सखारामाची आणि हंसाची
जोडी नवसाची, राजहंसाची।।
एक दुसर्याचा भोळा भक्त ।
काटा एकाला, दुसर्याला रक्त।
राज्य दोघांचं, दोघांचं तक्त ।
मीठ-भाकरीत दोघंजण खुशी।
नांदती कोट्यात कबुतरं जशी।।
‘सांगते ऐका’ चित्रपट डोळ्यापुढे आणा. तो शेवटचा सर्व कथाभाग वर्णन करणारा गदिमा लिखित वग, वसंत पवारांनी त्याला दिलेलं अप्रतिम संगीत आणि आशा भोसलेंच्या गळ्यातून उमटलेलं गीत आणि आणि सखाराम आणि हंसा यांची रुपेरी पडद्यावरील ती कबुतरांची जोडी, चंद्रकांत आणि सुलोचना! त्या पाठोपाठ आपोआपच डोळ्यापुढे साकारणारं ते तलम गीत, हे उठ रामराया झाली भली पहाट। सुलोचना आणि चंद्रकांत ही अस्सल गावरान जोडी लाजवाब!
गोपाळ तुकाराम मांढरे हे तुमच्या आमच्यासारखेच नाव असलेले गरीब कुटुंबातील एक मूल. जन्म १३ ऑगस्ट १९१३. वडील तुकाराम मांढरे लुगडी विकण्याचा आणि इंग्रजी टोप्या विकण्याचा व्यवसाय करीत. मुक्काम कोल्हापूर शनिवार पेढेत वास्तव्य. कधी कधी ते अत्तरेही विकत असत. गोपाळचे शिक्षण सहावीपर्यंत हरिहर विद्यालय आणि प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर येथे झाले. शिक्षणात फारशी प्रगती झाली नसली, तरी या मुलाच्या बोटात जादू होती. चित्रकलेची उपजत आवड आणि ब्रशवर हुकमत. भाई माधवराव बागल जसे राजकारणात तरबेज होते तसे कलाक्षेत्रातही. चित्रकलेतही पारंगत होते. त्यांनी गोपाळला कोल्हापुरात प्राथमिक धडे दिले. गोपाळच्या वडिलांनी त्याला कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्याकडे नेले आणि ‘त्याच्या करण्याजोगे काम द्या’ अशी विनंती केली.
बाबा गजबर हे बाबुरावांचे स्नेही ते चित्रकलेचे ओब्रायन हायस्कूलमधील शिक्षक होते. त्यांनी गोपाळला चित्रकलेचे शिक्षण दिले आणि ड्रॉइंगच्या इंटरमिजिएट परीक्षेला बसविले. गोपाळ उत्तम गुणांनी, ग्रेडने उत्तीर्ण झाला. त्याच सुमारास कोल्हापूरला राजाराम आर्ट सोसायटीतर्पेâ चित्रप्रदर्शन स्पर्धा योजिली होती. गोपाळने आपले जलरंगातले `पन्हाळा’ हे चित्र स्पर्धेसाठी पाठविले आणि त्याला रौप्यपदक मिळाले. या मुलात कलागुण दडलेले आहेत. त्याला अधिक संधी मिळाली पाहिजे म्हणून बाबा गजबर यांनी त्यांना सांगलीला पाठविले. चिंतामणराव कोल्हटकर आणि मा. दीनानाथ मंगेशकर यांची `बलवंत पिक्चर्स’ ही संस्था चित्रपटाच्या निर्मितीत मग्न होती. त्या कंपनीत गोपाळला पोस्टर्स रंगविण्याचे काम मिळाले. पगार रुपये पंधरा. पण दुर्दैवाने बलवंत पिक्चर्स कंपनी बंद पडली आणि गोपाळ काही काम नाही अशा अवस्थेत सांगली सोडून पुन्हा कोल्हापूरला परत आला.
या ठिकाणी त्याला बाबुराव पेंटरांनी हात दिला आणि आपल्या शालिनी स्टुडिओमध्ये `उषा’ या चित्रपटासाठी पोस्टर्स रंगविण्याचे काम दिले. पगार रुपये पंचवीस. सुरुवातीच्या काळात बाबुराव पेंटरांनी `सावकारी पाश’ हा मूकचित्रपट तयार केला होता. त्यात व्ही. शांताराम यांनी तरुण शेतकर्याची भूमिका केली होती. मध्यंतरीच्या काळात चित्रपट बोलू लागला होता. `सावकारी पाश’ बोलपट करण्याची कल्पना बाबुरावांच्या मनात आली. एके सकाळी गोपाळ स्टुडिओमध्ये आपले पेंटिंगचे काम करण्यात मग्न होते. बाबुराव पेंटरांकडून निरोप घेऊन एक कामगार आला आणि त्याने बाबुरावांचा निरोप गोपाळला सांगितला, `बाबुरावांनी सांगितले आहे, डोक्यावरचे सगळे केस काढून, चकोट करून ताबडतोब मला येऊन भेट.’ गोपाळने बाबुरावांच्या आज्ञेप्रमाणे डोक्यावरचे केस भादरले आणि बाबुरावांसमोर जाऊन उभा राहिला. बाबुरावांनी त्याला नीट न्याहाळला. अंगावर गरीब शेतकर्याचा पोशाख चढवायला सांगितला आणि काही क्षणातच गोपाळला `सावकारी पाश’मधली तरुण शेतकर्याची भूमिका करण्याची संधी मिळाली. गोपाळची ही भूमिका प्रचंड गाजली. गरीब जनतेला लुबाडणार्या सावकारशाहीच्या विरोधातला हा सामाजिक चित्रपट सर्वत्र अतिशय यशस्वी झाला. पं. जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांसारख्या राजकीय पुढार्यांनी हा चित्रपट पाहून गौरवोद्गार काढले. असा हा सामाजिक वास्तववादी पहिला चित्रपट. १९३६ सालचा हा बोलपट आजही तितकाच ताजा टवटवीत आहे. किंबहुना अधिकच आशयसंपन्न आहे. चित्रपट हे कॅमेर्याचे माध्यम आहे हे सर्वार्थाने सिद्ध करणारा चित्रपट.
‘सावकारी पाश’नंतर १९३८मध्ये व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला `ज्वाला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार चंद्रमोहन यांचे गोपाळ मांढरे हे सहकलाकार होते. योगायोगाने याच काळात प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम करणारे भालजी पेंढारकर ऊर्फ बाबा यांच्या संपर्कात गोपाळ मांढरे आले. भालजी त्यावेळी ‘राजा गोपीचंद’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत मग्न होते. त्यांनी भरपूर उंची, रुबाबदार, राजबिंडा, देखण्या अशा गोपाळ मांढरे यांची गोपीचंदाची भूमिका करण्यासाठी निवड केली. नुसती निवडच केली नाही, तर त्यांचे नवे नामकरणही केले. चंद्रकांत! यापुढील गोपाळ तुकाराम मांढरे यांची ओळख अवघ्या रसिकांना, कलासृष्टीला, झाली ती चंद्रकांत मांढरे आणि काही काळानंतर तर केवळ चंद्रकांत या नावानेच! त्याचप्रमाणे गोपाळ मांढरे यांचे धाकटे बंधू वामन तुकाराम मांढरे यांचेही नामकरण केले सूर्यकांत! चंद्रकांत-सूर्यकांत ही राम-लक्ष्मणाची जोडी आजही आपल्या कलाकौशल्यामुळे आणि अभिनयामुळे चित्रसृष्टीत अजरामर आहे.
`राजा गोपीचंद’नंतर चंद्रकांत यांचं भाग्य उजळलं असं म्हणायला काहीही हरकत नाही. तसं भविष्य तर मा. दीनानाथ मंगेशकरांनी गोपाळ मांढरे जेव्हा बळवंत पिक्चर्समध्ये पडदे रंगविण्याचे काम करीत होते. म्हणजे १९३१ सालीच वर्तवले होते. मा. दीनानाथ मंगेशकर उत्तम भविष्य जाणणारे होते. `रमल’ या भविष्यकथन विषयाचा त्यांचा गाढा अभ्यासही होता.
चंद्रकांत यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीमध्ये ७७ मराठी १४ हिंदी आणि एक इंग्रजी (‘लाईन्स ऑफ द रॉक’) चित्रपटात भूमिका केली. १९३४ ते १९८० अशी चंद्रकांत यांची चित्रपटसृष्टीची यशस्वी कारकीर्द आहे. १९८०मध्ये त्यांनी या चित्रपटसृष्टीमधून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. पण अमोल पालेकर यांच्या ‘बनगरवाडी’ या चित्रपटात १९९७ साली `म्हातारा कारभारी’ ही भूमिका केली. खरा कलावंत कधीही निवृत्त होत नाही हेच सत्य!
चंद्रकांत यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांची यादी भरपूर लांबीची आहे. ‘सावकारी पाश’, ‘राजा गोपीचंद’, ‘ज्वाला’, ‘शेजारी’, ‘थोरातांची कमळा’, ‘रामराज्य’, ‘भरतभेट’, ‘जय मल्हार’, ‘मानाचं पान’, ‘राम राम पाव्हणं’, ‘मीठभाकर’, ‘नवरंग’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘वादळ’, ‘तारका’, ‘मुकं लेकरू’, ‘भाऊबीज’, ‘सांगत्ये ऐका’, ‘पाटलांचं पोर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘शिवा रामोशी’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘ईर्षा’, ‘अष्टविनायक’, ‘भालू’, ‘महारथी कर्ण’, ‘मेरे लाल’, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘खंडोबाची आन’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पतिव्रता’ आणि अनेक…
सात्विक, सोज्वळ, शांत, उर्मट, भाबडा, क्रूर, मर्दानी, रांगडा असे विविध भाव प्रगट करणार्या भूमिका त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने यशस्वी केल्या. `रामराज्य’ आणि `भरतभेट’ या दोन चित्रपटात त्यांनी रामाची भूमिका साकारली. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी राम. या दोन्ही चित्रपटांत त्यांच्यासमवेत सीतेची भूमिका केली होती प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ यांनी. पुढील काळात `स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटात त्यांनी रावण उभा केला. रावण हा व्युत्पन्न ब्राह्मण, शिवभक्त आणि संगीत कलाप्रेमी आहे. `रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गदिमा रचित, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गायलेलं गीत चंद्रकांत यांनी रुपेरी पडद्यावर तितकंच जिवंत साकारलं आहे.
‘जय मल्हार’मधील रगेल, रंगेल पाटील, ‘मानाचं पान’मधला तरुण पेहलवान, ‘सांगत्ये ऐका’मधील साधा सरळ शेतकरी गडी, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’मधील निर्दय दरोडेखोर, ‘पवनाकाठचा धोंडी’मधील भावावर जिवापाड प्रेम करणारा थोरला भाऊ, ‘राम राम पाव्हनं’मधील भावाच्या ताटातुटीमुळे व्याकुळ झालेला मोठा भाऊ, ‘थोरातांची कमळा’मधील ऊग्र प्रकृतीचा संभाजी आणि सर्वात कळस म्हणजे ‘छत्रपती शिवाजी’मधील रयतेचा जाणता राजा शिवछत्रपती!
चंद्रकांत यांनी भूमिका केलेले सर्वच चित्रपट मी लहानपणापासूनच आवडीने पहात आलो आहे. मला स्वत:लाच नाटक, चित्रपट, संगीत या विषयांची रुची असल्यामुळे जसजसं वय वाढत गेलं तसतशी या चित्रपटांकडे बघण्याची दृष्टी बदलत गेली. चंद्रकांत यांच्या यशस्वी कलाकारकीर्दीचे रहस्य माझ्या कुवतीप्रमाणे शोध घेऊ लागलो.
चंद्रकांत मांढरे यांचे वडील तुकाराम मांढरे हे स्वत: नाटक चित्रपटांचे शौकिन होते. त्यांनी बाबुराव पेंटर यांच्या `गजगौरी’ चित्रपटात भूमिका केली होती. त्यांनी मुलाला बाबुराव पेंटर यांच्याकडे सोपवलं, बाबा गजबर, माधवराव बागल असे कलेचे निस्सीम, नामांकित उपासक गुरू त्यांना लाभले. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांच्यासारखे तपस्वी चित्रपट दिग्दर्शक त्यांना मिळाले आणि स्वत: चंद्रकांत यांची कलेविषयी निष्ठा, मेहनत घेण्याची प्रबळ इच्छा आणि गुरू आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे तंतोतंत वागण्याची आज्ञाधारक विद्यार्थ्याची प्रामाणिकता!
`सावकार पाश’मध्ये बाबुराव पेंटरांना आज्ञा करताच डोक्यावरचे केस कापून ते हजर झाले. आखूड धोतर, बंडी घालून महिनाभर वावरले आणि मगच अंगात तो शेतकरी भिनवून ते ‘सावकारी पाश’मधल्या भूमिकेसाठी तयार झाले. `शेजारी’ चित्रपटात शांताराम बापूंनी पुण्याच्या शेतकी महाविद्यालयातून खिल्लारी बैलांची जोडी, बैलगाडी आणि त्याचा सगळा सरंजाम आणला होता. त्या बैलाबरोबर ढेकळे तुडवीत शेतातून चालणे, बैलांना गाडीला जुंपणे, बैलांना प्रेमाचा लळा लावणे आणि गाडीवर उभे राहून बैलांचा कासरा हाती धरून बैलगाडी भरधाव पळविणे या सर्व गोष्टी बारीकसारीक तपशीलासह त्यांनी आत्मसात केल्या. या सर्व गोष्टींचा उपयोग त्यांना पुढील काळातही चित्रपट करताना झाला. `सांगत्ये ऐका’ या चित्रपटातील अचानकपणे झालेली पाटलाच्या आणि सखारामाच्या बैलगाडीची शर्यत. ते दृश्य डोळापुढे आणा.
‘भरतभेट’ चित्रपटातील राम वनवासी आहे. राम रंगाने सावळा. अंगावर तापस वेष. त्यामुळे बरचसे अंग उघडे. जो चेहर्याचा रंग आहे तोच शरीराचाही हवा, या जाणिवेमधून त्यांनी सर्व शरीरभर मेकअप केला होता.
`थोरातांची कमळा’मधील संभाजीची भूमिका करताना भालजी पेंढारकरांनी त्यांना घोड्यावर बसण्याची, त्याला हवा तसा दौडविण्याची कला आत्मसात करायला लावलीच होती. ढाल, तलवार, भाला, बरची, फरशी, कुर्हाड ही शस्त्रास्त्रे चालविण्याचेही पद्धतशीर शिक्षण त्यांनी घेतले होते आणि कुस्तीचे डावपेचही. म्हणूनच ‘मानाचं पान’मधील आखाड्यातील बाबुराव पेंढारकर यांच्याबरोबर केलेली सरावाची कुस्ती असो अथवा वसंत ठेंगडी यांच्याबरोबरची फडातील कुस्ती असो, कोठेही खोटेपणा जाणवत नाही.
`छत्रपती शिवाजी’मधील शिवाजी राजांची भूमिका साकारताना भालजींनी त्यांच्याकडून अनेक शिवचरित्रांचे वाचन करून घेतले होते. शिवाय `व्रतस्थ’ वृत्तीने राहण्याचे वचनही घेतले होते. ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेला एक प्रसंग जाणकार आवर्जून सांगतात, चित्रीकरण पन्हाळगडावर सुरू होते. प्रसंग असा होता की शिवाजी राजे घोड्यावरून दौडत दौडत कड्याच्या टोकापाशी येतात आणि कड्याच्या टोकाशी घोडा थांबतो. घोडा सरावाचा. आज्ञाधारक होता. चंद्रकांतही उत्तम रीतीने घोडेस्वारी करणारे सराईत. दौडत दौडत घोड्यावरून कड्याच्या टोकापाशी आले की घोडा योग्य त्या ठिकाणी थांबे, पण शिवाजी राजांच्या (चंद्रकांत) यांचे चेहर्यावरील भाव मात्र भालजींना हवे तसे उमटत नव्हते. चार-पाच रिटेक झाले. पण जमेना. अखेर भालजी ओरडले, ‘गोपाळा, घाबरू नको. कड्यावरून कोसळून घोडा आणि तू दरीत कोसळलात तर तू छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील.’ भालजींच्या या शब्दांनी चंद्रकांतना धीर आला आणि पुढला टेक… ओ.के.
अशी श्रद्धा, शिस्त, धाडस, भरपूर मेहनत करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता आणि कलेवरील अव्यभिचारी निष्ठा हेच चंद्रकांत मांढरे यांच्या यशाचे गमक आहे. त्याचे श्रेयही त्यांना निश्चितपणे मिळाले. `युगे युगे मी वाट पाहिली’, `पवनाकाठचा धोंडी’, `संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चंद्रकांत हे उत्तम कलाकार होतेच, पण मुळात ते उत्तम निसर्गचित्रकार होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्यक्ष प्रवास करून त्यांना जलरंगातील ऑईलपेंटमधील उत्कृष्ट निसर्गचित्रे रंगवली आहेत. शिवाय `चारकोल पेंटिंग’ ही दुर्मिळ झालेली चित्रकला त्यांनी जपली, जोपासली आणि पुढील होतकरू पिढीला शिकवलीही. दर मे महिन्याच्या सुट्टीत ते मुलांना निसर्गचित्रे, पावडर शेडिंगची चित्रे यांचे एकही पै न घेता शिक्षण देत. उद्देश एकच पुढील पिढीपर्यंत कला जावी, प्रगत व्हावी. फ्रान्स, नेपाळ, अमेरिका या देशांतूनही त्यांची चारकोल पेंटिंग्ज वखाणली गेली होती.
कोल्हापूर येथील त्यांच्या बंगल्याचे नावच आहे `निसर्ग’! या निसर्ग बंगल्याचे आता `चंद्रकांत मांढरे कलादालना’त कलासंग्रहात रुपांतर झाले आहे. १९८४मध्ये त्यांनी आपली ४००हून अधिक `निसर्गचित्रे’ आपल्या `निसर्ग’ या बंगल्यासह महाराष्ट्र सरकारच्या स्वाधीन केली. १७ फेब्रुवारी २००१ हा चंद्रकांत मांढरे यांचा या निसर्गनिर्मित जगातील अखेरचा दिवस. त्यांनी या दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि ते पंचत्वात विलीन झाले. अत्यंत यशस्वी, समाधानी जीवन जगून. `मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ हे समर्थ वचन चंद्रकांत यांनी सार्थ करून दाखविले. कोल्हापूरला गेलात तर जितक्या श्रद्धेने अंबाबाईचे देऊळ, रंकाळा तलाव, शिवाजी पुतळा इतर प्रसिद्ध स्थळे पाहाल, त्याच भावनेने `निसर्ग’ बंगल्यातील चंद्रकांत मांढरे कलासंग्रहही बघाच बघा! कोल्हापूरचे ‘कलापूर’ हे नाव किती योग्य आहे याची प्रचिती आपल्याला येईल.