या शंकांचं निराकरण झालं होतं. पुन्हा ‘सीआयए’च्या या कार्याबद्दल स्तुतिसुमने वाहण्यात आली.
– – –
एव्हाना चार्टर्ड फ्लाइटनं पठाणही दिल्लीत पोहोचला. त्यानं एअरपोर्टहून थेट ‘रॉ’चं मुख्यालय गाठलं. तिथं ‘रॉ’चे प्रमुख त्याची वाट पाहातच होते. पठाणही आपला अहवाल सादर केला. अन्य अधिकार्यांनी कौतुक केलं. ‘रॉ’च्या प्रमुखांनी अमेरिकेतील हे मिशन कसं साध्य केलं? याविषयी प्रश्न केला. त्यावर हसतमुख चेहर्यानं पठाण उत्तरला, ‘‘जो पत्ते मिलते है, उन्ही से बाझी खेलनी पडती है. और इस बाझी में सारे इक्के मेरे हाथ में है!’’ ‘रॉ’च्या प्रमुखांना पठाणचं अप्रूप वाटलं. ते आणखी खोलात शिरले नाही. कारण त्यांनाही बाँडच्या अहवालाप्रमाणे सादरीकरण करण्यात आलं आणि असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली. याचप्रमाणे होम्सनं इंग्लंडमध्ये तर अन्य गुप्तचर यंत्रणांनाही आपापले अहवाल सादर केले. बर्याच देशांना ट्वेन्टी-२० विश्वचषकातील धक्कादायक निकालांचं कोडं अखेर उलगडलं होतं.