महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे संपले आहेत. चौथा टप्पा २० मे रोजी आहे. कडक उन्हाळ्यात भाजपाच्या कोलांटउड्यांनी मतदारांची करमणूक होतेय. पराजयाच्या भीतीमुळे हादरलेल्या भाजपाच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांची घाबरगुंडी उडालीय. ४ जूनच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होतंय. मात्र पंतप्रधान मोदींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांना मात्र अजूनही काही चमत्कार होईल आणि महाराष्ट्रात महायुतीला किमान ४० जागा मिळतील, अशी गोड स्वप्नं पडताहेत. अंधभक्त तर सर्वच्या सर्व ४८ जागा भाजपाला मिळाव्यात म्हणून रामासकट तेहतीस कोटी देव पाण्यात ठेवण्याचा संकल्प मनाशी करत आहेत.
फक्त भाजपाच्या सुमित्रा महाजन यांच्यासारख्या सुज्ञ नेत्यांना सध्या भाजपात जे काही चाललंय ते पक्षाला खड्ड्यात नेईल हे स्पष्ट दिसत असल्यानं त्यांनी भाजपा उमेदवारांना मत देण्यापेक्षा ते नोटाला द्यावं, असं अप्रत्यक्षपणे भाजपा कार्यकर्त्यांना व पाठीराख्या मतदारांना सुचवलंय. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या म्हणाला, मोदी-शहांसकट भाजपाचा कावेबाजपणा, धूर्तपणा, दुटप्पीपणा, ढोंगीपणा, खोटारडेपणा, कृतघ्नपणा यांचे भयानक नमुने जनतेलाच नव्हे तर सच्चा भाजपनेत्यांनाही दिसत आहेत. हुकूमशाही पद्धतीने चाललेली मोदी-शहांची कारस्थानं आणि जनतेच्या खर्या समस्यांची पर्वा न करता भ्रष्टाचार्यांना जवळ करून निवडणुका जिंकण्यासाठी चाललेली धडपड आणि तडफड भाजपाला सत्तेपासूनच नव्हे तर जनतेपासून कायमची दूर नेणार आहे. जनतेची लाट भाजपविरोधात असल्याची चाहूल मोदी-शहांना पहिल्याच टप्प्यात लागल्यामुळे त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली असून त्यांचा पूर्वीचा आक्रमक नूर आणि सूर पालटलाय. ज्यांना दुखावलंय त्यांना चुचकारणार्याचा प्रयत्न एकीकडे करताना दुसरीकडे उसने अवसान आणून नको त्या विषयावर अघळपघळ बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही जोडगोळी करतेय. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्राच्या इतक्या वार्या करूनही मतदार आपल्याला ठेंगा दाखवणार आहेत याची कल्पना त्यांना आहे. ४ जून ही तारीख जसजशी जवळ येईल तसतशी त्यांची अवस्था बिकट होत जाईल. त्यांनी दावणीला बांधलेले दुसर्या पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक भंपक नेते त्यांची हुजरेगिरी करत त्यांचे गुणगान करीत असले तरी त्यांची लाचारी आणि अपरिहार्यता मतदारांच्या लक्षात आलीय. या भंपक नेत्यांना जवळ केल्याने महायुतीची मतसंख्या वाढणार नसून ती मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. पोक्याच्या या विश्लेषणानंतर मी त्याला महाराष्ट्राच्या महान मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायला पाठवला. तीच ही मुलाखत…
– नमस्कार मुख्यमंत्रीजी.
– नमोस्कार. सध्या नमोशिवाय दुसरा पर्याय नाही महाराष्ट्राला आणि देशालाही. केवढं त्यांचं कर्तृत्त्व आणि केवढी महाराष्ट्राची काळजी. महाराष्ट्रातील मतदारांचं तोंड पाहिल्याशिवाय त्यांना करमतच नाही. म्हणूनच सारखे खेपा मारतायत महाराष्ट्रात. आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने केलं नसेल महाराष्ट्रावर इतकं प्रेम. मी तर इतका भारावलोय त्यांच्या प्रेमाने की ते कधी महाराष्ट्रात येताहेत आणि मी कधी त्यांची तोंडफाटेस्तोवर स्तुती करतोय, असं होऊन जातंय मला. आनि म्हनून मी माझ्या प्रत्येक भाषणात त्यांनी आजपर्यंत देशासाठी केलेल्या त्यागाची महती सांगतो.
– मग आता कशाला घाबरलेत ते. राजकीय निरीक्षक म्हणतात की, पराभवाच्या भीतीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललीय.
– साफ खोटं. भाजपाच्या आणि महायुतीच्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वच्या सर्व जागा निवडून येतील. आनि म्हनून मी ठामपणे सांगतो की आता मी बरोबर असताना ते चारशे पार नाहीतर पाचशे पार जातील.
– पण, तुमच्या ठाण्यात तुमचे म्हस्के पडतील त्याचं काय!
– त्याला पडण्यासाठीच उभा केलाय. खूप आगाऊ आहे. साधे फोन घेत नाही कुणाचे. म्हणून झापलाय मागच्या आठवड्यात सर्वांसमोर.
– मग उभा कशाला केला?
– दुसरा उमेदवारच नव्हता ना आमच्याकडे. आता माझ्याशिवाय तगडा नेता आहेच कुठे आमच्या गटात ठाण्यामध्ये. आनि म्हनून, दुसरा कोणीही असला तरी भाजपवाल्यांनी दगा दिला नाही तर म्हस्के किमान निवडणुकीच्या कबड्डीतील टच लाईनला तरी स्पर्श करून येईल.
– म्हणजे पडणारच. बाकीच्यांचं काय?
– ते सगळे येतील.
– टच लाईनला स्पर्श करून?
– नाही रे पोक्या. जिंकून येतील. मोदींची लाट आहे ना देशात. केवढं मोठं राम मंदिर बांधलंय त्यांनी. किती योजना, किती गॅरंट्या… देश हेच कुटुंब आहे त्यांचं.
– खरंय, ज्याला स्वत:चं कुटुंब नसतं त्याचं देश हेच कुटुंब असतं. तरीही…
– तू बाकीचं काही बोलू नकोस. खूप मोठे आहेत ते. आता मी पण त्यांच्यासारखी पांढरी दाढी करून घेणाराय. डाय करून. महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील. मी गेलो होतो ना तिथे प्रचाराला. मी प्रत्येक भाषणात मोदींचा मोठेपणा, त्यांनी केलेला विकास, देशासाठी त्यांनी केलेला त्याग, परदेशात त्यांनी कमावलेले नाव याचा गौरव करत होतो ना मी. ते चायवाल्याचे पंतप्रधान झाले, तर मी रिक्षावाल्याचा मुख्यमंत्री झालो हे सांगितल्यावर तर इतक्या टाळ्या पडायच्या! आनि म्हनून, मी मोदींना सांगू इच्छितो की हा सारा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका, निराश होऊ नका. आम्ही सगळे ४०-४२ शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाही.
– म्हणजे तुम्ही आणि तुमचे गद्दार?
– अरे, आम्ही गद्दारी केली नसती तर माझ्यासारख्या एका सामान्य रिक्षावाल्याला मुख्यमंत्री होता आलं असतं?
– म्हणून गद्दारी केली तुम्ही अन्नदात्याशी?
– का करू नये? आनि म्हनून…