पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी मोठा गाजावाजा करीत अयोध्येतील रामजन्मभूमी येथे राममंदिरात तिरुपतीच्या बालाजीसारख्या दिसणार्या रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. अवघ्या भारतवर्षाने हा सोहळा हर्षोल्लासात साजरा केला. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या असंख्य शिवसैनिकांसह साजरा केला. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नव्हे तर स्वाभिमानाचा, अस्मितेचा विषय आहे, असे मोदी यांनी सांगितले. पण, प्रत्यक्षात १७ एप्रिल २०२४ रोजी आलेल्या रामनवमीच्या ऐवजी २२ जानेवारी २०२४ हा दिवस मोदी यांनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त म्हणून शोधला तो लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता रामनवमीच्या दिवशी असेल म्हणूनच.
ठरल्याप्रमाणे रामभक्तांसाठी राममंदिर खुले केले (पूर्ण बांधकाम झाले नसले तरी). नियोजनानुसार लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. आदर्श आचारसंहिता भारतीय निवडणूक आयोगाने लागू केली. याच आचारसंहिता काळात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अर्थात भारतीय जनता (इव्हेंट) पार्टीने रामनवमीच्या उत्सवाचा आणि अयोध्येतील रामलल्लाचा उपयोग आपल्या प्रचारासाठी केला नाही तरच नवल! तसेच घडले… रामलल्लाची विलोभनीय मूर्ती एका बाजूला आणि ‘ज्यांनी रामाला आणले त्यांना आम्ही आणणार’ (जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे) अशा आशयाची पत्रके वर्तमानपत्रांतून रामनवमीच्या दिवशी घराघरात पोहोचली आणि आकाशवाणीवर तीन महिने ‘मन की बात’ बंद असली तरी भारतीय जनता पार्टीने आपले नाव, पक्षचिन्ह न छापता घराघरात ही ‘मन की बात’ बेमालूमपणे पोहोचविली.
आदर्श आचारसंहितेनुसार कोणत्याही पत्रकात पत्रक छापणार्याचे, प्रकाशकाचे नाव आणि किती प्रती छापल्या, ते त्या पत्रकावर नमूद करावे लागते. रामनवमीच्या दिवशी अशी पत्रके वितरित करण्यात आली. याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली असेलच. पण राममंदिर आणि अयोध्येतील रामलल्लाची विलोभनीय मूर्ती पत्रकांवर छापून धर्माच्या आधारे निवडणूक प्रचार करण्याचा मोह राज्यकर्त्या भाजपाला आवरता आलेला नाही. भले पक्षाचे नाव आणि चिन्ह (निवडणूक निशाणी) नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करतानाचे छायाचित्र आणि खाली एका उमेदवाराचे छायाचित्र हे काय दर्शविते?
मोदी गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र छातीठोकपणे ‘अब की बार चारसौ पार’ अशा आत्मविश्वासाने नारे लगावत आहेत. सर्वत्र मोदी की गॅरंटी असे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष राणा भीमदेवी थाटात बोलत आहेत, तीसरी बार मोदी सरकार, अशा घोषणा देत आहेत. भाजपने आयात केलेल्या मित्रपक्षांच्या जाहिरातीतूनही मोदी की गॅरंटी अशा घोषणा देत आहेत. मोदींपेक्षा मित्रपक्षच ही ‘गॅरंटी’ मोठमोठ्या आवाजात देत आहेत.
असे असले तरी ‘इंडिया’ आघाडीच्या जबरदस्त आव्हानामुळे भाजपला मोदींसाठी अयोध्येतील ‘रामलल्ला’ची ‘गॅरंटी’ हवी असल्याचे रामनवमीच्या दिवशी वर्तमानपत्रांतून वितरित करण्यात आलेल्या ‘जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे’ या रामलल्लाच्या पत्रकांवरुन दिसून येते.
जे प्रभू रामचंद्र या विश्वाचे पालनहार आहेत, अशा प्रभू रामचंद्रांना आणण्याची अहंकारयुक्त भाषा पाहून रामभक्तांमध्ये तीव्र चीड व्यक्त झाल्याचे दिसून आले. विलेपार्ले विधानसभेच्या डॉ. रमेश प्रभू यांच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्याचा आरोप ठेवून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. रमेश प्रभू यांचा मताधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला होता, याची आठवण ठेवून आजघडीला निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे १४० कोटी भारतीयांचे डोळे लागले आहेत.