न्यूयॉर्कमधलं कोर्ट. स्टॉर्मी डॅनियल्सची जबानी चाललीय.
स्टॉर्मीनं डोनल्ड ट्रंपबरोबर लैंगिक संबंध ठेवले असा आरोप आहे.
ट्रंपनी त्याचा इन्कार केलाय.
डॅनियल्सनं कसा प्रणय केला याचं चित्रमय वर्णन कोर्टात केलंय.
ट्रंपवर हे स्कँडल उलटलंय, तो आधीच गुन्हेगार ठरलाय.
डॅनियल्सनं स्वतःचं चित्र आणि नाव असलेल्या मेणबत्त्या ऑनलाईन विकायला काढल्यात. Stormy, Saint of Indictment असं त्या मेणबत्तीवर लिहिलंय.
सेक्सचा मामला, म्हटलं तर बदनामी, म्हटलं तर प्रसिद्धी.
ट्रंपच्या वकील डॅनियल्सला म्हणाले, ‘तू सेलेब्रिटी असणं विकून पैसा मिळवतेस. एकेक मेणबत्ती चाळीस डॉलरला विकतेयस.’
डॅनियल्स शांतपणे म्हणाली, ‘ट्रंपही तेच करतोय. आणि मी चाळीस नव्हे सात डॉलरला मेणबत्ती विकतेय.’
प्रसिद्धी हाच जगण्याचा फंडा असलेल्या दोन व्यक्ती सध्या गाजत आहेत. डोनल्ड ट्रंप आणि स्टॉर्मी डॅनियल्स.
विवाहित (अनेक वेळा) असलेल्या ट्रंप यांनी डॅनियल्सशी संग केला. ट्रंप तसं झालंच नाही म्हणतात. तरीही त्या संगतीची वाच्यता डॅनियल्सनी करू नये असं बंधन घालणारा करार, पैसे मोजून, ट्रंपनी केला.
तर त्या स्टॉर्मी डॅनियल्सनी त्यांनी ट्रंप बरोबर केलेल्या प्रणयाचं एकाद्या दृश्यासारखं वर्णन नुकतंच कोर्टात केलं. मागं एकदा
डॅनियल्सनी आपली कहाणी पुस्तकाच्या रुपातही प्रसिद्ध केलीय.
अशा स्टॉर्मी डॅनियल्स-
स्टॉर्मी डॅनियल्स या महिलेनं शरीराचं प्रदर्शन मांडून (ट्रिपल डी आकाराचे स्तन), प्रसंगी लोकांना शरीर वापरायला देऊन पैसे मिळवले. अंगावरचे कपडे उतरवणार्या कार्यक्रमात भाग घेऊन ती श्रीमंत झाली, त्या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं तिला सिनेमात प्रवेश मिळाला, त्यात तिनं पैसे केले.
स्टॉर्मी डॅनियल्स ही मुळातली स्टेफॅनी क्लिफर्ड, लुईझियानातली.
अगदी लहान वयात तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. घर आणि वस्ती अत्यंत ओंगळ. व्यसनांमधेच ती वाढली. आई बेजबाबदार, तिचं घराकडं लक्ष नाही.
डॅनियल्स घराबाहेरच वाढली. सहा सात वर्षाची असताना शेजार्यानं तिच्यावर बलात्कार केला. डॅनियल्स शाळेत जात असे, ती अभ्यासू होती. पण तिची अगदी सामान्य अशी शाळा, त्या शाळेला नावही नाही, तर कीर्ती सोडून द्या. अमेरिकेत माणूस कुठल्या घरात, कुठल्या शाळेत, कुठल्या कॉलेजात, कुठल्या युनिव्हर्सिटीत, वाढला यावरून त्याचं भवितव्य ठरतं.
‘चांगलं जगायचं तर पैसे लागतात. पैसे मिळवणं हेच अमेरिकन जीवनाचा उद्देश असतो. पण माझ्याकडं पैसे मिळवण्याचं कोणतंच साधन नव्हतं.’ डॅनियल्सचं आत्मचरित्र सांगतं.
वयात येण्याआधीच डॅनियल्सनं नाईट क्लबमधे नाचायला सुरवात केली. दररोज संध्याकाळ ते रात्र ती नाईट क्लबमधे असे. तिथं तिला बरे पैसे मिळाले.
वयात आली तशी ती शरीरानं उफाड्याची झाली. तिनं स्ट्रिप नाच करणार्या क्लबात प्रवेश मिळवला. कपडे उतरवत उतरवत कपडे आहेत की नाहीत अशा स्थितीपर्यंत नाचायचं. शरीर जेवढं जास्त उत्तान तेवढे जास्त पैसे लोक देतात.
डॅनियल्स पैसेवाली झाली.
तिला कळलं की स्तनांमधे इंप्लांट्स वापरून स्तनांचा आकार वाढवता येतो. स्तन जेवढे मोठे तेवढे जास्त पैसे.
तिनं इंप्लांट्स घातले.
तिनं केसाचा रंग बदलला.
पॉर्न मासिकांनी तिचे फोटो वापरायला सुरुवात केली.
पॉर्न फोटो पाहून सिनेमावाले तिच्याकडं पोचले.
डॅनियल्स अॅडल्ट सिनेमातली नटी म्हणून प्रसिद्ध झाली.
आणखी पैसे मिळू लागले.
डॅनियल्सला अमेरिका चांगली समजली होती आणि अमेरिकेला डॅनियल्स चांगली समजली होती.
डॅनियल्सचा असा विकास चालला असतानाच समांतर पातळीवर वेगळ्या क्षेत्रात डोनल्ड ट्रंप नावाचा माणूस प्रसिद्ध होत चालला होता. तो टीव्ही शो करत असते. दिसायलाही तो स्मार्ट होता. त्याचा अॅप्रेंटिस नावाचा शो गाजत होता.
ट्रंपचं बायकांवर लक्ष असे.
डॅनियल्सचे फोटो, सिनेमे ट्रंपनी पाहिले. ट्रंपना वाटलं की हिला अॅप्रेंटिस या शोमधे घेता येईल. ट्रंप तिच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात होते.
२००६ साली लेक टॅहो या ठिकाणी सेलेब्रिटी गोल्फ स्पर्धा होती. जिथं सेलेब्रिटी असतात, तिथं सेक्स असतोच. डॅनियल्स तिथं पोचले आणि ट्रंप तर तिथं होतेच.
ट्रंपनी डॅनियल्सला आपल्या हॉटेलच्या खोलीवर बोलावलं. शोसाठी ती योग्य आहे की नाही ते पहायचा, तिच्याशी बोलायचा आपला हेतू होता असं ट्रंप म्हणतात.
डॅनियल्स ट्रंपच्या खोलीत पोचली. तिलाही पैसे मिळवायचे होते.
बाथरूममधून डॅनियल्स बाहेर आली तर ट्रंप कपडे उतरवून ‘तयार’ होते. अंडरवेअर आणि टी शर्ट.
डॅनियल्सनं कोर्टात सांगितलं ‘ आम्ही मिशनरी या आसनाचा शरीरसंग केला. मला खरं म्हणजे त्यात अजिबातच इंटरेस्ट नव्हता. मला काम मिळवायचं होतं. ट्रंप भोग घेत होते तेव्हा मी निर्विकारपणे छतावरच्या पंख्याकडं बघत होते.’
आटोपलं. डॅनियल्स निघून गेली. ट्रंप त्यांच्या उद्योगाला निघून गेले.
अजून २०१६ उजाडायचं होतं, ट्रंप हे राजकीय व्यक्तिमत्व झालं नव्हतं.
२०११च्या सुमारास ट्रंपचा उदय होत होता. त्याचा फायदा घेण्याचं कोणाच्या तरी डोक्यात आलं. डॅनियल्सबरोबरची धमाल कोणी तरी लीक केली, छोट्या मोठ्या पेपरात ती येऊ लागलीय असं डॅनियल्सला कळलं. कोणी तरी सनसनाटी छापून पैसे मिळवत होतं, कोणी तरी ट्रंप यांचं ब्लॅकमेलिंग करणार होतं.
डॅनियल्सनं विचार केला की इतर लोकं पैसा मिळवणार असतील तर आपण काय घोडं मारलंय, आपणही पैसे मिळवावेत. ‘त्या’ प्रसंगाचं अचूक वर्णन फक्त आपणच करू शकतो हे लक्षात घेऊन तिनं प्रकरण लिहून काढलं, पेपरांशी वाटाघाटी सुरू केल्या. याची अर्थातच वाच्यता झाली.
मायकेल कोहेन हे वकील २०११ साली डॅनियल्सकडं पोचले. कथा छापू नकोस असा आग्रह केला, मांडवळ करायच्या गोष्टी केल्या. बहुदा पैशाचा विषय निघाला नाही. एके दिवशी डॅनियल्स लास वेगासमधे असताना एक अनोळखी माणूस तिला भेटला. ‘ट्रंपपासून दूर रहा… नाहीतर…’ असं म्हणून तो निसटला.
म्हणजे डॅनियल्स आपली बदनामी करून पैसे मिळवण्याच्या बेतात आहे याची कल्पना ट्रंपना आली असावी.
२०१६मध्ये ट्रंपनी प्रेसिडेंटपदाची निवडणूक लढवायचं ठरवलं, प्रचार मोहिम सुरू झाली. डॅनियल्सच्या लक्षात आलं की आता आपली माहिती हे घबाड आहे. तिनं सारा मामला लिहून काढला आणि एका मॅगझीनला दिला. कोहेनला याचा सुगावा लागला.
कोहेन डॅनियल्सला भेटला. १.३० लाख डॉलर्स दिले. तिच्याकडून लिहून घेतलं की ती या प्रकरणाची वाच्यता करणार नाही,
मॅगझीनला दिलेला मजकूर मागं घेईल. हा व्यवहार कायदेशीर करार अशा रूपात करण्यात आला होता.
२०१६ ची निवडणूक. हिलरी क्लिंटन आणि ट्रंप यांच्यात लढत होती. पाच नोव्हेंबरला मतदान होतं. सात ऑक्टोबरला वॉशिंग्टन पोस्टनं एक क्लिप प्रसिद्ध केली. या क्लिपमधे ट्रंप आणि टीव्ही होस्ट बिली बुश यांच्यात बसमधे झालेलं संभाषण (२००५ सालचं) रेकॉर्ड झालं होतं. बुश आणि ट्रंप अॅक्सेस हॉलिवूड या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी निघाले होते. दोघं गप्पा मारत होते. ट्रंप म्हणाले, ‘मी विवाहित स्त्रियांना सिड्यूस करू शकतो; आपल्या कार्यक्रमासाठी येणार्या महिलेचं मी चुंबन घेऊ शकतो. माणूस स्टार असला की तो काहीही करू शकतो, कोणीही त्याला विरोध करत नाही. तुम्ही स्टार असला की स्त्रिया तुम्हाला कसंही वर्तन करायला परवानगी देतात, तुम्ही स्त्रीच्या गुप्तांगाला हात लावला तरी चालतं…’
गहजब झाला. प्रथम ट्रंपनी हे रेकॉर्डिंग खोटं आहे असं जाहीर केलं. पण ते खपलं नाही. मग म्हणाले की अशी संभाषणं पुरुष लॉकर रूममधे करत असतात, ती गंभीरपणे घ्यायची नसतात.’
निवडणूक ट्रंपच्या हातून जातेय की काय अशी स्थिती निर्माण झाली.
ही टेप प्रकाशित झाल्यावर दुसर्याच दिवशी डॅनियल्सनं आपल्याशीही ट्रंपनी गैरवर्तन केलं होतं असं जाहीरपणे सांगून टाकलं.
ट्रंप भडकले. डॅनियल करारानं बांधली होती, तिनं वाच्यता करणं हा कायद्याचा भंग आहे असं ट्रंप म्हणाले.
डॅनियल्स म्हणाली की ती जे सांगतेय त्याची वाच्यता इतरांनी आधीच केलेली असल्यानं त्यात गुप्त असं काहीच राहिलेलं नाही, सबब तिच्याकडून करारभंग झालेला नाही.
मग ट्रंपनी डॅनियल्सवर बदनामीचा खटला भरला.
प्रकरण चिघळत गेलं.
या भानगडीत डॅनियल्स आणि ट्रंप दोघांनाही अमाप प्रसिद्धी मिळाली.
ट्रंप यांनी डॅनियलला पैसे देताना अकाऊंट्समधे भानगडी केल्या या आरोपाखाली खटला सुरू झाल्यावर फिर्यादी पक्षानं
डॅनियल्सची साक्ष काढली.
डॅनियल्स चरित्रहीन आहे, तिचं बोलणं कशाला गंभीरपणे घ्यायचं, असं बचाव पक्षाचे वकील म्हणाले.
ट्रंप तरी कुठं चारित्र्यवान आहेत असं
डॅनियल्सनी विचारलं. आपल्याशी केलेल्या वर्तनाचं सविस्तवर वर्णन डॅनियल्सनी कोर्टात केलं.
डॅनियल्सनी ट्रंप यांना बदनाम करून पैसे कमवण्याचा कमर्शियल उद्योग केला असा आरोप ट्रंपच्या वकीलांनी केला.
डॅनियल्स म्हणाली की त्यात काय चूक केली? होय, मी ठरवूनच ते केलं कारण मला पैशाची जरुरी होती, यातून मला पैसे मिळणार आहेत हे लक्षात घेऊनच आपण हा उद्योग केलाय. ट्रंपसुद्धा तेच करतात ना?
तिकडे, आपल्यावरचा खटला आपल्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी केलाय, सबब मला वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे असं म्हणून ट्रंप रिपब्लिकन पक्षाचे लोक आणि आपल्या समर्थकांकडून पैसे मागत आहेत. म्हणजे या खटल्यातूनही ट्रंप पैसे मिळवत आहेत.