संतोषराव, राजकारण म्हणजे नेमकं काय हो?
– केशव बापू गटकळ, यवतमाळ
फुकटचं धान्य शिजवण्यासाठी महागडा गॅस विकत घ्यायला लावणं याला म्हणतात राजकारण…
माणसाला नेमकं काय हवं असतं?
– विश्वास भेलांडे, खालापूर
दोन वाक्यात सांगायचं झालं तर माणसाला आधी ‘ते’ हवं असतं… अन्न हो… एकदा ते मिळालं पोट भरलं… …की माणसाला नेमकं नको नको ते हवंहवंसं वाटायला लागतं… (हे कुठे शेअर केलंत तर प्लीज माझ्या नावाने शेअर करा.. माणसाला क्रेडिटसुद्धा हवं असतं ना.)
व्हॉट्सअपचा सर्वात मोठा फायदा काय वाटतो तुम्हाला?
– बीना फडतरे, कोल्हापूर
का? तुम्हाला काय वाटतं, व्हॉट्सअपवर बिझी असणार्यांनी डाटाला फाटा देऊन आटा मागत फिरावं की काय? ज्या दिवशी असं होईल ना तेव्हाच तुम्हाला व्हॉट्सअपचा फायदा कळेल.
टीव्हीवरील मालिकांमध्ये सोफा आणि खुर्च्या असताना कलाकार नेहमी उभे राहूनच का बोलतात?
– अशोक परशुराम परब, ठाणे
तुम्ही मालिका बघताना बसून बघू नका. उभे राहूनच बघा… मग बघा मालिकेत काम करणारे कलाकार झक मारत बसून बोलतील… (अहो डेली सोप डेली असतात ते… वर्ष वर्ष चालतात.. तेवढे दिवस कलाकार बसून बसून बोलले तर कढ येतील ना… तुम्हाला… दु:खाचे कढ येतील कलाकारांबद्दल… मग परत विचाराल हे कलाकार बसूनच का बोलतात?)
निवडणुकीत फार मोठा खर्च होतो हे माहीत असतानाही देशात निवडणुका का घेतात?
– निलेश पावसकर, रत्नागिरी
हे म्हणजे ‘चढते’ तरी का ‘घेतात’ असं विचारण्यासारखं झालं… (अहो निवडणुका नाही घेतल्या तर निवडणुकीला उभे राहणारे नोकर्या मागतील… त्यांना कुठून नोकरी देणार? तर त्यांना आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना बिझी ठेवण्यासाठीच निवडणुका घेतल्या जातात.)
राजकारणात प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळते का?
– विनायक रावेतकर, वाशी
तुमची नेमकी शंका काय आहे? तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका आहे? की योग्य स्थान मिळणार नाही याची खात्री आहे? (मुळात योग्य स्थान हे आयतं मिळत नाही… ते निर्माण करावं लागतं… आयतं मिळालं असतं तर आम्ही नसतो का राजकारणात गेलो… बघा, इतकं खरं सांगितलं म्हणजे किती प्रामाणिक आहे मी. पण योग्य स्थानच मिळत नाही… यावरून काय ते समजा.
थंड हवेच्या ठिकाणी एसी रूम का असतात?
– क्षिप्रा गोरे, पुणे
थंड हवेच्या ठिकाणी एसी रूम असले तरी ते एसी चालू करायलाच पाहिजेत अशी जबरदस्ती नसते.. त्यामुळे डोन्ट वरी.. किती गरम झालं तरी तुम्ही ज्या उद्देशाने थंड हवेच्या ठिकाणी जाल तो फुल एन्जॉय करा… पिकनिकबद्दल म्हणतोय मी हे तुम्ही ओळखलं असेलच.
रातोरात अब्जाधीश कसे बनावे, याचं मार्गदर्शन करणारे सर लोक लँब्रेटा स्कूटरवरून का येतात क्लासमध्ये?
– फ्रान्सिस मार्टिन, वसई
का? ते सर लोक तुम्हाला डबल सीट घेत नाहीत? कधी तुम्हाला डबल सीट घेतलं तर त्या सर लोकांना सांगा, अब्जाधीश कसे बनावे याचं मार्गदर्शन करण्यापेक्षा, दाढी मिशा वाढवून बाबा बिबा… बापू बिपू बना… पुण्यवान कसे बनावे याचा उपदेश करा. मग बघा ऑलरेडी अब्जाधीश असलेले त्यांच्याकडे यायला लागतील. आणि लँब्रेटा स्कूटरवर फिरणारे सर लोक लांबड्या लांबड्या फोरव्हीलरमधून फिरतील.
लोक एकमेकांबद्दल समोरासमोर कधी वाईट बोलत नाहीत आणि मागे कधीही चांगलं बोलत नाहीत… असं का?
– सिराज सय्यद, नसरापूर
सेम प्रश्न मला पडला होता. म्हणून एकाच्या तोंडावर त्याला वाईट बोललो. त्याने चांगलं बोलायलाही तोंड जागेवर ठेवलं नाही. तेव्हाच कळलं लोक मागूनच वाईट का बोलतात! त्यामुळे तुम्ही मागच्या आणि पुढच्या बाजूचा विचार न करता या गोष्टीचा विचार करा की माणसाला मागे आणि पुढे अशा दोनच जागा असतात… आपण मध्ये बोलायचं ठरवलं तर कुठे बोलणार ना… त्यामुळे मागे आणि पुढे अशा दोन बाजूंवरचं ‘बोलण्याचं’ समाधान माना.