![](https://emarmik.com/wp-content/uploads/2024/01/Shrikant-Ambre-new.jpg)
एकनाथ शिंदे
तेल गेले तूप गेले
हाती आले धुपाटणे
निवडणुकीत तेही जाईल
तेव्हा फक्त आपटणे
पक्ष चोरला, चिन्ह चोरले
चोरायाचे राहिले काय
तरीही लोक ऐकत नाहीत
म्हणती घालू नाकात पाय
तेव्हा जागा जिंकल्या ‘आम्ही’
आता करते भाजप दावा
म्हणते पक्ष फुटला तुमचा
निघून गेली तुमची हवा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
एकेक संपवू क्रमाक्रमाने
आधी शिंदे, नंतर दादा
माझा मार्ग मोकळा होईल
माझा हिशोब अगदी साधा
म्हणूनच घेतले या दोघांना
माझी डावी-उजवी बाजू
आता कुबड्या काढून घेऊ
लवकर त्यांना पाणी पाजू
कित्ती आहेत दोघे भोळसट
मी तर म्हणतो अगदी बावळट
कसे कळत नाहीत त्यांना
आमचे डावपेच किती बळकट
—– —– —–
अजित पवार
एवढे बळ कसे येते
ऐंशी पार गेले तरी
आमची हाडं दिसू लागली
जेव्हा दिसली ती सत्तरी
फक्त सुरू तोंडपट्टा
त्याला मात्र नाही लगाम
काका अगदी मोजकं बोलतात
तेव्हा मात्र फुटतो घाम
काय होणार कळत नाही
माझा विजय अगदी पक्का
पत्नी उभी नावापुरती
पुतणी देईल मोठा धक्का?
—– —– —–
विनोद तावडे
मी श्रेष्ठींना तेव्हाच बोललो
राज्यात आपले खरे नाही
कधी नव्हे ती आहे घसरण
राममंदिरही तारणार नाही
अजितदादा नि शिंदेशाहीचे
सगळे पडतील ते धडाधड
डुप्लिकेट पक्षांशी मैत्री
भाजपाचीही होईल परवड
आत्ताच त्यांच्या दावेदारीचा
पुरा घेऊन टाका कब्जा
तरच राहील भाजपाचीही
उरली सुरलेली लाजलज्जा
—– —– —–
नरेंद्र मोदी
कोण म्हणतो आम्ही आहोत
हिंदुस्थानचे हुकूमशहा
माझे नाव साधे सरळ
त्यांच्या नावात फक्त शहा
पाहताय तुम्ही दहा वर्षांत
निम्मी झाली महागाई
विरोधकच उरले नाहीत
आंदोलन तर एकही नाही
भ्रष्टाचारी मोट बांधून
संपवला ना भ्रष्टाचार
आता फक्त ठेकेदारांच्या
विकासाचा एकच विचार