पंडितांची शिस्त संघाच्या हिताचीच!
साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये गेल्या अंकात प्रशांत केणी यांचा ‘कठोर शिस्तीचा पंडित प्रयोग’ हा लेख खूपच आवडला. आयपीएल क्रिकेट सामने ऐन रंगात आलेले आहेत. प्रत्येक संघात अकरा या संख्येने कित्येक खेळाडू आपापल्या संघाच्या विजयासाठी झटत असतात. प्रत्येकाने कठोर शिस्त अंगीकारली तरच हा सामना यशस्वी होऊ शकतो.
बेभरवशाचा आणि नटखट विनोद कांबळी याच्याबद्दल या लेखात देण्यात आलेली कथा खूपच प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर आचरेकर सर कसे शिस्तबद्ध होते, कठोर होते त्याचाही प्रत्यय या लेखामधून वाचकांना येतो.
चंद्रकांत पंडित हेसुद्धा आचरेकर सरांचेच शिष्य. त्यामुळे त्यांच्या शिस्तीचा ‘आचरेकर पॅटर्न’ सर्वांनाच अनुभवायला आला आहे. हेदेखील या लेखातून समजले.
चंद्रकांत पंडित यांना मीही या बाबतीत खूप मानतो. रणजी करंडक स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत नसलेल्या संघांना विजेतेपद मिळवून देणारा प्रशिक्षक अशीच त्यांची ओळख आहे. म्हणूनच तर त्यांना ‘देशांतर्गत क्रिकेटमधील द्रोणाचार्य’ म्हटले जाते ते उगीच नाही. अलीकडे ‘मार्मिक’मध्ये सर्वच विषयांवर विस्तृत लेख येतात. ते वाचून खरोखर आनंद होतो. बदललेला ‘मार्मिक’ म्हणूनच मला खूप आवडतो.
– पांडुरंग सावंत, बारामती
– – –
भाजप आणि मोदींचा पराभव लोकशाहीसाठी आवश्यकच
देशभर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. भाजपाने कितीही मोठ्या आकड्याचा नारा दिला असला तरी भाजपा आता तडीपार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहीरच करून टाकले आहे. या निवडणुकीचे एकूण निकाल धक्कादायकच लागतील असे मला वाटते. कारण आज पंतप्रधान मोदींनी देशाचा कारभार करताना लोकशाही पूर्णपणे सोडली आहे. इतिहासातल्या हिटलरलाही या सरकारच्या कारभाराने हरवले आहे असे म्हणायची वेळ आली आहे.
विरोधी पक्षांना संपवणे वा त्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेणे, आपले मिंधे करून घेणे एवढेच काम भाजपने अलीकडच्या काळात केले आहे. देशात आणि पक्षातही आपल्याला विरोध करणारा नेता असूच नये असेच पंतप्रधान मोदींचे वर्तन आणि डावपेच आहेत. भाजपातही लोकशाही संपली आहे. लोकशाही सोडू नका असे राष्ट्रीय स्वयंसेुक संघ मोदींना सांगू शकत नाही, कारण मोदी पंतप्रधान असल्याने त्यांना तुमचे चुकत आहे असे सांगण्याची हिंमत संघातही नाहीये.
विरोधी पक्षांना फोडणारे कोणतेही सरकार आजवर टिकलेले नाही. यामुळे आता लोकशाही वाचवायची असेल तर मोदी हटाव देश बचाव असेच म्हणावे लागेल.
– आर. के. मुधोळकर
– – –
‘मार्मिक’च्या हिंमतीची दाद द्यायला हवी
आम्ही ‘मार्मिक’ आणि ‘सामना’ यांचे पूर्वीपासूनचे वाचक आहोत, याचा अभिमान वाटावा असा काळ सध्या आला आहे. आम्हाला एकेकाळी तटस्थ, परखड वगैरे वाटणार्या बहुतेक वर्तमानपत्रांनी आज भारतीय जनता पक्षाच्या आसुरी शक्तीपुढे नांगी टाकली आहे. न्यूज चॅनेलांवरची चमचेगिरी आणि भाटगिरी तर बघवत नाही.
वर्तमानपत्रांच्या जगात मोजकेच अपवाद असे आहेत जिथे सत्तेच्या विरोधात काही छापून येते. काँग्रेस, शिवसेना यांच्या बाबतीत परखड आणि टोकदार लिहिणार्या संपादकांची लेखणी मोदींचं नाव आलं की लुळी पडते. भाजपवर टीका करायची, पण इस्रायलचा, ट्रम्पचा दाखला देऊन, असला प्रकार पाहायला मिळतो. बाकीचे तर तेवढंही करत नाहीत.
सतत आरतीचं तबक घेऊन उभ्या असलेल्या सुवासिनींचा मेळा बनलेल्या प्रसारमाध्यमांच्या गर्दीत आज दै. सामनाची रोखठोक पत्रकारिता आणि मार्मिकचे सडेतोड प्रहार, फटकारे, बोचकारे एवढेच काय ते सत्ताविरोधी सूर उमटताना दिसतात. ‘मार्मिक’मध्ये संतोष देशपांडे, प्रशांत कदम यांचं राजकीय लेखन टीकेचा, अभ्यासाचा वस्तुपाठ ठरावं असं संतुलित असतं. सत्तेपुढे रांगणार्यांच्या गर्दीत मार्मिकचं हे वेगळेपण आम्हाला फार भावतं.
– श्रीपाद कुलकर्णी, सदाशिव पेठ, पुणे