अंकुश सखाराम पाटील, वय वर्षे चौतीस, एका अल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा. राहणार लाडजळगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर. तसे शिक्षण फारसे नाही. अवघ्या नऊ इयत्ता पार केलेला अंकुश. लाडजळगावसुद्धा तालुक्याच्या शहरापासून ३०-३५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तशी रोजगाराच्या संधींची कमतरता असतेच.
अंकुश यांच्या वडिलांचा लहानसा केटरर्सचा व्यवसाय. गावातील आणि आजूबाजूच्या गावातील विविध शुभप्रसंगी, कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांकरता स्वयंपाक बनवून देणे. फार मोठा व्यवसाय नव्हता. मात्र कसेबसे घर चाले. शिक्षण अर्ध्यातच सुटल्यानंतर अंकुश गवंडी काम करणार्याच्या हाताखाली बिगारी काम करू लागले. गावात, आजूबाजूच्या गावांत घराची बांधकामे चालू असत. तिथे ते मजुरीचे काम करू लागले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांच्यावर मजुरी करण्याचा प्रसंग आला. सलग दोन वर्षे ते बांधकाम मजूर म्हणून राबले. त्यानंतर पुढे दोन वर्षे गावातील एका मित्राच्या सोबतीने ते विहिरीवरच्या कामाला जाऊ लागले. विहीर खणणे असे ते काम असे. विहीर खणण्याचे काम उन्हाळ्यात केले जाते. सलग दोन उन्हाळे अंकुश यांनी विहिरीचे काम केले. पडेल ते काम करणे एवढाच उपाय होता. घरात पैशाची गरज लागत असे. ते असे कष्ट करून ती गरज भागवण्यासाठी कुटुंबाला मदत करत असे.
पुढे ते बोधेगावला मिठाई विक्री करणार्या आयुबभाई शेख यांच्याकडे कामाला लागले. हे दुकानदार, ज्यांना हलवाई म्हटले जाते, ते आठवडी बाजारात पालं टाकून (स्टॉल लावून) पेढे, शेव, चिवडा, गोडीशेव, जिलेबी, बर्फी विकत असतात. त्यांचे एक वर्ष तर पुड्या बांधणे, मालाची ने-आण करणे, गिर्हाईकाला खाऊ, शेव चिवडा बांधून देणे यात गेले. पुढे वर्षभरानंतर एकेक गोड पदार्थ कसे बनवायचे हे त्यांना शिकण्याची संधी मिळाली. जात्याच कष्टाळू स्वभाव असल्यामुळे ते समरसून शिकू लागले. एकेक खाद्यपदार्थ कसा बनवायचा हे समजू लागले, ते स्वत: उत्तमरित्या बनवू लागले. मालकाच्या व्यवसायात त्यांनी कारागिराची जबाबदारी पेलली. मालकाला मदत होऊ लागली. बोधेगाव या वर्दळीच्या ठिकाणी ते काम करत होते.
आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारला स्टॉल लावणे, तिथे माल बनवणे, विकणे, काही माल आधीच बनवून नेणे. दिवसभर आठवडी बाजारात माल विकणे, उन्हं उतरली की बाजार आटोपतो, तसे आपापल्या घराकडे जाण्यासाठी माघारी येणे. दुसर्या दिवशी दुसर्या गावचा बाजार. आठवड्यातून चार-पाच दिवस बाजारच चाले. शिवाय गावोगावच्या यात्रा जत्रा आहेतच. तिथेही जोरदार विक्री होत असते. बाजारात, जत्रेत आलेला प्रत्येक शेतकरी, गावकरी माणूस आपल्या घरातील लेकरांना खाण्यासाठी शेव, चिवडा, गोडीशेव नेणारच, असा शिरस्ता आहे. पोरं दारात बाजारातून येणार्या घरच्या माणसाची उंबर्यात बसून वाटच पाहत असतात. त्यामुळे बाजाराला गेलेला माणूस रिकाम्या हाताने येतच नाही.
अंकुश इकडे हलवायाकडे काम करीत होते आणि त्यांचे वडील विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंपाकाचे काम करीत होते. लग्न, साखरपुड्याच्या प्रसंगी जेवणं बनवण्याचे काम करीत असत. त्यांचा व्याप फार मोठा नव्हता. मात्र काम व्यवस्थित चाले. अंकुश आपले काम सांभाळून त्यांना जमेल तशी मदत करत असे.
गावात राहणारे विठ्ठल लादे हे केटरर्स क्षेत्रात काम करणारी जुनी असामी. अंकुशने २०१३ साली केटरर्स क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. वडिलांचा कामाचा वारसा पुढे चालवायचा निर्णय घेतला. विठ्ठल लादे यांनी अंकुश यांना हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला कामे मिळवून दिली, शिवाय कायम सहकार्य केले. विठ्ठल लादे यांना अंकुश आपला गुरूच मानतात.
तर त्यांनी ‘सावता केटरर्स’ नावाने व्यवसाय सुरू केला. या कामात दिलेला शब्द पाळणे, माणसांची टीमसोबत असणे, स्वच्छता, पदार्थाची चव या गुणांना विशेष महत्त्व आहे. शिवाय अंकुश यांना कसलेच व्यसन नाही. त्यामुळे तोंडात गुटखा-तंबाखूचा बकाणा भरलेले स्वयंपाक बनवणारे लोक पाहताच गदळ वाटतात. त्यांच्या हातचे अन्न ग्रहण करायचे म्हणजे एक प्रकारे शिक्षाच असते, मात्र पर्याय नसतो. अंकुश निर्व्यसनी तरुण मुलगा, कामाला वाघ होता. कष्ट करण्याची तयारी आणि धमक होती, आणि त्यांनी खाद्यपदार्थ बनवण्यात प्राविण्य मिळविले होते. इतक्या वर्षांची मेहनत कामी येणार होती.
ते जरी राहायला लाडजळगावात असले तरी त्यांना आजूबाजूच्या गावातून काम मिळू लागले, त्यांचा स्वत:चा जनसंपर्क मोठा होता. ते तब्बल सात वर्ष आठवडी बाजार करत होते. त्यामुळे त्यांना लोक ओळखू लागली होती. वडिलांच्या आणि विठ्ठल लादे यांच्या ओळखीतून त्यांना कामे मिळत गेली.
गावाकडे कायम विविध कार्यक्रम सुरूच असतात. लग्न, साखरपुडा, जागरण, गोंधळ, बारसे, दशक्रिया विधी, तेरावे, वाढदिवस या कार्यक्रमाच्या प्रसंगी जेवणावळी उठतात. अशा प्रसंगी अंकुश पाटील यांच्या सावता केटरर्सला कामाची ऑर्डर मिळते अन् मग अंकुश आपली सारी टीम सोबतीला घेऊन त्या कार्यक्रमात आपल्या हातचे सुग्रास अन्न बनवून आलेल्या पाहुण्यांना आनंदी करतो.
लोकांशी विनम्रतेने बोलणे, प्रेमाने बोलणे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काय आणि कसे बोलले पाहिजे याचे ज्ञान अंकुश यांनी सात वर्षे आठवडी बाजार करून अनुभवातून मिळवले आहे. त्याचाच उपयोग त्यांना केटरर्सच्या या व्यवसायात होतो आहे. केलेले कुठलेही काम वाया जात नाही. त्याचा उपयोग होतच असतो. फक्त माणसाला बिंदूजोडणी करता आली पाहिजे, जी अंकुश यांना जमली.
सुरुवातीचा काळ लोकांना, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात गेला, असे अंकुश सांगतात. कारण शेकडो ते काही हजार लोकांचा स्वयंपाक बनवणे तसे म्हणजे प्रचंड जबाबदारीचे काम असते. त्यात वेळ पाळावी लागते. कितीही अडचण असली तर यजमान व्यक्तींना कारण देऊन काम टाळता येत नाही. एकदा शब्द दिला की तो पाळावाच लागतो. कुठल्याही कारणाने काम टाळणे शक्यच नसते. म्हणून हे अतिशय जबाबदारीचे काम आहे. शब्दाला खरे उतरावेच लागते. मात्र शब्द पाळला, उत्तम व्यवहार ठेवला तर ह्या क्षेत्रात कामाची कमी नाहिये, असे समजते.
एका व्यक्तीच्या कार्यक्रमात केटरर्सचे काम केले की तिथे उपस्थित असणारी माणसे जेवण कोणी बनवले आहे, खूप छान बनवले आहे, असे सांगतात आणि यजमानाकडून अंकुश यांचा मोबाईल नंबर घेतात आणि त्यांच्याकडे असा कार्यक्रमाचा प्रसंग आला की अंकुश यांना बोलवले जाते.
सारा प्रचार अनुभवावर आधारित असतो. एकाला काम आवडले की तो दुसर्याला सांगतो आणि अंकुश यांना काम मिळते. आजपर्यंत अंकुश यांच्या ‘सावता केटरर्स’ने पन्नासपासून तर पाच हजार लोकांसाठी स्वयंपाक बनवला आहे. आज अंकुश यांच्या पाठीशी अतिशय दांडगा अनुभव आहे. त्यामुळे दोनशे पाचशे तर अगदी पाच सहा हजार लोकांसाठी स्वयंपाक बनवण्याचे कौशल्य त्यांनी कमावले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्याची क्षमता कमावली आहे. वरण भात, पुलाव, मसाले भात, पुरी भाजी, चपाती, बुंदी, जिलेबी, पापड, लोणचे असे पदार्थ असतात. ग्रामीण भागाची एक वेगळीच अर्थव्यवस्था असते. ती अशी कार्यरत असते.
याचसोबत अंकुश यांचे जवळपासच्या गावातील अनेक मंगल कार्यालयांचे मालक, लॉनमालक यांना स्वयंपाक बनवून देण्याचे काम चालूच असते. हॉल, लॉन्सकडून मोठा व्यवसाय मिळतो. त्यांच्याकडून मोठमोठे कंत्राट मिळतात. त्यामुळे अंकुश यांचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत चालला आहे. जमिनीवर काम करणे, ग्राहकांशी थेट संपर्क, आपल्या सहकार्यांसोबत स्वत:ही कार्याच्या ठिकाणी अंग मोडून करण्याच्या सवयीमुळे काम वाढतच आहे. आज आजूबाजूच्या दहा-बारा गावांमध्ये अंकुश यांना बोलावले जाते. त्यांना आणि त्यांच्या टीमला कोविडनंतर वर्षभर काम असते. एक दिवस म्हणून सुट्टी नसते. शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव, बोधेगाव, मातुरी, नागलवाडी, गोळेगाव शेकटे, वाडगाव, कोरडगाव, कळसपिंपरी, शिंगोटी ह्या गावांत सातत्याने काम सुरूच असते.
सध्या हा युवक वीसेक जणांचे मनुष्यबळ सांभाळतो, त्याने स्वत:साठी रोजगाराचे साधन तयार केलेच आहे, मात्र या वीसेक जणांसाठीसुध्दा रोजगार उभा केला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्टाच्या जिवावर अंकुश यांनी मार्केटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.