□ बलात्कार्याला देशातून पळून जाण्यास मदत केली हीच मोदी गॅरंटी – राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला.
■ त्यांना असल्या लोकांविषयी विशेष प्रेम आहे, हे बृजभूषणच्या मुलाला उमेदवारी दिली, त्यातूनही कळतंच आहे. वर हे नारी सन्मानाच्या बाता मारतात.
□ ठाण्यात मिंधेंविरोधात भाजपचा उद्रेक; नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने नवी मुंबई, भाईंदरमध्ये शेकडो पदाधिकार्यांचे राजीनामे.
■ म्हस्केंना शक्य झालं असतं तर इतका बाद उमेदवार दिल्याबद्दल त्यांनी स्वत:ही राजीनामा दिला असता… पण हात दगडाखाली अडकलाय, आता करतील काय?
□ महाराष्ट्रात जेथे महायुती धोक्यात, तेथेच मतदानाचा टक्का वाढला.
■ दया, कुछ तो गडबड है… ४ तारखेला दरवाजा लाथ मारून तोडायची वेळ आणणार हे लोक!
□ ईडीला संविधानिक कर्तव्याचा विसर – विशेष न्यायालयाचे कडक ताशेरे.
■ स्वामीभक्तीचा कडक गांजा मारला की बर्याच गोष्टींचा विसर पडतो… आपल्या पाठीला कणा असला पाहिजे, याचा तर सगळ्यात आधी पडतो…
□ पाच वर्षांत पाच पंतप्रधान, हा जावईशोध कुठून लावला? – शरद पवारांचा बोचरा सवाल.
■ त्यांना दुसरं काम काय आहे असले शोध लावण्याशिवाय? गटार गॅस, एक्स्ट्रा टू एबी आणि ढगांमागे दडून रडारला हुलकावणी देण्याचे शोध लावणार्यांकडून वेगळी काय अपेक्षा करताय पवारसाहेब?
□ २० वर्षांत आयआयटीच्या ११५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या.
■ यापेक्षा आयटीआयची पोरं बरी… पुढे नोकरीचीही शाश्वती नसते, तरी या मार्गाने जात नाहीत. अतिशिक्षण वाईट की त्याचं ओझं वाईट, कोण जाणे!
□ रायगड शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर मिंधे आमदार गोगावलेच्या गुंडांचा हल्ला.
■ पराभवाच्या भीतीने आता सगळेच घाबरलेले आहेत. त्यातून हे भ्याड प्रकार होतायत.
□ मराठ्यांना दिलेले कुणबी प्रमाणपत्र मिंधेंच्या अंगलट.
■ तात्पुरती वेळ मारून नेण्याचे उद्योग कधी ना कधी अंगलट येणारच होते.
□ चोरी करून सगळी यंत्रणा अजित पवार स्वत:साठी वापरत आहेत – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल.
■ त्यांना वॉशिंग मशीनने प्रमाणपत्र दिलेलं आहे रोहितराव, असा चिखल उडवू नका!
□ जातीयवादी भाषण देणारे पंतप्रधान म्हणून तुम्हाला लक्षात ठेवले जाईल- मल्लिकार्जुन खरगे यांनी डागली मोदींवर तोफ.
■ हे फारच सौम्य वर्णन झालं त्यांचं. पंतप्रधानपदाची गरिमा आपल्या सवंग आचरणाने, बुद्धीने आणि भाषेने धुळीला मिळवणारे पंतप्रधान हेच त्यांचं यथार्थ वर्णन राहणार आहे इतिहासात.
□ संविधान बदलण्याचा भाजपचा डाव – संभाजीराजे छत्रपती.
■ तसा प्रयत्न करून तर पाहू देत, लोक संविधानाची ताकद दाखवून देतील.
□ मोदींची आणि एखाद्या दारुड्याची वृत्ती सारखीच – अॅड. प्रकाश आंबेडकर.
■ घरात असेल नसेल ते किडुक मिडुक विकायचं आणि सत्तेची लत भागवायची… पण, त्यांना सोयीचं राजकारण का करता मग बाळासाहेब?
□ मोदींनी भ्रष्टाचाराची सर्वात मोठी योजना आणली – प्रियंका गांधी.
■ वर आपण सर्वात स्वच्छ असल्याचा टेंभाही केवढा मोठा.
□ बृजभूषण यांचे तिकीट कापले; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण भोवले.
■ पण, त्याच्या मुलाला तिकीट दिलंच… तो निवडून आला तर सत्ता अत्याचारी बृजभूषणच्याच हातात राहणार.
□ यशवंत जाधवांच्या विरोधात घोषणा देणार्या भाजप कार्यकर्त्यांवर त्यांच्याच ‘झिंदाबाद’च्या घोषणा देण्याची वेळ.
■ मुलुंडच्या पोपटलालइतका निर्लज्जपणा अंगी बाणवा, काही लाज वाटणार नाही. अशीही आता उरली कसली आहे?
□ ठाण्यात मिंध्यांच्या मिरवणुकीत गँगवॉर; कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे.
■ गँगस्टर गद्दार एकत्र आल्यावर काय गरबा खेळतील?
□ मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीवर राज्य निवडणूक आयोगाचे हात वर.
■ चार तारखेला झोल झाला तर जनउद्रेक निवडणूक आयोगाला वर पाठवेल हातांसकट… न्यायालयाच्या दारात हो!
□ मोदींनी शब्द पाळला नाही, आता त्यांचा पराभव करणे ही आपली जबाबदारी – शरद पवार.
■ मोदी शब्द पाळतील, असं तुम्हालाही वाटलं होतं पवार साहेब?
□ खडसे भाजपात की राष्ट्रवादीत? भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाय संभ्रम.
■ कुठेही असले तरी काय फरक पडतो आता. वात काढून विझवून टाकलेला फटाका बनले आहेत ते.
□ अमित शहांच्या सभेचा फज्जा; रत्नागिरीत खुर्च्या रिकाम्याच
■ मोदींच्या पुण्याच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या, तर अमित शहांचं काय कौतुक कुणाला?
□ जप्तीची कारवाई करत भाजपने माढ्यातील राष्ट्रवादीचा नेता पळवला.
■ ब्लॅकमेलर जनता पार्टी आहे ही… घ्या उद्धव साहेब, आणखी एक लाँग फॉर्म!
□ आता सहनशीलतेचा अंत पाहू नका – सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा.
■ ताई, त्यांना स्क्रिप्टनुसार बोलावंच लागेल. चार तारखेलाच त्यांचीही सुटका होईल.