भाजपला ४०० पार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या. पण त्यांचा या जुमलाबाजीकडे देशातील जनतेने पाठ फिरवली आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपची सत्ता जाण्याची भीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटू लागल्यामुळे संघ व नितीन गडकरी यांच्यातील संबंध अधिक घट्ट होताना दिसत आहेत.
– – –
महाराष्ट्राच्या ४८ जागांसाठी पाच टप्यात घेतलेली लोकसभा निवडणूक संपली असली तरी देशातील ५४३ जागांपैकी ११४ जागांसाठी निवडणूक २५ मे आणि १ जून रोजी होणे बाकी आहे. त्यात हरयाणाच्या सर्व १० जागा, हिमाचल प्रदेशच्या सर्व ४ जागा, दिल्लीच्या ७ जागा आणि पंजाबच्या सर्व १३ जागांचा समावेश आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत पाच टप्यात झालेल्या मतदानाचा टक्का घसरला आहे. हा घसरलेला मतदानाचा टक्का केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घसरलेली लोकप्रियता दर्शवते आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते चिंतेत आहेत. अब की बार ४०० पार हा नारा दिला तेव्हा निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीस भाजपचा सूर टिपेला पोहचला होता. पण आता २०० तरी पार करतील का अशी शंका त्यांच्याच नेत्यांना वाटू लागली आहे. काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. तिहेरी तलाक कायदा, देशप्रेमी व देशद्रोही सतत तुलना, मुसलमानांची वाढलेली लोकसंख्या, विरोधकांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, अयोध्येतील राममंदिर आदी मुद्दे निवडणूक प्रचारात उपस्थित करुनही भाजपला काही फायदा झालेला दिसत नाही. तेच तेच मुद्दे, त्याच भूलथापा आणि जुमलेबाजीला देशातील जनता वैतागली होती. आपण सोडून देशात कोणी काहीही केले नाही असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोबेल्स छापाचा पवित्रा असतो. त्याला जनता भुलली नाही.
गेली पाच वर्षं अदानी आणि अंबानी यांच्याबाबत सतत आम्हाला प्रश्न विचारणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक काळात टीका थांबवली आहे. राहुल गांधी आणि अंबानींचा काही व्यवहार झाला आहे का? यांच्याकडून काँग्रेसला टेम्पोभर माल मिळाला आहे का? असे प्रश्न मोदी यांनी तेलंगणातील वेमुलवाडा येथील निवडणूक प्रचारात केले. गेल्या दहा वर्षात मोदी यांनी अदानी व अंबानी यांच्यावरून काँग्रसला लक्ष्य केले नव्हते. याचा अर्थ असाही निघतो की, देशातील उद्योगपतींना निवडणूक निकालाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज आलेला असेल. त्यामुळे मोदींचा हा थयथयाट आहे. अदानी व अंबानी हे टेम्पोतून पैसे पाठवतात हे पंतप्रधान मोदी सांगत आहेत का? भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचे व मदतनीस कोण आहेत हे संपूर्ण देशाला माहित आहे. आमच्यात काही व्यवहार झालेले वाटत असेल तर पंतप्रधान मोदींनी ईडी व सीबीआयला पाठवून चौकशी करावी असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. पंतप्रधानपदाची खुर्ची डळमळीत झाल्यामुळे मोदी त्यांच्याच उद्योगपती मित्रांवर हल्ले करू लागले आहेत. यातून त्यांची पराभूत मानसिकता दिसत आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. देशातील सद्य परिस्थितीवर दोघांत चर्चा झाली असा दावा वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या दाव्याला शरद पवारांनी उत्तर दिले नाही किंवा त्याचा इन्कार केला नाही. असेही समजते की, भाजपाला काठावरचे बहुमत मिळाले तर राजनाथ सिंह किंवा नितीन गडकरी यांचा पर्याय संघाने खुला ठेवला आहे. याचाच अर्थ असा की वेळ पडल्यास संघ मोदी व शहांचे पार्सल गुजरातला पाठवण्यासाठी पुढे मागे पाहणार नाही.
भाजपला ४०० पार करण्यासाठी मोदी आणि अमित शहा यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या. प्रत्येक ठिकाणी मोदी गॅरंटीचे तुणतुणे वाजवले. पण त्यांचा या जुमलाबाजीकडे देशातील जनतेने पाठ फिरवली असल्याचे चित्र देशभर दिसत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपची सत्ता जाण्याची भीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटू लागल्यामुळे संघ व नितीन गडकरी यांच्यातील संबंध अधिक घट्ट होताना दिसत आहेत. वर्धा येथील प्रचारसभेनंतर मोदी यांनी नागपुरात मुक्काम ठोकला होता. परंतु नागपुरात असून देखील नितीन गडकरी यांनी मोदींची भेट टाळली. तर संघाच्या नेत्यांनीही मोदींकडे पाठ फिरवली अशी बातमी आहे. संघ व गडकरींनी मोदींचा अपेक्षाभंगच केला.
मोदी व शहा यांच्या अजेंड्यावरील हिंदू मुस्लीम हा मुद्दा सोडला तर विकास, रोजगार, किसानों की भलाई हे मुद्दे आता गायब झाले आहेत. यामुळे संघ परिवार नाराज असल्याची चर्चा आहे. नागपुरात नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ संघ परिवाराशी संबंधित ३६ संघटना मैदानात उतरल्या होत्या. भविष्यात संघाचा पाठिंबा हा मोदी व शहांना मिळणार नसून तो गडकरींना असणार आहे असेच यातून ध्वनित होते.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती होती. तेव्हा मोदींविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे व अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व छगन भुजबळ होते. पण तेव्हा महाराष्ट्रात मोदींनी फक्त सहा सभा घेतल्या होत्या, तरी युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. कारण तेव्हा मोदींबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. आता २०२४च्या लोव्ाâसभा निवडणुकीत मोदी यांच्याबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार व छगन भुजबळ, काँग्रेसचे अशोक चव्हाण व नारायण राणे असे अनेक नेते बरोबर असूनही महाराष्ट्रात मोदींनी जवळपास तीस सभा घेतल्या आहेत. कारण एकच आहे की यावेळेस उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे भाजपाला मोठा फटका बसणार हे त्यांना कळून चुकले आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लगार परिषदेने जाहीर केलेल्या अहवालात १९५० ते २०१५ या काळात देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ७.८२ टक्क्यांनी घटले. तर मुस्लीम लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे असे निदर्शनास आले आहे. हिंदूंची संख्या घटली आहे असे दाखवून ‘हिंदू खतरे में है’ असे भाजपला सुचवायचे आहे. निवडणुकीत भाजपा मागे पडत आहे ही भीती असल्यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा खटाटोप भाजप करीत आहे. लोकसभा निवडणूक प्रचारकाळात हा अहवाल प्रसिद्ध करण्यामागे भाजपचा हेतू साफ नाही. काँग्रेस सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देतील असा खोटा प्रचारही भाजप करीत आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे मोदी आणि शहा हा असा अप्रचार करून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा भाजपमध्ये विलीन व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एका सभेत केले. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला नकली शिवसेना म्हणायचे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हणायचे आणि दुसरीकडे सहभागी होण्याची ऑफर द्यायची म्हणजे मोदींनी भाजपच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले आहे. मोदी आणि शहा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळी कार्ड वापरली. पण कुठलेच चालले नाही. त्यामुळे ते दोघेही वैफल्यग्रस्त झाले आहेत.
मोदी नेहमी ५६ इंच छातीचा उलेख करतात. पण तो आता पोकळ ठरला आहे. कारण त्यांच्या नेत्तृत्वाखाली दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्याशिवाय एक डझन मुख्यमंत्री असलेली राज्ये हातात आहेत. तेव्हा ४०० पारची भाजपाची वाट सोपी असायला हवी. पण ती वाट आता बिकट ठरत आहे. भाजपला साधे बहुमत मिळाले तरी खूप आहे असे भाजपचे नेते खाजगीत बोलतात. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात मोदींनी प्रचाराचे मुद्दे बदलले आहेत. त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. ‘मोदी की गॅरंटी’ मागे पडून इंडिया आघाडी सत्तेत आली तर पाकिस्तानात फटाके फोडले जातील अशी भीती दाखविली जात आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसवर टीका केली जात आहे. काँग्रेसला ५०पेक्षा जास्त जागा मिळणार नाही असा दावा ते करीत आहेत. ते असंबद्ध बोलत आहेत. खोट्याची रेषा अधिक मोठी करण्यात भाजपवाले पटाईत आहेत. सारखी चुकीची उदाहरणे द्यायची. सतत खाटे बोलायचे. मग काही काळानंतर लोकांना खोटे हेच खरे वाटायला लागते. असे तंत्र भाजपने वापरले पण जनता आता हुशार झाली आहे.
२०१४ साली ‘अब की बार मोदी सरकार’, २०१९ साली ‘मोदी है तो मुमकीन है’ तर २०२४ साली ‘मोदी की गॅरंटी’ अशा घोषणा देऊन जनतेला भुलवण्याचा प्रयत्न मोदी यांच्याकडून केला गेला. मोदी या लोकसभा निवडणूक प्रचारात सतत विषय बदलत राहिले. त्यांना एक नॅरेटिव्ह सेट करता आला नाही. मतपेढीसाठी मुस्लीमांच्या वाढत्या लोकसंख्येचा बागुलबुवा उभा केला आहे. तेच तेच रेकॉर्ड लावले जात आहे. कारण आता मोदी नावाचा ब्रॅन्ड अस्ताला जात आहे. भाजपने अयोध्येत राममंदिराची उभारणी केली. पण राम काही त्यांना पावला नाही. हरे राम, राम-राम हरी-हरी म्हणता म्हणता, ‘हे राम’ म्हणण्याची पाळी देशातील जनतेने भाजपावर आणली आहे. ४ जूननंतर मोदी आणि शहा यांना ते आराम देणार आहेत, कायमचे घरी बसवणार आहेत. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.