□ मिंधे सरकारकडून संविधानाच्या शिल्पकारांची घोर उपेक्षा; बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम रखडले.
■ ज्यांना मुळात संविधानच शिल्लक ठेवायचं नाहीये, अशांच्या नेतृत्त्वातलं सरकार आहे हे. त्यांना संविधानाच्या शिल्पकाराचं स्मारक बनवण्यात किती रस असणार?
□ सहा हजार कोटी रुपये पाण्यात; पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाचा चिखल.
■ पाण्यात नाही गेले ते, त्यातले बरेच कुणाकुणाच्या खिशात गेलेले आहेत. आता नव्याने काम निघेल, नव्याने बजेट ठरेल, पुढच्या पावसाळ्यात आपण हीच बातमी वाचत असू.
□ अण्णा हजारेंना जाग आली; अजित पवारांच्या क्लीन चिटला आक्षेप.
■ अण्णांची झोप अशी बरोब्बर योग्य वेळेला, अजित दादांची उपयुक्तता संपल्यावर कोण डिस्टर्ब करतं, ते तपासायला हवं. काय टायमिंग आहे!
□ मीसुद्धा इच्छुक होतो, पण… : भुजबळांनी व्यक्त केली मनातली खदखद.
■ तुम्ही कधीपासून इच्छुक आहात… पण, भुजांमधलं बळ केंद्रीय यंत्रणांनी काढून घेतलेलं आहे… तेव्हा ठेविले अजिते तैसेचि राहावे…
□ महायुतीत बिघाडी; मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीचे तीन उमेदवार रिंगणात.
■ यशस्वी झाले असते तर मारून मुटकून बरोबर राहिले असते. लोकसभेत तोंड फुटल्यावर आता एकमेकांची तोंडं पाहण्याची इच्छा उरली नसणार.
□ कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा अदानीला आंदण.
■ जागा दिली, जागा दिली म्हणून जास्त गहजब माजवू नका. ते मदर डेअरीच विकत घेऊन विषय संपवून टाकतील.
□ पालिकेचे आठ हजार कर्मचारी अजूनही निवडणूक ड्युटीवरच.
■ पावसाळा आलाय, नागरी सुविधांवर लक्ष असायला पाहिजे. आता काय विधानसभा निवडणुका लागण्याची वाट पाहतायत की काय?
□ मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे अमोल कीर्तिकरांबाबतचा निर्णय; मिंध्यांची गुलामी करणार्या अधिकार्यांना ही चोरी पचणार नाही – संजय राऊत यांचा इशारा.
■ अजिबात पचणार नाही. निडर शिवसैनिक व्यवस्थेच्या घशात हात घालून सगळी पाळंमुळं खणून काढतील.
□ बारामतीत लोक बोलले नाहीत; शांतपणे बटण दाबत गेले – शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया.
■ तरी तुतारी आणि पिपाणी हा घोळ घातला गेला. शिवसेनेच्या अनेक मतदारांना धनुष्यबाणाचं बटण दाबल्यावर चूक लक्षात आली. निवडणूक आयोगाने कालाकांडी केली नसती, तर यांची संख्या एक आकडीच राहिली असती.
□ आशा सेविका व आरोग्य सेविकांचे आंदोलन पेटणार.
■ त्यांच्याकडे कोण पाहणार? प्रसारमाध्यमांना आरत्या ओवाळण्यातून वेळ नाही. नेत्यांना हे प्रश्न सोडवण्यात कसलाच इंटरेस्ट नाही.
□ खरीप हंगामाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.
■ त्यांना शेतावर जायचं असेल.
□ राज्यसभेवर जाणार्या सुनेत्राताईंना अदिती तटकरेंचे प्रॉम्प्टिंग.
■ राज्यसभेत तरी वेगळं काय होणार आहे?
□ ठाण्यात रस्त्याचे ‘अमृत’ कुणाच्या घशात? जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा उखडपट्टी.
■ अख्ख्या राज्यात हाच खेळ सुरू आहे. हजारो कोटी लंपास करण्याचा खरा समृद्धी महामार्ग आहे हा राज्यातला.
□ भाजपने मिंधेंवर फोडला घोटाळ्याचा बाँब.
■ एकमेकांवर बाँब फोडत बसा आता काही काळ! तंगड्यात तंगडी अडकवून घेतलीत, ती सोडवता मात्र यायची नाहीत आता लवकर.
□ मोदी की गॅरंटी… एका महिन्यात महागाईची दुप्पट झेप.
■ शिवाय हे उड्डाण करून पोहोचले थेट तिकडे इटलीत, काहीच महत्त्वाचं काम, स्थान नसताना, कोणी विचारत नसताना बळे बळे विश्वगुरू बनण्याची हौस तरी किती!
□ मोदींकडे बहुमत नाही; सरकार केव्हाही पडेल – मल्लिकार्जुन खरगेंचा हल्ला.
■ आपले आपण पडू द्या अंतर्विरोधातून. इंडिया आघाडीने काहीच करायची गरज नाही.
□ धारावीची दोन हजार एकर जमीन अदानीच्या घशात घालण्याचा डाव – महाविकास आघाडी आक्रमक.
■ अडाणीचा घसा नेमका आहे तरी केवढा?… आता काय अख्खा देश गिळून मोकळा होतोय काय बाबा!
□ १२ वर्षांपूर्वी सापडलेले शीना बोराच्या हाडांचे अवशेष गायब.
■ केस कोणत्या दिशेने जाणार, ते समजून घ्यायला हरकत नाही.
□ भाजप-मिंध्यांचे फाटले; सत्तारांनी गद्दारी केल्याचा भाजपचा आरोप.
■ एकमेकांत भरपूर लढा. त्याशिवाय महाअवदसा सरकार जायचं नाही तुमचं महाराष्ट्रातलं.
□ नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत गेम झाला; फडणवीस आता जनतेच्या कोर्टात जाणार.
■ जनता फ्यॅ फ्यॅ करून हसतेय… यांच्या टोळीचे सरदार देशभर ज्या काही भयंकर थापा मारत फिरत होते, ते
नॅरेटिव्ह खरं होतं का?
□ नीट परीक्षा घोटाळ्यात पुरावा नाही म्हणणारे केंद्र सरकार तोंडावर आपटले; उत्तरांसह हुबेहूब प्रश्नपत्रिका सापडल्या.
■ धर्मेंद्र प्रधान यांनी अकारण आपली पत घालवून घेतली घाई करून.