देशातील १८वी लोकसभा निवडणूक १ जून रोजी समाप्त झाली. १९ एप्रिल ते १ जूनपर्यंत ४४ दिवस हा लोकशाहीचा उत्सव सुरू होता. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी सात टप्प्यांत ही निवडणूक झाली. महाराष्ट्रात ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झाले. २० मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मुंबईसह ठाणे, पालघर, धुळे, नाशिक जिल्ह्यातील १३ मतदारसंघांत निवडणूक झाली. या शेवटच्या टप्प्यातील मतदारसंघांतील लढाईने देशाचे लक्ष वेधून घेतले. कारण महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या दोन जाहीर सभा १७ मे रोजी मुंबईत झाल्या. या लढाईचे केंद्र मुंबईत होते. महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी पवार गटाचे शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर नेत्यांनी उपस्थिती लावली. कधी नव्हे ते मोदी यांनी मुंबई महाराष्ट्रात २०पेक्षा जास्त प्रचारसभा घेतल्या. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुंबईत रोड शोही केला. याआधी असे कधी घडले नव्हते. ४० दिवसांत २० सभा म्हणजे जवळपास दिवसाआड मोदी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला महाराष्ट्रात येत होते. जवळपास अडीच मतदारसंघामध्ये एक सभा त्यांची झाली. चंद्रपूर येथे ८ एप्रिलला मोदींची पहिली सभा झाली. तर १७ मेच्या मुंबईतील शिवाजी पार्कच्या सभेने सांगता झाली.
२०१९मध्ये मोदींच्या महाराष्ट्रात १२ सभा झाल्या होत्या. त्यांच्याबरोबर तेव्हा उद्धव ठाकरे होते. या खेपेस उद्धव नव्हते, अस्सल शिवसेना नव्हती. एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे, महादेव जानकर, रामदास आठवले बरोबर असताना देखील मोदींना महाराष्ट्रात २०१९पेक्षा जास्त सभा घ्याव्या लागल्या. नकली शिवसेनेच्या नेत्यांसह गद्दार, भ्रष्टाचारी, लाचार, विश्वासार्हता गमावून बसलेले नेते त्यांच्याबरोबर होते, तेव्हा असेच होणार. शिवाजी पार्क येथे मोदी यांनी लाचार, गद्दार, भ्रष्टाचारी आणि महाराष्ट्र द्रोह्यांची फौज घेऊन सभा घेतली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून मोदी बसले होते. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना भाजपामध्ये घेऊन त्या पक्षाला भ्रष्टाचारमुक्त केले. पण भाजप भ्रष्ट्राचारयुक्त झाला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात ७ सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११५ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० प्रचारसभा घेतल्या. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ सभा घेतल्या. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्र्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. पण काही फरक पडला नाही. कारण या खेपेस महाराष्ट्रातील जनतेचं आधीच ठरलं आहे. बस! आता सत्ता परिवर्तन!!
यावेळी देशाची निवडणूक भारत सरकारऐवजी मोदी सरकार या नावाने लढवली गेली. मोदी यांनी प्रत्येक भाषणात ‘यह मोदी की गॅरंटी है’ अशी अहंकाराची भाषा केली. वास्तविक गॅरंटी ही भारत सरकारची असायला हवी. निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी नसतील. तेव्हा त्यांना मतदान केलेल्या जनतेने काय करायचे? पण गॅरंटी पूर्ण करावी लागणार नाही असे मोदींनी पक्के ठाऊक असल्यामुळे ते गॅरंटी देत आहेत असेच दिसते.
२०२४ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. भाजपाने ‘४०० पार’चा नारा आणि ‘नरेंद्र मोदी प्रधानमंत्री तिसरी बार’ असा नारा देत निवडणुकीत हवा भरली. त्याच वेळेस इंडिया आघाडीचा काही राज्यात वाटपाचा घोळ सुरू होता. तर काही राज्यात आप, तृणमूल, डावे कम्युनिस्ट हे स्वतंत्र लढण्याच्या मूडमध्ये होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली अन् देशातील जनतेने निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे घेतली. जाहीरनामा, वचननामा, इतर मुद्दे मागे पडले आणि लोकशाही व संविधान वाचविण्याच्या मुद्यावर सभा गाजू लागल्या. तशात मग भाजपा व एनडीएने हिंदू-मुस्लीम, हिंदुस्तान-पाकिस्तान, जात-धर्म या मुद्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानात फटाके वाजवले जातील, तुमच्या वारसाहक्कावर गदा येईल. तुमच्या संपत्तीचे वाटप मुस्लीम समाजात केले जाईल, अशी धादांत खोटी भीती देशातील समस्त हिंदू समाजाला दाखविली गेली. परंतु जनतेने यावेळेस ठरवले होते.
२०१४ आणि २०१९ला आपण फसलो होतो, तसे आता २०२४ ला भाजपाच्या भूलथापांना, जुमलेबाजीला फसायचे नाही. यामध्ये बदल घडवून आणायचा. भारताची राज्यघटना आणि त्यातील समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे जपण्यासाठी आणि लोकशाहीची मूल्ये टिकवण्यासाठी २०२४ची लोकसभा निवडणूक ही निर्वाणीची संधी आहे हे देशातील व महाराष्ट्रातील जनतेने अचूक ओळखले. त्यामुळे ४ जूनला सत्ता परिवर्तन अटळ आहे.
भाजपाच्या पराभवाची चाहूल मोदी आणि अमित शहा यांना लागली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये २०१९ साली जिंकलेल्या जागा पुन्हा जिंकता येतील की नाही ही शंका त्यांना वाटत आहे. महाराष्ट्रात जास्त जागा जिंकण्यासाठी मोदी यांनी बेताल वक्तव्य केले. खोटेनाटे आरोप विरोधकांवर केले. ही मोदींची पराभवापूर्वीची म्हणजे अंतापूर्वीची फडफड आहे. महाराष्ट्रातील यावेळेची निवडणूक ही वेगळी आहे. कारण प्रथमच मुस्लीम आणि मागासवर्गीयांची मोठ्या प्रमाणात मते ही महाविकास आघाडीला, त्यातही प्रामुख्याने शिवसेनेस मिळाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहे.
मुंबई कुणाच्या हाती सुरक्षित राहील याचा विचार मराठी माणसाने केला आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबई-महाराष्ट्राला ज्या रीतीने भाजपा व केंद्राने ओरबाडले आहे. मुंबईचे आर्थिक महत्व करण्याचा कुटील डाव केंद्राने खेळला. त्याप्रमाणे पावले उचलून अहमदाबादला देशाचे नंबर एकचे आर्थिक केंद्र बनवण्याचा घाट केंद्रातील भाजपाच्या दोन्ही गुजराथी नेत्यांनी घातला. मराठी अस्मिता, महाराष्ट्राभिमान पायी तुडवला जात असताना व महाराष्ट्राला ओरबाडले जात असताना महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार गप्प बसले. महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातील जनता परिवर्तनाच्या लढाईत उतरली.
‘राजा हा समाजामुळे असतो आणि नीट राज्य कारभार केला नाही, तर त्याला पायउतारही व्हावे लागते अशी अनेक उदाहरणे जगात आहेत, हे सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत यांचे विधान अलीकडचे आहे. ते बरेच काही सांगून जाते. ‘४ जूनला आपल्या देशाचे जुमला पर्व संपत आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले होते त्या ‘अच्छे दिन’ची सुरुवात ४ जूनपासून होईल. परिवर्तनाची लढाई इंडिया महाविकास आघाडी निश्चितपणे जिंकणार’ असा विश्वास एका पत्रपरिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
देशातील लोकशाहीवर आलेले संकट व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला निर्माण झालेला धोका वेळीच लक्षात आल्याने देशातील आणि महाराष्ट्रातील जनता जागृत झाली. महाराष्ट्रातील या सजग व स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीला मजबूत पाठिंबा दिला. परिवर्तनाची लढाईची सुरुवात महाराष्ट्रातूनच प्रथम होते हा इतिहास आहे. याआधी सामाजिक, सहकार, शैक्षणिक, आर्थिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली आहे. आता सत्ता परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. ४ जून रोजी महाराष्ट्रात परिवर्तनाची पहाट उदयास येणार आहे.