बाळासाहेबांनी २८ मे १९७२ रोजी चितारलेल्या या मुखपृष्ठ चित्राची पार्श्वभूमी फारच वेगळी होती. तो काळ कामगार संघटनांच्या प्राबल्याचा होता. सगळ्या देशाचं, उद्योगधंद्यांचं चक्र बंद पाडण्याची ताकद या संघटनांमध्ये होती. त्यामुळेच हिंदुत्ववाद्यांपासून कम्युनिस्टांपर्यंत सर्वच राजकीय विचारधारांना मानणार्या कामगार संघटना अस्तित्त्वात होत्या आणि त्या आपापल्या विचारसरणीनुसार कामगारांच्या हितरक्षणासाठी लढत होत्या. अनेकदा यात एकमेकांमध्येही वर्चस्वाच्या लढाया होत. त्या रक्तरंजितही असत. हिंद मजदूर संघ, इंटक, आयटक या संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ही एकीची लंगडी कशी मजेशीर आहे, ते दाखवणारं हे खुसखुशीत व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटलं आहे. या व्यंगचित्रात ऑल इंडिया ट्रेड युनियन अर्थात आयटकचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची जी अवस्था आहे, ती सध्या महायुती नावाच्या अवलक्षणी कडबोळ्यात अजित पवार यांची झाली आहे. त्यांची ‘दादा’गिरी लोकसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीने संपुष्टात आणली आहे. भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गट हे तुलनेने बलाढ्य भासणारे पक्ष गरज संपली की दादांचं विसर्जन करून मोकळे होतील… अर्थात त्यानंतरही त्यांची एकमेकांच्या तंगडीत तंगडी गुंतलेलीच असणार आणि लंगडीचा खेळ विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरूच राहणार.